एक नाठाळ भटकंती
चार-पाच महिन्यांपूर्वी सुधागडचा ट्रेक झाला तेव्हा वेळेअभावी ठाणाळे लेणी बघायची राहून गेली होती. परत कधीतरी घाटावरून उतरून लेणी बघायची असे ठरले होते. तो योग आत्ता जुळून आला. नेहमीचे भिडू तयार होतेच. तेलबैलाच्या पठारावर मुक्कामी जायचे आणि तांबडं फुटायच्या आधीच घाट उतरायचा यावर एकमत झाले. नुकताच चैत्र पाडवा झाला असला तरी सूर्याला ग्रीष्माचे डोहाळे लागले होते. सूर्य डोक्यावर येईपर्यंत अंगाची लाही होत होती. सूर्य कलता कलता तेलबैलाच्या अक्राळ भिंतीला उजव्या अंगाने वळसा घालून पाठीमागे कडय़ावर पोहोचलो. 

दिवसभर आग ओकून दमलेल्या सूर्याची अरबी सागरात बुडी मारून घसा ओला करण्याची चाललेली घाई आम्हाला दिसत होती. दूरवर सरसगड क्षितिजावर डोके काढून उभा होता, तर डाव्या अंगाला सुधागड तटस्थपणे अंधाराची वाट पाहत होता. खाली कोकणातील नाडसुर, कोंडगाव दिवे लावणीच्या तयारीत होती. सूर्यास्त होताच पोटात उगवणाऱ्या भुकेची आठवण झाली. जेवण झाल्यावर स्लीपिंग बॅग पसरून सारे आडवे झाले. अष्टमीचा चंद्र डोक्यावर आला होता. हवेत गारवा जाणवायला लागला होता. पहाटेचे चार वाजले, चंद्र मावळला, त्यामुळे ताऱ्यांचे फोटो काढायला सुरवात केली. तेलबैलाच्या डोक्यावर एक आकाशगंगेचा दुधाळ पट्टा दिसत होता. तिला कॅमेरात बंदिस्त करता करता चहा तयार असल्याची हाक आली. वाह. मग खडा चम्मच चहा आणि पार्ले जीची थप्पी आणि सह्याद्रीचा पहाटवारा.
उजाडायच्या आधी आवरुन रेडिओ टॉवरच्या शेजारून वाघजाईच्या घाटात उतरलो. पाचच मिनिटात वाघजाईचे मंदिर लागले. नमस्कार-चमत्कार करून घाट उतरायला सुरुवात केली. नकाशा-पुस्तकांवरून लेण्यांच्या ठिकाणाचा अंदाज घेतला. दोन तीन डोंगरधारा उतरून आलो तरी लेण्यांचा ठाव लागेना. नुकताच वणवा लागून गेल्यामुळे सगळे रान जळून गेले होते. पायवाटेच्या दोन्ही बाजूला होते फक्त जळलेले गवत आणि पाने. तेलबैलाच्या उदरात दडलेली लेणी काही केल्या आमच्यासमोर येईनात. तीन तासाच्या शोधाशोधीनंतर लेणी सापडली. एवढय़ा पायपीटीनंतरचे लेण्यांचे दर्शन नक्कीच सुखावह होते. ही बौध्द लेणी इ.स.पूर्व दुसऱ्या शतकात निर्मिल्याचा अंदाज आहे. एकूण एकवीस निवासी गुंफा आणि एक चैत्यविहार आहे. चैत्य विहाराच्या छतावर अप्रतिम नक्षीकाम सार काही अप्रतिम. फोटो काढता काढता वेळ कसा गेला कळलेच नाही. आमच्या जवळचे पाणीसुद्धा संपत आले होते आणि जवळपास पाणी नसल्याने परत फिरणे भाग होतेच. आमच्या जवळ होते फक्त एक लिटर पाणी, थोडीफार बिस्किटे आणि साखर. या जोरावर आम्हाला तीन तासाची चढाई करायची होती, ती सुद्धा रणरणत्या उन्हात. सगळा डोंगर वणव्याने खाल्ल्यामुळे, नावापुरती सुद्धा सावली नव्हती. तासाभराच्या चढाईनंतर काहींना त्रास सुरु झाला. पाणी नसल्याने सर्वाचे घसे कोरडे पडले होते. तापत चाललेल्या उन्हाने आणखी त्रास होत होता.
अजून दोन तासाची वाट बाकी होती. थोडय़ाच वेळात पाणी पूर्णपणे संपले. आता फक्त साखर आणि थोडी बिस्किटे. आणीबाणीच्या काळात वापरायचे पाणी गुप्तरित्या ठेवलेलं होतं. हे अर्धा लिटर पाणी अगदीच अडलेल्यांसाठी वापरायचे आणि बाकीच्यांनी जमेल तसे वाघजाईपर्यंत पोहोचायचे ठरले. दर पन्नास पावलावर दहा मिनिटाची विश्रांती घेत होतो. आता सर्वानाच त्रास व्हायला लागला होता. घाम येणे बंद झाले. उष्माघाताचे पहिले लक्षण.
प्रत्येक वळणावर पुढच्यास विचारात होतो वाघजाईचे मंदिर आले का? तिथे पाणी मिळेल अशी पुसटशी आशा होती. एका ठिकाणी एका मित्राचे त्राण संपले. आणखी दुसरा पूर्ण थकून गेला होता. अशा वेळी मनाचा हिय्या करून मी, आणखी एका मित्राने पुढे जाऊन पाणी शोधायचे ठरवले. बाकीच्यांनी शक्य तेवढे वर यायचे. आणीबाणीच्या पाण्याची वाटणी झाली. दहा मिनिटात मंदिर लागले. मी मंदिराभोवती पाणी शोधायला लागलो. पाणी सोडाच पण आटलेले टाके सुद्धा सापडले नाही. पाण्याने आमच्या सर्वाच्याच तोंडचे पाणी पळवले होते.
तेवढय़ात दुसरीकडे पठारावर पोचलेल्या एकाचा आवाज आला ‘पाणी सापडले’. या एका निरोपासरशी माझ्या मनात आभाळ दाटून आले. उन्हाळ्यात पळस फुलतो तसे सर्वाचे डोळे फुलले. कसलेही कुठलेही पाणी प्यायची आमची तयारी झाली होतीच. टाक्यातील पाण्याची चिकित्सा न करता बाटली बुडवली तसा एक बेडूक टुण्णकन उडी मारून बाटलीवर आला. फटाफट बाटल्या भरून घेतल्या आणि वाघजाईच्या मंदिरात पोचलो. प्रत्येकाने एकेक बाटली पाणी पिऊन मंदिरातच लोळण घातली.
संपूर्ण ब्लॉगपोस्ट वाचण्यासाठी – http://amitshrikulkarni.in/blog/tel-bel-thanale