ठाण्यात महिला वाहतूक पोलिसावर हल्ला; मारहाणीची आठवडाभरातील दुसरी घटना
शिवसेनेच्या एका शाखाप्रमुखाने ठाणे शहरात भर रस्त्यात आणि भर दिवसा एका महिला वाहतूक पोलिसाला गुरुवारी जबरदस्त मारहाण केल्याच्या घटनेचे तीव्र पडसाद राज्यभरातून उमटत आहेत. या प्रकारामुळे शहरातील विवेकी आणि विचारी नागरिकांत संतापाची लाट उसळली असून, अनेक महिला कार्यकर्त्यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. शशिकांत गणपत कालगुडे (४४) असे या गुंडाचे नाव असून, त्याला पोलीस कोठडी देण्यात आली आहे. लातूरमधील पानगाव येथे शिवजयंतीच्या दिवशी सहायक पोलीस उपनिरीक्षक युनूस शेख यांना मारहाण करून त्यांना भगवा ध्वज खांद्यावर घ्यायला लावून त्यांची धिंड काढल्याची घटना ताजी असतानाच ठाण्यासारख्या सुसंस्कृत शहरातही एका पोलिस कर्मचाऱ्याला झालेल्या या मारहाणीमुळे राज्यातील गुंडापुंडांना कायद्याचा धाकच उरला नाही की काय, असे वाटत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
ठाण्यातील नितीन कंपनी उड्डाणपुलाखाली गुरुवारी वाहतूक शाखेत कार्यरत असलेली २५ वर्षीय महिला कर्मचारी वाहतूक नियमन करत होती. त्याचवेळी कालगुडे हा सिग्नलवर गाडी उभी करून मोबाइलवर बोलत होता. सिग्नल सुटूनही तो गाडी थांबवून बोलत असल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. त्यामुळे या वाहतूक पोलीस महिलेने त्याला गाडी पुढे घेण्यास सांगितले. तरी त्याने ऐकले नाही तेव्हा तिने त्याच्याकडे वाहन परवान्याची मागणी केली. संतापलेल्या कालगुडेने गाडीतून उतरून या पोलीस महिलेलाच मारहाण सुरू केली. तिचा विनयभंगही त्याने केला. या घटनेत ही पोलीस महिला जखमी झाली आणि तिच्या नाकातोंडातून रक्त आले. या प्रकाराने संतापलेल्या नागरिकांनी त्याला पकडून नौपाडा पोलिसांच्या ताब्यात दिले.
कालगुडे याच्यावर सरकारी कामात अडथळा, मारहाण आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने त्याला एक दिवसाची कोठडी दिली होती. शुक्रवारी त्याला जामीन मंजूर करण्यात आला मात्र पोलिसांनी त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केल्याने तो तुरुंगातून बाहेर येऊ शकला नाही. कालगुडे हा शिवसेनेचा धर्मवीरनगर भागातील शाखाप्रमुख आहे. शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी मात्र तो माजी शाखाप्रमुख असल्याचा दावा केला आहे. तीन हात नाका परिसरात तो वडापावची गाडीसुद्धा चालवतो. दिवसाढवळ्या ठाण्यातील नितीन कंपाऊंडसारख्या भागात पोलिसांवर हात उचलण्याचा या गुंडाचा प्रताप संतापजनक असल्याची प्रतिक्रिया काही महिलांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.
लातूर जिल्ह्य़ातील पानगाव येथे आंबेडकर चौकात शिवजयंतीच्या दिवशी भगवा फडकविण्यास आलेल्या कार्यकर्त्यांना सहायक उपनिरीक्षक युनूस शेख यांनी अटकाव केला होता. हा भाग संवेदनाक्षम असल्याने त्यांनी नियमानुसार ही कारवाई केली होती. तरी या कार्यकर्त्यांनी त्यांना जबर मारहाण करीत गावभर भगवा झेंडा हाती घेऊन फिरविले होते. त्यानंतर अवघ्या आठ दिवसांत पोलिसांना मारहाण होण्याचा हा प्रकार घडला आहे.
काँग्रेसचे शरसंधान
लातूर आणि ठाण्यात सत्ताधारी पक्षांच्या कार्यकर्त्यांकडूनच पोलिसांवर झालेल्या हल्ल्यांच्या घटनांमुळे सत्ताधारी पक्षाच्या नेते आणि कार्यकर्त्यांना सारे माफ आहे का, असा बोचरा सवाल विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला. एवढेच नव्हे तर सरकारमधूनच अशा कारवायांना पाठिंबा आहे की काय, असा प्रश्न निर्माण होतो, असे विखे-पाटील यांनी सांगितले.
परवाना रद्द करणार?
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कालगुडेचा वाहन परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाकडे पाठवण्यात आला आहे, अशी माहिती ठाणे वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकर यांनी दिली
शशिकांत कालगुडेची गुन्हेगारी पाश्र्वभूमी
२००५ – धारदार शस्त्राने हल्ला.
२००८ – खुनाचा प्रयत्न.
२०१४ – बेकायदेशीर जमाव व दंगल.
ठाण्यातील हा प्रकार गंभीर आहे. महिला पोलीसच नव्हे तर कोणत्याही महिलेशी अशा प्रकारे वागणे हा गुन्हाच आहे. अशा आरोपींवर कायद्याने कठोर कारवाई करावी. शिवसेना पक्षाशी याचा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही.– खासदार राजन विचारे, ठाणे