लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला गणेशोत्सव आणि आजचा गणेशोत्सव यात जमीन-अस्मानाचा फरक आहे आणि आजचे स्वरूप टिळकांना खचितच आवडणार नाही असा कल्पनाविलास नेहमीच केला जातो. पण खरोखरच तसं आहे का?
ज्या लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरू केला ते जर आता असते आणि अशा प्रकारचा गोंगाटाचा गणेशोत्सव साजरा होताना त्यांनी पाहिले असते तर त्यांनाही हे रुचले नसते. उलट त्यांनीच अशा प्रकारच्या दणदणाटाच्या गणेशोत्सवाला विरोध केला असता.
– मुंबई उच्च न्यायालय,
ता. २८ ऑगस्ट २०१५.

सण आणि उत्सव सार्वजनिकरीत्या कसे साजरे करायचे ही सध्याची मोठीच वादंगाची गोष्ट. उत्सवप्रिय मंडळांचे म्हणणे असे की ही बाब धार्मिक. परंपरेने चालत आलेली. आम्ही या बाबतीत कोणाचेही ऐकणार नाही. उत्सव दणक्यात साजरे होणारच. विरोधी मंडळींचे म्हणणे असे की या उत्सवांनी सर्वसामान्य शहरी नागरिकांना त्रास होतो. तो होता कामा नये. यात प्रश्न गणेशोत्सवाचा आला की लोकमान्य टिळकांची आठवण सर्वानाच येते. लोकमान्यांनी १८९३ मध्ये सार्वजनिक गणपती उत्सवास चालना दिली. ते श्रेय त्यांचेच. हा उत्सव सुरू करण्यामागे त्यांची भावना निव्वळ धार्मिक होती असे मात्र नाही. ते स्वत:ही काही फार मोठेसे आचारमार्गी नव्हते. तेव्हा हा उत्सव सुरू झाला तो लोकांमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना वाढावी या हेतूने. साहित्यसम्राट न. चिं. केळकर यांनी या उत्सवाला राष्ट्रीय घटना म्हणून गौरविले आहे. तेव्हा एक बाब स्पष्ट व्हावी की हा उत्सव सुरुवातीपासूनच राजकीय स्वरूपाचा आहे. तत्पूर्वी तो होतंच होता. राजेरजवाडे वगैरे लोक तो मोठय़ा धामधुमीने करीत. दहा दहा दिवस तो चाले. त्यासाठी वाडे शृंगारले जात. हत्ती, घोडे लावून मिरवणुका निघत. मंडपांत गाणे-बजावणे, पुराण-कीर्तने, लळिते, सोंगे वगैरे प्रकार होत. पण त्यामागील भावना धार्मिक असे. टिळकांनी त्या धार्मिक भावनेला राजकारणाची जोड दिली.
ही बाब नीट समजून घेण्याची आहे. कारण अगदी आजच्या गणेशोत्सवाच्या स्वरूपाचे मूळ त्यातच कुठे तरी आहे. गणेशोत्सवाच्या सार्वजनिकीकरणाच्या पाश्र्वभूमीवर येतो तो ११ ऑगस्ट १८९३चा मुंबईत झालेला हिंदू-मुसलमान दंगा. मुंबईतल्या दंग्यांचा इतिहास तसा जुनाच. १८५० साली तेथे पारशी-मुसलमानांत दंगा झाला. १८७४ मध्येही त्याचीच पुनरावृत्ती झाली. वातावरणात ही विद्वेषाची हवा होतीच. १८९३च्या दंग्यानंतर पुण्यात नागपंचमीचा सण आला. तेव्हा ही हवा अधिकच तापली. दंगा होता होता राहिला. यावर ‘केसरी’चे (१५ ऑगस्ट, १८९३) म्हणणे असे होते, की ‘मुसलमान लोक शेफारून गेले आहेत व ते जर शेफारले असले तर त्याचे मुख्य कारण सरकारची फूस हे होय.’ केळकर ‘टिळक चरित्रा’त सांगतात, ‘या दंग्यानंतर सुमारे सहा आठवडय़ांनी गणपती उत्सव सुधारून वाढविण्याची कल्पना प्रथम निघाली. हिंदूंच्या वेगळ्या सभा भरवून दंग्यांसंबंधांचे स्पष्ट मत जाहीर करण्याची चळवळ सुरू असता एके दिवशी टिळक, ना.म.जोशी वगैरे मंडळी बाबामहाराजांच्या वाडय़ात जमली व तेथे उत्सवास नवीन वळण देण्याची कल्पना मुक्रर झाली.. या ब्राह्मण मंडळींना दगडूशेट हलवाई, भोरकर वकील, बंडोबा तरवडे, गावडे पाटील, भाऊसाहेब रंगारी वगैरे ब्राह्मणेतर मंडळी हौसेने मिळाली व या उत्सवास नमुनेदार स्वरूप झाले.’
एकंदर सार्वजनिक गणेशोत्सव हा हिंदू-मुस्लीम वादातून निर्माण झालेली प्रतिक्रियात्मक घटना होती. केळकरांनी स्पष्टच म्हटले आहे, की ‘मुसलमानांच्या चढेलपणाच्या वृत्तीमुळेच काही अंशी हा उत्सव हाती घेण्याची कल्पना सुचली व जे हिंदू लोक ताबुतांची पूजा करतात त्यांना सलोख्याने वागवून घेण्यास मुसलमान लोक तयार नसल्याने, हिंदूंना ताबुतांपासून परावृत्त करावे व उत्साहनिवृत्त केलेल्या या लोकांना स्वधर्माशी संबंध असलेली अशी काही तरी नवीन करमणूक मिळवून द्यावी, असा टिळकांचा बोलूनचालून उद्देशच होता.’ याला प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांचाही दुजोरा मिळतो. ते म्हणतात, ‘६० वर्षांपूर्वी लो. टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची टूम काढली. हिंदूंचे एकजीव संघटन व्हावे, त्यांनी मुसलमानांच्या मोहरमसारख्या परधर्मी फिसाटांत भाग घेऊ नये आणि नाचगाणे उत्सव चव्हाटय़ावर जमावाने करायचे तर ते गणेशोत्सवाच्या निमित्ताने करावे, एक दोन नव्हे तर तब्बल दहा दिवस रात्री करावे आणि मनाची हौस पुरवावी असा तो हेतू होता. यानंतरचा त्यांचा सवाल महत्त्वाचा आहे. ते विचारतात, ‘गेल्या ६० वर्षांत ते संघटन किती झाले, हे ज्याने त्याने आपल्या मनाला विचारावे. मोहरमवरचा बहिष्कार अखेर हिंदू-मुसलमानांची राजकारणी चुरस आणि अखेर पाकिस्तान भस्मासुराचा जन्म यात उमटला. धर्मबुद्धी झाली म्हणावी तर तिचाही काही थांगपत्ता नाही. उलट उत्सव आणि मेळ्यांतून टिळकपक्षीय प्रतिस्पध्र्याच्या हुर्रवडीचे, बदनामीचे आणि समाज-राजकारणी दडपणींचे प्रकार मात्र मुबलक होत गेले.’ येथे प्रबोधनकारांनी ज्या मेळ्यांचा उल्लेख केला आहे ते नेमके काय प्रकरण आहे हे पाहणे आवश्यक आहे.
मेळे म्हणजे फिरता ऑर्केस्ट्राच म्हणा ना. जुन्या जमान्यातले विख्यात भावगीतगायक गजाननराव वाटवे (१९१७-२००९) हे या मेळ्यांचे साक्षीदार. त्या काळात ते स्वत:ही गणेशोत्सवांत गात असत. १९९१ मध्ये एका लेखानिमित्ताने त्यांची भेट झाली. या मेळ्यांबद्दल ते अगदी भरभरून बोलले. ‘लोकजागृतीचे प्रमुख साधन म्हणून मेळा ही संस्था निघाली. मेळ्यांत साधारण दहा ते बारा जण असायचे. एखादा डफ, ढोलकी, तबला, तुणतुणी आणि सायकलरिक्षावर ठेवलेली बाजाची पेटी घेऊन ते प्रत्येक गणपतीपुढे जाऊन कार्यक्रम करायचे. पुण्यामध्ये असे अनेक मेळे तयार झाले होते. यांतील अहिताग्नी राजवाडे, दादा भिडे, शंकरराव महाजन आदींचा सन्मित्र समाज मेळा, १९२५ ते १९४० चा काळ अक्षरश: गाजवणारा भारतमित्र समाज मेळा, वज्रदेही तालीम हुतूतू मंडळाचा वज्रदेही शूर मेळा, काँग्रेसचा रणसंग्राम मेळा, पैसा फंड मेळा, समर्थ मेळा हे मेळे अतिशय लोकप्रिय होते.’
ते लोकप्रिय असणारच होते. कारण त्यातील अनेकांचा संबंध गणेशोत्सवापेक्षा शिमग्याशीच अधिक होता. प्रबोधनकार सांगतात, ‘माझ्या आठवणीप्रमाणे अगदी पहिल्या वर्षांपासून या मेळ्यांनी मऱ्हाटी इतिहासातले हिंदू-मुसलमानविषयक मुकाबले निवडून त्यावर मुसलमानांची कठोर निंदा करण्याचा सर्रास धूमधडाका चालवला होता.. आस्ते आस्ते ती टिंगल निंदेची महामारी सुधारक स्त्री-पुरुष, रानडे, गोखले, परांजपे इत्यादी नामांकित नेत्यांवरही वळली. टिळकपक्षीय राजकारणाच्या एकूणेक विरोधकांचा निर्गल शब्दांत शिमगी समाचार घेण्याचे सत्र म्हणजे हे गणेशोत्सवी मेळे बनले.’ प्रारंभी ब्राह्मणी मेळे इतरांची टर-टिंगल उडवीत. पुढे छत्रपती मेळा त्यांना प्रत्युत्तर देऊ लागला. हा सगळा दंगा एवढय़ा थराला गेला की त्यात ब्रिटिश सरकारला हस्तक्षेप करावा लागला. मेळ्यांच्या पदांवर सरकारी सेन्सॉरशिप लावण्यात आली. पुढे तर परवाना पद्धत सुरू करण्यात आली. प्रत्येक मेळ्याबरोबर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येऊ लागला. हे सगळे सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पहिल्या २५-३० वर्षांतले चित्र. एका मेळ्यातलेच पद आहे –
‘बदले जुना जमाना
नटले नवीन ढंग
बदलेहि उत्सवाचा
सगळाच रागरंग
गेली कथा-पुराणे
संकीर्तनेही गेली
व्याख्यान-प्रवचनांनी
तर धूम ठोकियेली’
प्रबोधनकार सांगतात, ‘या मेळ्यांनी महाराष्ट्रात बेकीचा आणि हेव्यादाव्यांचा मनस्वी वणवा पेटवण्याचेच दुष्कर्म आजवर केले आहे.’
तेव्हा हे स्पष्टच आहे की गणेशोत्सवाचे स्वरूप पहिल्यापासूनच राजकीय गोंधळाचे आहे. हा उत्सव लोकप्रिय झाला खरा. प्रबोधनकार सांगतात, ‘गणेशोत्सवात रंगणारे बामणेतर केवळ उत्सवप्रियतेच्या मानवी भावनेमुळेच त्यात भाग घेऊ लागले. यापेक्षा त्यात विशेष काही कधीच नव्हते आणि आजही नाही. वर्षांकाठी करावयाची काही मजा, ठीक आहे. बसवा एक मूर्ती. घाला मंडप. जमवा वर्गण्या. काढा मेळे. होऊन जाऊ द्या दहा दिवसांची गंमतजंमत. देवतेचा मान, काही भक्ती, भाव, पापभीरुत्व, पावित्र्याची चाड, कोठे काही नाही.. केवळ करमणूक म्हणून किंवा अनेक पंडितांची पांडित्यपूर्ण कथा, कीर्तने, व्याख्याने, प्रवचने होतात म्हणून गणेशोत्सवाचा मुलाजा राखायचा तर तसली तहानभूक भागवण्याची शेकडो क्षेत्रे आज लोकांना उपलब्ध आहेत. तेवढय़ासाठी गणेशोत्सवाची काही जरूर नाही.. वर्षांकाठी लोकांचे खिसे पिळून काढलेल्या पैशांच्या खिरापतीने दहा दिवस कसला तरी जल्लोष करून काही मतलबी सज्जनांच्या बहुमुखी स्वार्थाची भूक भागविण्यापलीकडे आजवर तरी या गणेशोत्सवाने जनतेच्या कल्याणाची एकही सिद्धी साधलेली नाही.’ हे प्रबोधनकार ठाकरेच म्हणतात म्हणून बरे. थोर विचारवंत राजारामशास्त्री भागवत यांनीही त्या काळी धर्मोत्सवाऐवजी सार्वजनिक गणेशोत्सव करण्यास विरोध केला होता. आज असे कोणी म्हणेल तर त्याची खासच धडगत नाही. त्या ‘सिक्युलरा’स ‘कलबुर्गीनंतर तुमचाच नंबर’ म्हणून प्रेमपत्रे येण्याचीच शक्यता जास्त. मुद्दा असा, की प्रबोधनकारांनी हे सगळे लिहून ठेवल्याला इतकी वर्षे झाल्यानंतरही गणेशोत्सवाच्या आशयात काही फरक पडला आहे का? तर तसे मुळीच दिसत नाही. तो आपापले राजकारण साधण्याचाच काही जणांचा मार्ग राहिलेला आहे. टिळकपंथीयांनी त्यांच्या राजकारणासाठी त्याचा वापर केला. तो भला की बुरा या फंदात जाण्याचे येथे कारण नाही. पण आजचा गणेशोत्सव टिळकांना भावला नसता हे म्हणण्यातही काही अर्थ नाही. तेव्हाच्या या उत्सवाच्या टीकाकारांना उत्तर देताना टिळकांनी ‘केसरी’त लिहिले होते – ‘धर्मबुद्धी ज्यांच्या मनाला शिवतदेखील नाहीं, जडाच्या पलीकडे ज्यांची बुद्धी जाऊच शकत नाही त्या अभागी व्यक्तींची कीव करण्यापलीकडे आम्हांस त्यांच्यासंबंधानें कांहीच म्हणावयाचे नाहीं. श्रीमंगलमूर्तीच्या महोत्सवाच्या वेळीं दिवाभीताप्रमाणें या दोन-चार मंडळींनीं खुशाल आपल्या खोलींत दडून राहावे.’ आज गणेशोत्सवातील गोंगाटाविरोधात बोलणाऱ्यांना हेच ऐकविले जात आहे. फरक काही पडलेलाच नाही.
आपल्या हे लक्षातच येत नाही की याचे कारण गणेशोत्सवाच्या सार्वजनिकीकरणात आणि राजकियीकरणात दडलेले आहे. तो राजकारण्यांचा राजकीय हेतूंसाठीचाच उत्सव आहे. त्याकडे धार्मिक दृष्टीने पाहणे हा आपल्या धर्मभोळ्या दृष्टीचा आणि त्या उत्सवामुळे सर्वसामान्य लोकांना त्रास होऊ नये असे म्हणणे हा आपल्या धर्मद्रोही विचारसरणीचा दोष. तो स्वीकारून हल्लीच्या काही मतलबी सज्जनांच्या बहुमुखी स्वार्थाची भूक भागविण्याचे कार्य त्यातून घडत असेल तर ते सार्वजनिक हिताचे मानण्यात एवढी काय अडचण आहे?
रवि आमले
response.lokprabha@expressindia.com

nana patole
पैशाच्या जोरावर लोकशाही विकत घेण्याचा प्रयत्न म्हणजेच ‘ऑपरेशन लोटस’,पटोलेंचा घणाघात
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Cyclone Feingal cleared entire state and once again state is heading towards winter
विदर्भ गारठला… गोंदिया ९.४, तर नागपूर, वर्धा १० अंश सेल्सिअस
gadhimai festival in nepal animal slaughtered
‘या’ उत्सवात दिला जातो हजारो जनावरांचा बळी; काय आहे गढीमाई उत्सव? याला जगातील सर्वांत रक्तरंजित उत्सव का म्हटले जाते?
Thane , government projects, dust, health,
सरकारी प्रकल्पांमुळेच धुळधाण, नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता
price of potatoes increased up to rs 10 per kg due to supply restrictions from west bengal
उत्तरेत ऐन थंडीत बटाटा तापला; पश्चिम बंगालने राज्याबाहेर बटाटा, कांदा विक्री, वाहतुकीस घातली बंदी
Raj Thackeray Supports WAQF Amendment bill
“गरीब शेतकऱ्यांच्या जमिनी घशात घालून…”, वक्फ दुरुस्ती विधेयकासाठी राज ठाकरे मैदानात; केंद्र व राज्य सरकारकडे मोठी मागणी
Farmers at their protest site at Shambhu border, in Patiala district, Punjab, Saturday,
Farmer Protest : पुन्हा चलो दिल्लीचा नारा, शेतकरी शंभू सीमेवरून पुन्हा दिल्लीकडे कूच करणार; पंजाब- हरियाणा मार्गावर सुरक्षा व्यवस्था वाढवली!
Story img Loader