नाशिकच्या पश्चिमेला त्रंबकेश्वरची डोंगररांग आहे. या त्र्यंबकेश्वरपासूनच दुगारवाडीच्या या जलसौंदर्याकडे जाण्यासाठी वाट आहे. या त्र्यंबकेश्वरपासूनच जव्हारकडे एक रस्ता जातो. या वाटेवर चार किलोमीटर गेले, की सापगावकडे एक वाट वळते. या सपागावहून काचुर्ली गावाकडे एक फाटा फुटतो. या गावातूनच या दुगारवाडी धबधब्याकडे पायवाट निघते.
काचुर्ली हे गाव अगदी डोंगरदरीतले. भोवतीने गर्द झाडी आणि त्यातून दुगारवाडी धबधब्याची ही पायवाट निघते. साधारण एक किलोमीटर अंतर गेलो, की आपण डोंगराच्या एका दरीत खोलवर येतो. जवळ जाताच आधी ‘त्याचा’ आवाज येतो आणि पुढच्या काही क्षणात अचानकपणे ती कोसळणारी शुभ्र धार दिसते.
गर्द हिरवाई आणि काळय़ाभोर कडय़ाची पाश्र्वभूमी घेत ती जलधारा कोसळत असते. या रंगसंगतीत उठून दिसणारा हा देखावा प्रथम दर्शनातच मनाचा ताबा घेतो. त्या उंच कडय़ावरून कोसळणारी ती धार निसर्गाचे ते थोरपणच उभे करत असते. तिच्या या जलशक्तीतून खाली पाण्याचा एक मोठा डोहच तयार झालेला आहे. दुरून दिसणाऱ्या या दृश्याच्या जवळ जाण्यासाठी मात्र थोडेसे साहस आणि सावधपण अंगी असावे लागते. या जोडीलाच गिर्यारोहणाचे दोर बरोबर असतील तर पाण्याचा हा प्रवाह ओलांडणे शक्य होते. अन्यथा हे सौंदर्य दुरून पाहण्यातही मोठी मजा वाटते. निसर्गशांततेत हे दृश्य मनात खोलवर उतरते आणि चार अविस्मरणीय क्षण गाठी बांधले जातात.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Oct 2013 रोजी प्रकाशित
दुगारवाडीची जलधारा!
पाऊस सुरू झाला, की महाराष्ट्रात कडय़ाकपारी वाहणारे अनेक जलप्रपात चर्चेत येतात. यातील काही प्रसिद्ध, काही अप्रसिद्ध, काही वाटेवरचे- गर्दीत बुडणारे तर काही दुर्गम वाटेवर स्वत:चे अस्पर्शी सौंदर्य जपणारे!

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 02-10-2013 at 08:41 IST
मराठीतील सर्व Trek इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Waterfall in dugarwadi