नुकत्याच साजऱ्या झालेल्या जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने सालाबादप्रमाणे यंदाही प्लास्टिक ‘राग’ आवळणारी वृत्तचित्रे माध्यमांकडून जोमाने दाखविली जात होती. प्लास्टिकचा भस्मासुर कसा बोकाळत आहे हे आपण गेली अनेक वर्षे पाहतो आहोत. बाजारात जाताना आपण नेमकी कापडी पिशवी न्यायची विसरतो आणि प्लास्टिक पिशवीत सामान घेतो. काही वेळा तर त्यासाठी पाच रुपयेही मोजतो. मोठय़ा दुकानात प्लास्टिकची पिशवी देतात, पण त्याचे दोन ते पाच रुपये आकारले जातात. पण या प्लास्टिकचे कचऱ्यात गेल्यानंतरही विघटन होत नाही, नदी-नाले तुंबतात, मग या प्लास्टिकच्या कचऱ्याचे करायचे तरी काय? पर्यावरण दिनानिमित्तानेच प्लास्टिकविरोधी पारंपरिक सूर टाळून गरज आणि इच्छाशक्ती असली तर प्लास्टिकचे काय करता येईल, याचा सकारात्मक आढावा.
बंगळुरूतील प्रयोग
खरेतर याला प्रयोग म्हणता येणार नाही कारण ती सिद्ध झालेली गोष्ट आहे, की प्लास्टिकचा वापर रस्ते तयार करण्यासाठी करता येतो. बंगळुरूत रोज एक चतुर्थाश कचरा हा प्लास्टिकचा असतो, पण या प्लास्टिकचे काय करायचे याची चिंता केके प्लास्टिक कचरा व्यवस्थापनाचे अहमद खान यांना पडली होती, त्यांनी प्लास्टिक त्याज्य वस्तू मानतो त्याचा दुसरीकडे काही उपयोग करता येईल का, असा विचार केला. गांधीजी म्हणायचे, की कुठलीही वस्तू पूर्ण वापरल्याशिवाय फेकून देऊ नका. चंगळवादी संस्कृतीत लोक कपडे बदलावे तशा वस्तू बदलतात आणि त्यांचा शेवटी कचराच होतो. तर खान यांनी प्लास्टिक गोळा करून ४३० कि.मी.चा रस्ता तयार केला आहे. अहमद खान सांगतात, की प्लास्टिकचा वापर रस्त्यांसाठी करावा, की करू नये यावर आपण अनेकांशी बरीच सल्लामसलत केली, त्यामुळे आणखी जनजागृती झाली. खान रोज कचराकुंडीत जायचे व प्लास्टिक गोळा करायचे. हे प्लास्टिक गोळा केले, की ते बिटूमेनमध्ये मिसळतात, बिटूमेन हा पदार्थ अस्फाल्ट सिमेंट किंवा अस्फाल्ट म्हणून ओळखला जातो. खनिज तेलशुद्धीकरणात तो तयार होतो व सामान्य तपमानाला अर्धघनअवस्थेत राहतो. काही वेळा दगड, वाळू व बिटूमेन यांच्या मिश्रणाला अस्फाल्ट म्हणतात तर रस्ते निर्मितीत ५ टक्के बिटूमेन वापरलेले असते. तर खान नावाचे हे गृहस्थ बिटूमेनमध्ये प्लास्टिक मिसळत होते. प्लास्टिकमुळे रस्ते टिकतात अधिक. शिवाय रोज ९००० टन प्लास्टिक तयार होते ते सत्कारणीही लागते.
अमेरिकेत प्लास्टिकपासून पेट्रोल
जगात सगळीकडेच वेगवेगळे प्रयोग सुरू असतात पण त्याची माहिती आपल्यापर्यंत येतेच असे नाही. अमेरिकेतील उद्योजिका व वैज्ञानिक प्रियांका बकाया हिने प्लास्टिकपासून वीज तयार करण्याचा प्रयोग केला आहे, हे सगळे प्रकार येथे सांगत आहे, त्याला इनोव्हेशन असे गोंडस नाव आहे व त्यालाच टाकाऊपासून टिकाऊ असे म्हणतात. आता अमेरिकेसारखा देश तिथे तर सगळेच यूज अँड थ्रो. पण फेकून दिलेल्या वस्तूंचा ढीगच जमतोय त्यात प्लास्टिक आहे. प्लास्टिक हे खनिज तेलापासून बनते व त्यामुळे त्याचे ऊर्जा मूल्य खूप अधिक असते त्यामुळे या प्लास्टिकला पुन्हा तेलात रूपांतरित करण्याचा आमचा उपक्रम आहे. त्यामुळे त्याचा इंधन म्हणून वापर करता येईल. ही नवीन कल्पना पी.के. क्लीन या अमेरिकेतील एमआयटी संस्थेने स्थापलेल्या संस्थेने साकार केली आहे. प्रियंका ही त्या कंपनीची मुख्य कार्यकारी अधिकारी आहे. प्रियंकाचे ऑस्ट्रेलियातील कौटुंबिक मित्र पर्सी क्लीन यांनी ही कल्पना प्रथम मांडली. पर्सी हे संशोधक होते व त्यांचा विवाह झालेला नव्हता, मुलेबाळे नाही, ते अगदी आजोबाच होते असे बकाया सांगते. त्यांचे घर म्हणजे रसायनशास्त्राची प्रयोगशाळाच होती. टाकाऊ पदार्थापासून ते तेल तयार करायचे व त्यावर दिवा पेटवायचे, त्यांचे हे सगळे प्रयोग बघून आश्चर्य वाटायचे ,प्रियंका सांगते. कीन यांचे २००७ मध्ये ९५ व्या वर्षी निधन झाले, त्यांनी शोधलेल्या तंत्रज्ञानाचे व्यावसायिकीकरण झाले नाही पण त्यांनी काही नोट्स ठेवल्या होत्या नंतर न्यूयॉर्क येथे मी त्यांच्याप्रमाणेच संशोधन हाती घेतले. खनिज तेलाच्या किमती तर वाढतच आहेत. मग स्वच्छ ऊर्जा तंत्रज्ञान विकसित करण्यावर भर द्यावा असे वाटले. एमआयटीमध्ये प्रियंका ऊर्जा विषय शिकत होती, तेव्हा तिने उटाह येथील सॉल्ट लेक येथे एक कंपनी सुरू केली. तेथे प्लास्टिकवर प्रक्रिया करणारी यंत्रे तयार केली व ते अमेरिकेत सगळीकडे उपलब्ध करून दिली. २०१० मध्ये तिने भारतातही हा प्रयोग केला. तिच्या पी.के.क्लीन या कंपनीला २०११ मध्ये एमआयटीचा स्वच्छ ऊर्जा पुरस्कार मिळाला, यामागे टीमवर्कचे यश आहे असे ती सांगते.
तंत्रज्ञान काय
प्रियंकाने खनिज तेलापासून प्लास्टिक बनवतात तर प्लास्टिकपासून खनिज तेल का बनवता येऊ नये ही संकल्पना वापरली, हे नव्या जगाचे रसायनशास्त्र आहे. पी.के.क्लीन या कंपनीच्या वतीने तिने या तंत्रज्ञानाचे पेटंटही घेतले आहे. प्लास्टिक हे अनेक कार्बन रेणूंचे बनलेले आहे. आमच्या प्रक्रियेत आम्ही कार्बनच्या या मोठय़ा साखळ्या तोडून छोटय़ा करतो. डिझेल हे कार्बनचे १२ ते २० रेणू एकत्र साखळीत जोडून बनते, हे नेमके तंत्र त्या सांगता नाहीत पण हे मात्र खरे, की सरते शेवटी उष्णता व उत्प्रेरक यांच्या वापराने केलेल्या या प्रक्रियेतून ७५टक्के तेलच मिळते. यात प्रदूषण होत नाही. २० टक्के नैसर्गिक वायू तयार होतो, तो पुन्हा उष्णता निर्मितीसाठी वापरला जातो म्हणजे प्लास्टिक तापवायला वेगळे इंधन वापरावे लागत नाही व ५ टक्के अवशेष राहतात, तेही कसले असते तर प्लास्टिकवर जी लेबले लावतात त्यांचे असते. प्लास्टिकपासून जास्त ऊर्जा मूल्याचे तेल मिळवता येते असा याचा अर्थ आहे.
प्लास्टिक वापरलेला पहिला रस्ता
कणेगरी येथे बंगळुरू विद्यापीठाच्या बाहेर जो ट्रॅक रोड बांधलेला आहे, तो देशात या तंत्रज्ञानाने बांधलेला पहिला रस्ता आहे. यात प्लास्टिक बिटूमेनमध्ये टाकून त्याच्या गोळ्या करण्याचे यंत्र असते, त्याचा वापर केला जातो. खरेतर प्लास्टिकपासून रस्ते तयार करता येतील याचा पथदर्शक प्रकल्प बंगळुरूच्या आर.व्ही कॉलेज अफ इंजिनीयिरगच्या विद्यार्थ्यांनी तयार केला, त्यांनी रस्ते संशोधन संस्थेचे समन्वयक ए.वीरराघवन व तज्ञ प्राध्यापक जस्टो यांना अहवाल सादर केला, त्यात असे दिसून आले, की रस्त्यांमध्ये प्लास्टिक वापरल्याने ते मजबूत होतात व प्रदूषणाचे संकटही टळते.रस्त्यासाठी जे बिटूमेन वापरावे लागते त्यात प्लास्टिक मिसळले जात असल्याने खर्चही कमी होतो., रस्त्याची मजबुती तीन पट वाढते.
प्लास्टिकचे धोके
अगदी २० मायक्रॉन जाडीच्या प्लास्टिक पिशव्याही त्यासाठी वापरतात येतात, ज्यांच्यावर अनेक राज्यात बंदी आहे. के.के.पॉलिफ्लेक्स ही कंपनी कागद-कचरा व्यावसायिकांकडून प्लास्टिक विकत घेते. आता प्लास्टिकमध्ये बिसफेनॉल असेल तर त्यामुळे कर्करोग होतो त्यामुळे लहान बाळांसाठी दुधाच्या बाटल्या चांगल्या दर्जाच्या प्लास्टिकच्या हव्या. हल्लीतर लोक चहाही प्लास्टिक पिशवीत देतात, इतका अतिरेक झाला आहे. उकळता चहा आणि कमी दर्जाचे प्लास्टिक मिळून आपण काय पित असतो ते आपल्याला नंतरच कळते तो भाग अलाहिदा. प्लास्टिकमुळे शुक्रजंतूंचे प्रमाण कमी होते. स्तनाचा कर्करोग होतो. प्लास्टिकच्या पिशव्या नदी-नाल्यात साठून त्यांचे मार्ग बंद होतात असे अनेक दुष्परिणाम आहेत. गाईंच्या पोटातून प्लास्टिकच्या पिशव्या निघाल्याच्या घटनाही आपण वाचतो. मग त्यावरचा हा उपाय सर्वच महापालिकांनी करायला काय हरकत आहे, कदाचित त्यात व्यवहाराच्या दृष्टीने काही भाग नकोसा असेल, तरी शहर विकासासाठी तो आवश्यक असू शकतो.
‘प्लास्टिक हा सर्वात वाईट प्रकारचा कचरा असतो, त्याचे विघटन व्हायला कित्येक शतके लागतात, खड्डय़ांमध्ये कचराकुंडीत, पर्यटन स्थळी आपण नकळत हा कचरा टाकत असतो, हजारो टन प्लास्टिक लँडफील्समध्ये गाडले जाते.’
प्रियंका बकाया
‘सुरुवातीला आम्ही रस्ते बांधणीसाठी प्लास्टिक वापरण्याचा प्रयत्न केला, तेव्हा जे हाताला लागेल ते प्लास्टिक गोळा करत होतो, विकतही घेत होतो. कुठेही थांबायची आमची तयारी नव्हती, मग आम्ही त्याचा साठा करून ठेवला, मग आम्ही बंगळुरू महापालिकेपुढे शहरातील ४० टक्के रस्ते प्लास्टिकने तयार करण्याचा प्रस्ताव मांडला, रस्ते बांधलेही, आज या रस्त्यांनी अनेक पावसाळे पाहिले आहेत.’- अहमद खान