पुढील वर्षी लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक असल्याने आपापल्या मतपेढय़ा सुरक्षित ठेवण्याचे सर्वच पक्षांचे प्रयत्न सुरू आहेत. दंगलीमुळे काही नेत्यांचे भले होतही असेल, पण जनतेने मात्र आपले डोके भडकणार नाही याची काळजी घ्यावी, हेच वास्तव मुझफ्फरनगरच्या दंगलीने अधोरेखित केले आहे.
जातीय आणि धार्मिक दंगलींसाठी उत्तर प्रदेश बदनाम असले तरी मुझफ्फरनगरचा लौकिक तसा नाही. परंतु गेल्या आठवडय़ात अचानक सुरू झालेल्या दंगलीत मुझफ्फरनगर आणि परिसरात ३१ वा अधिकांचा बळी गेला असून परिस्थिती अद्याप नियंत्रणाखाली आहे, असे म्हणता येणार नाही. या दंगलीची ठिणगी हिंदू.. त्यातही जाट.. आणि मुसलमान तरुणांतील प्रेमप्रकरणामुळे पडल्याचे सांगण्यात येते. याबाबत मुझफ्फरनगर हे काही पहिले आहे, असे म्हणता येणार नाही. पंजाब, हरयाणा इतकेच काय तामिळनाडू वा महाराष्ट्रातही या कारणांवरून हिंसाचार झाला आहे. महाराष्ट्रात नगर जिल्हय़ात काही महिन्यांपूर्वी घडले ते शरमेने मान खाली घालावयास लावणारेच होते. फरक इतकाच त्यानंतर परिसरात दंगेधोपे झाले नाहीत. परंतु त्याबाबत अभिमान बाळगण्याचे कारण नाही. दंगेधोपे झाले नाहीत कारण राजकीयदृष्टय़ा दांडगट म्हणता येतील अशा समाजाचा या गुन्ह्य़ात हात होता. परिस्थिती उलट असती तर अशीच शांतता राहिली असती किंवा काय, हे सांगणे कठीण. उत्तर प्रदेशात जे काही झाले त्यामागे संबंधित जात पंचायतींनी घेतलेल्या भडक भूमिका आहेत. महाराष्ट्रातील जात पंचायतीही काही वेगळे करण्यासाठी प्रसिद्ध नाहीत. मुझफ्फरनगरात मुस्लीम तरुण आणि जाट तरुणी यांच्यातील तारुण्यसुलभ प्रेमसंबंधांतून दोन्ही बाजूंच्या धेंडांचे पित्त खवळल्याने ही दंगल सुरू झाली. या संदर्भात मुस्लीम मोहल्ल्यात गेलेल्या तरुणांची हत्या झाल्याच्या वृत्ताने आणि त्यानंतर मुसलमान तरुणासही मारले गेल्याचे वृत्त पसरल्याने तणाव अधिकच वाढला. इंटरनेट आदी माध्यमांच्या गैरवापराने हा तणाव वाढल्याचे प्राथमिकरीत्या दिसते. काही उपद्व्यापी मंडळींनी फेसबुकवरून या मारहाणीच्या दृश्यफितींचा प्रसार केल्याने वातावरण अधिकच बिघडले. परंतु यामागील बेजबाबदारपणा हा की फेसबुकद्वारे पसरवण्यात आलेली ध्वनिचित्रफीत ही प्रत्यक्षात अन्य देशातील असून दोन वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेची आहे. तिचा मुझफ्फरनगर येथे जे काही घडले त्याच्याशी काडीइतकाही संबंध नाही, असे पोलिसांचे म्हणणे. ते खरे असेल तर परिस्थिती किती स्फोटक आहे, याचा अंदाज यावा. ही ध्वनिचित्रफीत अनेक तरुणांनी पाहिल्यावर त्यांची माथी भडकली आणि हा वर्ग जाळपोळीत उतरल्याने हिंसाचार पसरला, असे दिसते. या सगळ्याचा पूर्ण तपशील अद्याप बाहेर आला नसून तो आल्यावर नक्की कोणी काय उद्योग केले हे समजू शकेल. भाजपच्या आमदाराने ही ध्वनिचित्रफीत इंटरनेटच्या महाजालात सोडल्याचे सांगण्यात येते. ही वस्तुस्थिती आहे की समाजवादी पक्षाचा कांगावा हे स्पष्ट होणे कठीण नाही. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात घडलेले काहीही पूर्णपणे नष्ट करता येत नाही. त्यामुळे भाजपच्या नेत्याने तसे केले असल्यास त्याच्या पाऊलखुणा सापडू शकतील. अशा वातावरणात जे काही घडले त्यास हिंदू विरुद्ध मुसलमान असे वळण देण्याचा प्रयत्न झाला. तो सुदैवाने यशस्वी झाला नाही. याचे कारण सदर हिंसाचारात जाट समाजाचे राजकारण असल्याचे लगेचच स्पष्ट झाले. किंबहुना या समाजाच्या जात पंचायत बैठकीतच विशिष्ट धर्मीयांविरोधात आगपाखड करण्यात आली आणि त्यानंतरच दंगलीचे लोण पसरले. ७ सप्टेंबर रोजी झालेल्या जाट पंचायतीस लाखभरांनी गर्दी केली होती. या बैठकीत आगलावी भाषणे झाली आणि त्यानंतरच हिंसाचार पसरला. या समाजाचे म्हणून ओळखले जाणारे अजितसिंग यांना मुझफ्फरनगर येथे जाण्यापासून रोखण्यात आले, त्यावरूनही या दंगलींचा उगम समजू शकेल. अजितसिंग यांच्याकडे जाट समाजाचा मक्ता वडिलोपार्जित आहे. वडील चौधरी चरणसिंग हे जाट समाजाचे प्रभावशाली नेते होते आणि त्यांच्यानंतर तो प्रभाव आपल्याकडे आणि नंतर आपला मुलगा जयंत चौधरी याच्याकडे आला आहे, असे अजितसिंग यांना वाटते. वास्तविक या जात पंचायत बैठकांनंतर लगेचच केंद्रीय गृहखात्याने उत्तर प्रदेश सरकारला संभाव्य तणावाची कल्पना दिली होती. तरीही मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी काही केले नाही.
यामागे दोन कारणे दिसतात. एक म्हणजे मुख्यमंत्रिपद सांभाळण्याचा वकूब अखिलेश यादव यांच्याकडे अद्याप नाही. वडील नेताजी मुलायमसिंग, काका शिवराजसिंग आणि अन्य ज्येष्ठ समाजवादी पक्षीय नेत्यांनी अखिलेश यांना पार गुंडाळून ठेवले असून यांना बाजूला करून आपले नेतृत्व सिद्ध करावे इतकी ताकद त्यांच्याकडे नाही. त्या राज्यात अखिलेश यादव मुख्यमंत्री झाल्यापासून गेल्या १८ महिन्यांत उत्तर प्रदेशात किमान पन्नासभर इतक्या जातीय वा धार्मिक दंगली घडलेल्या आहेत. याच्या जोडीला राज्याची कायदा व सुव्यवस्था रसातळाला गेली असून अखिलेश यादव यांचे सर्वच मंत्री अकार्यक्षमतेबाबत एकास झाकावा आणि दुसऱ्यास काढावा या लायकीचेच आहेत. तेव्हा त्यांच्याकडून काही चांगल्या कारभाराची अपेक्षा नाही. अत्यंत कमी वेळेत इतका मोठा अपेक्षाभंग झाल्याचे दुसरे उदाहरण नसावे. खेरीज दुसरे असे की अशा प्रकारची दंगल होणे ही समाजवादी पक्षाची आणि त्याच वेळी भारतीय जनता पक्षाचीही गरज आहे. गेल्या काही वर्षांत समाजवादी पक्षाचा मुसलमान पाया भुसभुशीत होत चालला असून नाराज मुसलमान मोठय़ा प्रमाणावर काँग्रेसच्या आश्रयास जाताना दिसतात. हे असेच सुरू राहिल्यास समाजवादी पक्षास परवडणारे नाही. त्याच वेळी उत्तर प्रदेशातील समस्त हिंदू आपल्या मागे कसे येतील हा भाजपसाठीही काळजीचा विषय बनलेला आहे. राजनाथ सिंग, कल्याणसिंग ते कलराज मिश्र ते विनय कटियार व्हाया लालजी टंडन अशी एकापेक्षा एक अकार्यक्षम नेत्यांची फळी भाजपकडे असून हे मान्यवर कमी म्हणून की काय कथित साध्वी उमा भारती यांनाही या पक्षाने उत्तर प्रदेशाकडे वळवले आहे. वास्तविक या उमा भारती यांना आपला मध्य प्रदेशातील टिकमगड हा पारंपरिक मतदारसंघदेखील राखता आलेला नाही. परंतु जे जे भगवे ते ते पवित्र वा सामथ्र्यवान असे मानण्याचा निर्बुद्ध पायंडा परिवाराने पाडला असून त्यामुळे उमा भारती वगैरे गणंगांना महत्त्व आले आहे. पदसिद्ध अकार्यक्षमांची इतकी मजबूत तुकडी असतानाही भाजपने गुजरातेतून अमित शाह यांच्याकडे उत्तर प्रदेश शाखेची जबाबदारी दिली. हे शाह गुजरातचे विद्यमान मुख्यमंत्री आणि देशाचे संघघोषित आगामी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जवळचे. त्यांच्याकडे उत्तर प्रदेशची जबाबदारी देऊन भाजपने उत्तर प्रदेशातील राजकारणाची दिशा स्पष्ट केली. त्याचमुळे उत्तर प्रदेशात काही भडकाऊ होणार अशी अटकळ राजकीय वर्तुळात बांधली जात होतीच. ती खरी ठरली. तसे प्रयत्न आधीपासूनच होते. मुझफ्फरनगर दंगलीच्या आधी विश्व हिंदू परिषदेच्या चौरासी कोस यात्रेत तणाव निर्माण व्हावा असा उभय पक्षीयांचा प्रयत्न होता. परंतु ती यात्रा अगदीच फुसकी ठरली. तेव्हा ते नाही तर अन्य काही कारणांनी धार्मिक तेढ वाढवण्याचा प्रयत्न होईल हे उघड होते. कारण या सगळ्यास आगामी निवडणुकांचे परिमाण आहे.
२०१४ सालात होऊ घातलेल्या निवडणुकांआधी सर्व पक्षांना आपापल्या मतपेढय़ा चोख बांधावयाच्या असून मुझफ्फरनगरात जे काही घडले ते या पाश्र्वभूमीवर पाहावयास हवे. दुष्काळ पडल्यास जसे सरकारी यंत्रणा आणि राजकीय पक्ष यांचे भले होते तसेच धार्मिक दुफळीमुळेही होत असते, हे सर्वच संबंधित अमान्य करतील इतके कटू वास्तव आहे. त्यामुळे दंगल आवडे सर्वाना ही राजकीय मानसिकता जनतेनेच समजून घेऊन आपली डोकी भडकणार नाहीत याची काळजी घ्यायला हवी. दंगलींमुळे काही डोक्यांवर राजमुकुट चढतो हे जितके खरे, तितके दंगलींमुळे सामान्यांची डोकी फुटतात हेही खरे.
दंगल आवडे सर्वाना..
पुढील वर्षी लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक असल्याने आपापल्या मतपेढय़ा सुरक्षित ठेवण्याचे सर्वच पक्षांचे प्रयत्न सुरू आहेत.
आणखी वाचा
First published on: 11-09-2013 at 01:01 IST
मराठीतील सर्व अग्रलेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The real story behind muzaffarnagar communal riots