हिलरी आणि तेनझिंग यांच्या विक्रमामुळे मानवी आयुष्य पुढे गेले, नवा शोध लागला वा नवी भूमी सापडली असे काहीही घडले नाही. पण तरीही त्यांचा विक्रम अमोल आहे. कारण तो मानवाच्या उंची गाठण्याच्या प्रेरणेचा विजयसोहळा होता..
माणसाला गिरिशिखरे का खुणावतात? काय उत्तर देणार! कोलंबसाला फेसाळत्या दर्याने का आणि काय निमंत्रण दिले होते? असलेच काही साहस करण्यासाठी कॅप्टन कुक यांस कोणती प्रेरणा होती? घरातले सगळे ज्या आजाराने गेले तोच आजार झालेल्या गाईचे रक्त स्वत:च्या शरीरात टोचून लसशास्त्र विकसित करण्याची प्रेरणा एडवर्ड जेन्नर यांना कोठून मिळाली? पिसाळलेला कुत्रा चावला तर आपले मरण नक्की हे माहीत असूनही लुई पाश्चर याला अशाच पिसाळलेल्या कुत्र्याच्या तोंडात नळी खुपसून त्याची लाळ काढून घेण्याचा आगाऊपणा करावा असे का वाटले? संभावितपणे सुखात जगू पाहणाऱ्यांच्या आणि तसे जगून झाल्यावर स्वप्नपूर्ती झाल्याच्या थाटात साठी वा सहस्रचंद्र सोहळे करून घेणाऱ्यांच्या नजरेतून हे सगळे वेडपटपणाचेच उद्योग ठरतीलही. परंतु जग आणि मानवी संस्कृती पुढे जाते ती वेडपटांच्या बेहिशेबीपणातून. आज अशाच एका वेडपटपणाचा हीरक महोत्सव साजरा होत आहे.
 तेनझिंग नोर्गे आणि एडमंड हिलरी या दोघांनी सर्वोच्च अशा एव्हरेस्ट हिमशिखरावर पाऊल ठेवले तो हा दिवस. १९५३ साली हा इतिहास घडला. एका साध्या, दुर्लक्षित खेडय़ात राहणारा तेनझिंग आणि शास्त्रशुद्ध आखीवरेखीव मोहिमेचा भाग असलेले एडमंड हिलरी या दोघांनी साठ वर्षांपूर्वी या दिवशी एव्हरेस्टवर पाऊल टाकले. तेनझिंग त्याआधीही अनेक एव्हरेस्ट मोहिमांत चक्क हमाल म्हणून सहभागी झाले होते. हिमालयाच्याच कुशीतल्या अशाच कोणत्या खेडय़ातला त्यांचा जन्म. तारीख त्यांनाही माहीत नाही. त्यामुळे एव्हरेस्ट यशाच्या कौतुकामुळे भारून गेलेल्या तेनझिंग यांनी २९ मे हाच दिवस आपला जन्मदिन म्हणून वापरायला सुरुवात केली. हिलरी यांचे तसे नाही. न्यूझीलंडमध्ये जन्मलेले हिलरी हवाई दलात होते. दुसऱ्या महायुद्धात वैमानिकाचे मार्गदर्शक  म्हणून त्यांनी चाकरी केली होती. तेनझिंग यांच्याप्रमाणेच हिलरीदेखील तरुण वयातच उंच उंच शिखरांच्या प्रेमात पडले होते. हजारो मैलांच्या अंतरांनी दुरावलेले असले तरी या शिखरांवरती आपले पाऊल पडायला हवे, ही भावना दोघांच्यातही प्रबळ होती. हा योगायोग येथेच संपत नाही. विख्यात ब्रिटिश गिर्यारोहक एरिक शिप्टन यांनी १९५१ साली हाती घेतलेल्या एव्हरेस्ट मोहिमेतही ते सहभागी झाले होते. वास्तविक या शिप्टन यांनी पाऊल टाकले नाही, असे जगात एकच शिखर असावे. एव्हरेस्ट. भारतातील नंदादेवी ते नॉर्वे या उत्तर गोलार्धास जवळ असलेल्या देशातील योतुनहैमन अशा अनेक शिखरांवरील भटकंतीचे विक्रम त्यांच्या नावावर आहेत. याच शिप्टन यांनी १९३४ साली भारतातील नंदादेवीवर पाऊल टाकले. पुढे जाऊन बद्रिनाथपर्यंतची गौरीशंकराची पर्वतरांग त्यांनीच धुंडाळली. या कामगिरीने त्यांच्या समोर पुढचे आव्हान निर्माण केले. एव्हरेस्टचे. १९३५ साली त्यांनी एव्हरेस्टवर पाऊल टाकण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी त्यांच्या मोहिमेतला बिल टेमन या सहकाऱ्याचा जीव प्राणवायूच्या विरलतेने कासावीस झाला आणि त्याला ती मोहीम सोडावी लागली. तेव्हा त्यास पर्याय म्हणून शिप्टन यांनी १९ वर्षांच्या, हसऱ्या चेहऱ्याच्या आणि मिचिमिची डोळ्यांनी सतत हसराच भासणाऱ्या स्थानिक तरुणास संधी दिली. त्याचे नाव तेनझिंग नोर्गे. पुढे हेच दोघे शिप्टन यांच्या एव्हरेस्ट मोहिमेचे भाग झाले. परंतु काही कारणाने मोहिमेची सूत्रे शिप्टन यांना सोडावी लागली आणि ती गेली जॉन हंट यांच्याकडे. तेव्हा खरे तर हिलरी मोहिमेतून बाहेर पडणार होते. परंतु शिप्टन यांनी आग्रह धरला आणि ते राहिले. पुढे काय झाले ते अर्थातच सर्वश्रुत आहे. या मोहिमेचा भाग बनून दोघांनी २९ मे या दिवशी एव्हरेस्टवर पाऊल टाकले आणि कोणत्याही यांत्रिक मदतीशिवाय सर्वाधिक उंची गाठणारे ते पहिले मानव ठरले. ज्या वर्षांत जनुकीय रचनांचा शोध लागला, ज्या वर्षांत अमेरिकेने हायड्रोजन बॉम्ब विकसित केला, आयसेनहॉवर अमेरिकेचे अध्यक्ष बनले, पीटर पॅन आणि जेम्स बाँड या दंतकथा चित्रपटाच्या पडद्यावर आल्या, जोसेफ स्टॅलिन यास पक्षाघाताचा झटका आला आणि मर्लिन मन्रोचे अर्धनग्न छायाचित्र छापीत ‘प्लेबॉय’ जन्माला आले, त्याच वर्षांत हिलरी आणि तेनझिंग यांच्याकडून एव्हरेस्टला पहिला मानवी स्पर्श घडला.
नक्की काय बदल झाला या दोघांच्या या साहसामुळे? आकडय़ांत वा मोजपट्टीत याचे उत्तर देताच येणार नाही. काही काही प्रश्न पडतात हेच त्यांतून मिळणाऱ्या उत्तरांपेक्षा महत्त्वाचे असते. या दोघांचे हिमसाहस हे असे महत्त्वाचे आहे. या दोघांनंतर अनेकांची एव्हरेस्टवर पावले उमटली आणि आता तर एव्हरेस्टवर फिरवून आणणाऱ्या व्यावसायिक सहलीदेखील आयोजित केल्या जातात. यातील लाजिरवाणा भाग हा की अशा प्रकारे एव्हरेस्टवर सफर करवून आलेले एव्हरेस्टवीर वा वीरांगना म्हणून ओळखल्या जातात आणि कोणत्याही उत्सवाच्या प्रतीक्षेत असलेले हौशे अशा वीरांगनांचा सत्कार करून आपल्या आसपासच्या खुज्या टेकाडांचा परिचय करून देतात. परंतु ज्या काळात विमानातूनदेखील एव्हरेस्ट दिसते कसे याची छायाचित्रे प्रसिद्ध झालेली नव्हती त्या काळात हिलरी आणि तेनझिंग यांनी एव्हरेस्ट वारी केली. उत्तुंगाच्या प्रेमात असलेल्या मानवी जमातीसाठी फार मोठी घटना आहे ही. याचे कारण हे की त्यामुळे उंची गाठायची प्रेरणा मानवी मनात शाबूत राहिली आणि कोणती ना कोणती उंची गाठण्याचा आनंद काय असतो, हेही अनेकांना कळू लागले. गिरिशिखरांची भ्रमंती हा छंद आणि वेड दोन्हीही आहे. सर्वाच्याच मनात ते निर्माण होईल असे नाही. त्यामुळे सगळेच काही कमरेला दोर, डोक्यावर विजेऱ्यांच्या टोप्या आणि पाठीवर अंथरूण-पांघरूण आणि प्राणवायूच्या नळकांडय़ा घेऊन कोणत्या ना कोणत्या शिखराच्या दिशेने चालू लागतील, असेही नाही. तसे करण्याची गरजही नाही.
 याचे कारण असे की प्रत्येकाच्या मनात एक एव्हरेस्ट असते. किंबहुना असायला हवे. तसे असेल तर मग त्याचा ध्यास लागतो. ते शिखर गाठायची ओढ अस्वस्थ करते आणि तो अस्वस्थपणा जगण्याचे प्रयोजनच बनून जातो. हे शिखर खेळांतील असेल. लेखनातील असेल. संगीतातील असेल. चित्रनाटय़शिल्पकलेतीलही असेल किंवा साध्या शिडाच्या होडीतून सागरभ्रमंती करण्याच्या इच्छेचेही असेल. कोणतेही असेल. पण ते असणे हे आवश्यक असते. कारण ते तसे असणे हे प्रयोजन असते आणि प्रयोजनाशिवाय जगणे हे फक्त तगून राहणे असते. मानवाचे माणूसपण असलेच तर ते या आणि अशा एव्हरेस्टच्या ध्यासात आहे. हिलरी आणि तेनझिंग यांच्या विक्रमामुळे मानवी आयुष्य पुढे गेले, एखाद्या रोगावर मात करणारी लस तयार झाली, नवा शोध लागला वा नवी भूमी सापडली असे काहीही घडले नाही. पण तरीही हिलरी आणि तेनझिंग यांचा विक्रम अमोल आहे.
कारण तो मानवाच्या उंची गाठण्याच्या प्रेरणेचा विजयसोहळा होता. हे उंचीचे प्रेम असेच शाबूत राहावे म्हणून तो साजरा करायला हवा.