राजकीय व्यवस्थेत सामील न होता तिच्याविषयी घृणा बाळगत ट्विटर, फेसबुक आदी माध्यमांव्दारे बदलाची अपेक्षा ठेवणारा वर्ग ठोस पर्यायही देत नाही हे धोकादायक आहे. व्यवस्थेचा फायदा घेत ती झीडकारण्याची भाषा करणाऱ्या रिअ‍ॅक्शनरावांना कोणतेही राजकीय अधिष्ठान नाही हेच जगभरातील अलीकडच्या उठावांचे समान सूत्र आहे.
इजिप्त हा देश पुन्हा एकदा सत्तांतराच्या तोंडावर उभा आहे. गेल्याच वर्षी ३० जूनला ज्यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली ते मोहंमद मोर्सी हे या ताज्या जनक्षोभाच्या केंद्रस्थानी आहेत. त्याच्याही आधी एक वर्ष जनतेच्या उठावात इजिप्शियन जनतेने होस्नी मुबारक यांची दीर्घकालीन राजवट उलथून पाडली आणि नंतर पहिल्या मोठय़ा निवडणुकांत सत्तेची सूत्रे मोर्सी यांच्याकडे गेली. मुस्लीम ब्रदरहूड या आक्रमक इस्लामी संघटनेचे प्रतिनिधित्व मोर्सी करतात. त्यामुळे त्यांच्या निवडीनंतर धर्मवाद्यांचे वर्चस्व वाढेल अशी सार्वत्रिक भीती व्यक्त केली जात होती. ती पूर्णपणे अस्थानी नव्हती, हे मोर्सी यांनी सिद्ध केले. मोर्सी यांनी ज्या काही महत्त्वाच्या नेमणुका केल्या त्या सर्वच ठिकाणी ब्रदरहूड वा तत्सम संघटनेच्या सदस्यांचीच वर्णी प्राधान्याने लावण्यात आली. ब्रदरहूडचे समर्थक उच्च पदांसाठी निवडले गेले आणि अन्य कोणी कार्यक्षम असला तरी डावलला जाऊ लागला. ज्या इजिप्शियन जनतेने गमाल नासर वा अन्वर सादात यांच्या काळात निधर्मी राजवट अनुभवली त्याच देशात आता धर्माचा इतका प्रभाव वाढत असेल तर त्याची प्रतिक्रिया तीव्रच असणार. त्याच वेळी गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात मोर्सी यांनी घटनाबदल करून स्वत:कडे अमर्यादित अधिकार घेतले. तेथपासून जनतेत क्षोभ निर्माण व्हायला सुरुवात झाली. अमर्यादित अधिकार हाती घेतले म्हणून मुबारक यांच्या विरोधात जनतेने उठाव करून त्यांना सत्ता सोडण्यास भाग पाडले आणि त्यांच्यानंतर सत्ता हाती घेणारे मोर्सी हेदेखील त्याच उद्योगाला लागले. त्यामुळे सामान्य इजिप्शियनाच्या मनात राग असेल तर तो क्षम्यच म्हणावयास हवा. हे सत्तांतर होत होते त्या वेळी बरेच जण त्याबाबत भाबडे आशावादी होते. तहरीर चौकात ज्या वेळी इजिप्तमधील सत्ताबदलासंबंधी निदर्शने होत होती तेव्हा या चौकात जगातील नव्या क्रांतीची मशालच जणू पेटली आहे, असे अनेकांना वाटू लागले होते. जगभर आता लोकशाहीच येणार आणि फेसबुक, ट्विटर आदी माध्यमांतून व्यक्त होणाऱ्या जनतेच्या भावना आता लोकशाहीला नवा आकार देणार अशी भाबडी आशा चॅनेलचर्चीयांकडून व्यक्त केली जात होती आणि चेतन भगतसारख्या उथळोत्तमांनी भारतात त्याच वेळी सुरू असलेल्या अण्णा हजारेंच्या आंदोलनाची तुलना इजिप्तमधील घटनेशी करण्यापर्यंत मजल गाठली होती. हा हुच्चपणा होता असे तेव्हाही आमचे मत होते. आता तोच तहरीर चौक पुन्हा एकदा आंदोलकांनी व्यापून टाकलेला आहे आणि मोर्सी यांनाही बदलून टाकावे, अशी त्यांची मागणी आहे. हे सर्व सुरू आहे ते अपक्षीय आहे आणि सर्व जनतेचाच त्यास पाठिंबा आहे, असे सांगितले जाते. ताज्या आंदोलनांचे नेतृत्व करणाऱ्यांनी मोर्सी यांच्या विरोधात जवळपास अडीच कोटी स्वाक्षऱ्या जमा केल्या असून सगळ्यांचे म्हणणे एकच आहे. ते म्हणजे सत्ताबदल व्हायला हवा. या सर्व अस्थिरतेच्या काळात इजिप्तची अर्थव्यवस्था लयाला गेली असून बेरोजगारांचे प्रमाण दोन वर्षांत ९ टक्क्यांवरून १३ टक्क्यांवर गेले आहे. आता या अंदाधुंद परिस्थितीला वळण लावण्याचे कारण पुढे करीत लष्कर पुढे सरसावले आणि त्याने सरकारचा ताबा घेतला तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. याचा अर्थ लोकशाहीकडून इजिप्तची वाटचाल पुन्हा एकदा लष्करशाहीकडे होऊ शकते. या पाश्र्वभूमीवर ब्राझील ते इजिप्त या मोठय़ा टापूतील अनेक देशांतील उठावांचा आढावा घेणे आवश्यक ठरते. ब्राझील या देशात बसच्या प्रवासी भाडय़ात वाढ झाली म्हणून जनता संतापली आणि रिओ द जानेरो हे राजधानीचे शहर निदर्शकांनी बंद पाडले. टर्कीतील इस्तंबुल शहरात सार्वजनिक ठिकाणी एका इमारतीचा घाट घातला गेल्यामुळे लोक रागावले आणि त्या रागाचा उद्रेक झाला. इंडोनेशियात इंधनाचे भाव वाढवल्याचे कारण झाले तर बल्गेरियनांना सरकारच्या कुडमुडय़ा भांडवलशाहीचा राग आला.
या सर्व उठावांच्या मागे होती ती ट्विटर, फेसबुक आदी माध्यमे. ही माध्यमे म्हणजे माहिती महाजालातील चावडय़ा बनल्या असून तेथे कोणालाही कोणत्याही मताची पिंक टाकण्याची मुभा असते. या माध्यमांचे दुसरे वैशिष्टय़ असे की यामुळे वैयक्तिक रागलोभाला सामाजिक अन्यायाच्या पातळीवर नेता येते. याचे चांगले आणि वाईट दोन्ही परिणाम असतात कारण कोणतेही माध्यम हे दुधारी तलवारीसारखे असते. या नवतंत्र माध्यमांचा यांस अपवाद नाही. या माध्यमांमुळे कोणत्याही प्रश्नाला व्यापक प्रमाणावर वाचा फोडणे हे जसे सहज शक्य झाले आहे तसेच कोणत्याही मुद्दय़ाचे अवास्तव स्तोम माजवले जाण्याची शक्यताही तयार झाली आहे, हे नाकारता येणार नाही. या माध्यमांच्या उदयाआधी मतेच्छू व्यक्तींचे अभिप्राय खासगी गप्पांत व्यक्त होत. परंतु तंत्रज्ञानाच्या उदयाने या खासगी वतुर्ळाचे रूपांतर जाहीर चौकात झाले असल्याने या मतांचे पडसाद आता अधिक व्यापक स्वरूपात पडू लागले आहेत. कोणत्याही देशातील सर्वसामान्य माणूस कशावर ना कशावर तरी नाराज असतोच. नवीन तंत्रज्ञानाने या नाराजीस अधिक व्यापक रूप देण्याची व्यवस्था केली. त्यात हे तंत्रज्ञान एकमेकांना जोडत असल्याने या नाराजांचा समूह तयार झाला आणि त्यातील नाराजीचेही मोठय़ा प्रमाणावर वहन होऊ लागले. याचा परिणाम असा की समग्र वातावरणातच नाराजी साठून असल्याचे चित्र निर्माण झाले. आज अनेक ठिकाणी त्याचेच पडसाद उमटताना दिसतात. आज जेथे जेथे आंदोलने सुरू आहेत त्या सर्वच ठिकाणी त्यांचा या माध्यमांतून प्रसार झाला आणि आभासी जगात दाटलेल्या भावना व्यक्त करण्यासाठी जनता वास्तव जगात रस्त्यावर उतरू लागली. या सर्व निदर्शनांत दोन समान मुद्दे आहेत. एक म्हणजे त्यांना कोणाचेही नेतृत्व नाही, ते स्वयंस्फूर्त आहेत आणि निदर्शनांचा रोख सत्ताधाऱ्यांच्या विरोधात असला तरी विरोधी पक्षीयांनादेखील ते उभे करीत नाहीत. त्याचबरोबरीने दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा की या सर्वच निदर्शकांना व्यवस्थेविषयी, त्यातही राजकीय व्यवस्थेविषयी जवळपास घृणाच आहे.
हे धोकादायक आहे. कारण या सर्वच निदर्शकांना बदल हवा आहे. पण तो बदल झाल्यावर काय करायचे हे माहीत नाही. या सर्व निदर्शनांकडे पाहिल्यास आणखी एक बाब स्पष्ट व्हावी. हे सर्वदेशीय ट्विटरोत्सुक फेसबुकी निदर्शक यच्चयावत त्या त्या देशातील मध्यमवर्गीय आहेत. म्हणजे हा संघर्ष सामाजिकदृष्टय़ा आहे रे आणि नाही रे यांच्यातील नाही. तो आहे रे वर्गाच्या अधिकाच्या भुकेतून निर्माण झाला आहे आणि घरबसल्या आधुनिक माध्यमांमुळे त्याचा आकार अधिकच मोठा वाटू लागला आहे. यातील गंभीर बाब ही की या सर्वाना राजकीय प्रक्रियेत सामील व्हावयाचे नाही आणि जो बदल हवा आहे तो स्वत: करावा अशा त्यांच्या प्रेरणाही नाहीत. त्यांना फक्त काय नको आहे ते सांगायचे आहे.
परंतु अशाने काही होत नाही. एखाद्या व्यवस्थेत उणिवा असतील तर त्या व्यवस्थेच्या अधीन राहूनच कराव्या लागतात. व्यवस्थाच नको असे म्हणणे शहाणपणाचे नसते. व्यवस्थेचा सर्व फायदा घेऊन ती झिडकारणाऱ्यांच्या मागे मेणबत्त्या घेऊन जमा होणाऱ्यांची कमी आपल्या देशातही नाही. नवीन तंत्रज्ञानाने जगभरातील हे मेणबत्ती संप्रदायी एकत्र आणले आणि त्यामुळे यातून बदल होत असल्याचे चित्र निर्माण झाले. वस्तुत: हा केवळ ठिकठिकाणच्या रिअ‍ॅक्शनरावांचा राडा आहे आणि त्यास जोपर्यंत राजकीय अधिष्ठान मिळत नाही तोपर्यंत त्यातून दीर्घकालीन असे काहीही हातास लागणार नाही.

Story img Loader