कोची येथील शिबिरातील निर्णयांची माहिती देताना  हिंदूंना बहुप्रसवतेचा सल्ला रा. स्व. संघाचे पदाधिकारी देतात, त्यावर टीका झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी असा काही ठराव नसल्याची सारवासारव केली जाते. मुस्लिमांना या मातीतलेच मानायला तयार असलेला संघ, ‘त्यांच्या’मुळे देशाचा लोकसंख्या-समतोल बिघडणार या मतावर मात्र ठाम राहातो.. कोणत्या दिशेने जावे याबाबत संघाचा गोंधळ  संपविण्याचा एक मार्ग म्हणजे संघाने स्वतच निवडणुकीच्या आखाडय़ात उतरावे.
या देशात हिंदूंची काही प्रगती झाली असेल तर ती केवळ एकाच कारणामुळे. ते म्हणजे हा समाज धर्मगुरू म्हणवून घेणाऱ्यांच्या कच्छपि लागला नाही. त्याच वेळी हेही तितकेच खरे की बहुतांश मुसलमान समाज अप्रगत अवस्थेत असेल तर त्या मागेही एकच कारण आहे. ते म्हणजे त्या समाजावरील धर्माचा प्रभाव. हिंदू इतिहासाच्या चक्राची ही सव्य भ्रमंती राष्ट्रीय स्वयंसेवक संघास मंजूर नसावी असे दिसते. त्याचमुळे हिंदूंनी कुटुंब नियोजन करू नये आणि किमान तीन अपत्ये जन्माला घालावीत असे अपसव्यी विधान करण्याची दुर्बुद्धी संघाच्या एका पदाधिकाऱ्यास शनिवारी झाली. आपणास तसे अभिप्रेत नव्हते, हा संघाचा ठराव नाही, असे सांगण्याचा प्रयत्न सोमवारी   संघाने केला, परंतु या विधानासाठी संघाने घेतलेले आधार आजही कायम आहेत. हिंदू धर्मास बुद्धिप्रामाण्यवादाची उदात्त परंपरा आहे. धर्मतत्त्वांना झिडकारून वेगळे तत्त्वज्ञान मांडणाऱ्यांचेही या धर्माने स्वागत केले आणि त्याचमुळे ऋ ण काढून सण करा असे म्हणणाऱ्या चार्वाकाचाही या समाजात आदर झाला. त्याच वेळी जातिव्यवस्थेचे समर्थन करणाऱ्या मनूचा निषेध याच धर्मातील मंडळींनी केला आणि सुधारणेच्या वाऱ्यांना गती दिली.
आर्य समाज, ब्राह्मो समाज आदी संस्थात्मक सुधारणांना महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, गोपाळ गणेश आगरकर, विनायक दामोदर सावरकर अशा अनेकांनी वैयक्तिक पातळीवर हातभार लावला आणि त्यामुळे या समाजाची प्रगती झाली. मुसलमानांच्या तुलनेत हिंदू महिलांची अवस्था बरी म्हणावी अशी आहे ती केवळ या सुधारकांमुळे, हे नाकारता येणार नाही. ज्या वेळी हिंदुत्ववादी म्हणवून घेणारे ‘भाला’ या नियतकालिकाचे संपादक भोपटकर अर्वाच्य आणि असभ्य भाषेत प्रतिगामी विचारांचे समर्थन करीत होते, त्याच काळात त्यांना संयत उत्तर देणारे रघुनाथ धोंडो कर्वे हे ‘समाजस्वास्थ्य’मधून कुटुंब नियोजनाचा आग्रह धरीत होते. या सगळय़ाकडे दुर्लक्ष करीत पुन्हा एकदा हिंदूंनी अधिक मुले जन्माला घालण्याचे विधान आणि ते महागात पडणार हे  स्पष्ट झाल्यानंतर त्याचा इन्कार, हे केविलवाणे आहे. ज्या काळात कर्वे हे गर्भनिरोधकांचा प्रचार करीत होते त्याच काळात भालाकार भोपटकर या रबरी टोप्यांतून कित्येक राम आणि कृष्ण वाया जात असल्याचा निलाजरा युक्तिवाद करीत होते. रा. स्व. संघाने कोची येथील शिबिरानंतर याच विचाराचा पाठपुरावा करावा हे संघ काळाबरोबर पुढे न जाता १०० वर्षे मागे जात असल्याचे लक्षण म्हणावे लागेल. या कर्वे यांच्याही आधी साडेतीनशे वर्षांपूर्वी समर्थ रामदासांनी दासबोधात  लेकुरे उदंड झाली, तो ते लक्ष्मी निघोन गेली, बापुडे भिकेस लागली, काही खाया मिळेना असा इशारा देत कुटुंब लहान राखण्याचा सल्ला दिला आहे. संघाचे आधीचे प्रमुख के. एस. सुदर्शन यांनीही हिंदूंनी अधिक मुले जन्मास घालावीत असेच मत व्यक्त केल्याचा दाखला आता हे मत नव्याने मांडणाऱ्यांनी दिला. मुळात सुदर्शन हे काय विचारविश्वाचे मापदंड होते असा संघाचा समज आहे की काय? दूरसंचार-अभियांत्रिकीचे पदवीधारक असलेल्या सुदर्शन यांची विज्ञानविषयक मतेही आश्वासक नव्हती आणि स्वदेशीसारखे कालबाह्य तत्त्वज्ञान ते कवटाळून बसले. त्यामुळे त्यांच्या सामाजिक मतांचा आदर करण्याचे काहीच कारण नाही. हिंदूंनी अधिक मुले जन्माला घालावीत, कारण मुसलमानांच्या तुलनेत हिंदू जननदर घसरला आहे, असे मत शनिवारी मांडणाऱ्यांनी सुदर्शन यांच्या अशाच मताचा आधार घेतला. परंतु याच सुदर्शन यांनी आपल्या उत्तरायुष्यात मुसलमान धर्मगुरूंची भेट घेऊन मुसलमान हे अल्पसंख्य नाहीत, ते याच मातीचा भाग आहेत, असेही मत व्यक्त केले होते. ते जर खरे मानले तर ‘त्यांची’ संख्या वाढत असल्याबद्दल संघास काळजी वाटायचे कारण काय? राष्ट्रीय लोकसंख्या धोरण हवे, ही संघाची खुलासेवजा सारवासारवही मग अर्थहीन ठरते. अशा स्वरूपाच्या विधानांमुळे संघ हा हिंदूंतील विचारींना अतार्किक वाटू लागेल आणि मुसलमानांपासून अधिक दूर जाईल. समाजाचे अधिक भले करणे हाच संघाचा विचार असेल तर मागे असलेल्यास पुढे आणावयाचे की पुढे असलेल्यास मागे खेचायचे याचा विचार संघाने करावयास हवा.
इस्लाम धर्माचे कट्टर पालन करणाऱ्या सौदी अरेबियासारख्या देशात महिलांना समान अधिकार नाहीत. इतकेच काय, साधे वाहन चालवावयाचे असेल तर त्यांना बंड करावे लागते. हे निषेधार्ह आहे. परंतु त्याच वेळी संघासारख्या संघटनेतही महिलांना स्थान नाही, या वास्तवाचे काय करायचे? महिलांना आम्ही आदराचे स्थान देतो असा भास निर्माण करता यावा यासाठी संघाने महिलांसाठी राष्ट्रसेविका समिती जन्माला घातली. परंतु मूळ संघाची द्वारे, त्यातील पदे महिलांना खुली करण्याचा मोठेपणा दाखवला नाही, या वस्तुस्थितीकडे कानाडोळा करता येणार नाही. हिंदूंनी कुटुंब नियोजन करू नये असे संघ सांगत असताना त्याच वेळी केरळातील ख्रिस्ती धर्मगुरूंनीही आपल्या धर्मबांधवांसाठी अशाच स्वरूपाचा फतवा काढला. तेव्हा संघाची गणना या असल्या मागास मंडळींच्या रांगेत केली गेल्यास अयोग्य ते काय? अमेरिकेत ख्रिस्ती धर्मीयांचे प्राबल्य असलेल्या रिपब्लिकन पक्षीयांचा गर्भपातास आणि स्ंकद पेशी संशोधनास विरोध आहे. ते स्वतस जीवनवादी म्हणवून घेतात. म्हणजे एका बाजूला जीवनवादी असे म्हणवून घ्यावयाचे आणि त्याच वेळी हेच जगणे अधिक समृद्ध करणाऱ्या स्कंदपेशी संशोधनास विरोध करावयाचा हे शहाणपणाचे कसे? वास्तव हे आहे की अनेकांप्रमाणे सध्याच्या काळात संघाचा कोणत्या दिशेने जावे या बाबत गोंधळ उडालेला आहे. एका बाजूला सावरकर यांच्यासारख्या प्रखर बुद्धिवाद्यांस संघ आपलासा करू पाहतो. परंतु त्याच वेळी दुसरीकडे गंगाजल वा गोमूत्राने सर्व आजार बरे होतात असल्या थोतांडाचा प्रचार करणाऱ्यांना उत्तेजन देतो आणि गोबराच्या लेपामुळे किरणोत्साराचा धोकाही टळतो असले भंपक युक्तिवाद खपवून घेतो.
याच शिबिरात संघाने संयुक्त पुरोगामी आघाडीचे भ्रष्ट सरकार जनतेने पराभूत करावे अशी हाक दिली. संघ अलीकडे राजकीय भूमिका उघडपणे घेऊ लागला आहे, याचेच हे निदर्शक आहे. सरकार कसे चालवावे या बाबतही संघाच्या बऱ्याच सूचना असतात. त्याचे पालन काँग्रेसजनांकडून होणे अशक्यच. परंतु  संघाचे कुलदैवत्व मान्य करणाऱ्या भाजपलाही त्या सूचनांचे पालन करणे का जमत नाही, याचाही विचार संघाने करावा. आदर्श कसे असावे हे सांगण्याचा सर्वात चांगला मार्ग स्वत: आदर्श होऊन दाखवणे हाच असतो. तेव्हा संघाने आणखी एक पाऊल पुढे टाकून प्रत्यक्ष निवडणुकीच्या आखाडय़ात उतरावे आणि आपल्या स्वयंसेवकांचे सरकार किती उत्तम कार्य करू शकते याचा मूर्तिमंत धडा द्यावा. ज्या प्रमाणे पोहोण्यास शिकवावयाचे असेल तर कोरडे राहून चालत नाही, पाण्यात उडी घ्यावीच लागते. त्या प्रमाणे राज्यशकट हाकण्यात आदर्श निर्माण करू पाहणाऱ्याचेदेखील तसेच आहे. संघाने आपलेच एकेकाळचे स्वयंसेवक अटलबिहारी बाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांच्यापासून ते मनमोहन सिंग यांच्यापर्यंत सर्वाच्याच कारभारातील वैगुण्य दाखवून दिले आहे. आता वैगुण्यशून्य कारभाराचा दीपस्तंभ निर्माण करण्यासाठी स्वत:च राज्यशकट हाकण्यास सुरुवात करावी, हे उत्तम. तसे होत नाही, तोवर अशा विचारनिरोधनाची वेळ संघावर वारंवार येईल.