गिरीश कुबेर
नागरिकांनी आपल्या पारडय़ात मते टाकली नाहीत तरी ती आपल्याकडेच वळतील आणि नाही वळली तरी आपल्यावर सत्तात्यागाची वेळ येणार नाही, अशी व्यवस्था रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी करून ठेवली आहे. हा त्यांच्या धडाडीचाच भाग. अशा या नेत्याविरोधात.. कोणी आघाडी उघडलीच, तर ?
राजकारणी आणि चहा यांचा काय संबंध आहे हे एकदा तपासायला हवं! नाही.. इथे संबंध आहे तो रशियाचा. व्लादिमीर व्लादिमीरॉविच पुतिन यांच्या रशियाचा. सर्वसामान्यांना आवडतात तसे पुतिन निधडय़ा छातीचे आहेत. प्रसंगी आपली ही छाती उघडी टाकून त्यांना घोडय़ावरून रपेट करत या छातीचं दर्शन घडवायला आवडतं. मग हे सर्वसामान्य खूश होतात. आपल्या नेत्याची रुंद छाती, त्या छातीतली िहमत वगैरे पाहून त्यांना आपला देश सुरक्षित हातात आहे, याचा आनंद होतो आणि त्या आनंदात हे हर्षभरित नागरिक पुतिन यांच्या पारडय़ात आपली मते टाकतात. अर्थात, त्यांनी तशी ती टाकली नाही तरी ती आपल्याकडेच वळतील आणि नाही वळली तरी आपल्यावर सत्तात्यागाची वेळ येणार नाही, अशी पुतिन यांची व्यवस्था आहे. हादेखील त्यांच्या धडाडीचाच भाग.
पुतिन हे ज्युडो/कराटेही खेळतात. यात आपल्या प्रतिस्पध्र्यास उचलून आपटायचं असतं. त्याचा जीव जात नसतो या खेळात. ही या खेळाची मर्यादाच म्हणायची. प्रतिस्पध्र्याचा जीव जाणार नसेल, उचलून आपटल्यावरही तो जिवंत राहणार असेल तर मग काय उपयोग या खेळाचा, असं त्यांना वाटत असावं बहुधा. मग त्यांच्या देशात आपल्या विरोधकाला चहा पाजतात. आणि तो प्यायल्यावर पुतिन यांचा विरोधक मरून जातो. किंवा मरणाच्या रस्त्याला लागतो. आता काही जण म्हणतात, असं करण्यात पुतिन यांचाच हात असतो म्हणे. पण पुतिन हे धडाडीचे नेते असल्याने अशा कोणत्याच पापकृत्यात त्यांचा हात असल्याचं कधीच दिसत नाही. जे तो आहे असं शोधायला जातात, त्यांनाही कोणी तरी चहा पाजतं.. आणि मग अलेक्सी नवाल्नी यांचं आणि अशा अनेकांचं जे झालं ते होतं.
गेल्या आठवडय़ात आपल्या यशस्वी सायबेरिया दौऱ्यानंतर नवाल्नी भल्या पहाटे मॉस्कोला परतायला निघाले. लवकरचं विमान असल्यामुळे त्यांना न्याहारी वगैरे काही करता आली नाही. कसेबसे ते विमानतळावर पोहोचले.. विमानतळावरच्या व्हिएन्ना कॅफेतनं घाईघाईत चहाचा कप हातात घेतला, संपवला आणि बसले विमानात. दोन हजार मैलांचं अंतर पार करायचं होतं. विमानात चार-पाच तास आराम करायचा विचार होता त्यांचा. पण विमानानं शंभरेक मैल अंतर पार केलं असेल/नसेल; नवाल्नी वेदनेनं कळवळू लागले. सहन होईनात त्यांना कळा. काय झालंय हे सांगताही येईना. आणि तसं काही सांगण्याच्या आतच ते बेशुद्ध झाले. विमान उलटं वळवलं गेलं आणि आणीबाणीच्या परिस्थितीत नवाल्नी यांना आधी सायबेरियातल्या टोम्स्क इथल्या रुग्णालयात आणि नंतर जर्मनीतल्या बर्लिन इथं हलवलं गेलं.
नवाल्नी यांचा प्रवक्ता म्हणाला त्यांच्यावर विषप्रयोग झाला. नवाल्नी यांची चूक इतकीच की, ते आपल्या देशाचा धडाडीचा नेता, अध्यक्ष पुतिन यांना विरोध करतात. पुतिन दुष्ट आहेत आणि त्यांना हरवायला हवं असं त्यांना वाटतं. पुतिन यांच्या पक्षाचं वर्णन ते ‘बदमाशांचा पक्ष’ असं करतात. म्हणजे तसे ते धडाडीचेच. अशा या धडाडीच्या नेत्यानं दुसऱ्या धडाडीच्या नेत्याविरोधात.. आणि त्यातही सत्ताधारी.. आघाडीच उघडली. आणि मग ते हा चहा प्यायले.
त्याआधी १६ वर्षांपूर्वी, २००४ साली अॅना पोलिट्कोस्का हीदेखील असाच चहा प्यायली. अॅना पत्रकार. धडाडीची पत्रकार. सत्यशोधनासाठी जिवाचं रान करायची. तसं करताना तिला आपल्या देशाचे धडाडीचे पुतिन यांनी जिंकलेलं चेचेन युद्ध ‘बनावट’ असल्याचा संशय आला. म्हणजे चेचेन बंडखोर मारले गेले होते, हे खरं. या चेचेन बंडखोरांनी शाळेवर हल्ला करून विद्यार्थ्यांना ओलीस धरण्याचा प्रयत्न केला होता म्हणे. पण धडाडीच्या पुतिन यांच्यासमोर या चेचेन बंडखोरांची डाळ कुठली शिजायला. धडाडीच्या पुतिन यांनी खांडोळी करून टाकली या चेचेन मुसलमान बंडखोरांची. पण अॅनाला यात वास येत होता घडवून आणलेल्या नाटय़ाचा. खरं तर देशप्रेमाने ओतप्रोत भरलेल्या आणि भारावून टाकणाऱ्या आपल्या अध्यक्षाबाबत ही अशा शोधपत्रकारितेची गरजच काय, हे कळलं नाही तिला. देशप्रेमापोटी मारले पाचपन्नास बंडखोर पुतिन यांनी तर काय बिघडलं त्यात इतकं, हे साधं कळलं नाही. मानवाधिकार वगैरे प्रश्न तिला पडायला लागले. मग काय होणार? मॉस्को विमानतळावर असाच चहा प्यायली.. आणि मरणाच्या दरवाजात सुखेनैव पोहोचली. पण तिला कोणी तरी धडाडीचा डॉक्टर मिळाला. त्यानं लगेच उपचार केले. वाचली. पण मोठय़ा धडाडीच्या नेत्यासमोर अशी छोटय़ा धडाडीची व्यक्ती वाचली तर मोठय़ास राग तर येणारच. त्यामुळे मग कोणी तरी तिच्या घरासमोरच गोळ्या घालून मारून टाकलं. पाच जण पकडले गेले. पण तिला मारायचा आदेश दिला कोणी, हे काही आजतागायत कळलेलं नाही.
तिच्या मरण्याला एक महिनाही झाला नसेल. लंडनमध्ये अलेक्झांडर लिटविनेन्को याला भेटायला कोणी रशियन मित्र आले. अलेक्झांडर रशियाच्या गुप्तहेर यंत्रणेत होता. म्हणजे धडाडीच्या पुतिन यांच्यासारखाच. पुतिन पुढे राजकारणात आले आणि आजन्म सत्ताधीश राहण्याची व्यवस्था करते झाले. अलेक्झांडरही धडाडीचाच तसा. पण पुतिन यांच्यापेक्षा कमी. त्यामुळे पुतिन यांना जमलं ते काही करता आलं नाही. पण पुतिन यांनी कशाकशात धडाडी दाखवलेली आहे, याची बरीच माहिती त्याच्याकडे होती. याचा उपयोग करून त्याला पुतिन यांना विरोध करायचा होता. हाही तसा धडाडीचाच विचार. पण पुतिन यांनी त्याच्यावर मात केली. अलेक्झांडरवर परागंदा व्हायची वेळ आली. तो लंडनला स्थायिक झाला. तिथं राहून तो पुतिन यांना विरोध करणार होता. त्यांची कुलंगडी बाहेर काढणार होता. त्याचीच काही चर्चा करण्यासाठी हे कोणी आपल्याला भेटायला आले असणार असं त्याला वाटलं. त्यांना घेऊन शेजारच्या कॅफेत गेला तो गप्पा मारायला. तिथे त्यांच्याबरोबर चहा प्यायला.. आणि झालं. कणाकणानं तडफडून गेला तो रुग्णालयात. अलेक्झांडरला कसली विषबाधा झालेली आहे हे मुदलात कळायलाच डॉक्टरांना वेळ लागला. तोपर्यंत हे विष त्याच्या अंगात भिनून गेलं. त्यामुळे कोणीही वाचवू शकलं नाही त्याला. डॉक्टर, कुटुंबीय यांच्या साक्षीनं तळमळत त्यानं प्राण सोडले.
अगदी पाच वर्षांपूर्वी व्लादिमीर कारामुर्झा यांचंही असंच झालं. व्लादिमीर हे पत्रकार, लेखक, माहितीपट निर्माते वगैरे वगैरे होते. मानवी मूल्ये, स्वातंत्र्य हे त्यांच्या लिखाणाचे विषय. ते मिखाइल खोदोर्कोव्हस्की यांचे चेले. मिखाइल हे रशियातलं बडं प्रकरण. ते एके काळचे पुतिन यांचे प्रवर्तक. तेलसम्राट. बलाढय़ युकोस कंपनीचे प्रमुख. पुतिन यांना त्यांनी बरंच पुढे आणलं. पुतिन सत्तेवर आल्यावर हे पुतिन यांच्याशी असलेली आपली दोस्ती मिरवत राहिले. मग पुतिन यांनी इंगा दाखवला आणि मरता मरता वाचलेल्या मिखाइल यांना लंडनमध्ये आसरा शोधावा लागला. तिथे गेल्यावर शांत बसले. त्यामुळे त्यांना अजूनपर्यंत तरी कोणी चहा पाजलेला नाही. पण कारामुर्झा त्यांच्या जिवावर फारच नाचत होते. २०१५ साली एका बैठकीआधी असा चहा प्यायले आणि बैठक सुरू झाल्यावर ज्या काही ओकाऱ्या सुरू झाल्या त्यात थेट अत्यवस्थच. वाचले. पण पुन्हा तेच उद्योग. २०१७ साली मग पुन्हा तेच. चहा प्यायले आणि थेट कोमात. वैद्यकीय मदत लगेच मिळाली. म्हणून वाचले. शुद्धीवर आल्यावर पहिलं काय केलं, तर त्यांनी देश सोडला.
बोरिस नेमत्सोव्ह हा त्यांचा मित्र. तो विरोधी पक्षनेता होता. उमदा आणि उदारमतवादी. बोरिस येल्त्सिन यांच्या काळात उद्याचा रशियन नेता म्हणून पाहिलं जायचं त्याच्याकडे. पण २००० साली पुतिन आले सत्तेवर आणि सगळं चित्रच बदललं. बोरिस त्यांचा कडवा विरोधक बनला. धडाडीचा होताच. त्यामुळे बराच टिकलाही. पुतिन यांना हा पर्याय होणार असं चित्र निर्माण झालं होतं त्या वेळी. पण २७ फेब्रुवारी २०१५ या दिवशी मॉस्कोतच अगदी क्रेमलीनजवळच पुलावर त्याला कोणी गोळ्या झाडून ठार केलं. दोन वर्षांपूर्वी रशियात ‘पुसी रायट’ नावाचा तरुणांचा बँड खूप लोकप्रिय होता. प्योत्र वीर्झिल्व्ह हा कोवळा तरुण त्यातला एक. लोकशाहीवादी वगैरे. हे ‘पुसी रायट’ सदस्य निदर्शनं करायचे पुतिन यांच्याविरोधात. चांगला प्रतिसाद मिळायचा त्यांना. तर अशाच एका कार्यक्रमाआधी प्योत्र चहा प्यायला आणि.. पुन्हा तेच. मरता मरता वाचला. पण आता त्याची निर्णयक्षमताच मेली आहे. कायम गोंधळलेला असतो. प्योत्रच्या कुटुंबीयांनी त्याला बर्लिनला हलवलं. म्हणून योग्य ते उपचार तरी मिळाले.
नवाल्नी हेदेखील बर्लिनमध्येच उपचार घेतायत. जर्मनीच्या चॅन्सेलर अँगेला मर्केल यांनी स्वत: लक्ष घालून नवाल्नी यांना चोख बंदोबस्त दिलाय.
आता त्याही चहा फुंकून फुंकून पीत असतील बहुधा..
girish.kuber@expressindia.com
@girishkuber