दीपावली ही सत्याचा असत्यावरील विजय असल्याने तो साजरा करण्यासाठी आपण रोषणाई करतो. आकाशातील आतषबाजीने तर सारा आसमंत उजळून निघतो. ही रोषणाई आरोग्य, संपत्ती, समृद्धी आणि ज्ञान -विज्ञानाचे प्रतीक असते. आपल्या परंपरेनुसार सकाळी देवपूजा करून मित्र, नातेवाईक, सगेसोयरे यांना मिठाई वाटून हा आनंदो सव साजरा केला जातो. सायंकाळी घरासमोर पणत्या लावून पूर्ण परिसर प्रकाशाने उजळला जातो. त्यानंतर फटाक्यांच्या आतषबाजीने लहान मुले आणि तरुण व्यक्ती सर्वानाच आनंदाचे उधाण येते. आपण जे फटाके फोडतो त्यामागे आपणास विविध रंगांचे आवाजाचे वेगळेपण दिसते तेच आपणास भावते. अशा फटाक्यामुळे लहान मुले, प्राणी यांच्या आरोग्यास धोका पोहचतो. याची जाणीव आपल्याला असली तरी त्याविषयी आपण योग्य ती काळजी घेत नाही. फटाके फोडल्याने ध्वनी आणि वायू प्रदूषण होते. मानवाची ऐकण्याची क्षमता २० हर्टझ ते २०००० हर्टझ कंप्रतेची असते. त्यातच आवाज हा ८०डेसिबल पेक्षा कमी असेल तर त्याचा आपणास फार त्रास होत नाही. परंतु वाहने, घरगुती उपकरणे, ओद्योगिक कारखाने याचा आवाज नक्कीच अधिक असतो. आता दिवाळीत फटाके फोडल्याने तर आवाजाची तीव्रता अधिक होते. त्यातील काही फटाक्यांची आवाजाची तीव्रता जास्त असते. थंडर बॉम्ब आणि कृष्णा बॉम्ब यांची ध्वनितीव्रचा कमीतकमी १३०, ९६ डेसिबल एवढी आढळून येते. लक्ष्मी बॉम्ब हा कमीतकमी ११९ डेसिबल तर अधिकतम १४२ डेसिबल आवाज करतो. कारगील बुलेट १०३ ते १३९ डेसिबल, स्टार बॉम्ब १०२ ते १४७, डेसिबल, व्ह्ल्कॅनो १२७ ते १४७ डेसिबल, एके ४७ फटाके ११० ते १४५ डेसिबल आढळते. ह्यावरून एक लक्षात येते की फटाक्याचा आवाज हा नक्कीच बहिरेपणाकडे नेत आहे. रंगीबेरंगी फटाक्यामधून जड धातू, नायट्रिक ऑक्साईड आणि सल्फर डायऑक्साईड वायू बाहेर पडतो. तसेच ओझोन, लीड (शिसे), हरितगृह वायू वातावरणात मिसळतात. फटाके जर एक तास उडवले तर वातावरणातील स्ट्रॉनशियम १२० पट, मॅग्नेशियम २२ पट, बेरियम १२ पट, पॉटेशियम ११ पट तर कॉपर (तांबे) ६ पट वाढते. फटाक्यामुळे आरोग्यास धोका पोहचतो तसेच त्यामुळे वातावरणासही धोका पोहचतो. नियमानुसार ४ मीटर अंतरावर ठेवलेला फटाका १२५ ते १४५ डेसिबल इतका आवाज करीत असेल तर ते हानिकारक असते. यंदाच्या वर्षी मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद कोल्हापूर येथे फटाक्याच्या चाचण्या काही व्यक्तींच्या समक्ष करून त्यातील रसायनांचे व ध्वनिप्रदूषणाचे धोके दाखवून देण्यात आले. मग मनात प्रश्न असा पडतो की,सजीव प्राणी आणि निसर्गास धोका आहे तर फटाके फोडणे योग्य आहे का? त्याऐवजी पर्यावरणस्नेही फटाके वापरणे योग्य होईल. त्यामध्ये आवाजाची तीव्रता आणि धुराचे प्रमाण कमी केलेले असते. तसेच अधिक घातक रसायने वापरण्याचे टाळलेले असते. तरीसुध्दा त्यातून हरितगृह वायूचे उत्सर्जन होते. अलिकडे लेझर शोने होणारी आतषबाजी आपले वेगळेपण दाखवते. तसेच काही वेळा एलईडी वापरूनही फटाक्याचा आनंद घेता येतो. इलेक्ट्रॉनिक फटाके ही नवीन संकल्पना आता येत आहे. त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक फटाक्याने विविध बल्ब वापरून रंगीबेरंगी आतषबाजी होऊ शकते. त्याने वायू प्रदूषण आणि ध्वनिप्रदूषण होऊ शकत नाही. फटाके फोडून आपणास जो आनंद मिळतो त्याहीपेक्षा अधिक वेदना हे त्यातून जखमी झालेल्या प्राण्यांना होते. त्याने पर्यावरण तर नक्कीच प्रदुषित होते. त्यामुळे पसा, आरोग्य आणि पर्यावरण वाचवायचे असेल तर पारंपारिक फटाक्या ऐवजी पणत्यांनी रोषणाई करावी. शक्य असल्यास लेझर शो, इलेक्ट्रॉनिक फटाक्याचा आनंद घ्यावा. लहान मुलांना फटाके देण्याऐवजी खेळणी, भेटवस्तू, कपडे आणि पुस्तके दिली तर ज्ञानाची दिवाळी साजरी केल्याचा आनंद मिळेल.
फटाक्यातील रसायनांचे परिणाम
तांबे – श्वसनमार्गाचा दाह
कॅडिमियम – अॅनिमिया व मूत्रपिंडाला धोका
शिसे – चेतासंस्थेवर परिणाम
मॅग्नेशियम – मॅग्नेशियमच्या वाफेमुळे ताप
सोडियम – त्वचेवर परिणाम
जस्त – उलटीची शक्यता
नायट्रेट – मेंदूवर परिणाम
नायट्राइट – व्यक्ती कोमात जाण्याचा धोका
पर्यावरणस्नेही दीपावली
दीपावली ही सत्याचा असत्यावरील विजय असल्याने तो साजरा करण्यासाठी आपण रोषणाई करतो.

First published on: 29-10-2013 at 10:23 IST
मराठीतील सर्व Sci इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ecofrindly diwali