लव्ह जिहादसाठीचे तथाकथित दरपत्रक जाहीर करणारे किंवा दहशतवादाला देशातील कत्तलखान्यांतून पैसा पुरवला जात असल्याचा आरोप करणाऱ्या मेनका गांधी, यांसारखे सहकारी मोदी यांच्यासाठीच उपद्रवी ठरणार आहेत. हे ओळखून त्यांना वेळीच आवरायला हवे..  
नरेंद्र मोदी यांच्या राज्यारोहणामुळे बेजबाबदारांच्या आचरटपणास आलेले उधाण हे देशातील सुज्ञांची काळजी वाढवणारे खचितच आहे. विख्यात विधिज्ञ फली नरिमन वा ज्येष्ठ सनदी अधिकारी माधव गोडबोले यांनी स्वतंत्रपणे या संदर्भात व्यक्त केलेली चिंता ही किती रास्त आहे हे एकाच दिवसात साक्षी महाराज आणि मेनका गांधी आदींनी दाखवून दिलेले आहे. आतापर्यंत पद्धत अशी की मंत्रिमंडळातील वा पक्षातील कोणा अतिउत्साही नेत्याने काही बेजबाबदार भाष्य केलेच तर त्याचे कान पिळणारे ज्येष्ठ हे पक्षात वा सरकारात असत. नरिमन यांनी दिल्लीत विधिज्ञांसमोर बोलताना आणि मुंबईत लोकसत्ताच्या कार्यालयात भाष्य करताना गोडबोले यांनी या संदर्भातच चिंता व्यक्त केली. ती रास्त होती. कारण मोदी यांच्या सरकारात आणि अमित शहा यांच्या पक्षात या अशा मुक्तउपद्रवी पाखरांना आवरणारे कोणी दिसत नाही. मोदी यांचे सत्ताग्रहण हे अतिरेकी हिंदुत्ववादावर झालेले शिक्कामोर्तबच आहे असे अनेकांना वाटू लागले असून ही मंडळी कानात वारे गेल्यासारखी उधळताना दिसतात. साक्षी नामक कोणी महाराज आणि मेनका गांधी यांच्या ताज्या वक्तव्यावरून हेच दिसून येते. योगी आदित्यनाथ वा साक्षी महाराज ही मंडळी बाबरी मशीद आंदोलनाच्या असहिष्णू वृक्षाला लागलेली कटू फळे आहेत. सुयोग्य राजकीय पर्यावरणाच्या प्रतीक्षेत या फळांची बीजे इतके दिवस देशाच्या मातीत लपून राहिलेली होती. मोदी यांच्या आगमनामुळे या सर्वाचा वसंतोत्सव आता सुरू झालेला दिसतो. उत्तर प्रदेशात अचानक होऊ लागलेल्या दंगली वा न्यायालयाच्या आदेशास आव्हान देऊ पाहणारे हे बकवास संतमहंत हेच दर्शवतात. यातील साक्षी महाराजांनी तोडलेले तारे याचेच प्रतीक आहेत.
उत्तर प्रदेशात मुसलमान तरुणांकडून हिंदू वा अन्य धर्मीय तरुणींना प्रेमपाशात ओढून धर्मातरासाठी उद्युक्त केले जाते, अशा स्वरूपाचे आरोप वा वदंता गेले काही दिवस सुरू आहेत. या प्रकारास लव्ह जिहाद असे नाव देण्यात आले आहे. आता हा प्रकार खरा असेल तर देशाच्या वा राज्य सरकारच्या गृह खात्याने त्याची रीतसर चौकशी करून संबंधितांना योग्य ते शासन करावे आणि हे प्रकार रोखावेत ही मागणी करण्यात काहीही गैर नाही. परंतु या अशा कथित प्रकारांमुळे साक्षी महाराज यांच्यासारख्या अविवेकी मंडळींनी समस्त मुसलमानानांच जबाबदार धरले असून इस्लामी धर्माचे शिक्षण देणाऱ्या पारंपरिक शाळांत देशभर या लव्ह जिहादचे शिक्षण जाणूनबुजून दिले जाते असे बेधडक विधान केले आहे. या इस्लामी धर्मशाळा, म्हणजेच मदरसा, या सार्वत्रिकपणे दहशतवादाची प्रशिक्षण केंद्रे चालवीत असल्याचा आरोपही ते करतात. एरवी या साक्षी महाराजांसारख्या व्यक्तीच्या बेताल भाष्याची दखल घेण्याचे काहीही कारण नाही. परंतु सध्याच्या वातावरणात ती घेणे भाग पडते कारण यांना आवरणारे कोणी आसपास दिसत नाही. या साक्षी महाराजांची मजल तर धर्मातरित विवाहाचे दरपत्रक देण्यापर्यंत गेली. त्यांच्या मते इस्लामी तरुणाने शीख तरुणीशी विवाह केल्यास त्यास ११ लाख रुपये दिले जातात तर हिंदू तरुणीशी निकाह लावल्यास १० लाख रुपये मिळतात. जैन धर्मीय तरुणीशी दोनाचे चार केल्यास मात्र ही रक्कम सात लाख होते. हे साक्षी महाराज हे हिंदू धर्माचे कट्टर अनुयायी आहेत. तेव्हा या महाराजाने हे दरपत्रक देताना त्या कल्पनाविलासात तरी हिंदू धर्माचा मान राखावयास हवा होता. तेही त्यांना जमलेले नाही. शीख तरुणीस ११ लाख आणि हिंदू तरुणीसाठी लाखभर कमी का? बरे, शीख तरुणी तुलनेने अल्पसंख्याक आहेत, असे म्हणावे तर जैन तरुणींच्या बाबतही असेच म्हणता येईल. वास्तविक धर्माच्या आधारे विचार करावयास झाल्यास आपल्या धर्मावरील प्रेमाबाबत जैनदेखील तुलनेने कडवटच असतात. तेव्हा कडवट तरुणीच्या धर्मातराची किंमत ही सहिष्णू धर्मीय तरुणीपेक्षा अधिक असावयास हवी. परंतु तेवढेही भान या साक्षी महाराजांना नाही.
या महाराजांच्या जोडीने मेनका गांधी यांनीदेखील बरेच अकलेचे तारे तोडलेले दिसतात. वास्तविक मेनकाबाई या कधीच विवेकी वागण्या-बोलण्यासाठी ओळखल्या जात नव्हत्या आणि वयानुसार येणाऱ्या शहाणपणाने देखील त्यांना दगा दिलेला दिसतो. खाटीकखान्यांच्या व्यवसायातून केली जाणारी कमाई दहशतवादासाठी खर्च होते असा नवाच सिद्धांत त्यांनी मांडला आहे. तो वाचल्यावर या मेनकाबाईंच्या विवेकाचीच कत्तल झाल्याचे लक्षात यावे. हा आरोप करूनच मेनकाबाई थांबत नाहीत. त्याचे म्हणणे असे की दहशतवादाला कसाईखान्यातून होणारा रसदपुरवठा रोखायचा असेल तर देशातील सर्व खाटीकखान्यांवर बंदीच घालावयास हवी. मेनका गांधी यांचे प्राणिप्रेम हे सर्वश्रुत आहे आणि काही प्रमाणात आम्ही त्याचे स्वागतच करतो. काही प्रमाणात असे म्हणावयाचे कारण की मेनका गांधी यांच्या अतिरेकी इच्छेस मान देऊन सर्वानीच शाकाहारी होण्याचे ठरवल्यास या पृथ्वीतलावर काय हाहाकार होईल याची जाणीव त्यांना नाही, हे आहे. कोणी कोणत्या प्रकारचे अन्नसेवन करावे वा न करावे हा पूर्णपणे वैयक्तिक प्रश्न आहे आणि त्याचे उत्तर शासकीय वा सामुदायिक पातळीवर देण्याचा प्रयत्न करणे अनाठायी आहे. मेनकाबाईंना याचे भान नाही. या भूतलावरील सर्वच जण शाकाहारी झाल्यास त्यांच्या गरजेसाठी पुरा पडेल इतका अन्नसाठा आपण पिकवू शकतो काय? माणसाचा जननदर वाढता आहे, आयुष्यमान वाढते आहे. सर्वानीच मेनकाइच्छेस मान देऊन शाकाहारी होण्याचे ठरवल्यास लागेल तितका भाजीपाला कोठून आणणार? त्याच्या तुटवडय़ामुळे अर्थातच त्याच्या किमती चढय़ा राहणार आणि त्यामुळे तो फक्त धनिकांनाच परवडणार. आताच भाजी खरेदी करणे हे एका वर्गासाठी चैनच आहे. हा वर्ग पुरवठय़ाचा भाग म्हणून मांसाहार खातो. तेव्हा गरज म्हणून खाणारे आणि जिव्हालौल्यासाठी खाणारे अशा दोघांनी मांसाहाराचा त्याग केल्यास पशुसंपत्तीचा प्रचंड गुणाकार होऊन त्यांची संख्या वाढेल त्याचे काय करायचे या मेनकाबाईंच्या मनी आहे? या वाढीव पशुपक्ष्यांना जगण्यासाठी वाढीव चारा वा भाजीपाला लागेल तो कोठून आणणार? या असल्या कोणत्याही प्रश्नांची उत्तरे मेनकाबाई देणार नाहीत. कारण ती देण्याइतका विवेक त्यांच्याकडे नाही. दहशतवादाला पैसा कोठून मिळतो याची जणू गोपनीय माहिती असल्यासारखे बोलणाऱ्या मेनकाबाई काय किंवा तितकेच गंभीर आरोप करणारे साक्षी महाराज काय. त्यांच्या बुद्धीने शहाणपणाशी फारकत घेतली त्यास बराच काळ लोटला. या अशा मंडळींचे अस्तित्व मोदी यांच्यासमोर विरोधकांपेक्षा अधिक डोकेदुखी ठरणार आहे.
तेव्हा नरिमन अथवा गोडबोले काय म्हणतात यासाठी नाही. पण निदान स्वत:ची डोकेदुखी कमी व्हावी यासाठी तरी मोदी यांनी या अशा मंडळींना आवरण्याची गरज आहे. नपेक्षा अशा स्वपक्षीयांपेक्षा काँग्रेसवाले परवडले असे मोदी यांना वाटल्याखेरीज राहणार नाही.