‘हे (कुणबी, माळी व धनगर) पूर्वी एकाच शूद्र शेतकरी जातीचे असावेत’ हे जोतिरावांच्याच ‘शेतकऱ्याचा असूड’मध्ये आढळणारे सूत्र धरून त्याच्या आधारे फार प्राचीन काळातील नव्हेत, पण जोतिरावांच्याच मागे-पुढे घडलेल्या व घडणाऱ्या घटनांची संगती लावता येते का, हे पाहणे समाजाच्या स्थितीगतीच्या संदर्भात उद्बोधक ठरावे..
समाजाच्या स्थितीचा व गतीचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणून समाजशास्त्राकडे पाहणारा फ्रेंच विचारवंत ऑगस्त कोंत हा कार्ल मार्क्सचा समकालीन. अर्थात स्वत: मार्क्सला कोंतबद्दल काहीसा आदरभाव नव्हता हा भाग वेगळा. समाजाच्या स्थितीगतीचा अभ्यास करणारी मार्क्सची पद्धत कोंतच्या पद्धतीशी जुळणारी नसल्यामुळे ते स्वाभाविकच समजले पाहिजे.
महाराष्ट्रात कोंतच्या विचारपद्धतीचा अवलंब राजवाडे आणि टिळक यांनी केला. मार्क्सच्या विचारपद्धतीचा उपयोग करण्याचा प्रारंभ जरी धर्मानंद कोसंबी यांनी केला असला, तरी तो प्रभावीपणाने करण्याची प्रक्रिया विसाव्या शतकाच्या तिसऱ्या दशकात सुरू झाली असे म्हणता येते. दरम्यानच्या काळात विद्यापीठीय वर्तुळात समाजशास्त्र नावाचा विषय अधिकृतपणे दाखल झाला. मधल्या काळात कोंतला गंभीरपणे घेण्याचे काही कारण उरले नसले, तरी मार्क्सवादी पद्धतीनुसार समाजशास्त्राची रचना करणे सुरू झाले होते.
कोंत आणि मार्क्स यांच्या समकालीन असलेला मराठी विचारवंत म्हणजे जोतिराव फुले. विशेष म्हणजे कोंत आणि मार्क्स समाजासंबंधी तिकडे काही वेगळी मांडणी करीत असताना इकडे जोतिराव भारतीय समाजाविषयी व विशेषत: या समाजातील जाती व लिंग यावर आधारित असलेल्या विषमतेविषयी बोलत होते. भारतात तेव्हा ना कोंत माहीत होता, ना मार्क्स. तेव्हा ते फुल्यांनाही माहीत असण्याचे कारण नव्हते. फुल्यांचे विचार हा स्वत: फुल्यांच्याच आर्ष प्रतिभेच्या आविष्कार होता. ते विद्यार्थिदशेत होते तोपर्यंत मुंबई विद्यापीठाची स्थापनाही झाली नव्हती. त्यामुळे त्यांना सामाजिक शास्त्रामध्ये वापरात असलेल्या कोणत्याही मेथडॉलॉजीचा परिचय असल्याचेही कारण नव्हते. तरीही भारतीय समाजाच्या स्थितीगतीचे त्यांनी केलेले विश्लेषण थक्क करणारे आहे यात संशय नाही.
जोतिरावांच्या १८८३ साली प्रसिद्ध झालेल्या ‘शेतक ऱ्यांचा असूड’ या पुस्तकाच्या उपोद्घाताच्या प्रारंभी त्यांनी केलेले विधान या दृष्टीने फार महत्त्वाचे आहे आणि सुदैवाने सध्या ते अवतरणक्षम अवतरणांमध्ये अग्रभागीही असते.
‘विद्येविना मती गेली; मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली!
गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले.’
अविद्येत सर्व अनर्थपरंपरेचे कारण मानण्याचा विचार जोतिरावांपूर्वी भगवान बुद्धापासून आदिशंकराचार्यापर्यंत प्रचलित होता. विशेषत: बुद्धांनी तर दु:खाचे निदान करताना असेच एक चक्र सांगितले होते. द्वादशनिदान म्हणून प्रसिद्ध असलेल्या या बुद्धविचाराचे लक्ष्य व्यक्तीला भोगावे लागलेले दु:ख हे होते. बुद्धविचारांना द्वादशनिदान म्हणतात. कारण त्यात एकूण १२ दुव्यांचा समावेश आहे. फुल्यांनी सांगितलेल्या कारणपरंपरेत सहा दुवे आहेत. त्यामुळे तिला षड्निदान म्हणायला हरकत नाही. मात्र फुल्यांचा भर व्यक्तीच्या ऐवजी समूहावर आहे. हा फरक लक्षात घ्यायला हवा. शूद्रांच्या या खचलेल्या अवस्थेला ते लगेचच ‘दैन्यवाणी स्थिती’ असे म्हणतात व तिची कारणपरंपरा सांगण्याचा अर्थात निदान करण्याचाही प्रयत्न करतात. या कारणाचे वर्गीकरण त्यांनी ‘धर्मसंबंधी’ व ‘राज्यसंबंधी’ अशा दोन वर्गात केले आहे. (या सर्व खटाटोपामागचा हेतू शूद्रांची मुक्ती हा आहे, हे वेगळे सांगायची गरज नाही.) वित्ताचा उल्लेख अगोदरच झालेला आहे. त्यामुळे फुल्यांच्या विचारात धर्मकारण, अर्थकारण आणि सत्ताकारण यांचा स्पष्ट उल्लेख आहे, असे निश्चितपणे म्हणता येते. ‘अविद्ये’चा उल्लेख हा खरे तर ज्ञानकारणाचा उल्लेख आहे, असे म्हणण्यातही काही अतिशयोक्ती नाही.
जोतिरावांच्या उपरोक्त ओळीमधील ‘गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले’ या अंशाकडे मी लक्ष वेधू इच्छितो. सुरुवात ‘वित्ताविना शूद्र खचले’पासून करू. फुल्यांची ‘शेतक ऱ्यांचा असूड’ ही कृती शेतक ऱ्यांच्या समस्यांसंबंधी असल्यामुळे ‘शूद्र’ या शब्दाने त्यांना शेतकरी वर्गच अभिप्रेत आहे याविषयी शंका घ्यायला जागा नाही. पण या शेतक ऱ्यांचे आणखी विश्लेषण करताना त्यांनी त्यांचे तीन भेद सांगितले आहेत. ‘मूळचे जे लोक शुद्ध शेतकीवर आपला निर्वाह करू लागले, ते कुळवाडी अथवा कुणबी, जे लोक आपले शेतकीचे काम सांभाळून बागायती करू लागले, ते माळी व जे ही दोन्ही करून मेंढरे, बकरी वगैरेंचे कळप बाळगू लागले ते धनगर, असे निरनिराळ्या कामांवरून प्रथम हे भेद उपस्थित झाले असावेत. परंतु, आता या तीन पृथक जातीच मानतात. हे (कुणबी, माळी व धनगर) पूर्वी एकाच शूद्र शेतकरी जातीचे असावेत. आता पुढे या तिन्ही जातींतील लोक आपला मूळचा शेतकीचा धंदा निरुपायाने सोडून उदरनिर्वाहास्तव नाना तऱ्हेचे धंदे करू लागले.’ जोतिरावांनी दिलेले हे सूत्र धरून त्याच्या आधारे फार प्राचीन काळातील नव्हेत, पण जोतिरावांच्याच मागे-पुढे घडलेल्या व घडणाऱ्या घटनांची संगती लावता येते का, हे पाहणे समाजाच्या स्थितीगतीच्या संदर्भात उद्बोधक ठरावे.
फुले ज्यांना शूद्र शेतकरी समजतात, त्यांच्यापैकी एक गटाची म्हणजे कोरडवाहू शेती करणाऱ्या कुणब्यांची साधारणपणे इ.स. १६४५ पासून १८१८ पर्यंत चढती कमान होती. शिवाजी महाराजांनी स्वराज्यसाधनेचा उपक्रम सुरू केला, तेव्हा त्यांच्यातील लढवय्या क्षत्रियांनी विजापूर दरबारात आपले बस्तान बसवले होते. (अहमदनगरच्या बुडीत निजामशाहीतील लढवय्ये एकतर विजापूरकराच्या किंवा दिल्लीपती मोगलांच्या आश्रयास गेले होतेच.) पण असे देशमुख पाटलादी लोक संख्येने थोडेच असणार. स्वराज्याच्या उदयापासून तर सातारकर शाहू महाराजांच्याच कारकिर्दीपर्यंत व त्यानंतरही मराठय़ांच्या राज्यांचा विस्तार उत्तरोत्तर होतच राहिल्यामुळे शेती सांभाळून (किंवा तिच्याकडे दुर्लक्ष करून?) लष्करी पेशा अंगीकारणाऱ्याची संख्या वाढतच गेली. हा विस्तार इतका व्यापक होता, की फुले ज्याला शेतक ऱ्यांमधील पशुपालक म्हणतात, त्या समाजातील होळकरासारख्यांनाही त्यात सामावून जाता आले. अर्थात हे लोक फार होते असे मात्र नाही. अपवादानेच होते. या प्रकारामुळे म्हणजेच मराठी समाजाची ‘गती’ वाढल्यामुळे महाराष्ट्राची भरभराट होत होती. शेतीच्या अनिश्चित उत्पन्नाबरोबर आता लष्करी पेशातून येणारा पगार, खंडणी, लूट, महसूल इ. माध्यमांतून कुणबी-शेतक ऱ्यांचे ‘वित्त’ वाढीस लागले.
१८१८ साली ब्रिटिशांनी पेशवाई बुडवून मराठय़ांच्या राज्याची इतिश्री केल्यानंतर ही परिस्थिती पार पालटून गेली. मराठय़ांच्या हिंदुस्थानभर चाललेल्या मोहिमांना व वसुलीला एकदम पायबंद बसला. बडोदा, ग्वाल्हेर, इंदूर अशी संस्थाने ब्रिटिशांनी राखली असली, तरी त्यांच्याही मोहिमा, लढाया व वसुल्या थंडावल्या व थांबल्या.
मराठय़ांची ही गती अशा प्रकारे थांबल्यानंतर या प्रकाराचा परिणाम महाराष्ट्रातील त्यांच्या वित्तावर झाल्याशिवाय कसा राहील? त्यांच्यावर एकदम १६४५ च्या अगोदरच्या परिस्थितीत प्रविष्ट होण्याची वेळ आली. त्यांच्यावर परत पूर्ववत शेतीवर अवलंबून राहण्याची वेळ आली. या ठिकाणी एक मुद्दा विचारात घेणे गरजेचे आहे. फुल्यांनीच निदर्शनास आणल्याप्रमाणे माळी समाज बागाईत म्हणजे थेट पावसाव्यतिरिक्त पाण्यावर शेती करण्यात तरबेज होता. किती तरी वेळा त्याने पाण्याचा मागोवा घेत स्थलांतरे केली आहेत. शिवाय अगोदरच्या दोनएकशे वर्षांच्या काळात त्याने मराठा शेतक ऱ्यांप्रमाणे लढायाबिढायांच्या भानगडीत फारसे स्वारस्य दाखवले नव्हते. असेच काही पशुपालक शेतक ऱ्यांच्या बाबतीतही म्हणता येईल. दुसरे असे, की मल्हारबाबांनी उत्तरेत राज्य चालवले असले, तरी महाराष्ट्रात त्यांच्या मालकीचे मेंढय़ांचे कळप फिरतच असत.
मराठा शेतक ऱ्यांच्या बाबतीत अशी काही व्यवस्था नव्हती. एक तर पावसावर अवलंबून असलेल्या शेतीला नेहमी बसणारे अवर्षणाचे फटके आणि दुसरे म्हणजे ब्रिटिशांची अगदी वेगळ्या प्रकारची महसूल व्यवस्था. फुल्यांनी ‘असूड’ लिहिला, तेव्हा तर लोकल फंड नावाचा आणखी एक कर शेतक ऱ्यांच्या डोक्यावर बसला होता. त्यामुळे एके काळी अगदी नुकताच राज्य स्थापणारा, वाढवणारा व राज्याचा कारभार पाहणारा, मोहिमांच्या निमित्ताने संपूर्ण हिंदुस्थान घोडय़ांच्या टापांखाली तुडवणारा हा वर्ग अस्मानी आणि सुलतानी संकटांनी ग्रस्त होऊन हतबल बनला होता. ‘शेतक ऱ्यांचा असूड’मध्ये जोतिरावांनी केलेले वर्णन सर्वसाधारणपणे सर्वच शेतक ऱ्यांना लागू पडत असले, तरी ते विशेषकरून कुणबी मराठा शेतक ऱ्यांच्या बाबतीत अधिक खरे आहे. त्यांच्या या दु:स्थितीत भर पडली ती आपण राज्यकर्ते असलेल्या एका ‘कॉम्प्लेक्स’ची.
अशी अवस्था ब्राह्मणांवर यायचे काही कारण नव्हते. १८१८ नंतर राज्य व्यवहारातून बाहेर फेकले गेल्यावर त्यांनी आपले लक्ष पूर्वीप्रमाणे अध्ययनावर केंद्रित केले. फरक एवढाच, की पूर्वी ते संस्कृतचा अभ्यास करायचे, आता इंग्रजीचा करू लागले. त्याच्या जोरावर त्यांनी इंग्रजांच्या राज्य यंत्रणेत नोक ऱ्या पटकावल्या. कुणबी-मराठा-शूद्र-शेतकरी मागे पडले ते पडलेच. त्यांची गती खुंटली म्हणून त्यांचे वित्त गेले.
* लेखक पुणे विद्यापीठात तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक असून संतसाहित्याचे व्यासंगी व विचारवंत आहेत. त्यांचा ई-मेल – sadanand.more@rediff.com
* उद्याच्या अंकात गिरीश कुबेर यांचे ‘अन्यथा’ हे सदर
गतीविना वित्त गेले..
‘हे (कुणबी, माळी व धनगर) पूर्वी एकाच शूद्र शेतकरी जातीचे असावेत’ हे जोतिरावांच्याच ‘शेतकऱ्याचा असूड’मध्ये आढळणारे सूत्र धरून त्याच्या आधारे फार प्राचीन काळातील नव्हेत, पण जोतिरावांच्याच मागे-पुढे घडलेल्या व घडणाऱ्या घटनांची संगती लावता येते का, हे पाहणे समाजाच्या स्थितीगतीच्या संदर्भात उद्बोधक ठरावे..
आणखी वाचा
First published on: 24-01-2014 at 12:35 IST
मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jyotirao phule focussed wide range of issues