अथांग पसरलेल्या सागरातून प्रवास करणे हे थरारक आणि रोमांचक असले तरी ते तितकेच आव्हानात्मकही असते. त्यात त्या प्रवासाचे नेतृत्व करणाऱ्यासाठी तर खूपच. अशाच एका निवृत्त कॅप्टनने लिहिलेले हे पुस्तक जगभरच्या समुद्रांची, बंदरांची आणि प्रवासाची अद्भुत सफर घडवतं.
प्रवासाचा मार्ग सागरी असेल आणि जहाजाचे सारथ्य करण्याच्या प्रक्रियेतील तुम्ही एक घटक असाल, तर तो अनुभवही अतिशय रोमांचकारी अन् विलक्षण असतो. खवळलेल्या समुद्रातून.. गोठलेल्या पाण्यातून.. गोडय़ा व खाऱ्या पाण्यातून मार्गक्रमण करताना जहाजाच्या कप्तानाचे कसब आणि धैर्य पणास लागते. ‘र्मचट नेव्ही’मध्ये २० वर्षे विविध पदांवर कार्यरत राहिलेल्या कॅप्टन मिलिंद परांजपे यांचे ‘रॅम्बलिंग्स ऑफ सी लाइफ’ हे पुस्तक त्याचेच उदाहरण म्हणावे लागेल. लेखकाच्या अनुभवांचे प्रतििबब या पुस्तकात उमटले असले तरी त्यात कुठेही अतिशयोक्ती वा आभासी देखणे चित्र निर्माण केलेले नाही. सरळ-सोप्या भाषेत अनुभव कथन करीत हे पुस्तक जगातील वाणिज्य बंदरे, जलमार्ग, त्यांची खासीयत व वैशिष्टय़े आदींची ओळख करून देते. प्रत्येक ठिकाणची वैविध्यपूर्ण माहिती लेखकाने दिली आहे.
लेखकाने आपल्या सागरी भ्रमंतीचा मांडलेला आलेख अनेकार्थाने वेगळा ठरतो. प्रशिक्षणांतर्गत ‘डफरिन’द्वारे सुरू झालेला प्रवास पुढे त्यांना आठ जहाजांचे सारथ्य करण्याची संधी देणारा ठरला. सुएझ कालवा त्यांनी अनेकदा पार केला. एका वेळी एकाच बाजूने वाहतूक होणारा हा जलमार्ग. रात्रीच्या वेळी नौकानयनासाठी ‘सर्च लाइट’चा वापर होणारा जगातील हा एकमेव जलमार्ग. जेव्हा एका बाजूचा मार्ग सुरू होतो. तेव्हा रस्त्यावर वाहनांची जशी रांग लागते, जवळपास त्याच पद्धतीने कालव्यातून जहाजे रांगेत मार्गस्थ होतात. सुएझ कालव्याचे ऐतिहासिक संदर्भही समजतात.
उत्तर अमेरिकेत न्यूऑर्लिन्समधील मार्दिग्रास येथे वावरताना तर भारतातच असल्याची अनुभूती मिळते. या ठिकाणी वास्तव्यास असणारे भारतीय नागरिक पारंपरिक पोशाखात गणेशोत्सव, दुर्गापूजा उत्साहात साजरा करतात. हा सुखद अनुभव एका बाजूला, तर ‘लेक सुपीरिअर’मधील अनुभव तितकाच रोमांचकारी. या भागात प्रवेश करताना जहाज समुद्रसपाटीपासून बरेच उंचावर असते. सर्वसाधारणपणे जहाजाचा अर्धा भाग पाण्याखाली बुडालेला असतो; परंतु या ठिकाणी वेगळेच घडते. स्वच्छ पाण्याचे हे जगातील सर्वात मोठे सरोवर आहे. बल्गेरियातील वारणा येथून पुढील ओडिसा बंदराकडे जाताना हिवाळ्यात समुद्राचे पाणी गोठल्यामुळे कित्येक दिवस जहाज अडकून पडते. काही दिवसांनी बर्फ हटविण्याचे काम स्थानिक यंत्रणेने सुरू करावे लागते. पश्चिम युरोपीय देशात शिस्तबद्धपणे कसे काम चालते, त्याचे हे उदाहरण. कस्टम विभागाने एखाद्या मालवाहू जहाजाला हिरवा कंदील दाखविल्याशिवाय कोणी जहाजावर प्रवेशदेखील करीत नाही.
कमी दृश्यमानता, भरती-ओहोटीच्या काळात जहाज सुरक्षितपणे मार्गस्थ करण्याचे कसब अनुभवांतून मिळते. पनामा कालव्यातील प्रसंग त्याच धाटणीचा. या कालव्यातून मार्गक्रमण करताना जहाजातील पाणी बाहेर काढणारी यंत्रणा नादुरुस्त झाली होती. बंदरात थांबणे अवघड असल्याने कप्तानाने मालाने भरलेले जहाज समुद्रात नेण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय तसा धोकादायक; पण असेही निर्णय कधी कधी घ्यावे लागतात. काही काळानंतर नादुरुस्त यंत्रणा सुरू झाली. मग जहाजाचा पुढील प्रवास विनासायास पार पडला. रशियात जहाजावर काही जणांनी हल्ला केला. त्या वेळी रशियन पोलिसांनी धाव घेऊन केलेली मदतही लेखकाच्या कायम लक्षात राहणारी ठरली.
वैविध्यपूर्ण अनुभवांची मालिका या पुस्तकात वेगवेगळ्या अंगांनी भेटते. स्वीडनमधील उद्येवाला बंदरावर व्यापारी जहाजांची मोठी वर्दळ असते. दिवसभरात या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात मालाची वाहतूक होते. इथेच भारतात बोफोर्स तोफांसाठी दारूगोळा घेऊन निघालेले जहाज लेखकाच्या दृष्टिपथास पडले. दिवसभर कमालीची वर्दळ असणाऱ्या बंदराच्या रम्य परिसरात सायंकाळी नीरव शांतता पसरते. असे ठिकाण अन्यत्र सापडणे अवघड.
‘जगविकास’ जहाजातून नवलाखी बंदरावर जाताना लेखकाला लाटांमुळे अकस्मात समस्येला तोंड द्यावे लागले. बंदरात एकाच वेळी दोन जहाजे आत जाऊ शकतात. तिसरे जहाज ‘जगविकास’ होते. आतमध्ये जागा नसल्याने ते बाहेर नांगर टाकून थांबले; परंतु लाटांचा जोर असा होता की, रात्रीतून हे जहाज जागेवरून फिरले. सकाळी कप्तानाने मूळ जागेवर जहाज नेण्याचा प्रयत्न केला; पण या प्रयत्नात ‘जगविकास’ आतील दोन जहाजांकडे कलले. या वेळी खुद्द लेखकाने जहाजाचे सारथ्य करीत कौशल्यपूर्वक ते समुद्रात सुरक्षित जागेवर नेले.
अथांग पसरलेला समुद्र ऐतिहासिक सागरी युद्धाची साक्ष देतो. पाण्यात कोणतेही चिन्ह नसते; पण त्या त्या क्षेत्रातून मार्गस्थ होताना इतिहासाचा तो पट उलगडला जातो. अशा वेगवेगळ्या लढाईंचा साक्षीदार राहिलेल्या सागरी ठिकाणांची ओळख हे पुस्तक करून देते.
प्रत्येकाच्या आयुष्यात काही प्रेरणा देणारे घटक असतात. प्रशिक्षणादरम्यान लेखकाला भेटलेला मलेशियन वंशाचा मोहंमद तोरमोती हा त्यापैकीच एक. अनेक भाषांचे ज्ञान असणाऱ्या तोरमोतीची कामातील जिद्द विलक्षण होती. त्याची जिद्द प्रेरणा देणारी ठरल्याचा उल्लेख लेखकाने केला आहे. सागरी प्रवासात भारतीय टपाल विभागाचे महत्त्व लक्षात येते. इतर देशांच्या तुलनेत भारतीय टपाल विभाग कुठे मागे नाही. इतर देशांच्या टपाल विभागाला पत्र वा तत्सम वस्तू पोहोचविण्यासाठी जितका कालावधी लागतो, तितकाच भारतीय टपाल विभागाला लागतो. सर्व देशांची कार्यपद्धतीदेखील सारखीच आहे. प्रवास वर्णनावरील बरीच पुस्तके आपण वाचलेली असतात; पण नेहमीच्या प्रवासापेक्षा हा पूर्णपणे वेगळा असा प्रवास आहे. काळ्या समुद्रापासून ते बँकॉक, चायना स्ट्रीट, सिंगापूर, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, व्हेनिसपर्यंतच्या वैविध्यपूर्ण सागरी भटकंतीचा पट मांडणारे हे पुस्तक आहे.
रॅम्बलिंग्स ऑफ सी लाइफ : मिलिंद आर. परांजपे,
यंग ग्राफिक्स, मुंबई,
पाने : १९९, किंमत : २५० रुपये.