तत्त्वज्ञान विचार करू शकत नाही, असा विचार जगात शिल्लकच राहिला नाही, असे कधीही घडत नसते. समाजाचे प्रश्न कोणते व त्यांच्या उत्तरांची संभाव्य दिशा कोणती असेल, याचे ‘शिस्तबद्ध दर्शन’ सातत्याने देणे, हा तत्त्वज्ञानाचा संसार!
दडपे पोहे, अळूचे फतफते, दहीबुत्ती, थालपीठ, साबुदाणा, आळंबी, आळुवडय़ा, सुरळीच्या वडय़ा, कोिथबीरवडी, मुगाची खिचडी, उपमा, इत्यादी.

पोळपाट-लाटणं, कढई, तवा-पातेलं, ताट-वाटी, खलबत्ता, पळी-गाळणी, उलथनं,  मिक्सर इत्यादी.   

तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, खिमा, कलेजी, चिकन फ्राय, मटन फ्राय, अंडाकरी, ऑम्लेट, हैदराबादी बिर्याणी, फ्राईड राईस, शेजवान इत्यादी.

थर्टी, सिक्स्टी, नाईन्टी, क्वार्टर, हाफ, खंबा, स्मॉल, लार्ज, सोडा, चकणा, इत्यादी.

हेडलाइन, अ‍ॅन्कर, सिंगल, डबल, सबिंग, संपादकीय पान, डेडलाईन..  इत्यादी

दादा, भाई, अम्मा, पेटी, खोका, घोडा, हप्ता, अथवा धर्मात्मा, सरकार, कंपनी, कॉर्पोरेट, इत्यादी.

हे आणि इतर असे शब्दसंच वाचले की एक चित्र आपल्या नजरेसमोर उभे राहते. शब्द कोणते आहेत हे कळाले, की त्यांचा जिथे उपयोग होतो त्या ज्ञानाचे क्षेत्र समजते. एवढेच नव्हे तर वापरणाऱ्याची जात, िलग, धर्म, वय, प्रांत, आíथक क्षमता, शिक्षण इत्यादीचा जणू काही साक्षात्कार होतो!!   
 ०
आता काही प्रश्न उपस्थित होतात, का ते पाहू..
स्वातंत्र्य, समता, बंधुता, व्यक्तिवाद, स्वायत्त व्यक्ती, निर्णयस्वातंत्र्य, स्त्री-पुरुष समता, िलगभेदरहित समाजजीवन, तृतीय िलगधारकांना नागरिकत्वाची मान्यता, आंतरजातीय विवाह, आंतरधर्मीय विवाह, धर्मनिरपेक्षता, सर्वधर्मसमभाव, इहवाद (सेक्युलरिझम), समान नागरी कायदा, इत्यादी. हे शब्द कोणत्या क्षेत्रातील आहेत?
आत्मा, जीवात्मा, शिवात्मा, विश्वात्मा, ब्रह्म, सत्य, अंतिम सत्य, मन, विचार करणारे इंद्रिय किंवा द्रव्य, ईश्वर, परमेश्वर, अल्लाह, गॉड, प्रेषित, देवदूत, पुरुषार्थ, अवतार, दशावतार, जिवाशिवाचे मीलन. हे शब्द कोणत्या क्षेत्रातील आहेत?
कर्म, कर्मफळ, स्वर्ग-नरक वा पाप-पुण्यरूपी अनिवार्य कर्मबंध, पुनर्जन्म, नशीब, सटवाई, विधिलिखित, कपाळकरंटा, बारसं, मुंज, सोडमुंज, दहावा, तेरावा, नारायण नागबळी, जारणमारण, भानामती इ. हे शब्द कोणत्या क्षेत्रातील आहेत?
स्त्री म्हणजे मोक्षमार्गातील धोंड, सती, विधवा, अवदसा, पांढऱ्या पायाची, बाईजात. रांडेच्या, िशदळकी, जाता जात नाही ती जात, जातीसाठी खावी माती, जात पंचायत, खाप पंचायत, इत्यादी. हे शब्द कोणत्या क्षेत्रातील आहेत?  
आता, या चार शब्दसंचातील शब्द हे केवळ बापुडवाणे शब्द नाहीत, त्या मूलभूत संकल्पना आहेत. त्या आपल्या शरीर, मन, बुद्धी, आत्म्यावर (मानला तर) आणि संपूर्ण जीवन व्यवहारांवर मजबूत पकड बसविलेल्या, अंतर्बाह्य़ विळखा घातलेल्या संकल्पना आहेत. एवढेच नव्हे तर जन्माला येण्यापूर्वी आईच्या पोटात असताना आणि मृत्यूनंतरही त्या आपला पिच्छा सोडत नाहीत. त्या आपल्या खासगी आणि सार्वजनिक जीवनाचे डीएनए बनलेल्या आहेत. म्हणून तर जात, जात नाही. किंबहुना ती शुक्राणूतच रुजते.   
या संकल्पना विचार करण्याच्या कोणत्या क्षेत्रात येतात? धर्म, धर्मसंस्था की तत्त्वज्ञान? या संकल्पनांची चर्चा, त्यांची चिकित्सा, त्यांचा खरेखोटेपणा, सत्य-असत्यता कुणी तपासावयाची? धर्ममरतड, धर्माचार्य, राजकारणी की सत्ताधिकाऱ्यांनी? मतदान करताना नेमकी कशाची चिकित्सा मतदार करीत असतो?  
आता, यातील कोणत्या संकल्पनांच्या आधारे जगत आहोत? किंवा आपण कोणत्या संकल्पनांच्या आधारे जगावयाचे आहे? लोकशाही जीवनरीत कोणत्या संकल्पनांच्या संचाने बनली आहे? आणि प्रत्यक्ष जीवन व्यवहाराच्या मुळाशी कोणत्या संकल्पनांचा चक्रव्यूह राजकारण करतो? या चक्रव्यूहात सामान्य माणसाचा अभिमन्यू झाला आहे की शिखंडी? ही चिकित्सा करताना अन्याय होणार नाही, याची काळजी कशी घ्यावी? बरे, मग आता, न्याय म्हणजे काय?   
हे सारे तत्त्वज्ञानाचे प्रश्न आहेत. मग, तत्त्वज्ञानाचा संसार कोणत्या शब्दांनी, संकल्पनांनी बनतो? याचे उत्तर असे की ज्ञान, अस्तित्व, तर्क, सौंदर्य आणि नीती या तत्त्वज्ञानातील पाच मूलभूत संकल्पनांच्या आधारे तत्त्वज्ञानाचा संसार चालू असतो. ज्ञानशास्त्र ज्ञानाची चर्चा करते, अस्तित्वशास्त्र अस्तित्वाची चर्चा करते, तर्काची चर्चा करते ते तर्कशास्त्र, सौंदर्याची चर्चा करते ते सौंदर्यशास्त्र आणि नीतीची चर्चा करते ते नीतिशास्त्र. या तत्त्वज्ञानाच्या शाखा आहेत.
या पाच संकल्पनांचा किंवा शाखांचा वरील सर्व संकल्पना संचातील प्रत्येकाशी नेमका कसा संबंध येतो? तो असा; उदाहरणार्थ, धर्म किंवा जात या नावाची काही एक गोष्ट ‘अस्तित्व’वान असेल तर त्याचे ‘ज्ञान’ होते कसे? अनुभवाने की तर्काने? धर्मात, जातीत ‘सुंदर’ काय आहे? धर्म-जातीचे पालन करण्यात कोणती ‘नतिकता’ आहे?  
आता, पाहा या संकल्पना व्यवहारात कशा येतात. स्वधर्म, परधर्म भयावह, सर्वधर्मसमभाव (किंवा इहवाद), आमचा पक्ष जात-धर्म मानीत नाही किंवा िहदू किंवा इस्लाम हा धर्म नाही, ती संस्कृती आहे; असा केला जाणारा दावा. अथवा जातीपातीचे राजकारण, जातवार गणना, राखीव जागा, स्त्री-पुरुष समता इत्यादी. या व अशा संकल्पना रोज वापरल्या जातात, तेव्हा त्या संकल्पनांचे ज्ञानशास्त्र, त्यांचे तर्कशास्त्र किंवा नीतिशास्त्र नेमके काय आहे? हे जाणणे हे सुखमय, शांत, समृद्ध जीवनासाठी अन्नाइतकेच गरजेचे असते.
अशी चिकित्सा करण्यासाठी तत्त्वज्ञानाच्या ज्ञानशास्त्र, अस्तित्वशास्त्र, तर्कशास्त्र, सौंदर्यशास्त्र आणि नीतिशास्त्र या पाच ज्ञानशाखा ही तात्त्विक विश्लेषणाची उपकरणे बनतात. म्हणून त्यांची ओळख प्रत्येकाला होणे आवश्यक आहे. प्रत्येक जण कोणत्या तरी धर्माचा, जातीचा, िलगाचा असतो आणि या सगळ्या संकल्पना त्याच्या जीवनावर नियंत्रण आणत असतात. मग त्या व्यक्तीची इच्छा असो की नसो!!
तत्त्वज्ञान ही सर्व कला, ज्ञान व विज्ञान यांची आई आहे, असे मत सिसिरो (इ.स.पूर्व १०६- ४३) या ग्रीक इतिहासकाराने मांडले आहे. कोलरीज (१७७२-१८३४) हा कवी-तत्त्ववेत्ता तत्त्वज्ञानाला विज्ञानाचे विज्ञान म्हणतो. ही दोन्ही मते नंतर अनेकांनी वेगवेगळ्या संदर्भात व्यक्त केली. (तत्त्वज्ञानाला ‘माता’च का म्हटले आहे, ‘पिता’ का नाही म्हटले गेले, याचे विश्लेषण ओघात नंतर कधी तरी करता येईल.)    
आता, जर तत्त्वज्ञान ही सर्व ज्ञानाची जननी असेल; तर तिचा संसार कोणता? तिचा संसार म्हणजेच ती अनंत संकल्पनांना जन्म देते, त्यावर आधारित जीवन व्यवस्थांचे पालनपोषण करते आणि दुष्ट, अधर्मी मुलांना प्रेमपूर्वक पूर्णविरामसुद्धा देते. म्हणून उदाहरणार्थ, प्लेटोचे राज्य अस्तित्वातच आले नाही आणि मदांध ब्रिटिश राज संपुष्टात आले, चेंगीजखान अन् नाझी भस्मासुर  अखेर भस्म झाला.
तत्त्वज्ञान हे रामकृष्ण परमहंसांच्या कालीसारखे दुष्ट मुलांचे निर्दालन करते. जी. ए. कुलकर्णीच्या ‘पाणमाय’ कथेतील केवळ प्रेममय ‘पाणमाय’ असते आणि ‘काली’ कथेतील मुमुक्षूची मुक्तिदाती ‘काली’ असते.
*लेखक संगमनेर महाविद्यालय, संगमनेर येथे तत्त्वज्ञान विभागप्रमुख आणि सहयोगी प्राध्यापक आहेत.
*उद्याच्या अंकात, पर्यावरणतज्ज्ञ व परिसर्ग  अभ्यासक  माधव गाडगीळ यांचे ‘उत्क्रांतियात्रा’ हे पाक्षिक सदर

Loksatta lokrang A collection of poems depicting the emotions of children
मुलांचं भावविश्व टिपणाऱ्या कविता
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
loksatta kutuhal artificial intelligence and research in mathematics
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि गणितातील संशोधन
artificial intelligence to develop ability to create substances with specific qualities
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्तेतून हव्या त्या गुणधर्मांचा पदार्थ
Where a giant animal like a dinosaur was destroyed, what happened to microscopic organisms! Man should take the initiative to protect biodiversity know more about
जैवविविधतेच्या संरक्षणासाठी माणसानेच पुढाकार घ्यावा
Loksatta chaturanga Parent Nature Confused Psychologist
सांधा बदलताना : संसार शांतीचा झरा…
loksatta readers feedback
लोकमानस: संशय आणि असुरक्षिततेचा परिणाम
loksatta readers feedback
लोकमानस: उतावीळपणा पुन्हा अंगलट!