संगणकाचे बाहय़ स्वरूप आणि आतील महत्त्वाचे भाग समजावून घेतल्यावर आता हे यंत्र कसे चालते ते पाहू. अनेक ठिकाणी आज मनुष्याचे काम संगणक करतो, असे आपण बघतो. बँकेतील क्लिष्ट आकडेमोड असो, कारखान्यातील अनेक पदरी यांत्रिक काम असो किंवा सुरक्षा व्यवस्था असो, पुनरुक्ती असलेली अनेक कामे आज संगणक करताना दिसतो.
मानवाची अशी अनेक कामे करणारा संगणक आणि मानवी शरीर यांची तुलना करताना आपल्याला काही साम्ये सापडतात.
१. मानवी मेंदू पंचेंद्रियांद्वारे बाहेरून माहिती घेतो. चेतासंस्था ही माहिती मेंदूपर्यंत पोहोचवते. मेंदूत ही माहिती साठवली जाते. या माहितीवर जरूर त्या प्रक्रिया होतात. पुढील कार्य करण्याचे निर्णय मेंदूतील पेशी घेतात आणि तो आदेश चेतासंस्थेमार्फत योग्य त्या अवयवांना पोहोचवला जातो आणि हवे ते कार्य घडते.
२. संगणकात कळफलक, माऊस, ध्वनिमुद्रक, कॅमेरा आणि आंतरजालाशी (Internet) असलेला संपर्क या पंचेंद्रियांकडून माहिती जमा केली जाते. संगणकातील कार्यप्रणाली (Operating System), ती माहिती हार्ड डिस्क समजू शकेल अशा भाषेत बदलवून हार्ड डिस्कपर्यंत पोहोचवते. हार्ड डिस्कमध्ये हे माहिती साठवली जाते. या माहितीवर आवश्यक त्या प्रकिया करण्याचे काम, मध्यवर्ती प्रक्रिया केंद्रातील (CPU) सूक्ष्म चकतीमध्ये होते. ही चकती आणि हार्ड डिस्क म्हणजे संगणकाचा मेंदू. यांना काम करण्याची व्यवस्था लावणारी कार्यप्रणाली म्हणजे संगणकाची चेतासंस्था.
संगणकातील सर्व भाग चालण्यासाठी ऊर्जेबरोबरच एक कार्यप्रणाली लागते आणि त्या भागांना समजेल अशा भाषेत दिलेल्या सूचना लागतात. उदाहरणार्थ- आपल्याला जर संगणकावर एखादे पत्र लिहावयाचे असेल तर प्रथम कळफलकावर असलेली अक्षरे दाबल्यावर ती माहिती आतमध्ये साठवणे, त्याच्यावरील पुढील संस्कार करणे याकरिता आधी एक कार्यक्रम (Programme) लिहून तो संगणकात जतन करणे गरजेचे असते. पूर्वी जेव्हा कुठल्याही संगणकाला समजेल अशी समान भाषा उपलब्ध नव्हती तेव्हा प्रत्येक उपभोक्त्याला हा कार्यक्रम लिहावा लागायचा आणि अर्थातच त्यामध्ये खूप वेळ जायचा. आता हे तयार कार्यक्रम विकत मिळतात. मायक्रोसॉफ्ट कंपनीने बनवलेले वर्ड/एक्सेलसारखे कार्यक्रम आपल्या संगणकावर जतन केले तर त्या कार्यक्रमात शक्य असलेले/लिहून ठेवलेले कुठलेही काम आपण विनासायास करू शकतो. Windows विंडोजसारखाच Open office हाही कार्यक्रम आपण वापरू शकतो, जो सध्या तरी फुकट उपलब्ध आहे.
अनेक प्रकारचे कार्यक्रम एकाच संगणकात जतन करून वापरण्याची सुविधा उपलब्ध करून देते, ती संगणकातील कार्यप्रणाली (Operating System) संगणकातील चेतासंस्था. चित्र क्र. १ मध्ये याचे संकल्पना चित्र दाखवले आहे.
संगणकातील आवक, जावक, स्मृती आणि प्रक्रिया या सर्व गोष्टींचा मेळ घालणारी मूलभूतप्रणाली. उपभोक्ता आणि संगणक यांच्यात संवाद साधणे, थोडक्यात मध्यस्थाचे काम करणे हे या प्रणालीचे काम. बुद्धिबळ खेळणे आणि पत्रे लिहिणे याला लागणारे दोन भिन्न कार्यक्रम (Programme) चालवणारी एकच पायाभूत कार्यक्रमप्रणाली.
कार्यप्रणालीची काय कामे करते ते पाहू.
संगणकातील कार्यक्रम चालण्यासाठी आवश्यक ते भाषांतर करते. आलेले आदेश त्या कार्यक्रमाला कळतील अशा भाषेत त्यांच्यापर्यंत पोहोचवते.
संगणकातील स्मृती (Memory) चे व्यवस्थापन करते.
स्मृती मधील विषयवार(File) आणि विभागवार (Folders) लावलेल्या सर्व माहितीचे व्यवस्थापन करते.
सर्व प्रणाली (Software) चा संगणकातील दृश्य भागांशी (Hardware) सुलभ संवाद साधून देते.
हार्ड डिस्कवरील माहिती आवश्यकतेनुसार हलवते.
बाहेरून आलेल्या नवीन प्रणाली संगणकात घेण्यापूर्वी तपासते, योग्य असल्यास हार्ड डिस्कवर मुद्रित करून घेते आणि पुढे गरजेनुसार चालवते.
संगणकातील आवक आणि जावक घडवून आणते.
संगणक सुरक्षित ठेवते.
संगणक व्यवस्थेत आलेल्या चुका आणि घोळ याबद्दल उपभोक्त्याला जाणीव करून देते.
संगणकाचा अपेक्षित वापर त्याच्यामध्ये कुठली कार्यप्रणाली असली पाहिजे ते ठरवतो. पुढील तक्त्यात ही माहिती थोडक्यात दिली आहे-
चित्र क्र. २ मध्ये सध्या उपलब्ध असलेल्या विविध कार्यप्रणाली दाखवल्या आहेत.
वरील तक्त्यात दिलेल्या विविध प्रकारच्या कार्यप्रणालींमध्ये बरेचसे गुण/सोयी समान असू शकतात उदा. तत्काळ व्यवस्था आणि आंतरसंवादी व्यवस्था. भ्रमणध्वनी आणि त्याचा नवा आविष्कार ‘टॅब’, हे तर आता संगणकाचेच छोटे , हातात मावणारे अवतार उपलब्ध आहेत. त्यांच्यातही ‘विंडोज’ कार्यप्रणाली चालते, पण त्याच्याबरोबरीने ‘अॅण्ड्रॉइड’ ही कार्यप्रणालीसुद्धा लोकप्रिय आहे.
ही कार्यक्रम प्रणाली चालण्यासाठी आणखी एक मूलभूत व्यवस्था काम करीत असते, ती म्हणजे आवकजावक यंत्रणा (Basic Input Output System -BIOS) अनेक संगणकांची कार्यक्रमप्रणाली एकच असू शकते, पण प्रत्येक संगणकाची आवकजावक यंत्रणा आपण हवी तशी निवडू शकतो आणि ती नंतर बदलू शकत नाही. ही यंत्रणा आपण निवडलेल्या दृश्य भागांच्या (Hard ware) अनुरूप बनवलेली असते. ही कायमस्वरूपी लिहिलेली प्रणाली असल्याने तिला Firmware असेही म्हणतात. या समान कार्यक्रमप्रणालीमुळे कुठलाही संगणक जगातल्या कुठल्याही संगणकाशी जोडला जाऊ शकतो, एका यंत्रावर झालेले काम दुसऱ्या यंत्रावर पाहता येते, बदलता येते.
खऱ्या अर्थाने जगाला जवळ आणणारे हे तंत्रज्ञान, रोज विकसित होतच आहे.
dpdeodhar@gmail.com