आपल्या देशात रस्त्यावरून गाडी चालवणे हे एकप्रकारचे दिव्य आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. वाहतूक कोंडी, रस्त्यातले खड्डे या समस्या प्रवास करताना पाचवीलाच पुजलेल्या असतात. मात्र, अनेकदा वाहन चालकांनी नियम पायदळी तुडवल्यामुळेही अडचणींना किंवा अपघातांना सामोरे जावे लागते. चुकीच्या दिशेने गाडी चालवणं, सिग्नल मोडणं, गाडी मध्येच उभी करणं अशाप्रकारे बेशिस्तपणे वागणारे अनेक चालक रस्त्यावर भेटतील. अशा लोकांना धडा शिकवला पाहिजे असं सारखं वाटतं, पण ‘वाटणं’ आणि प्रत्यक्षात ‘कृती करणं’ यात बरंच अंतर आहे. तेव्हा नियम मोडणाऱ्यांची तुम्हालाही चीड असेल आणि तुम्हालाही बदल घडवायचा असेल तर भोपाळच्या तरूणाकडून काहीतरी शिकायला पाहिजे.

नियम मोडणाऱ्या चालकाविरुद्ध तो एकटा लढला, मारही खाल्ला पण शेवटपर्यंत त्याने चालकाला चुकीच्या दिशेनं गाडी चालवू दिली नाही. रस्त्यावर घडलेला हा प्रसंग सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एसयुव्ही गाडीचा चालक चुकीच्या दिशेनं गाडी चालवत होता. यामुळे अपघात होण्याचा धोका आहे, हे लक्षात येताच एका दुचाकीस्वाराने त्याला रोखलं. त्याने एसयुव्ही चालकाला गाडी विरुद्ध दिशेने चालवू दिली नाही. यासाठी गाडीच्या मार्गात त्याने स्वत:ची बाईक उभी केली. चालक वारंवार त्याला मार्गातून हटण्याची धमकी देत होता. पण हा तरूण ठामपणे उभा राहिला. त्यामुळे राग अनावर झालेल्या चालकाने शेवटी त्याला बेदम मारहाण केली. या दोघांचं भांडण विकोपाला पोहोचलेलं पाहून काही लोक मदतीला धावून आले आणि त्याने भांडण सोडवलं. हे संपूर्ण दृश्य रस्त्यावरच्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झालं. अनेकांनी या तरूणाने दाखविलेल्या हिंमतीचे कौतुक केले आहे. या प्रकरणात एसयुव्ही चालकाविरुद्ध आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.