नामदेव ठसाळांच्या कविता केवळ दु:खे मांडून थांबल्या नाहीत, तर दु:ख सांगणाऱ्या कवितांना ‘वाहवा’ची दाद मिळू नये, अशी पाचर त्यांच्या अनुभवनिष्ठ निवेदनाने आणि ‘नव्या’ भाषेने मारून ठेवली. भाषेची आणि अनुभवनिष्ठतेची ती पाचर, हे ढसाळांच्या अनेक कवितांचे मोठेपण ठरले. त्याबरोबरीनेच अनेक संस्कारित, अभ्यस्त संदर्भासह येणाऱ्या त्यांच्या कवितेची दखल घ्यावीच लागली.
कविताबिविता आपल्याला कळत नाहीत, असा माज मोठा समाज बाळगत असतो. त्यांच्यापैकी जे स्वत:ला सभ्य समजणारे असतात, ते कवितेच्या वाटेला जातात. कविता समजून घेण्याने आपण सुसंस्कृत होऊ, आपली संस्कृती नुसतीच टिकण्याऐवजी वाढत राहील, असा विश्वास या सभ्य माणसांना कविता देत राहते. नामदेव ढसाळ नावाच्या कवीने या सभ्यपणाचीच गचांडी धरून, आपापली संस्कृती कवितेतून वाढवू इच्छिणाऱ्यांना ‘गांडू बगीच्या’त नेले. ‘गोलपिठा’ दाखवला. याच नावांच्या जागा मुंबईत आहेत हे सभ्य माणसांना माहीत असे. पण तिथे जाणे असभ्य. म्हणून तसल्या जागांची दखल घेणेही असभ्य. हे असे अनेक अलिखित नियम सभ्य समाजाने ठरवून टाकले होते, ते नामदेव ढसाळ यांनी बदलायला लावले. गोलपिठय़ात जाणे असभ्य असेलही, पण तिथल्या माणसांच्या दु:खांकडे का नाही पाहायचे, असा प्रश्न नामदेव ढसाळ यांनी विचारला. उपेक्षितांचे अंतरंग जाणून घेणे सभ्य समाजाला नवे नव्हते. तरीही या नव्या नामदेवाने उभे केलेले प्रश्न इतके नवीन होते की ते गैरसोयीचेच वाटावेत. आपण ज्याला आपला समाज असे म्हणतो त्यावर आपल्या ध्यानीमनी नसताना कुणीतरी हक्क सांगतो आहे, अशी जाणीव झाल्यावर गैरसोय होणारच. तशी गैरसोय करण्याचे धैर्य ढसाळांची कविता दाखवते आहे, हे मराठीबद्दल आस्था असणाऱ्यांना नवीन वाटले. हे जे कवितेतील नावीन्य ओळखणारे लोक होते, ते आजही आहेत. पण त्यांचे कुणी ऐकत नाही. साहित्य संमेलनांच्या व्यासपीठांवरदेखील अशा लोकांना बोलावले जात नाही. ही एक प्रकारे अस्पृश्यताच. अशी वाङ्मयीन अस्पृश्यता १९६०च्या दशकात नव्हती. फडके-खांडेकरी कंपूंमधला आणि अत्र्यांच्या वादपटू आवेशातला फोलपणा साठोत्तर लेखककवींनाच नव्हे तर वाचकांनाही मनोमन कळला होता आणि स्वातंत्र्यानंतर जन्मलेली ती पहिली पिढी ऐन विशीत आली असताना जगदेखील अनेक चळवळींनी झपाटून गेले होते. ते खरे अस्वस्थ दशक. याच दशकाच्या अखेरीस लिहू लागलेल्या नामदेव ढसाळांचा पहिला कविता संग्रह १९७२ साली आला. ही कविता मराठी भाषेत आणि आशयात नवी भर घालणारी आहे, हे काही जणांनी निक्षून सांगितले आणि चर्चा होऊ लागली. नामदेव ढसाळांच्या नवेपणाने धक्का दिला, किंवा ‘गचांडी धरली’, याचेही स्वागत झाले.
या स्वागतामागे एक वाङ्मयीन परंपरा आहे आणि त्या परंपरेतले सारे खाचखळगेसुद्धा आहेत. आजपासून जवळपास शतकभरापूर्वी ‘ब्राह्मण नाही, हिंदुहि नाही’ असे म्हणणारे केशवसुत ‘नव्या युगाचा शूर शिपाई’ होऊ पाहात होते आणि महायुद्धकाळातले बा. सी. मर्ढेकर म्हणत होते की ‘निदान आता घडल्या गोष्टी नडल्या आशा चुलीत फेका, जिवंतता जर असेल रोमी, मरण तिच्यातिल थोडे हुडका’. एवढे होऊनही जगण्यावर शतदा प्रेम करावयास सांगणारे कवीच लोकप्रिय होणार आणि पुढेमागे आपला मराठीभाषक समाज त्यांना कविवर्य, महाकवी वगैरे म्हणणार, हेही ठरलेले असते. साहित्यानेच काय, कशानेही आपली बैठक सरकू नये, असे समाजाला वाटतच असते. मग जाणिवांऐवजी शब्दांचेच कौतुक करायचे, अशी सुखासीन बघेगिरी वाढीस लागते. साहित्याकडून काय घ्यायचे, हे ठरवताना आपल्या समाजाने केलेल्या लबाडीची पहिली सुरी कुसुमाग्रजांवर फिरली, हे आता तरी मान्य करावे लागेल. कविता काय सांगते, यापेक्षा कविता कशी आहे, हेच पाहणाऱ्या या समाजात जिवंतपणातले मरण हुडकण्याचे धैर्य दाखवण्याची जबाबदारी कविता नाकारत होती आणि अन्याय-अत्याचारांची जाणीव थेटपणे होऊनही हा रस्ता अटळ आहे, माझ्या मना बन दगड, अशा बघेगिरीत रमली होती. चळवळीची गाणी चळवळीतच राहूंद्या, असा धोपटमार्ग बापट स्वीकारीत होते. अशा वेळी समाजाला काही महत्त्वाचे आणि नवे सांगणारी कविता घेऊन आले ते नारायण सुर्वे. मोच्र्यात मार्क्‍सबाबा भेटला, क्षणभरही थरकू नको अशा सुर्वे यांच्या कवितांनी, कष्टकऱ्यांच्या लढय़ाचे बळ वाढवण्याची जबाबदारी थेटपणे घेतली होती. ‘तुमचंच नाव लिवा मास्तर’ म्हणत सुर्वे यांनी अत्याचारित स्त्रीच्या ‘अडाणी’पणाची दुखरी जाणीव दिली होती. पण सुर्वे यांना महत्त्वाच्या वाटणाऱ्या वर्गीय जाणिवांच्याही पलीकडे भारतीय वर्णवादाने उभी केलेली दु:खे कवितेची वाट पाहात होती आणि त्या दु:खांना काव्योद्गार देणारे वामनदादा कर्डकांसारखे शाहीर मराठी साहित्याच्या मुख्य प्रवाहाबाहेरच होते. या इतिहासाची कोंडी फोडण्यासाठी केवळ अनियतकालिके पुरेशी नाहीत, हे साठच्या दशकात स्पष्ट होऊ लागले. वाङ्मयीन चळवळी वांझोटय़ा आहेत, अशी ठसठस या चळवळीतील कवीच व्यक्त करू लागले होते. सामाजिक  किंवा राजकीय चळवळीतून जन्मलेली कविता म्हणजे शाहिरी किंवा प्रचारकी, असेच समजले जात होते. परंपरेत असे खाचखळगे असतील, तर मार्ग रुंदावण्याऐवजी अपघात होण्याची शक्यता अधिक. तशा काहीशा अपघातानेच दलित पँथरचा जन्म आधी झाला आणि मग त्याच वर्षी, ‘गोलपिठा’ प्रकाशित झाला. दुर्गाबाई भागवतांसारख्या, बंडखोरी समजून घेऊ पाहणाऱ्यांनाही आमचे विचार आमच्या दृष्टीने समजून घ्यावे लागतील असा आग्रह ‘गोलपिठा’च्या प्रकाशन सोहळ्यात धरला जाणे, हा तात्कालिक अपघात होता. त्याचे पडसादही तात्कालिक होते. पुढे दलित पँथर ही संघटनादेखील तात्कालिक ठरली आणि आता उरले आहे, ते नामदेव ढसाळांचे कवीपण. ढसाळांनी जगण्यासाठी केलेल्या तडजोडींचा पाढा वाचल्यानंतरही उरणारे आणि आता त्यांच्या मरणानंतरही शाबूत राहणारे.
‘गोलपिठा’मधल्या कविता या केवळ वेश्यांची दु:खे मांडून थांबल्या नाहीत. दु:ख सांगणाऱ्या कवितांना ‘वाहवा’ची दाद मिळू नये, अशी पाचर नामदेव ढसाळांच्या अनुभवनिष्ठ निवेदनाने आणि ‘नव्या’ भाषेने मारून ठेवली. भाषेची आणि अनुभवनिष्ठतेची ती पाचर, हे ढसाळांच्या अनेक कवितांचे मोठेपण ठरले. या वैशिष्टय़ांची चर्चा कितीही केली तरी थोडीच ठरेल. सभ्य वाचकांना शिवराळ, बीभत्स वाटू शकणारे शब्द या भाषेत होतेच पण ‘पुरुषगुढी’, ‘ऑक्टोपसचे संघटित जनानखाने’ , ‘राँय राँय रहदारी’ अशी आजवरच्या मराठी प्रतिमासृष्टीला पुढे नेणारी भरही ढसाळांच्या गोलपिठय़ाने घातली. केवळ अनुभवनिष्ठेचा बडिवार न माजवता बोदलेअर, लेडी मॅक्बेथ, अ‍ॅचिलस असे अनेक संस्कारित, अभ्यस्त संदर्भही या संग्रहाच्या पानोपानी आहेत. कविता कशी आहे, हेच पाहणाऱ्यांना नामदेव ढसाळांच्या कवितेची दखल घ्यावीच लागली ती या वैशिष्टय़ांमुळे. हिजडय़ांची रंडकी पुनव, वेश्येची धंदेवाईक प्रेरणा, अनेक गुप्तरोग यांची खुली चर्चा ही कविता करते हे जितके नवीन होते, तितकेच केवळ त्या एका समाजाची दु:खे मांडण्याऐवजी ही कविता सर्वदूर विद्रोहाची स्वप्ने का पाहते आहे, हा प्रश्नही महत्त्वाचा होता. गांडू बगीचा, खेळ, मूर्ख म्हाताऱ्याने डोंगर हलवले, तुही यत्ता कंची हे स्वतंत्र संग्रह आणि चिंध्यांची देवी किंवा ‘तुझे बोट धरून चालतो आहे मी’ यांसारखी विषयानुसार कवितांची एकत्रीकरणे, यांतून नामदेव ढसाळांची जी कविता प्रकटली, तिने विद्रोहाचे सूत्र जपतानाच मानवकल्याणाचे स्वप्नही पाहिले. या एकंदर कवितेतून नवे प्रश्न उभे राहिले. माणूस माणसावर अन्याय करतो, ही ‘सहजप्रवृत्ती’ अमान्य करणारा हा कवी- त्याला बंडखोर म्हणायचे की स्वप्नाळू, समाजावर त्याने केलेली टीका खरी मानायची की खोडसाळ, समष्टीचे निराळे भान देणाऱ्या कवीचे द्रष्टेपण महत्त्वाचे मानायचे की याच कवीने चळवळ यशस्वी करण्याची संधी गमावल्याबद्दल त्याची निर्भर्त्सना करायची, अशा अनेक दुविधांतून योग्य पर्यायांची निवड करण्याचे आव्हान देऊन नामदेव ढसाळ निवर्तले आहेत.
 हाडकी हाडवळा ही कादंबरी किंवा काही लेखसंग्रह यांसारखे गद्य लिखाण ढसाळांनी केले असले तरी, कवी म्हणून त्यांनी मराठीभाषक समाजात केलेले काम त्यापेक्षा मोठे आहे. त्यांच्या कवितेला सांभाळण्याचे काम साहित्य क्षेत्रात ज्या समीक्षकांनी केले, त्यांना आज कुणी विचारत नाही. आजच्या फेसबुकी अस्मितांच्या आणि ‘डिंगडांग धतिंग करावी’ हे ढसाळांचे एक वाक्य जणू तंतोतंत पाळणाऱ्या समाजाला, कवितादेखील ‘लाइक’ करण्यापुरतीच हवी असेल तर ढसाळांची धडगत नाही. जिवंतपणीच ‘निर्वाणा अगोदरची पीडा’ भोगलेल्या या कवीला सांभाळण्यासाठी त्याची सहचरी, कवयित्री मलिका अमर शेख यांना अनेकांनी सहकार्य केले होते. त्याहीआधी, वाटेल तसे जगणाऱ्या नामदेवला अनेकांनी सांभाळले. अटळ अंतानंतर आता आपली जबाबदारी वाढली आहे. नामदेव ढसाळ यांना कवी म्हणून मराठीभाषक समाज यापुढे कसे सांभाळतो, यावर या समाजाची लायकी ठरणार आहे.

mla sanjay rathod upset over baseless news spread against him by media
“मन दुखावले, जिव्हारी लागले…” आमदार संजय राठोड असे का म्हणाले?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Nikki Giovanni
व्यक्तिवेध : निक्की जियोव्हानी
Zeenat Aman
‘डॉन’ नाही, तर ‘या’ चित्रपटात दिसणार होतं ‘खइके पान बनारस वाला’ गाणं पण…, झीनत अमान यांनी सांगितलेला किस्सा चर्चेत
Sadabhau Khot
“राहुल गांधींचं एकच स्वप्न, मेरी शादी कब होगी?” मारकडवाडीतून सदाभाऊ खोतांचा चिमटा; ‘खळं लुटणारा’ म्हणत पवारांवर टीका
Atul Suhas Suicide
“न्याय प्रलंबित आहे”, गळ्यात फलक लटकावून तरुणाची आत्महत्या; २४ पानी नोटमुळे पोलिसांसमोर आव्हान वाढले!
sarva jat dharm ekta manch
बांगलादेशातील हिंदू विरुद्ध अत्याचार मोदी सरकारने रोखावेत, सर्व जाती-धर्म एकता मंचची मागणी
Story img Loader