ग्रंथदिंडीला ठाणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
स्वातंत्र्यवीर सावरकरांची गीते, त्यांच्या साहित्याचा सन्मान, त्यांच्या कर्तृत्वाची ओळख करून देणाऱ्या गीतांवर तरुणांचे नृत्य, ढोलपथकाचा गजर आणि सावरकरांविषयी अभिमान असलेल्या नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.. ठाण्यात शुक्रवारी २९ व्या अखिल भारतीय सावरकर साहित्य संमेलनाची दिमाखदार सुरुवात झाली.
तरुणांमध्ये सावरकरांचे विचार रुजावेत या उद्देशाने दरवर्षी अखिल भारतीय सावरकर साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येते. स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य अभ्यास मंडळ, सावरकर दर्शन प्रतिष्ठान आणि स्वा. वि. दा. सावरकर प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने २९वे अखिल भारतीय सावरकर साहित्य संमेलन ठाणे शहरात होत आहे. शुक्रवारी सावरकरांच्या आठवणींना उजाळा देणाऱ्या दिंडीतून या संमेलनाचा प्रारंभ झाला. नौपाडय़ातील भगवती शाळा मैदानातून ग्रंथदिंडीला सुरुवात झाली. त्यानंतर विष्णूनगर, घंटाळी चौक, राम मारुती मार्ग, पु. ना. गाडगीळ चौक, तलावपाळी या मार्गावरून ही दिंडी गडकरी रंगायतन येथे विसर्जित झाली. सावरकर संमेलनाच्या या दिंडीतील पालखीत सावरकरांच्या प्रतिकृती आणि सावरकरांनी लिहिलेले ग्रंथ ठेवण्यात आले होते. तरुणांचे ढोलपथक, महिलांचे भजन आणि सावरकरांच्या गाण्यांवरील नृत्य असे सादरीकरण दिंडीत पाहायला मिळाले. दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर समितीतर्फे तयार करण्यात आलेली सावरकर स्मारक प्रतिकृती दिंडीत ठेवण्यात आली होती. पदन्यास कला समूहातर्फे तरुणांनी सावरकरांच्या गाण्यांवर नृत्य सादरीकरण केले, तसेच गुरुदत्त महिला गटाच्या महिलांतर्फे या दिंडीत भजन सादर करण्यात आले. ठाण्यातील सावरकर प्रेमींनी या ग्रंथदिंडीला आवर्जून उपस्थिती दर्शवली, तसेच ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग या दिंडीत पाहायला मिळाला. मात्र परीक्षांचा काळ असल्याने महाविद्यालयीन विद्यार्थी, शाळकरी मुलांचा या दिंडीत अत्यल्प प्रतिसाद दिसून आला.