तसे सदाशिव अमरापूरकर यांचे व्यक्तिमत्त्व काही देखणे या सदरातले नव्हे. रंगही नावापुरताच गव्हाळ वगैरे. पोट सुटलेले आणि हसल्यानंतर स्पष्टपणे दिसणाऱ्या दंतपंक्ती. डोळ्यांत मात्र एक विशिष्ट प्रकारची लकाकी. आतुर, कुतुहलाने भारलेले आणि सहजपणे समोरच्याला कवेत घेऊ पाहणारे. अहमदनगरसारख्या शहरात राहून साऱ्या देशावर राज्य करण्याचे स्वप्न उराशी बाळगण्यासाठी हाताशी केवळ अभिनयाची हौस आणि खूप खोल पोहोचलेली जाण एवढेच. अशा गुणांचे चीज त्या शहरात होण्याची वाट पाहत राहणे, म्हणजे दीर्घकाळचा प्रवास. अमरापूरकर यांनी आपल्याला उत्तम भूमिका मिळाव्यात, यासाठी कधी कुणाच्या पुढेपुढे केले नाही, की एखादी ‘पीआर एजन्सी’ गाठली नाही. त्यांचा दुर्दम्य विश्वास होता, तो अंगच्या कलागुणांवर. पण जगणे असे केवळ कलेपुरते सीमित करण्यापेक्षा आजूबाजूला घडत असलेल्या घटनांनी थरारून जाण्याएवढी संवेदनशीलता त्यांच्यापाशी होती. त्याला वाचनाची, अभ्यासाची आणि चिंतनाची जोडही होती. त्यामुळे कलावंतांच्या दुनियेत ते नेहमीच वेगळेपणाने उठून दिसत. नाटकाच्या दुनियेत आपल्या अभिनय कौशल्याने सदाशिव अमरापूरकर यांना सतत काही नवे मिळत गेले. अंगच्या गुणांवरील विश्वास रसिकांकडूनही द्विगुणित झाल्याने अभिनयातील प्रतिभा नवोन्मेषी होणे ही स्वाभाविक गोष्ट बनली. अमरापूरकरांचा आवाज काही कमावलेला नव्हता. पण संवादात आपल्या याच आवाजाने, त्यांनी इतरांसमोर एक वेगळेच आव्हान उभे केले. कलावंतपण आतून असावे लागते, यावर दृढ निष्ठा असल्याने ते जपत राहणे, त्यांच्यासाठी सतत महत्त्वाचे होते. नाटय़सृष्टीत स्थिरावत असताना विजय तेंडुलकर यांच्या नजरेतून अमरापूरकर सुटणे शक्यच नव्हते. हा नट काही तरी वेगळा आहे, त्याची लकब अधिक ठाशीव आहे आणि त्याच्याकडून काढून घेण्यासारखेही खूप आहे, याची जाणीव असल्यानेच तेंडुलकरांनी ‘अर्धसत्य’ या चित्रपटासाठी गोविंद निहलानी यांच्याकडे अमरापूरकर यांच्या नावाचा आग्रह धरला. तो वृथा नव्हता, हे चित्रपट पाहिलेल्या प्रत्येकाला जाणवलेच. मराठी रंगभूमीवरील एक ताकदीचा नट हिंदी चित्रपटांच्या दुनियेत एका वेगळ्याच पद्धतीने पोहोचला होता. तोवर चित्रपटांमधील व्हिलन एका चाकोरीत रुतून बसला होता. ही चाकोरी मोडून, एक नवा व्हिलन निर्माण करणे ही साधी गोष्ट नव्हती. रामा शेट्टी या व्यक्तिरेखेतील अनेक बारकावे अमरापूरकरांनी अशा काही ताकदीने सादर केले, की त्याने सारी चित्रपटसृष्टी थक्क होऊन गेली. नाटकाच्या तालमीत रंगणारा हा अभिनेता कॅमेऱ्यासमोर जणू अनेक वर्षे उभा राहतो आहे, अशी खात्री वाटावी, इतक्या कमालीच्या आत्मविश्वासाने ते चित्रपटभर वावरले. नंतर भूमिकांची रांग लागणे आणि त्यांनाही एका चाकोरीत अडकून पडायला होणे या स्वाभाविक घटना होत्या. पण अमरापूरकर इतरांपेक्षा वेगळेच खरे. त्यांनी आपले वाचन थांबवले नाही, सामाजिक भान सोडले नाही आणि चाकोरीतून बाहेर पडण्याच्या अनेकानेक वाटा शोधून काढल्या. मग सामाजिक कृतज्ञता निधीसारख्या उपक्रमाशी त्यांनी स्वत:ला जोडून घेतले आणि नगरच्या जोशीबुवांनी प्रचंड खस्ता खाऊन उभ्या केलेल्या  वस्तुसंग्रहालयासाठी आवश्यक असणारा निधी उभारण्यासाठी खटपटी केल्या आणि ते संग्रहालय दिमाखात उभे राहील, याची हमी घेतली. गावोगाव नाटकाचे प्रयोग करून त्यातून मिळणारा निधी सामाजिक कामासाठी उपयोगात आणणाऱ्या अनेक उपक्रमांत अमरापूरकर शेवटपर्यंत कार्यरत राहिले. सडक चित्रपटातील महाराणीची भूमिका समरसून करणाऱ्या या अभिनेत्याला तळातल्या समाजाशी आपले नाते घट्ट करायचे होते. जमिनीवर राहण्याचे भान असणाऱ्या लोकप्रिय व्यक्ती संख्येने नेहमीच कमी असतात. अमरापूरकर यांच्या निधनाने ती कमी आणखी वाढली आहे.

Story img Loader