जवळपास सर्वच महानगरांना कचऱ्याच्या विल्हेवाटीचा प्रश्न भेडसावत आहे. ठाणे शहरही त्याला अपवाद नाही. ठाणे शहरातून दररोज तब्बल ७०० टन कचरा गोळा होतो. नागला बंदर येथील खाडीकिनाऱ्यालगत पूर्वी कचरा टाकला जात होता. त्याजागी आता इंचभरही कचरा टाकायला जागा नाही. डायघर आणि दिवा येथे सध्या कचरा टाकला जात असला तरी या ठिकाणच्या कचराभूमींची कचरा सामावून घेण्याची क्षमताही आता संपुष्टात आली आहे. तरीही अन्य पर्याय नसल्याने सध्या तिथेच कचरा टाकला जात आहे. कारण कचराभूमीसाठी जवळपास दुसरी कोणतीही जागा आता शिल्लक नाही. लगतची कोणतीही गावे आता शहरांचा कचरा टाकण्यासाठी जागा देण्यास तयार नाहीत. शिवाय लांब अंतरावर असलेल्या कचराभूमींपर्यंत कचरा वाहून नेण्याचा खर्च परवडणारा नाही. वाढत्या कचऱ्यामुळे शहर सौंदर्यात बाधा येते. जागोजागी साठून राहणाऱ्या कचऱ्यामुळे परिसरात दरुगधी पसरते. आरोग्याच्या समस्या भेडसावतात. शहरांभोवती पडलेला हा कचराकोंडीचा फास सोडवायचा असेल तर शहरातील प्रत्येक नागरिकाने पुढाकार घेणे गरजेचे आहे. सर्वोच्च न्यायालयानेही गृहनिर्माण सोसायटींनीच सुका, ओला आणि घातक कचरा वेगवेगळा करून आपापल्या आवारात त्याचे व्यवस्थापन करावे, असे आदेश दिले आहेत.
त्यामुळे आता शहरातील प्रत्येक सुजाण नागरिकाने कचरा निर्मूलनासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. लोकप्रतिनिधींनी आपापल्या विभागात शून्य कचरा मोहीम मोठय़ा प्रमाणात राबविणे आवश्यक आहे. काही व्यक्ती आणि संकुलांनी त्या दृष्टीने उपक्रमही राबविण्यास सुरुवात केली आहे. मात्र त्याला व्यापक चळवळीचे स्वरूप देणे आवश्यक आहे.
चार वर्षांपूर्वी आम्ही आमच्या सोसायटीपासूनच या कामाची सुरुवात केली. ‘कोरस’ आणि ‘तारांगण’ या आम्ही राहात असलेल्या सोसायटय़ांमध्ये सामूहिक कचरा निर्मूलन प्रकल्प राबविले. त्यामुळे या दोन सोसायटय़ांमधील सुका, ओला आणि घातक कचऱ्याचे वर्गीकरण होऊ लागले. ओल्या कचऱ्यापासून सोसायटीच्या आवारातच खत बनविले जाऊ लागले. सोसायटीतील उद्यानांसाठी हा कचरा वापरला जाऊ लागला. सुक्या कचऱ्याचा पुनर्वापर होऊ लागला आणि आता फक्त घातक कचरा घंटागाडीमध्ये दिला जाऊ लागला आहे.
आमचा प्रकल्प पाहून इतरांनीही अशा प्रकारचे प्रकल्प राबविण्याबाबत उत्सुकता दाखवली. त्यामुळे कोरस आणि तारांगणमध्ये आम्ही इच्छुकांसाठी कार्यशाळा आयोजित केल्या. गेल्या चार वर्षांत आम्ही तब्बल ८० कार्यशाळा घेतल्या. त्यासाठी ‘आर निसर्ग फाऊंडेशन’ या संस्थेची स्थापना केली. घोडबंदर येथील सेंट झेवियर्स शाळेने आमच्या मार्गदर्शनाखाली आवारात ‘शून्य कचरा’ मोहीम यशस्वीरीत्या राबवली.
आता नवी मुंबईतील सानपाडा येथील साधू वासवानी शाळेत शून्य कचरा मोहीम राबवली जात आहे. कोरम मॉलजवळील महापालिकेच्या शहीद हेमंत करकरे उद्यानातील कचऱ्याचे व्यवस्थापनही आमची संस्था करीत आहे. त्याचप्रमाणे गोकुळगरजवळील आझादनगर येथील झोपडपट्टी विभागात कचऱ्याविषयी प्रबोधनपर उपक्रम हाती घेतले आहेत. खोपट येथील ज्या इमारतीत आम्हा दोघींची इस्पितळे आहेत, त्या ब्युटी आर्केड इमारतीमध्येही शून्य कचरा मोहीम यशस्वीरीत्या राबविण्यात आली आहे. मुंबई परिसरातील तब्बल ७ हजार ९४ सोसायटय़ांमधून कोरस आणि तारांगण या संकुलांना कचरा व्यवस्थापनासाठी विशेष पारितोषिक मिळाले आहे. भविष्यात कचरा निर्मूलनाविषयी शाळांमध्ये अधिक जनजागृतीपर उपक्रम राबविण्याचा आमचा विचार आहे. त्याद्वारे पुढील पिढीवर कचरा निर्मूलनाविषयी चांगले संस्कार होतील, असे आम्हाला वाटते.
कचराभूमी नसल्याने आता याच प्रकारे ज्याची त्याला कचऱ्याची व्यवस्था लावावी लागणार आहे. ठाणे शहरात अशा प्रकारे स्वयंसेवी पद्धतीने अनेक लोक आपापल्या परीने निरपेक्षपणे कचरा निर्मूलनाचे काम करीत आहेत. महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी अशा प्रकारच्या उपक्रमांना साथ दिली तर ठाणे शहरातील कचरा निर्मूलनाची समस्या बऱ्याच अंशी कमी होऊ शकेल. मात्र त्यासाठी मोठय़ा प्रमाणात नागरिकांमध्ये प्रबोधन करण्याची तसेच त्यांना प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे.