शेतीच्या नीतिशास्त्राचे पाश्चात्त्य प्रारूप भारतालाही लागू पडेल, असे नव्हे. महात्मा जोतिबा फुले,
कॉ. शरद् पाटील, शरद जोशी ते  वंदना शिवा आदींनी केलेल्या मांडणीआधारे पुढील पावले
उचलता येतील का?

इतर कोणत्याही गोष्टीची वाट पाहाता येते, पण शेतीविकासाची नाही.
– जवाहरलाल नेहरू
शेतीचे तत्त्वज्ञान, शेतीचे नीतिशास्त्र या दोन संकल्पना आणि शेती, शेतकरी, शेतीउत्पादने हा विषय पाश्चात्त्य-युरोपीय अ‍ॅकेडेमिक विचारविश्वाच्या आज अग्रस्थानी आहे. ‘भारतीय शेतीचे तत्त्वज्ञान’ आणि ‘भारतीय शेतीचे नीतिशास्त्र’ हा विषय भारतीय अ‍ॅकेडेमिक विचारविश्वाच्या आणि शासकीय, प्रशासकीय निम्नसूचीतही कधीही आलेला नाही; पण आता तो अंमलबजावणीच्या पातळीवर अगदी ऐरणीवर अग्रस्थानी आणणे अत्यंत निकडीचे आहे.
या दोन्ही संकल्पनांचे देशी आणि समकालीन भारतीय प्रारूप बनविण्याकरिता काय करावे लागेल? उदाहरणार्थ, एक प्रारूप पाहू. ते असे : अमेरिकेतली नॉर्थ टेक्सास युनिव्हर्सटिीच्या धर्म आणि तत्त्वज्ञान विभागाने नुकताच ‘अन्नाचे तत्त्वज्ञान प्रकल्प’ (द फिलॉसॉफी ऑफ फूड प्रोजेक्ट) सुरू केला आहे. तात्त्विक संशोधनाचा एक मूलभूत विषय म्हणून शेती आणि अन्न हा चर्चाविश्वात अग्रस्थानी आणणे, त्यातील नव्या तात्त्विक संशोधनाची माहिती राज्यकत्रे, धोरणकत्रे व सामान्य लोकांना देणे या विषयातील आंतरविद्याशाखीय संशोधकांना व इतर जिज्ञासू मंडळींना एकत्र आणणे हे या प्रकल्पाचे स्वरूप आहे. शेतीचे सत्ताशास्त्र, ज्ञानशास्त्र, नीतिशास्त्र, तर्कशास्त्र, सौंदर्यशास्त्र अशा मुख्य शाखा विकसित करून शेतीचे तत्त्वज्ञान ही नवी रचना ते निर्माण करीत आहेत. त्याचप्रमाणे अन्नाचे राज्यशास्त्र, अन्नतंत्रज्ञान आणि अन्नाशी जोडला गेलेला माणसाचा आत्मपरिचय व सामाजिक न्यायाचे वितरण (फूड आयडेंटिटी अँड जस्टिस) या विषयांचाही समावेश त्यांनी शेतीच्या तत्त्वज्ञानात केला आहे. त्यावर आधारित अभ्यासक्रम अनेक विद्यापीठे आणि महाविद्यालये, शाळा येथे शिकविले जातात. शेती, शेतीतील प्रत्येक कृती आणि शेतकऱ्यावर प्रेम (म्हणजे त्याचे अस्सल वास्तव कल्याण) हा शेतीच्या तत्त्वज्ञानाचा मुख्य गाभा कायम ठेवून अनेक दृष्टिकोनांतून अभ्यास, संशोधन व लेखन यात होते आहे. या समग्र अभ्यासाची गंभीर दखल घेऊन सरकार, न्याय विभाग काटेकोर अंमलबजावणी करते.
अर्थात हे प्रारूप आपणाला लागू पडेल किंवा तेच स्वीकारले पाहिजे, असे नाही. भारतीय शेतीचे सत्ताशास्त्र, ज्ञानशास्त्र, नीतिशास्त्र, तर्कशास्त्र, सौंदर्यशास्त्र रचून आपण आपले देशी ‘भारतीय शेतीचे तत्त्वज्ञान’ विकसित करू शकू. काहीएक सुरुवात करणे आवश्यक आहे.  
पाश्चात्त्यांनी त्यांच्या तत्त्वज्ञानात शेतीधोरण शोधले तसे आपणही आपल्या तत्त्वज्ञानात काही बीज सापडते का ते पाहावयाचे, त्यात समकालीन कालसुसंगत भर टाकावयाची आणि त्यातून ‘भारतीय शेतीचे तत्त्वज्ञान’ विकसित करावयाचे. उदाहरणार्थ, कृषिसूक्त, भूमिसूक्त, अन्नसूक्त यांना आणि अन्नाचे रूप धारण करणारे देव आणि अन्नाची इच्छा व्यक्त करणाऱ्या शेकडो ऋचांना ज्येष्ठ विचारवंत स. रा. गाडगीळ अन्नब्रह्मवाद (फूड फिलॉसॉफी) म्हणतात. जमिनीचे व्यवस्थापन, निगराणी, महसूल आणि शेती व्यवसायाचा धोरणात्मक विचार बादशहा अकबर, त्याचे अधिकारी राजा तोडरमल आणि मुझफ्फर खान या अधिकाऱ्यांनी आणलेली मनसबदारी पद्धती, छत्रपती शिवरायांची ‘आज्ञापत्रे’, त्यानंतर म. जोतिराव फुल्यांच्या लेखनात आढळतो. इंडियन कौन्सिल फॉर फिलॉसॉफिकल रिसर्च या भारतातील तत्त्वज्ञानाच्या शिखर संस्थेने बाराव्या शतकापर्यंतचा भारतीय शेतीचा इतिहास खंड रूपाने (सं. लल्लनजी गोपाल, व्ही. सी. श्रीवास्तव) प्रसिद्ध केला आहे. त्यात अनेक आधार मिळू शकतात.
शेतीकडे अर्थव्यवस्थेचा कणा व जीवनाचे इहवादी तत्त्वज्ञान म्हणूनच पाहणे हे भारतीय शेतीचे तत्त्वज्ञान या विषयाची तात्त्विक बाजू मानता येईल. नियती, नशीब, कर्मफळ, जातिव्यवस्था, स्त्रीशोषण यांचा पुरस्कार करणारे पारंपरिक जीवनविषयक तत्त्वज्ञान; त्यावर आधारित पुराणे, कथा, प्रवचने इत्यादी साहित्याचा त्याग करणे आणि नवे शेतीपूरक, शोषणरहित, समतापूर्ण सामाजिक न्यायाचा पुरस्कार करणारे विचार परंपरेत शोधणे किंवा निर्माण करणे, जगातील ज्या तत्त्वज्ञानातून अशी तत्त्वे मिळतील तिथून ती आत्मसात करणे, त्यांचा समावेश करून या नव्या तत्त्वज्ञानाची रचना करणे ही भारतीय शेतीच्या तत्त्वज्ञानाची काही आधारभूत तत्त्वे मानता येतील.
शेतीला प्राधान्य देणारे भारतीय शेतीचे तत्त्वज्ञान रचले गेले की भारतीय शेतीचे नीतिशास्त्र रचता येईल. त्यासाठी भारतीय शेती व्यवसायाचा इतिहास, विद्यमान स्थिती आणि आधुनिक जागतिक नीतिव्यवस्था यांची सांगड घालणे आवश्यक आहे. भारतीय शेतीच्या नीतिशास्त्राचा मुख्य विषय भारतीय समाजजीवनास चपखल लागू असणारी सार्वजनिक धोरणे निश्चित करणे हा आहे. पण भारतीय शेतीक्षेत्राचा इतिहास पाहिल्याशिवाय भारतीय शेतीचे नीतिशास्त्र रचणे फार कठीण आहे. भारताला विस्तीर्ण भूगोल आणि जडशीळ ओझं बनलेला प्रदीर्घ इतिहास आहे. तो शेती इतिहासाबरोबर वर्णजाती-जमाती व िलगभेदग्रस्त शोषणव्यवस्थेचाही इतिहास आहे. कॉ. शरद पाटील, देबिप्रसाद भट्टाचार्य, आ. ह. साळुंखे, वंदना शिवा यांच्यासारख्या अनेक तज्ज्ञांनी त्या इतिहासावर बोट ठेवले. भारतीय शेतीचे आधुनिक नीतितत्त्वज्ञ म्हणून म. जोतिराव फुले आणि कॉ. शरद पाटील आणि समकालीन शेतीनीतिशास्त्रज्ञ म्हणून शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांचे नाव घेणे अनिवार्य आहे.
‘आम्ही आपल्या स्थानिक गरजेवर आधारित शेतीनीतिशास्त्राची व्याख्या कशी करावी? ही आमची समस्या आहे’, असा प्रश्न आधुनिक काळातील शेतकऱ्यांच्या नव्या पिढीने उपस्थित केला पाहिजे. आधुनिक विद्य्ोची जोड देऊन विद्यमान भारतीय समाजव्यवस्था आणि भारतीय मानसव्यवस्था लक्षात घेऊनच सार्वजनिक हिताची धोरणे शेतीनीतिशास्त्राच्या सूचीत निश्चित करता येतील. समाजसेवा (सोशल सव्‍‌र्हिस), व्यवसाय (प्रोफेशन), धंदा (बिझनेस), आवडीचा छंद (व्होकेशन), नफेखोरीचा धंदा (ट्रेड),  उद्योगसमूह (कॉपरेरेशन/ कंपनी)  यातील नेमके काय म्हणून शेतीकडे पाहावायचे हे धोरण ठरविणे हा भारतीय शेतीच्या नीतिशास्त्राचा कळीचा प्रश्न मानता येईल.
शेतीचे नीतिशास्त्र हा प्रकल्प राबविण्याकरिता पाश्चात्त्य तत्त्ववेत्त्यांनी उपयोजनात आणलेली वैचारिक उपकरणे, साधने व पद्धती यांचा पुरेपूर उपयोग ‘भारतीय शेतीचे नीतिशास्त्र’ रचताना होऊ शकतो. त्यांना भारतीय तत्त्वज्ञानातील आणि इतर विचारविश्वातील वैचारिक उपकरणे, साधने व पद्धती यांची जोड देता येईल. त्यास ‘भारतीय शेतीचे तर्कशास्त्र’ म्हणता येईल.
या विद्याशाखा आकारल्यानंतरच त्यांचा समावेश शालेय, महाविद्यालयीन आणि विद्यापीठीय पातळीवर करता येईल.
जगात सर्वत्र तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात शेती तत्त्वज्ञान व शेती नीतिशास्त्रविषयक व्यापक वैचारिक साहित्य निर्माण करण्याचे काम वेगात सुरू आहे. विशेषत: अमेरिकन विद्यापीठात अनेक पदव्या, अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. जगप्रसिद्ध भिख्खू बुद्धदास (१९०६-१९९३) यांची शेतीधम्म (अ‍ॅगी्र धम्मा)  ही संकल्पना िलडसे फालयेव या विचारवंताने थाई भाषेतून इंग्रजीत आणली आहे. फूड पॉलिटिक्स (मेरीओन नेसले २०१३), फिलॉसॉफी ऑफ फूड (सं. डेविड काप्लान, २०१२), फूड अँड फिलॉसॉफी (फ्रित्झ ऑलहॉफ, डेव मनरो, २००७), कुकिंग, ईटिंग, िथकिंग : ट्रान्सफॉरमेटिव्ह फिलॉसॉफीज ऑफ फूड (डीएन कर्टीन, लिसा हेल्डेक, १९९२) ही पाश्चात्त्य ग्रंथांची वानगीदाखल काही नावे.
भारतीय शेतीचे तत्त्वज्ञान व नीतिशास्त्र तयार करण्यासाठी मंत्रिमंडळ, अधिकारी वर्ग, शेतीतज्ज्ञ, शेतीशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, क्षेत्रीय अभ्यासक, शेतकरी संघटना, माध्यमे, बिगरसरकारी संस्था, रसायन, भूगोल, पर्यावरण, जैवतंत्रज्ञान, जीवशास्त्र, अभियांत्रिकी या विषयांतील तज्ज्ञ, सीए इन्स्टिटय़ूट, तत्त्ववेत्ते व व्यावसायिक तत्त्ववेत्ते आणि आणखीही गरजेनुसार इतर तज्ज्ञ आणि कार्यकत्रे यांनी एकत्र येणे तातडीचे आहे.
*लेखक संगमनेर महाविद्यालय, संगमनेर येथे तत्त्वज्ञान विभागप्रमुख आणि सहयोगी प्राध्यापक आहेत.

maharashtra assembly election 2024 many agricultural work disrupted due to election campaigning
प्रचारामुळे शेतीकामे ठप्प! शेतमजुरी ३००; तर राजकीय पक्षांकडून जेवणासह ४०० रुपये
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Bad weather in Mumbai Measures against pollution Mumbai print news
मुंबईत निवडणुकीपर्यंत प्रदूषणाचा त्रास; मनुष्यबळाअभावी पालिकेची यंत्रणा हतबल
Mallikarjun kharge nashik rally
“महायुतीचे सरकार विचारधारेवर नव्हे, खोक्यावर बनलेले”, मल्लिकार्जुन खरगे यांची टीका
banana cultivation farmer kiran gadkari tried different experiment for banana farming
लोकशिवार: आंतरपिकातील यश !
what is the reason that Sea fish became expensive
मासे परवडत नाहीत, मत्स्याहारींनी करायचे तरी काय?
Increase in cotton soybean prices print politics news
कापूस, सोयाबीनच्या दराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; निवडणूक काळात शेतकऱ्यांमध्ये रोष
maharashtra pollution control board to submit report to ngt on noise pollution
सर्वच गणेश मंडळांकडून ध्वनिप्रदूषण! महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ देणार ‘एनजीटी’ला अहवाल