आपण आजपर्यंत अनेक अलिशान गाड्या पाहिल्या असतील. या गाड्यांच्या किंमती ऐकून अनेकदा अवाक व्हायला होते. मात्र, त्या तुलनेत या गाड्यांची सेकंडहँड मॉडेल्स काहीशी स्वस्त असतात. निदान आजपर्यंत आपला असा समज असेल. मात्र, बुगाटी सिरॉन (Bugatti Chiron) या गाडीची किंमत ऐकल्यानंतर तुमचा हा समज खोटा ठरण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे ही गाडी सेकंडहँड असून त्याची किंमत गाडीच्या मूळ मॉडेलपेक्षा जास्त आहे. साहजिकच हे कसे शक्य आहे, असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. कंपनीने या मॉडेलच्या फक्त ५०० गाड्याच तयार केल्या होत्या. साहजिकच मॉडेल्सची संख्या मर्यादित असल्यामुळे सध्याच्या बाजारपेठेत या गाडीला चांगलाच भाव आला आहे.

ही गाडी २६१ मैल प्रतीतास इतक्या वेगाने धावते. या गाडीला ग्राहकांच्या सोयीने कस्टमाइज करण्यात येते. या गाडीची मूळ किंमत ३० कोटींहून अधिक आहे. यातून कार दुसऱ्या ग्राहकाला विकणाऱ्याला ८ कोटींहून अधिक नफा होणार आहे. परंतु, सध्या कंपनीकडून या गाडीचे उत्पादन जवळपास बंद करण्यात आले आहे. त्यामुळे या मॉडेलची सेकंडहँड गाडी विकत घेण्याशिवाय पर्याय नाही. मात्र, त्यासाठी गाडीच्या मूळ किंमतीपेक्षा अधिक पैसे मोजावे लागत आहेत. काही दिवसांपूर्वीच या गाडीची ५०० नवीन मॉडेल्स तयार करण्याची घोषणा कंपनीने केली होती. मात्र, त्यासाठी तब्बल तीन ते चार वर्षांचा अवधी लागेल. त्यामुळे तुर्तास ग्राहकांना गाडीचे सेकंडहँड मॉडेल विकत घेण्याशिवाय पर्याय नाही.