अर्थव्यवस्था बदलत असताना भांडवली बाजारात घपले घडू लागले, ते टाळण्यासाठी एक छोटे- पण महत्त्वाचे पाऊल २० वर्षांपूर्वी उचलले गेले. आर एच पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या नव्या, संगणकाधारित भांडवली बाजाराने – ‘एनएसई’ने २१ व्या वर्षांत सशक्तपणे पदार्पण केले आहे..
मराठी संस्कृतीचा सर्वात दळभद्री असा कोणता गुण असेल तर संपत्तिनिर्मितीस कमी लेखणे. पैसे कमावणे हे जणू काही पापच आहे आणि ते न कमावणारे हेच थोर थोर आहेत अशा स्वरूपाचे संस्कार मराठी मनांवर लहानपणापासूनच होतात. परिणामी जरा कोणी पैसे मिळवणारा वा मिळवताना दिसला की तो नक्की भानगडबाजच असणार अशा स्वरूपाची खात्री मराठी मनामनात आपोआपच होते. त्याचमुळे देशातील सर्वात मोठा भांडवली बाजार, बाँबे स्टॉक एक्स्चेंज, या मराठी राज्याच्या राजधानीत असूनही मराठी पावले त्याकडे वळलीच नाहीत आणि मराठी माणूस त्या बाजारास सट्टाबाजार म्हणून खिजवत आपले भिकार नैतिक दारिद्रय़ मिरवत राहिला. समस्या ही की मराठी समाजातील हा दुर्गुण दूर करण्याचा प्रयत्न करावा असेदेखील कोणा राजकीय पक्ष वा संघटनेस वाटले नाही. मराठी अस्मितेच्या नावाने राजकारण करणाऱ्यांची बौद्धिक कुवत वडापावच्या गाडीच्या आसपासच घुटमळत राहिली आणि स्वत:ची धन करण्यापलीकडे मराठी माणसाच्या संपत्तिनिर्मितीत महत्त्व द्यावे असे या मंडळींना कधी वाटले नाही. मुंबई महाराष्ट्रात राहणार की जाणार अशा काल्पनिक मुद्दय़ांवर लढण्यात या मंडळींना शौर्य वाटत होते. मुंबई महाराष्ट्राच्या सीमांत राहिली खरी पण मुंबई तुमची भांडी घासा आमची, हेच ऐकण्याची वेळ मराठी माणसावर आली. या सगळ्याचा दूरगामी परिणाम असा की मराठी माणूस आर्थिक संपन्नांच्या सान्निध्यात अजूनही कानकोंडा होतो आणि विपन्नांच्या संगतीतच त्यास हायसे वाटते. तेव्हा या अशा मुंबई नगरीत स्थापण्यात आलेली नॅशनल स्टॉक एक्स्चेंज, एनएसई, ही यंत्रणा आज एकविसाव्या वर्षांत पदार्पण करीत असून तिच्या वाटचालीची दखल घेणे हे या मराठी मानसिकतेवर काही प्रमाणात तरी उतारा ठरू शकेल.
ही अशी दखल घेण्याची अनेक कारणे आहेत. पहिले म्हणजे या एनएसई नामक भांडवली बाजाराने भारतीय अर्थव्यवस्थेतील एका महत्त्वाच्या घटकात शिस्त आणली आणि त्यायोगे बाजारपेठेवरील विश्वास वाढवला. हे झाले तो काळ पाहिल्यास याचे महत्त्व पटेल. हर्षद मेहता नामक व्यापारी सांडाने बाजारात धुमाकूळ घातला होता. भांडवली बाजार आणि बँकिंग व्यवस्था यांतील कच्चे दुवे चतुरपणे हेरत हर्षद मेहता याने भारतातील पहिला मोठा भांडवली बाजार घोटाळा करून दाखवला आणि स्वत:चे आणि त्याचबरोबर अर्थव्यवस्थेचेही अध:पतन घडवून आणले. हा काळ पंतप्रधानपदी नरसिंह राव आणि अर्थमंत्रिपदी मनमोहन सिंग यांच्या असण्याचा. देशाच्या सीमा आर्थिक सुधारणांच्या वाऱ्यांनी मुक्त झालेल्या आणि परकीय भागभांडवल भारताकडे संभाव्य गुंतवणूक गंतव्यस्थान म्हणून पाहू लागले होते. परंतु भांडवली बाजारातील या घोटाळ्याने भारताविषयीच्या विश्वासास मोठाच तडा गेला होता. अर्थात हा तडा घालवण्याचे पुण्यकर्म करणारा हर्षद मेहता ही काही पहिली विभूती नव्हे. त्याआधी दुनिया मुठ्ठी में घेऊ पाहणाऱ्यांनी समभाग प्रमाणपत्रांची बनावट मालिका छापून बाजाराची झोप उडवली होती. त्या काळात समभाग हे कागदी स्वरूपात असत आणि अनुक्रमांकांनी त्यांची नोंद ठेवली जात असे. परंतु या थोर महाशयांनी या अनुक्रमांकांचीच चोरी केली. परिणामी एकाच अनुक्रमांकाचे अनेक समभाग बाजारात उपलब्ध झाले आणि एकच हलकल्लोळ झाला. तेव्हा इतक्या मागास आणि लबाडांना आवतण देणाऱ्या व्यवस्थेत सुधारणा करण्याची गरज वाटू लागली होती. त्यासाठी पर्याय होता बाँबे स्टॉक एक्स्चेंजमध्येच आमूलाग्र सुधारणा घडवणे वा स्पर्धा म्हणून एक स्वतंत्र एक्स्चेंज जन्माला घालणे. यातील दुसरा निवडला गेला. याचे कारण जुन्या पडक्या वाडय़ाची डागडुजी करण्यापेक्षा नवीन इमला बांधणे अधिक सोपे आणि आर्थिकदृष्टय़ा परवडणारे असते. खेरीज नवीन घर हे बदलत्या काळानुसार बांधता येते. त्याचमुळे असे नवीन घर बांधण्याचा निर्णय झाला.
हे नवीन घर म्हणजे नॅशनल स्टॉक एक्स्चेंज. ही घटना १९९२ सालची. म्हणजेच आर्थिक सुधारणांना वर्ष होत असतानाची. त्या वेळी या नव्या घराची चावी कोणाच्या हाती द्यावी यासाठीदेखील मोठा खल झाला होता. या जबाबदारीसाठी लायक व्यक्ती अनेक होत्या तरी लायकीइतकीच निष्ठा आणि बांधीलकी हे गुण असणे अधिक महत्त्वाचे होते. कारण मुंबई भांडवली बाजारात जे काही उद्योग सुरू होते ते पाहता ही नवीन बाजारपेठ पूर्णपणे घोटाळामुक्त असणे गरजेचे होते. या सर्व निकषांवर निवडली गेलेली व्यक्ती ही मराठी होती ही बाब लक्षात घेण्यासारखी आणि एनएसईची विशी साजरी करण्यासाठी आणखी एक कारण ठरणारीदेखील. त्या वेळी आयडीबीआय या बँकेच्या प्रमुखपदी होते एसएस नाडकर्णी. या नाडकर्णी यांनी अनेकांना घडवले आणि त्या घडलेल्यांतील एका व्यक्तीने पुढे नाडकर्णी यांच्या हाताखाली काम न करता स्वतंत्रपणे काही नवे करण्यासाठी आयडीबीआय सोडली. यांच्याचकडे एनएसईची सूत्रे देण्यात आली. रामचंद्र पाटील हे त्यांचे नाव. पुढील काळात आरएच पाटील या व्यक्तीच्या नावावर अनेक आर्थिक संस्थांची नोंद झाली. परंतु या अनेक संस्थांतील मानाचा तुरा म्हणजे एनएसई. या बाजाराने भारतीय भांडवली बाजाराचा चेहराच बदलून तो अधिकच साजिरा आणि आश्वासक केला. कोणत्याही नव्या व्यवस्थेस नाके मुरडणे, तिचे अहित चिंतून ती कशी अपयशी होईल याचे प्रयत्न करणे हे आपल्या समाजाचे लक्षण. त्या लक्षणांना सामोरे जाण्याची वेळ एनएसईवरदेखील आली. लीधो-वेचो करीत समभागांची खरेदी-विक्री करणाऱ्यांचे वर्तुळ एनएसईत कधीच नव्हते. सुरुवातीपासून चोख संगणकीय पद्धतीने व्यवहार करणाऱ्या एनएसईला कधीही बाजारपेठीय गोंगाटाचा स्पर्श झाला नाही. त्या अर्थाने या नवीन पद्धतीत विक्रेत्यांची कलकल, वर्दळ वा गलका कधीच नव्हता. त्यामुळे हा बाजार बाजार वाटायचाच नाही. तेव्हा जन्मल्या जन्मल्या त्याचे मृत्युलेख लिहिले जाणे अपरिहार्य होते.
परंतु ते सर्व फोल ठरले आणि भारतीय कल्पनाही करू शकत नव्हते अशा स्वरूपाचे एक्स्चेंज यातून उभे राहिले. या बाजारपेठेचे यश साजरे करण्याचे आणखी एक कारण म्हणजे या व्यवस्थेच्या निमित्ताने आणखी एका, पूर्ण भारतीय महाकंपनीचा जन्म झाला. एनएसईची स्थापना, तिचे पूर्ण संगणकीकरण, संगणकीय आज्ञाप्रणाली, यंत्रसामग्री आदी प्रचंड पसारा हाताळण्याचे काम अनेक बलाढय़ परदेशी कंपन्या स्पर्धेत असतानाही एका तुलनेने नगण्य अशा भारतीय कंपनीस दिले गेले. ती कंपनी म्हणजे टीसीएस. यातील वैशिष्टय़ाची बाब ही की टीसीएसने या बाजाराची उभारणी दिलेल्या मुदतीच्या आधीच पूर्ण केली आणि अखेर ४ नोव्हेंबर १९९४ या दिवशी एनएसईवर पूर्णपणे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने, बडय़ा विकसित देशांत होतात तशाच पद्धतीने व्यवहारांस सुरुवात झाली. या काळात वरळीतील एका बडय़ा इमारतीत अत्यंत छोटेखानी खोलीत पाटील यांचे कार्यालय होते. त्यांना भेटावयास गेलेल्या एका उद्योगपतीने ते पाहून अधिक मोठय़ा कार्यालयाची गरज व्यक्त केली. त्यावर पाटील म्हणाले, मोठेपणा विचारात हवा, कार्यालयासाठी एक टेबल आणि संगणक इतकेच पुरेसे असते. जेव्हा जन्माला आले त्या वेळी एनएसईत एका सेकंदात दोन व्यवहार इतकेच व्यवहार होत. सहा वर्षांत त्याची गती एका सेकंदात ६० व्यवहार इतकी झाली. आजमितीला या एक्स्चेंजमध्ये एका सेकंदात तब्बल एक लाख ६० हजार व्यवहार होतात आणि जगातल्या पहिल्या २० एक्स्चेंजमध्ये त्याची गणना होते.
तेव्हा अशा तऱ्हेने पूर्ण भरात आलेल्या, अर्थक्षमतेने मुसमुसत्या या बाजारपेठेचा विसावा जन्मदिन साजरा करणे हे आपले कर्तव्य ठरते. त्याची आठवण करून देण्यासाठीच हा प्रपंच.