अनेकेश्वरवादी एकेश्वरवाद भारतीय संस्कृतीच्या ऐक्याचे पहिले सूत्र होय. वेदकाळातले अनेक देव, या आर्याच्या देवांत द्रविडांच्याही अनेक देवांची व देवींची सरमिसळ.. यानंतरही उपनिषदांत सांगितलेला एकेश्वरवाद रुजून हे सूत्र सिद्ध झाले, त्याची ‘प्रचार आणि प्रभाव’ हीच कारणे आज शोधता येतात..

मागील लेखात उपस्थित केलेला प्रश्न असा होता की, भारतात सर्वाना संघटित करणारा एक धर्म उदयास न येताही जे सांस्कृतिक ऐक्य निर्माण झाले, त्यासाठी आपल्या पूर्वजांनी कोणती खास पद्धत उपयोगात आणली होती?
त्यांनी येथे अशी एक संस्कृती निर्माण केली की, ज्यामुळे भारताबाहेरून आलेले कोणतेही लोकसमूह वा टोळ्या परक्या न राहता येथील लोकांत व संस्कृतीत समाविष्ट होऊन जावेत. यासाठी त्यांनी अशी पद्धत शोधून काढली की, ज्यानुसार प्रत्येक टोळीला इच्छेप्रमाणे स्वत:च्या टोळीधर्मातील काही भाग पाळण्याचे स्वातंत्र्य दिले गेले व सर्व टोळ्यांना पाळण्यासाठी काही समान तत्त्वे व शिष्टाचार निर्माण करण्यात आले. ‘प्रत्येकाला काही स्वत:चे व सर्वासाठी काही समान,’ अशी ही पद्धत अमलात आली. त्यामुळे एका बाजूने स्वायत्तता व दुसऱ्या बाजूने एकात्मता हे भारतीय संस्कृतीच्या ऐक्याचे महासूत्र बनले. काही उदाहरणांनी हे सूत्र अधिक ठळकपणे लक्षात येईल. पहिले उदाहरण ईश्वर संकल्पनेचे घेऊ.
वेदांत अनेक देव-देवतांची नावे येतात. त्यात ३३ देवता मुख्य मानल्या आहेत. ऋग्वेदात दोन ठिकाणी देवांची संख्या ३३३९ असल्याचे म्हटले आहे. यापैकी मंत्रोक्त देवता म्हणून २३४ देवांची नामसूची ‘भारतीय संस्कृतिकोशात’ दिली आहे. वेदांत आलेली बहुतांश देवांची नावे निसर्गदेवता व गणदेवता यांची आहेत. आर्याच्या विविध गणांना, म्हणजेच टोळ्यांना समावेशून घेण्यासाठी गणप्रमुखांना देव म्हणून वेदांत स्थान देण्यात आले. इंद्र, अग्नी, सोम, वरुण, सूर्य या ऋग्वेदातील महत्त्वाच्या देवता आहेत. इंद्र हा आर्याचा राष्ट्रीय देव आहे. प्रजापती, विष्णू, रुद्र या देवांना ऋग्वेदात फारसे स्थान नाही. ते तिसऱ्या, चौथ्या दर्जाचे देव. ऋग्वेदातील देवांची ही श्रेष्ठ-कनिष्ठता पुढे यजुर्वेदात बदलली. त्यात प्रजापतीला अग्रस्थान मिळाले. रुद्र या देवाला महत्त्व देण्यात आले. यजुर्वेदातील रुद्र हा धनुष्य-बाण घेऊन शिकार करणारा, चर्मवस्त्र व जटा धारण करणारा आहे, तसेच ऋग्वेदात सर्वश्रेष्ठ असलेल्या इंद्राचा सहायक व आज्ञाधारक असणारा विष्णू यजुर्वेदात इंद्रापेक्षा श्रेष्ठ ठरला. ऋग्वेदात सर्व देवांमध्ये सर्वश्रेष्ठ नैतिक नियमांचा पालनकर्ता असणारा वरुण यजुर्वेदात खालच्या दर्जावर गेला. अग्नीचीही तीच गत झाली आहे.
त्यानंतरच्या पुराणग्रंथांत तर इंद्र हा विष्णूला शरण गेला आहे. तो पूजेतून नंतर अदृश्य झाला आहे. या पौराणिक युगात ब्रह्मा, विष्णू व महेश या तीन देवांना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले. शिवाय हे तीन देव वेगवेगळे नसून एकच आहेत, असा त्रिमूर्तीचा सिद्धांत मांडण्यात आला. वैष्णव पुराणांनी हे तिघे विष्णूचेच तीन कार्यासाठी घेतलेले अवतार आहेत, असे प्रतिपादन केले. शैव पुराणांनी हे तिन्ही देव एकटय़ा शिवाची (महेशाची) रूपे आहेत, असा सिद्धांत मांडला. वायुपुराणाने वैष्णव व शैव यांच्या एकीकरणाची भूमिका मांडली. त्यांच्याबरोबरच राम व कृष्ण या दोन नव्या देवांना आणण्यात आले. यानंतरच्या देवांना विष्णूचेच अवतार घोषित करण्यात आले. गीतेतील कृष्ण सर्वश्रेष्ठ परमेश्वर ठरला आहे. महाभारतातील कृष्ण म्हणतो की, ‘मी विष्णू आहे, मरिची आहे, इंद्र आहे, वरुण आहे, यम आहे, सूर्य आहे, बृहस्पती आहे, वासुदेव आहे, रुद्रातला शंकर आहे, नागांतील अनंत आहे, दैत्यांतला प्रल्हाद आहे.. महाभारतातच अन्य ठिकाणी शिव (महादेव) हा कृष्णापेक्षा मोठा व सर्वश्रेष्ठ देव दाखविण्यात आला आहे. वैदिक व पुराण काळातील देवांच्या या चढ-उतार व ऐक्याकडे तत्कालीन लोकसमूहांना वा गुणांना एकत्र आणण्याच्या व त्यांच्यात सांस्कृतिक ऐक्य निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून काळजीपूर्वक पाहण्याची गरज आहे.’
पुराणांनीच पंचायतन स्वरूपातील उपासना मार्ग प्रचलित केला. विष्णू, शिव, शक्ती (देवी), गणपती व सूर्य या पाच देवांचा त्यात समावेश होतो. देवी भागवतात ब्रह्मा, विष्णू व शिवही श्रीदेवीनेच निर्माण केल्याची कथा आली आहे. पुराणांतील नव्या देवांना वेदांतील देवांशी जोडून दिले. पुराणातील शिवाला वेदातील रुद्राशी, विष्णूला वेदातील सूर्य देवाशी, कृष्णाला वासुदेवाशी, तसेच गणपतीला वेदातील ब्रह्मस्पतीशी जोडण्यात आले. पुराणकाळात गणपती शिवाचा पुत्र म्हणून पूज्य ठरला. पुराणांनी गणपतीला स्वतंत्र दर्जा व प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. नंतर बाहेरून भारतात आलेले शक-कुशाण यांची उपास्यदेवता सूर्य होती. पुराणांनी वैदिक सूर्योपासना व शक-कुशाणांची सूर्योपासना यांचा समन्वय घडवून आणला व सूर्याला पंचायतनात समाविष्ट केले. भारतातील सर्व पंथोपपंथांतील सांस्कृतिक ऐक्यासाठी आद्य शंकराचार्यानी ही पंचायतन सुरू केली. या पूजेत या पाचपैकी ज्या पंथाचा जो मुख्य देव असेल त्यास मध्यभागी ठेवून उरलेले देव सभोवताली ठेवले जातात. हिंदू समाजातील सर्व पंथांच्या एकात्मतेसाठी शोधून काढलेली ही नवी पद्धत होती.
जसजसे आर्याचे प्रभाव क्षेत्र वाढत चालले, तसे विविध अनार्य व अवैदिक लोकसमूह त्यात येत गेले. त्यांच्या पूर्वापार विविध पंथांना वा संप्रदायांना सामावून घेण्यासाठी पुराणांप्रमाणेच विविध उपनिषदांचीही निर्मिती करण्यात आली. अवैदिकांच्या धर्माना व देव-देवतांना मान्यता देऊन त्यांना एका संस्कृतीत आणण्याचे काम उपनिषदांनीही केले. आर्य संस्कृतीत नव्याने समाविष्ट होणाऱ्या संप्रदायांसाठी नव्याने उपनिषदे रचण्यात आली. उपनिषदांची संख्या २५० असल्याचे सांगितले जाते. आतापर्यंत १९१ उपनिषदे उपलब्ध झाली आहेत. त्यातील एक ‘अल्लोपनिषद’ नावाचे उपनिषद आहे. अल्लाह या देवाला भारतीय देवांच्या मांदियाळीत स्थान देऊन तो मानणाऱ्यांना येथील संस्कृतीत सामावून घेण्याचा तो प्रयत्न होता. असेच प्रयत्न करून वेदपूर्वकालीन लोकांना व त्यांच्या संस्कृतींना वैदिक संस्कृतीने आत्मसात करून एक भारतीय समाज व महान भारतीय संस्कृती निर्माण केली.
शिव हा अनार्य व अवैदिक देव आहे. त्याला नंतर आर्यानी स्वीकारले व महापदास चढविले. वेदपूर्वकालीन लोकांचे देव व पूजा पद्धती आर्यानी स्वीकारली. हिंदू समाजात नंतरच्या काळात मानाचे स्थान मिळालेल्या अनेक देव-देवता मूळच्या द्रविडांच्या होत. आज प्रचलित असलेली देवांची पूजा व त्यासाठी फुले, फळे, जल वाहणे, दीपारती करणे, देवापुढे बळी देणे या प्रथा द्रविड संस्कृतीतून आलेल्या आहेत. आर्यात यज्ञभाग व होमहवन या विधी होत्या, पूजा पद्धती नव्हती. ‘पूजा’ हा शब्द द्राविड आहे. शैवपंथ हा द्रविडी संस्कृतीचा भाग होता; तो नंतर शिवाच्या रूपाने आर्यानी स्वीकारला. गणेश, स्कंध, नाग, नंदी, भैरव, हनुमान, गरुड, सीतलादेवी इत्यादी आर्यानी नंतर स्वीकारलेल्या देवता मूळ द्रविडांच्या होत्या. राम, कृष्ण, विष्णू हे मूळचे द्रविडांचे देव. त्यांचा रंगही आर्याचा नव्हता. सांस्कृतिक ऐक्याची आर्याची ही पद्धत इतकी परिणामकारक व यशस्वी ठरली की, मुळात कोण व कोणते कोणाचे होते हे शोधण्यासाठी आज इतिहास संशोधन करावे लागत आहे.
सिंधू संस्कृती ही द्रविडांची वा अनार्याची. तीत मातृदेवतेची वा देवाची पूजा होत असे. आर्यानी वेगळे रूप देऊन ही देवीपूजेची पद्धत स्वीकारली. शिवपत्नी पार्वती हिला सर्वशक्तिमान देवी म्हणून संबोधण्यात आले. तिला सर्वश्रेष्ठ देवता, आदिमाया किंवा जगदंबा म्हणून गौरविले गेले. उमा, गौरी, पार्वती, जगदंबा व भवानी ही तिची सौम्य रूपे, तर दुर्गा, काली, चंडी, भैरवी, चामुंडा ही उग्र रूपे मानण्यात आली. देवीवर उपनिषदे व पुराणे स्थापण्यात आली. वेदपूर्वकाळातील लोकांच्या ग्रामदेवतांनाही आर्यानी मान्यता देऊन टाकली.
उपनिषदांनी असेही तत्त्वज्ञान मांडले की, सर्वाचा परमेश्वर एकच आहे. त्याला ब्रह्म, परब्रह्म, परमात्मा अशीही नावे देण्यात आली. प्रत्यक्षात लोक जे शेकडो देव-देवता पूजतात, ते त्या परमेश्वराचीच रूपे होत. सत्य एकच आहे, पण ते जाणण्याचे, त्याकडे जाण्याचे, पाहण्याचे हे भिन्न मार्ग होत. अशा प्रकारे एकेश्वरवादाचा सिद्धांत मांडतानाच, प्रत्येकाने त्या परमेश्वरावरही श्रद्धा ठेवावी व त्याचबरोबर आपला स्वत:चा पूर्वापार देवही मानावा, अशी एकत्वाची व स्वायत्ततेची शिकवण देण्यात आली. याचा एवढा प्रचार करण्यात आला व तो एवढा प्रभावी झाला, की लोकांनाही वाटू लागले की, खरंच मुळात परमेश्वर एकच आहे व आपण मानतो तो देव त्याचीच रूपे व अंश आहेत. शतकानुशतकांच्या अशा प्रचाराने ही श्रद्धा भारतीय जनमानसाचा अविभाज्य भाग व भारतीयत्वाची खूण बनली आहे. सर्व देवांत व त्यांना मानणाऱ्या लोकसमूहात एकत्व निर्माण करण्याचा हा यशस्वी प्रयत्न होता. समान श्रद्धा ठेवायला एक श्रद्धास्थान व आपापले देव मानण्याचेही स्वातंत्र्य मिळाले. हा अनेकेश्वरवादी एकेश्वरवाद भारतीय संस्कृतीच्या ऐक्याचे पहिले सूत्र होय!
हा लेख म्हणजे देव मानणाऱ्या कोणा आस्तिकाने ‘संस्कृतिसंवाद’साठी लिहिलेले पुराण नव्हे; बुद्धिवादी, नास्तिक व अधार्मिक माणसाचे इतिहासाचे डोळस आकलन होय!

 

itin gadkari on Secularism word meaning
Nitin Gadkari : नितीन गडकरी म्हणाले, “संविधानातील सेक्युलर शब्दाचा अर्थ धर्मनिरपेक्षता नव्हे, तर…”

IND vs AUS Usman Khawaja Reveals How He Stop Virat Kohli Sam Konstas Fight on Field Melbourne
IND vs AUS: “मी विराटला ओळखतो…,” कॉन्स्टास-कोहलीमध्ये मैदानात…

atrocities committed on name of religion in world are due to misconceptions says Sarsangchalak mohan bhagwat
सरसंघचालक डॉ. मोहन भागवत म्हणाले, “चुकीच्या समजुतीतून धर्माच्या नावाखाली अत्याचार…”

Pankaja Munde and Dhananjay Munde vs Suresh Dhas new controversy on political stage after elections
मुंडे बहीण-भाऊ विरुद्ध सुरेश धस, निवडणुकीनंतर राजकीय पटलावर नवा वाद

A story of corruption in the name of religion
धर्माच्या नावे भ्रष्टाचाराची कहाणी

RSS chief Mohan Bhagwat statement regarding Ram temple
‘राम मंदिर निर्मिती झाली, म्हणून कोणी हिंदूंचा नेता होत नाही’; सरसंघचालक मोहन भागवत यांचे प्रतिपादन

Dr Mohan Bhagwat statement on religion Pune news
सरसंघचालक डॉ. मोहन भागवत म्हणाले, धर्म सोडून वागल्यास सृष्टी…

Rahul Gandhi mentions Eklavya
अंगठा गमावल्यानंतर एकलव्याचं आयुष्य कसं होतं? काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सरकारवर टीका करताना एकलव्याच्या कथेचा संदर्भ का दिला?

Story img Loader