पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्रपती भवनातील इफ्तारच्या मेजवानीस जाणार नसल्याचे वृत्त असून, यातून मोदी यांना नेमके काय साधायचे आहे, हा एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होत आहे. मोदी यांनी गेल्या वर्षीही राष्ट्रपतींच्या घरचे रात्रभोजनाचे आमंत्रण टाळले होते. यंदाही ते जाणार नाहीत. या आमंत्रणास त्यांनी सविनय नकार दिला याचे कारण नेमक्या त्याच वेळी त्यांची ईशान्येतील राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक होती, असे सांगण्यात येते. ही बैठक महत्त्वाची होती हे तर खरेच आहे. पंतप्रधानांची कोणतीही बैठक तशी बिनमहत्त्वाची नसतेच. मात्र राष्ट्रपतींच्या इफ्तार मेजवानीस मोदी यांना उपस्थित राहाता यावे याकरिता, संबंधित राज्यांच्या काही मुख्यमंत्र्यांनीच त्यांना बैठकीची वेळ बदलली तरी चालेल असे कळविले होते. ती बदलण्यात आली नाही. याचा अर्थ स्पष्ट आहे. मोदी यांना मुळातच इफ्तारची फिरनी खायची नव्हती. एखाद्या व्यक्तीला वैयक्तिक पातळीवर कोणत्या कार्यक्रमाला जावे वा जाऊ नये याचे स्वातंत्र्य आहे. तसे ते मोदी यांनाही आहे. पंतप्रधान म्हणून मात्र त्यांना काही रिवाज, काही परंपरा या पाळणे आवश्यक असते. तेथे वैयक्तिक आवडीनिवडीला स्थान नसते. इफ्तार हा त्यातलाच प्रकार आहे. रमजानचा दिवसभरातील उपवास सोडण्याचा हा भोजन समारंभ. तो मुस्लिमांसाठी धार्मिक आहे आणि इतर धर्मीय जेव्हा त्यात सहभागी होतात तेव्हा तो प्रतीकात्मक असतो. हे प्रतीक असते ऐक्यभावनेचे. समाजजीवनात अशा प्रतीकांना किती महत्त्व असते हे हिंदुस्थानी संस्कृती आणि परंपरा ज्यांच्या नसानसांतून वाहतात त्यांना सांगण्याची आवश्यकता नाही. इफ्तारच्या माध्यमातून हिंदूू आणि मुस्लीम समाज एकत्र येणे यातून नेमके काय साध्य होते हे गणिती भाषेत कदाचित मांडताही येणार नाही, परंतु मुस्लिमांनी गणेशपूजा करणे किंवा हिंदूंनी उरुसात शेरणी वाटणे किंवा बराक ओबामा यांनी व्हाइट हाऊसमध्ये दिवाळी साजरी करणे यातून एकमेकांत काही मानसिक बंध निर्माण होत असतात. समाजाची वीण त्यातूनच घट्ट होत असते. ज्यांचे राजकारणच द्वेषावर आधारित आहे ते हिंदू आणि मुस्लीम या विचारास स्युडोसेक्युलर म्हणतात. परंतु मौज अशी की सर्व धर्मानी एकमेकांचा आदर करावा हे तत्त्व तर मोदी ज्या संघाचे संस्कार सांगतात त्या संघानेही कधी अमान्य केलेले नाही. खुद्द मोदीही हीच मन की बात सांगत असतात. अशी प्रतीके तेही अन्य राष्ट्रप्रमुखांना भेटीदाखल देताना दिसतात. असे असताना ते जेव्हा इफ्तार टाळतात किंवा देश-विदेशात ठिकठिकाणी त्या-त्या ठिकाणच्या पारंपरिक पगडय़ा आणि पोशाख परिधान करत असताना मुस्लीम पद्धतीच्या टोपीला शिवतही नाहीत तेव्हा मात्र ते आपल्या मतपेढीला शरण गेल्याचेच दिसते. यातील विसंगती त्यांच्या अनुयायांना कळत नसेल, परंतु इतरांना ती समजत नाही असे नाही. इफ्तारसारख्या धार्मिक कार्यक्रमांचे राजकीयीकरण त्यांना पसंत नसल्याने ते अशा समारंभास जात नाहीत, असे सांगितले जाते. इफ्तारचा वापर काही व्यक्ती राजकीय स्वार्थासाठी करतात हे आहेच, परंतु तसा तो अन्य धार्मिक कार्यक्रमांचाही केला जातो. त्याला कधी मोदी यांनी नकार दिल्याचे दिसत नाही. तेव्हा एकटय़ा इफ्तारला टाळून मोदींना नेमके काय साधायचे आहे, हा प्रश्न उरतोच.

Story img Loader