बर्नार्ड विल्यम्सच्या तत्त्वज्ञान- इतिहास रीतीची मांडणी मराठीत सर्वप्रथम करणारे  मे. पुं. रेगे यांनी ऐतिहासिक आकलन आणि वर्तमानकालीन पुनर्रचना या दोन गोष्टी तत्त्वज्ञानाचा इतिहास लिहिताना अनिवार्य बनतात, अशी दिशा दाखवणारा अभ्यास केला.. तो आपल्याकडे पुढे मात्र गेला नाही!
कल्पना या मुळातच सनातनी असतात. त्या इतर कल्पनांच्या हल्ल्याला शरण जात नाहीत. परंतु परिस्थितीच्या जबरदस्त कत्तीलीशी मात्र त्या झगडू शकत नाहीत आणि भुईसपाट होतात
 – जॉन केनेथ गालब्रेथ
(१९०८-२००६ अर्थशास्त्रज्ञ )  
कल्पनांचा इतिहास आणि तत्त्वज्ञानाचा इतिहास यात प्रोफेसर बर्नार्ड विल्यम्स यांनी केलेला फरक भारतीय जीवनशैलीत कसा उपयोगी ठरू शकेल, याची मराठीत सर्वप्रथम सविस्तरपणे मांडणी करण्याचे महत्वाचे काम तत्त्ववेत्ते आणि तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक मे. पुं. रेगे यांनी केले. मराठीतील ही एकमेव मांडणी म्हणता येईल. ही चर्चा प्रा. रेगे ‘नवभारत’ या मासिकाच्या ‘तत्त्वज्ञानाचा इतिहास आणि आणि कल्पनांचा इतिहास’ (जुल १९८०) या संपादकीयात सुरू करतात. भारतीय तत्त्वज्ञानाचा अभ्यास, तत्त्वज्ञान म्हणून न करता केवळ भारतीय तत्त्वज्ञानाचा इतिहास, म्हणून करताना काय घडते; पण काय अपेक्षित आहे, याचे सूचन ते ‘भारतीय तत्त्वज्ञान’ (ऑगस्ट  १९८३)आणि ‘भारतीय तत्त्वज्ञानाची समकालीन प्रस्तुतता’ (जून-जुल १९९६) या संपादकीयात आणि इतरत्रही करतात. ही सारी चर्चा दोन दृष्टिकोनांतून समजावून घेता येते.
पहिला दृष्टिकोन म्हणजे रेग्यांच्या मते, इतिहास म्हणजे भूतकालात काय घडले आणि त्याची करणे काय असावीत, हे शोधणे असते. या अर्थाने कल्पनांचा इतिहास म्हणून विचारवंतांच्या विचारांकडे किंवा त्यांच्या वैचारिक आंदोलनांकडे पाहतो तेव्हा त्या विचारांचे नेमके स्वरूप आपण पाहतो. दुसरी गोष्ट ते विचार आजच्या तात्त्विक, सामाजिक व राजकीय संदर्भात तपासून पाहणे. हे नवे काम कोणत्याही येणारया काळात नेहमीचे काम ठरते.
विचार नेमका समजावून घेणे, या प्रक्रियेत विचारवंताची तत्त्वे, सिद्धांत, समर्थनाचे पुरावे, युक्तिवाद, त्याचे मंडन-खंडण आणि ज्या लोकांसाठी हे लेखन असते त्यांचे प्रश्न, त्यांची मानसिकता, त्यांची जीवनशैली, त्यातील विविध प्रकारचे संघर्ष, त्यांची भाषा, त्यांच्यासाठी असलेली संवादाची रीत या अशा इतर घटकांचा समावेश असतो. हे सारे समजावून घेणे ही इतिहासाची पद्धत आहे. कल्पना मांडल्या, पुस्तकात बंद केल्या की तो कल्पनांचा इतिहास बनतो. पण तत्त्वज्ञानाचा इतिहास बनत नाही. याचे कारण दुसऱ्या दृष्टिकोनात आहे.          
दुसरा दृष्टिकोन म्हणजे या कल्पनांचे परीक्षण करणे, त्यांची अतिशय काटेकोर चिकित्सा करणे. तत्त्वज्ञानाचा इतिहास म्हणजे तात्त्विक कल्पना, संकल्पना यांच्या चिकित्सेचा इतिहास असतो. तत्त्वज्ञानात समस्यांची उत्तरे शोधणे आणि ती तपासणे, त्यात दुरुस्ती करणे, पुन्हा मांडणे, त्यात पुन्हा दुरुस्ती असेल तर ती करणे, आणि असे नेहमी करणे ही तत्त्वज्ञानाची रीत असते. याला तात्त्विकीकरण म्हणता येईल. तात्त्विकीकरण अटळ आणि अखंड प्रकिया असते. ते नेहमी ‘आज’ च्या वर्तमानकाळात घडत असते.
  या दुसऱ्या दृष्टिकोनातून तत्त्वज्ञानाचा इतिहास उलगडतो आणि तो प्रवाही, जिवंत राहतो. म्हणजे असे : एखादी कल्पना अथवा संकल्पना समजावून घेणे हे जेवढे महत्त्वाचे असते तेवढेच ती तपासणे महत्त्वाचे असते. किंबहुना ती जास्त महत्त्वाची आणि मूलगामी कृती असते. तपासणे याचा अर्थ बदलेल्या तत्त्वज्ञानानुसार ही तपासणी करावी लागते. भूतकालीन विचारवंताच्या विचाराचा आजच्या विचाराशी कोणकोणत्या प्रकारे संबंध पोहोचतो, त्याचे ज्ञानात्मक मूल्य काय, त्याची समकालीन प्रस्तुतता कशात शोधात येईल व जोडता येईल हे पाहणे, हे चिकित्सेत अपेक्षित असते. हे करणे म्हणजे त्या विचारवंताची पुनर्माडणी करणे. याचा अर्थ ऐतिहासिक आकलन आणि वर्तमानकालीन पुनर्रचना या दोन गोष्टी तत्त्वज्ञानाचा इतिहास लिहिताना अनिवार्य अटी बनतात. वस्तुनिष्ठ ऐतिहासिक दृष्टी आणि चिकित्सक तत्त्वज्ञानात्मक दृष्टी यांचा संगम केल्याशिवाय तत्त्वज्ञानाचा इतिहास लिहिणे शक्य नाही, असे रेगे यांनी म्हणावयाचे आहे. चिकित्सा झाली तरच विचार समकालीन होतो, जिवंत होतो. उदाहरणार्थ देकार्त या सोळाव्या शतकातील तत्त्ववेत्त्याने मन म्हणजे काय? ही संकल्पना मांडली आणि आज आपण संगणकाला ‘विचार करणारे यंत्र’ म्हणतो. मग संगणक हे मन आहे काय ?  हा प्रश्न उपस्थित केला की विचार करणे, जाणीव असणे या संकल्पना आपल्या आजच्या समस्या बनतात. आणि देकार्त समकालीन विचारवंत बनतो. अर्थात असे समकालीन होण्याची क्षमता सर्वामध्ये नसते, ती काहीजणामध्येच असते.
आता, असे भारतीय तत्त्वज्ञानाबाबत घडते का?  भारतीय तत्त्वज्ञान समकालीन आहे की इतिहासजमा आहे ? भारतीय तत्त्वज्ञान हा भारतीय कल्पनांचा इतिहास असून तो भारतीय तत्त्वज्ञानाचा इतिहास बनत नाही, अशी खंत रेगे  व्यक्त करतात. किंबहुना असा चिकित्सक इतिहास लिहिलाच गेला नाही, असे ते म्हणतात. कर्मसिद्धांत, पुनर्जन्म, मोक्ष, पुरुषार्थ, चातुर्वण्र्य, जातीव्यवस्था इत्यादी संकल्पनांची काटेकोर ताíकक चिकित्सा केली, त्यांची समकालीन प्रस्तुतता तपासली तरच ते तत्त्वज्ञान होईल आणि केवळ विश्वासव्यवस्था म्हणून, केवळ ‘पवित्र, प्राचीन, सनातनी परंपरेतील कल्पना’ म्हणून अंधपणे बाळगल्या तर तो मृत इतिहास होईल. या संकल्पनांवर आधारलेली आपली सामाजिक व नतिक परंपरा टाकाऊ ठरली आहे आणि  ती का त्याज्य ठरली ते राजा राममोहन राय, लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख-म. जोतीराव फुले ते शरद पाटील यांच्या पर्यंत अनेकांनी सप्रमाण दाखवून दिले आहे. ही परंपरा आणि त्यामागील भारतीय दर्शनप्रणाली इतिहासजमा का व कशी झाली आहे, याचे विवरण रेगे देतात. उदाहरणार्थ उपनिषदातील तात्त्विक विचार, दर्शने यांचा संकल्पनांचा इतिहास म्हणून अभ्यास करण्यास हरकत नाही. पण याज्ञवल्क्य आणि श्व्ोतकेतू, गौतम आणि कणाद यांना समकालीन तत्त्ववेत्ते का म्हणावे?  हा प्रश्न ते उपस्थित करतात.                
अर्थात असा प्रयत्न भारतीय प्रबोधनकालापासून होत आहे. महाराष्ट्रात लक्ष्मणशास्त्री जोशी, प्रो. सुरेंद्र बारिलगे, प्रो. दि. य. देशपांडे, शि. स. अंतरकर, प्रदीप गोखले, आ.ह. साळुंखे, शरद  पाटील आणि खुद्द मे.पुं. रेगे यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. प्रो.बारिलगे यांचा ‘भारतीय तत्त्वज्ञानाचे पुनर्आकलन’ हा प्रकल्प आहे. दि. य. देशपांडे यांनी विवेकवादी चिकित्सेसाठी ‘आजचा सुधारक’ या प्रकाशनच्या माध्यमातून आधुनिक विवेकवादी तात्त्विक प्रणाली रुजविली. ‘व्हाट इज लििव्हग अँड व्हाट इज डेड इन इंडियन फिलॉसॉफी’ हा देबीप्रसाद चट्टोपाध्याय यांचा हा प्रकल्प आहे भारतीय तत्त्वज्ञानाचा इतिहास म्हणून के. सच्चिदानंद मूर्ती यांचे  ‘इव्होल्यूशन ऑफ इंडियन फिलॉसॉफी’ हे महत्त्वाचे पुस्तक आहे. टी. एम.पी. महादेवन,मोहंती, राजेंद्र प्रसाद, दयाकृष्ण ही अन्य काही मान्यवर नावे आहेत. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर एन्सायक्लोपीडिया ऑफ इंडियन फिलॉसॉफी’ (सं. कार्ल पॉटर), हिस्ट्री ऑफ इंडियन सायन्स, फिलॉसॉफी अँड कल्चर (सं.देबीप्रसाद चट्टोपाध्याय)  ही मोठी प्रकाशने आहेत. इंडियन कैान्सिल ऑफ फिलॉसॉफिकल रिसर्च या संस्थेने अनेक चिकित्सक ग्रंथ प्रकाशित केले आहेत.  
महाराष्ट्रातील विद्यापीठ, महाविद्यालय पातळीवरील तत्त्वज्ञान, इतिहास, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, मानववंशशास्त्र, वाणिज्यविषयक, व्यवस्थापनशास्त्रविषयक अथवा विविध निसर्ग विज्ञानाचे अभ्यासक्रम, तसेच विविध सामाजिक -राजकीय चळवळी यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात बर्नार्ड विल्यम्सप्रणीत  फरकाची चर्चा झालेली नाही. एका अर्थाने विल्यम्स किंवा रेगे यांनी केलेली चर्चाच समासात राहिली.  जिथे अशी चर्चा काटेकोरपणे अपेक्षित आहे, त्या तत्त्वज्ञान या विषयाच्या अभ्यासक्रमातच ती नाही तर इतर विषयांच्या चर्चाविश्वात ती येणे आणखी कठीण आहे. कारण त्या दिशेने अद्यापि आपण विचार करण्यास प्रारंभ केलेला नाही. 

Loksatta lokrang A collection of poems depicting the emotions of children
मुलांचं भावविश्व टिपणाऱ्या कविता
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
loksatta kutuhal artificial intelligence and research in mathematics
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि गणितातील संशोधन
nehru literature soon in one click available on digital form on mobile
नेहरूंचे साहित्य लवकरच एका क्लिकवर!
History Of Tipu Sultan
एका रात्रीत ८०० मंड्यम अय्यंगारांची हत्या; ‘नरक चतुर्दशी’ हा दिवस शोकदिवस का ठरला?
Peshwa Maratha sacking of the Sringeri math
Tipu Sultan History: पेशव्यांच्या नेतृत्त्वाखाली मराठ्यांनी लुटला होता ‘शृंगेरी मठ’; या ऐतिहासिक घटनेत किती तथ्य?
artificial intelligence to develop ability to create substances with specific qualities
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्तेतून हव्या त्या गुणधर्मांचा पदार्थ