आर. के. नारायण यांच्या ललित आणि ललितेतर साहित्यातील निवडक लेखनाचा समावेश असलेले हे पुस्तक नारायणप्रेमींसाठी पर्वणी आहेच, पण ‘मालगुडी’ न वाचलेल्यांसाठीही चांगला पर्याय आहे. नारायण यांच्या भाषाशैलीचे, व्यक्तिचित्रांचे आणि त्यांच्या प्रत्यक्ष अनुभवांचे दर्शन या पुस्तकातून होते. वास्तव आणि प्रतिमांमध्ये असलेला विरोधाभासही ‘गाइड’वरील दोन लेखांतून व्यक्त होतो. थोडक्यात विचारप्रवृत्त करत अंतर्मुख करणारे हे संकलन आहे.
ललित आणि वैचारिक हे दोन्ही वाङ्मय प्रकार तितक्याच ताकदीने हाताळणाऱ्या काही मोजक्या साहित्यिकांमध्ये आर. के. नारायण यांचा उल्लेख करावा लागेल. या प्रतिभासंपन्न लेखकाने स्वत:ला ‘रिअॅलिस्टिक फिक्शन रायटर’ म्हटले आहे. त्यांच्या या वाक्याची प्रचीती थोडक्यात देणारे अलीकडेच प्रसिद्ध झालेले पुस्तक म्हणजे ‘द व्हेरी बेस्ट ऑफ आर. के. नारायण – टाइमलेस मालगुडी – सिलेक्टेड फिक्शन अॅण्ड नॉन फिक्शन.’ यात फिक्शन विभागांतर्गत सात आणि नॉन फिक्शनअंतर्गत चार लेखांचा समावेश आहे.
काळजाला भिडणारे प्रसंग, नाटय़ात्मक कथन, शैलीमुळे डोळ्यांसमोर उभ्या राहणाऱ्या घटना आणि सोप्या भाषेत सहजपणे सांगून जाणारा खोल, गंभीर जीवनानुभव हे नारायण यांच्या सृजनात्मक साहित्याचे वैशिष्टय़ म्हणायला हवे. त्यांची पहिली कादंबरी अर्थातच ‘स्वामी अॅण्ड फ्रेंन्ड्स’. मालगुडी गाव, स्वामी, त्याचे नातेवाईक, मित्र आणि तेथील ग्रामस्थ अनेकांना परिचित झाले ते या आणि यानंतर आलेल्या पुस्तकांमुळे. आणि इतर अनेकांना हे सगळे परिचित झाले ते त्यावर कित्येक वर्षांनंतर आलेल्या दूरदर्शन मालिकेमुळे. मानवी स्वभावाचे विविध पलू ‘मालगुडी’मध्ये पाहायला मिळतात. अगदी स्वामीच्या घरातले कुटुंबीयसुद्धा आपल्याला आपलेच वाटतात इतके ते प्रसंग कुणाच्याही घरात घडणारे आहेत. आणि ते तितकेच सकसपणे उतरलेले आहेत.
या पुस्तकात अर्थातच त्याची फक्त एक झलकच वाचायला मिळते ती ‘स्वामी अॅण्ड फ्रेंन्ड्स’ या एका प्रकरणातून. शाळेला सुट्टी पडल्यामुळे स्वामी दुपारच्या वेळात खेळायला येतो म्हणून मित्रांना सांगून बसलाय. मित्रही वाट बघताहेत. पण नेमका वडिलांना तो सापडतो आणि ते त्याला एकेक कामे सांगतात. वडिलांना तो उलट उत्तरे देऊ शकत नाही, पण त्याची होणारी सारी चरफड शब्दबद्ध करणारी त्याची देहबोली आपल्याला त्याचा उद्वेग जाणवून देते. बाबांना हवे असलेले कापड खूप शोधूनही त्याला सापडत नाही. आजी, आई काही मदत करत नाही, त्यामुळे चिडलेला स्वामी आपल्या तान्ह्य़ा भावाच्या अंगाखालचे कापड ओढून काढून बाबांना देतो. त्यावर टिप्पणी करताना नारायण लिहितात, ‘आपल्या या सगळ्या समस्येला आईला जबाबदार धरत बाळाला त्रास देत त्याच्या अंगाखालचा कपडा ओढून काढण्याने स्वामीला आपल्यावरील अन्यायाचा बदला घेतल्याचा बालसुलभ दिलासा मिळाला.’ खेळायला पाठवण्याऐवजी वडील जेव्हा त्याला गणित घालतात तेव्हा मात्र त्याच्या संयमाचा कडेलोट होतो. इतका की महाप्रयासाने जेव्हा ते गणित सुटते तेव्हा त्याच्या डोळ्यांतून पाणी वाहायला लागते.
या पुस्तकातील सर्वाधिक जागा व्यापणारी दोन प्रकरणे म्हणजे ‘द गाइड’ आणि ‘मिसगायडेड गाइड’. देव आनंद आणि वहिदा रेहमान यांचा ‘गाइड’ बघणं आणि नारायण यांनी शब्दबद्ध केलेली ‘द गाइड’ ही कादंबरी ‘वाचणं’ हे दोन स्वतंत्र अनुभव आहेत. गाइड राजू, रोझी, मार्को, राजूची आई, मामा ही व्यक्तिमत्त्वे पुस्तकात अधिक ठसठशीतपणे येतात, अधिक कळतात. खोटी सही केल्यानंतर राजू पकडला जातो, तेव्हा अपेक्षाभंगामुळे रोझीला झालेले स्वाभाविक दु:ख आणि त्याच वेळी त्याच्यावरचे निरतिशय प्रेम यांची सरमिसळ पुस्तकातून अधिक ठसते. तुरुंगवासानंतर राजूचे गावात येणे, तिथे त्याला संतपद मिळणे आणि त्यातच त्याचा शेवट होणे या राजूच्या अनपेक्षित जगण्यातून मानवी जगण्यातली अपरिहार्यताच व्यक्त होते.
‘मिसगायडेड गाइड’ या प्रकरणात प्रत्यक्षातला ‘गाइड’ आणि पडद्यावर साकार झालेला ‘गाइड’ या दरम्यानची लेखक म्हणून सहन करावी लागलेली तडजोड व्यक्त होते. ‘आम्ही नारायण यांनी लिहिलेला ‘गाइड’ अगदी तसाच्या तसा पडद्यावर साकारू, तेही प्रत्येक टप्प्यावर त्यांना घेऊनच’ या नारायण यांनी शूटिंगच्या सुरुवातीच्या टप्प्यात सातत्याने ऐकलेल्या वाक्यातला विरोधाभास नंतर त्यांना सातत्याने प्रत्ययास येऊ लागला. आपली कथा आपल्याच हातातून निसटून चालली आहे, याची जीवघेणी वेदना या प्रकरणात प्रभावीपणे उतरली आहे.
सुरुवातीच्या काळात अमेरिकी दिग्दर्शक, निर्मात्या आणि नोबेल पुरस्कार विजेत्या लेखिका पर्ल बक यांनी भारतीय मातीतला ‘गाइड’ बनवण्याची स्वप्ने दाखवली होती. पण त्यांना पहिला धक्का बसला तो मालगुडीच्या अस्तित्वाचाच. ‘मालगुडी’ हे गाव जरी नारायण यांच्या कल्पनेतले असले तरी दक्षिण भारतातले त्यांनी निर्माण केलेले ते असे गाव आहे जे हजारो लोकांच्या मनात घर करून राहिलेले आहे. त्या गावाला स्वत:चा असा रंग, रूप, अर्थ आहे. त्यामुळे ‘गाइड’ची कथाही गावातच साकार व्हायला हवी होती. मात्र सिनेमा वाइड स्क्रीनवर आणि इस्टमन कलरमध्ये दाखवला जाणार असल्याने साहजिकच त्यांना देखणे शहर दाखवायचे होते. ज्यासाठी त्यांनी निवडले जयपूर, जे नारायण यांच्या कल्पनेतल्या गावाशी फटकून वागणारे होते. यावर लिहिताना नारायण यांची उपहासात्मक शैली अधिक तेज होताना दिसते. ते लिहितात, ‘चच्रेदरम्यान मला विचारले गेले, ‘तुम्हाला वाटतेय तिथेच मालगुडी आहे हे तुम्हाला कसे माहीत, ते कुठेही असू शकते.’ तेव्हा मात्र मी माघार घेतली. तरीही मी त्यांना म्हटले, ‘मालगुडी माझ्या कल्पनेतले आहे. मी तयार केलेय त्याला. आणि गेली तीस वष्रे या परिसरातल्या कादंबऱ्या मी एका मागोमाग लिहितोय.’ ’ शेवटी असे जाहीर करण्यात आले की ही कथा मालगुडीमध्ये घडतेय हेच चित्रपटातून काढून टाकू या. ही एका शहरातली प्रेमकथा होईल. तेव्हा मात्र नारायण यांना त्यांच्या मनातल्या मालगुडीला, त्यात साकारत गेलेली प्रेमकथा, त्या मातीचा गोडवा, गावाच्या अस्तित्वातून व्यक्त होणारे लोकमानस या सगळ्याला भव्य-दिव्य सिनेमाच्या स्वप्नापुढे तिलांजली द्यावी लागली. त्यानंतरही मूळ कथेत, प्रसंगात बदल घडवणारे प्रस्ताव सुचवण्यात आले. काही स्वीकारले गेले, काही रद्द केले गेले. ते सांगणारी नारायण यांची प्रसंगी उपहासात्मक शैली वाचण्यासाठी आणि सिनेमापलीकडचा ‘गाइड’ जाणून घेण्यासाठी मूळ प्रकरणेच वाचायला हवीत.नॉन फिक्शन या विभागातले आणखी एक महत्त्वाचे प्रकरण म्हणजे, ‘प्रॉब्लेम ऑफ इंडियन रायटर’. लेखकाला आपल्या लेखनासाठी गुंतवावे लागणारे तन, मन, धन आणि त्या बदल्यात वाचकांचा पुस्तक विक्रीसाठी असलेला कमी प्रतिसाद यात चांगल्या प्रकारे व्यक्त झाला आहे. दोन लाख ७४ हजार लोकवस्ती असलेल्या आपल्या शहरात जिथे आपले नावही सुपरिचित आहे तेथेही २०० पेक्षा जास्त प्रतींच्या विक्रीची खात्री देता का येत नाही, याचे उत्तर मीही शोधतोय, असे ते म्हणतात. एखादी कादंबरी लिहायची असेल तर किमान ८० हजार शब्द लिहावे लागतात, वर्ष-दोन वर्षे गुंतवावी लागतात. तेव्हा ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत जावे ही अपेक्षा असतेच. म्हणूनच विक्री संस्कृती वाढणे गरजेचे असल्याचे त्यांनी या लेखात म्हटले आहे.
या वैचारिक लेखांबरोबरच फिक्शन विभागातली पुराणकाळात घेऊन जाणारी ‘मिसपेअर अँकलेट’ आणि त्याच्या विरुद्ध जॉनरची कथा म्हणजे ‘अॅन अॅस्ट्रोलॉजर्स डे’. या कथांचा शेवट कहानी मे ट्वीस्टसारखा अनपेक्षित आहे, कथेतल्या पात्राला आणि वाचक म्हणून आपल्यालाही. याशिवाय ‘टॉकेटीव्ह मॅन’, ‘अंडर द बनियान ट्री’, ‘अ हॉर्स आँड टू गोट्स’ या कथाही मानवी स्वभावाच्या विविध पलूंवर भाष्य करत आपल्याला गुंतवून ठेवतात; तर ‘माय डेज्’, ‘माय डेटलेस डायरी’सारखे लेख जगण्यावर भाष्य करत आपल्याला विचारप्रवृत्त करतात.
थोडक्यात आर. के. नारायण यांच्या एकाच वेळी फिक्शन आणि नॉन फिक्शन कलाकृतीचा आनंद देणारे हे पुस्तक महत्त्वाचे आहे.
द व्हेरी बेस्ट ऑफ आर. के. नारायण
टाइमलेस मालगुडी,
रूपा पब्लिकेशन इंडिया, नवी दिल्ली,
पाने : ३७८, किंमत : ३९५ रुपये.
सर्वोत्तम आर. के. नारायण
आर. के. नारायण यांच्या ललित आणि ललितेतर साहित्यातील निवडक लेखनाचा समावेश असलेले हे पुस्तक नारायणप्रेमींसाठी पर्वणी आहेच, पण ‘मालगुडी’ न वाचलेल्यांसाठीही चांगला पर्याय आहे. नारायण यांच्या भाषाशैलीचे, व्यक्तिचित्रांचे आणि त्यांच्या प्रत्यक्ष अनुभवांचे दर्शन या पुस्तकातून होते.
First published on: 14-06-2014 at 01:03 IST
मराठीतील सर्व बुकमार्क बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The best r k narayan