जगात ८ हजार मीटरहून उंच अशी एकूण १४ हिमशिखरे आहेत. ही सर्व शिखरे सर करणारे आज जगात केवळ २७ गिर्यारोहक आहेत. या अष्टहजारी शिखरांपैकी एव्हरेस्ट, ल्होत्से आणि मकालूच्या यशानंतर उर्वरित ११ हिमशिखरांना साद घालण्याचाही ध्यास ‘गिरिप्रेमी’ संस्थेने घेतला आहे. यातूनच ‘क्वेस्ट ऑफ एटथाउजंडर’ मोहिमेचा जन्म झाला.

हिमालय हे नाव ऐकताच अनेकांच्या शरीरावर रोमांचकारी शहारे उभे राहतात, त्यातील मी एक होय. अफगाणिस्तान-पाकिस्तान व भारताच्या सीमेजवळ सुरू होणारी हिमालयाची ही पर्वतरांग काही हजार किलोमीटरवर असलेल्या म्यानमापर्यंत गेली आहे. या संपूर्ण हिमाच्छादित पट्टय़ामध्ये अनेक निसर्गनिर्मित हिमशिखरे डौलाने उभी आहेत. हिमालयामध्ये असंख्य डोंगररांगा काही हजार मीटर उंच आहेत. यातील नेपाळमध्ये वसलेल्या ‘अन्नपूर्णा’ पर्वत रांगेमध्ये १६ शिखरांची उंची ६००० मीटरहून अधिक आहे, तर संपूर्ण हिमालयामध्ये ८ हजार मीटरहून उंच अशी एकूण १४ हिमशिखरे आहेत. त्यांना अष्टहजारी हिमशिखरे असे संबोधतात. अनेक गिर्यारोहकांनी या शिखरांवर चढाई करण्यासाठी अक्षरश: आपले आयुष्य वेचले आहे, पण हे यश आतापर्यंत केवळ २७ गिर्यारोहकांच्याच वाटय़ाला आले आहे. या चौदा शिखरांपकी सात शिखरे नेपाळमध्ये, पाच पाकव्याप्त काश्मीरमध्ये तर प्रत्येकी एक शिखर भारत व तिबेटमध्ये वसलेले आहे.
गिर्यारोहण जगतात प्रत्येक गिर्यारोहकाला आणि संस्थेला ही सर्व शिखरे सर करण्याची इच्छा असते. ‘गिरिप्रेमी’ने २०१२ साली ‘माउंट एव्हरेस्ट’, २०१३ साली ‘माउंट ल्होत्से व माउंट एव्हरेस्ट’ आणि २०१४ साली ‘माउंट मकालू’ अशा सलग तीन वर्षे तीन अष्टहजारी मोहिमा यशस्वी केल्या. या मोहिमांच्या यशस्वीतेनंतर संस्थेत ही सर्वच अष्टहजारी शिखरे सर करण्याचा विचार पुढे आला आणि ‘क्वेस्ट ऑफ एटथाउजंडर’ मोहिमेचा जन्म झाला.
‘माउंट एव्हरेस्ट’ मोहिमेनंतर अनेकांनी विचारले होते, ‘‘सर्वोच्च शिखर झाले, आता पुढे काय?’’ तेव्हा माझ्या मनामध्ये एकच भावना येत असे, ती म्हणजे, ‘‘अरे ही तर फक्त सुरुवात आहे, अजून हिमालयाशी खूप गप्पा मारायच्या आहेत, त्याच्या कवेत बसून हसायचे आहे, आपली दु:ख त्याच्या सोबत वाटून रडायचे देखील आहे. याच आपल्या हिमालयाला कडकडून भेटायचे आहे, एकदा नव्हे तर अनेकदा.’’ याच भावनेचा आविष्कार म्हणजे ‘क्वेस्ट ऑफ एटथाउजंडर’ मोहीम होय. यामध्ये आम्ही येत्या काही वर्षांमध्ये सर्व चौदा अष्टहजारी शिखरांवर चढाई मोहीम आखणार आहोत. त्यातील ‘माउंट एव्हरेस्ट’, ‘माउंट ल्होत्से’ व ‘माउंट मकालू’ या तीन शिखरांवरील मोहिमा यशस्वी झाल्या आहेत. आता क्रमाक्रमाने आम्ही इतर शिखरे पादाक्रांत करण्याचे उद्दिष्टय़ ठेवले आहे. याचा पुढचा टप्पा म्हणून एप्रिल-मे २०१६ मध्ये ‘माउंट चो ओयू’ व ‘माउंट धौलागिरी’ या अष्टहजारी शिखरांच्या मोहिमा निघणार आहेत.
‘क्वेस्ट ऑफ एटथाउजंडर’ ही ‘गिरिप्रेमी’ची महत्त्वकांक्षी मोहीम आहे. गिर्यारोहण क्रीडाप्रकाराला अधिक उत्तेजन मिळावे, या खेळाला लोकाश्रय प्राप्त व्हावा, अशी अनेक ध्येये आम्हाला या मोहिमेसमवेत प्राप्त करावयाची आहेत. साहसी खेळांना प्रोत्साहन दिल्याचा अप्रत्यक्ष फायदा देशाला व तेथील व्यवस्थेला होतो. साहसी खेळांमुळे व्यक्तीची कार्यक्षमता वाढते, परिस्थितीला धर्याने तोंड देण्याचा आत्मविश्वास जागृत होतो, निर्णय घेण्याची क्षमता विकसित होते, असे एक ना अनेक फायदे साहसी खेळांमुळे सामान्य माणसाला होतात. या खेळांमध्ये कुठलीही हार-जीत नाही. फक्त ध्येय गाठल्याचे अपूर्व समाधान आहे. तुम्हीही एकदा कधी छोटी टेकडी चढून बघा, तुम्हाला या समाधानाची प्रचीती येईल. असे अनेक उद्दिष्टय़े गाठण्यासाठी खेळाचा प्रसार मोठय़ा प्रमाणावर होणे आवश्यक आहे. हा प्रसार अधिक वेगाने करण्यासाठी ‘क्वेस्ट ऑफ एटथाउजंडर’ मोहीम हातभार लावेल यात शंका नाही.

एव्हरेस्ट
‘माउंट एव्हरेस्ट’ हे जगातील सर्वात उंच शिखर. हे समुद्रसपाटीपासून ८८४८ मीटर उंच आहे. नेपाळ व तिबेटच्या सीमेवर असलेल्या हिमालयीन रांगांमध्ये या शिखराचा अधिवास आहे. नेपाळी नागरिक ‘माउंट एव्हरेस्ट’ला ‘सगरमाथा’ तर तिबेटी नागरिक ‘चोमोलुंग्मा’ या नावाने ओळखतात. १९५३ साली तेनसिंग नोग्रे व एडमंड हिलरी यांनी या शिखरावर पहिली यशस्वी चढाई केली. उणे ४० अंशाहून कमी तापमान, प्राणवायूची कमतरता, अवघड चढाई मार्ग या कारणांमुळे ‘माउंट एव्हरेस्ट’वरील चढाई अवघड मानली जाते. ‘गिरिप्रेमी’च्या संघाने २०१२ व २०१३ या सलग दोन वर्षी ‘माउंट एव्हरेस्ट’वर यशस्वी मोहिमा केल्या. सध्या ‘गिरिप्रेमी’च्या संघामध्ये ११ एव्हरेस्टवीर आहेत.

माउंट के-२
उंची – ८६११ मीटर. जगातील दुसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर. पाकव्याप्त काश्मीरमध्ये बाल्टिस्तान-गिलगीट परिसरातील काराकोरम रांगांमध्ये हे शिखर वसलेले आहे. चढाई करण्यासाठी सर्वात आव्हानात्मक शिखर, असा याचा लौकिक आहे. १९५४ साली इटलीच्या लीनो लासेडेली व अशाईल कॉम्पाग्नोनी यांनी ‘माउंट के-२’वर सर्वप्रथम यशस्वी चढाई केली.

कांचनगंगा
उंची ८५८६ मीटर. जगातील तिसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर. ‘माउंट कांचनगंगा’ हे भारतीय हद्दीमध्ये वसलेले एकमेव अष्टहजारी हिमशिखर आहे. भारतीय चलनातील १०० रुपयांच्या नोटेच्या पृष्ठभागावरील हिमशिखर म्हणजे ‘माउंट कांचनगंगा’ होय. नेपाळ व भारतातील सिक्कीम राज्यालगतच्या सीमेवर हे शिखर वसलेले आहे. १९५५ साली ज्यो ब्राउन व जॉर्ज ब्रँड या ब्रिटिश गिर्यारोहकांनी ‘माउंट कांचनगंगा’वर सर्वात पहिली यशस्वी चढाई केली.

 

ल्होत्से
उंची ८५१६ मीटर. जगातील चौथ्या क्रमांकाचे उंच शिखर. हे शिखर ‘माउंट एव्हरेस्ट’च्या अगदी जवळ उभे आहे. ‘साउथ कोल’ नावाचा मार्ग ‘माउंट एव्हरेस्ट’ व ‘माउंट ल्होत्से’ या दोन अष्टहजारी शिखरांना जोडतो. या ‘साउथ कोल’ची उंची देखील ८ हजार मीटरहून अधिक आहे. १९५६ साली फ्रित्झ लुिशगर व अर्न्‍स्ट रीस या स्विस गिर्यारोहकांनी या शिखरावर सर्वात पहिली यशस्वी मोहीम केली. २०१३ साली ‘गिरिप्रेमी’च्या संघाने ‘माउंट एव्हरेस्ट-माउंट ल्होत्से’ या दुहेरी मोहिमेंतर्गत हे शिखर सर केले.

मकालू
उंची ८४६३ मीटर. जगातील पाचव्या क्रमांकाचे उंच शिखर. हे शिखरदेखील ‘माउंट एव्हरेस्ट’च्या हिमालयीन रांगांमध्ये वसलेले आहे. १५ मे १९५५ रोजी लिओनेल टेरे व जिन कुझी यांची फ्रेंच मोहीम सर्वप्रथम या शिखरावर दाखल झाली. २०१४ साली ‘गिरिप्रेमी’च्या संघाने या शिखरावर यशस्वी चढाई केली.

चो ओयू
उंची ८२०१ मीटर. जगातील सहाव्या क्रमांकाचे उंच शिखर. हे शिखर नेपाळमध्ये वसलेले आहे. १९५४ साली एच. टीशी, ए. जोश्लर व स्थानिक नागरिक तवांग दलाम लामा यांनी ‘माउंट चो ओयू’वर जगातील पहिली यशस्वी मोहीम पूर्ण केली. ‘गिरिप्रेमी’चा संघ येत्या एप्रिल-मे मध्ये (२०१६) ‘माउंट चो ओयू’ शिखरावरील चढाईचा अनुभव घेणार आहे.

धौलागिरी
उंची ८१६७ मीटर. जगातील सातव्या क्रमांकाचे उंच शिखर. १९६० साली स्विस, ऑस्ट्रियन व नेपाळच्या संयुक्त मोहिमेने हे ‘माउंट धौलागिरी’ अथवा ‘माउंट धवलगिरी’ शिखर सर केले. यामध्ये के. दिम्बर्गर, ए. शेल्बर्ट व नवांग दोरजे यांचा समावेश होता. या मोहिमेच्या वेळी इतिहासामध्ये सर्व प्रथमच काही गिर्यारोहण साहित्य हलक्या विमानांच्या साहाय्याने एका विशिष्ट उंचीपर्यंत पोहचविण्यात आली. ‘गिरिप्रेमी’चा संघ ‘माउंट चो ओयू’ समवेत ‘माउंट धौलागिरी’वर देखील मोहीम करणार आहे.

मानसलू
उंची ८१६३ मीटर. जगातील आठव्या क्रमांकाचे उंच शिखर. हे शिखर पश्चिमेतर नेपाळमध्ये वसलेले आहे. या शिखराचे नाव संस्कृत भाषेतील आहे. स्थानिक नागरिक ‘मानसलू’ला ‘कुटांग’ असे देखील संबोधतात. १९५६ साली जपानच्या तोशियो इमानिशी व ग्यालत्सेन नॉर्बू (शेर्पा) यांनी या शिखरावर पहिली यशस्वी चढाई केली.

नंगा पर्वत
उंची ८१२५ मीटर. जगातील नवव्या क्रमांकाचे उंच शिखर. हे शिखर हिमालयाचे पश्चिम टोक म्हणून ओळखले जाते. पाकव्याप्त काश्मीरमध्ये बाल्टिस्तान-गिलगीट प्रांतामध्ये हे शिखर वसलेले आहे. जून १९५३ साली ऑस्ट्रियन गिर्यारोहक हर्मन बुहृ यांनी ‘नंगा पर्वत’वर यशस्वी चढाई केली. या शिखराच्या विचित्र नावाबरोबरच अनेक विचित्र घटनांसाठी हे शिखर प्रसिद्ध आहे.

अन्नपूर्णा
उंची ८०९१ मीटर. जगातील दहाव्या क्रमांकाचे उंच शिखर. हे शिखर उत्तरमध्य नेपाळमध्ये वसलेले आहे. अष्टहजारी शिखरांमध्ये चढण्यासाठी ‘अन्नपूर्णा’ हे सर्वात अवघड शिखर असून २०१२ पर्यंत फक्त १९१ गिर्यारोहकांना या शिखरावर चढण्यात यश आले आहे. हे शिखर ‘धौलागिरी’ शिखरापासून फक्त ३४ किमी अंतरावर असून या दोहोंच्या मधून ‘गंडकी’ नावाची नदी वाहते. या नदीचे पात्र जगातील सर्वात खोल पात्र (दोन अष्टहजारी शिखरांच्या मध्यातून वाहते) म्हणून ओळखले जाते. १९५० साली मॉरिस हेझरेग यांच्या नेतृत्वाखाली फ्रेंच गिर्यारोहक ‘धौलागिरी’ पर्वत शिखरावर चढाई करत असताना, त्यांना काही अडचणींचा सामना करावा लागला. या परिस्थितीमध्ये या गिर्यारोहक संघाने ‘धौलागिरी’चा नाद सोडून, आपला मोर्चा ‘अन्नपूर्णा’ शिखराकडे वळविला. यामध्ये त्यांना शिखर सर करण्यात यश आले.

गशेरब्रूम- १
उंची ८०६८ मीटर. जगातील अकराव्या क्रमांकाचे उंच शिखर. हे शिखर हिमालयातील काराकोरम पर्वत रांगेमध्ये वसलेले आहे. हा पर्वत आसपासच्या प्रदेशातून बघितल्यास पटकन लक्ष वेधून घेतो, तो एखाद्या चकाकणाऱ्या िभतीप्रमाणे भासतो. म्हणून या पर्वताचे नाव ‘गशेरब्रूम’ अर्थात ‘चकाकणारी िभत’ असे ठेवण्यात आले आहे. ५ जुल १९५८ मध्ये निकोलस क्लींच यांच्या नेतृत्वातील अमेरिकन मोहिमेने हे शिखर सर केले. या मोहिमेत सहभागी झालेल्या एकूण आठ गिर्यारोहकांपकी पिट स्कोनिंग व अँडी कॉफमन यांनी हे शिखर सर्वप्रथम गाठले.

ब्रॉड पिक
उंची ८०५१ मीटर. जगातील बाराव्या क्रमांकाचे उंच शिखर. हे शिखर पाकिस्तान-चीनच्या सीमेवर बाल्टिस्तान परिसरामध्ये वसलेले आहे. काराकोरम पर्वत रांगेमध्ये, ‘माउंट के-२’ पासून अवघ्या आठ किलोमीटरवर ‘माउंट ब्रॉड पिक’ उभे आहे. या शिखराची रुंदी साधारण दीड किलोमीटर आहे. एवढय़ा अवाढव्य रुंदीमुळे याचे नाव ‘ब्रॉड पिक’ असे ठेवण्यात आले आहे. ९ जून १९५७ रोजी फ्रित्झ िवटरस्टेलर, मार्कस श्मुक, कर्ट डेमबर्गर व हरमौन बुहृ यांच्या ऑस्ट्रियन गिर्यारोहक संघाने हे शिखर पहिल्यांदा सर केले.

गशेरब्रूम- २
उंची ८०३५ मीटर. जगातील तेराव्या क्रमांकाचे उंच शिखर. या शिखराला ‘के-४’ असे देखील संबोधतात. हे शिखर सर्व अष्टहजारी शिखरांमध्ये सर्वात सुरक्षित शिखर म्हणून ओळखले जाते. २०१२ पर्यंत एकूण ९३० गिर्यारोहकांनी हे शिखर सर केले आहे. या शिखराच्या गिर्यारोहण इतिहासात अनेक गिर्यारोहकांनी पॅराशूट, स्नो-बोर्ड अथवा हँिगग ग्लायिडगच्या साहाय्याने देखील शिखरावरील चढाई व उतराई केली आहे. काही गिर्यारोहकांनी थेट हिम शिखरापासून ते थेट बेसकॅम्पपर्यंत ग्लायिडग केली आहे. ‘माउंट गशेरब्रूम-२’ हे पाकव्याप्त काश्मीरमध्ये वसलेले आहे.

 

शिशापंग्मा
उंची ८०२७ मीटर. जगातील चौदाव्या क्रमांकाचे उंच शिखर. उंचीनुसार सर्वात लहान असलेले हे अष्टहजारी शिखर तिबेट परिसरामध्ये वसलेले आहे. या शिखरावर पहिली यशस्वी मोहीम १९६४ साली चिनी गिर्यारोहकांनी केली. यामध्ये झान जुनयांग, वांग फुझोहू व चेन सान यांचा समावेश होता. सर्वात कमी उंचीचे अष्टहजारी शिखर असून देखील याच्यावरील पहिली यशस्वी चढाई अष्टहजारी शिखरांमध्ये सर्वात शेवटी झाली. याचे मुख्य कारण म्हणजे, हे शिखर संपूर्णपणे तिबेटमध्ये येते. या ठिकाणी विदेशी व्यक्तींना जाण्यास चीन सरकारची अनेक बंधने आहेत. तरी देखील १४ अष्टहजारी शिखरे सर करण्याचे उद्दिष्टय़ बाळगणारे गिर्यारोहक या पर्वतावर मोठय़ा उत्साहाने जातात.

Story img Loader