गायिका म्हणून जगण्यात मी पूर्ण समाधानी आहे. ही गायिकाच कधी रचनाकार होते, कधी लेखिका बनते, कधी शिक्षणतज्ज्ञ म्हणून काम करते, कधी गुरूची जबाबदारी उचलते आणि कधी कवयित्री म्हणून काव्याकडे वळते. हे सगळे माझ्या गाण्याचेच आविष्कार आहेत.या आविष्कारांनी मला आणि माझ्या गाण्याला श्रीमंत केलंय. १३ सप्टेंबरला मी ८४ व्या वर्षांत पाऊल टाकलं आहे. या टप्प्यावर मी एकटी नाही, माझं संगीत आणि आपण सर्व जण बरोबर आहात, कलाकाराचा खरा पुरस्कार आहे त्याचं साधनेमधलं यश आणि त्याचे श्रोते. मी मागे वळून पाहते तेव्हा लक्षात येतं, या वळणवाटांनीच मला जगण्याचा तोल सांभाळायला शिकवलं.
आजच्या या टप्प्यावर पोहोचताना किती वळणं लागली, लहान-मोठी, सोपी-कठीण, आनंद देणारी, दु:ख देणारी याचा हिशेब कसा लावायचा? माझ्यासमोर सरळ रस्ता नव्हता, एवढं मात्र खरं. ही सारी वळणं नियतीनं निवडली होती, आज ना उद्या ती मला येऊन भेटणार होती. माझ्या हातात होतं ते फक्त चालणं ..
आई सांगायची, लहानपणी मी फार गोड-गोड बोलायची. त्यामुळं माझ्या मामानं या मुलीचं नाव ‘गुलगुल’ ठेवलं होतं. पुढे या गुलगुलची ‘गुग्गी’ झाली. शाळेमध्ये माझ्याबरोबर असणारी मुलं अगदी कॉलेजमध्ये गेल्यावरसुद्धा मी सायकल वरून येता-जाताना ‘गुलगुल’ म्हणून मोठय़ानं हाक मारायची. लाजरी,अबोल, अलिप्त राहणारी ही गुलगुल ‘प्रभा अत्रे’ कधी झाली ते तिलाच कळलं नाही..
मी कधी गायिका होईन, असं कोणाच्या स्वप्नातही आलं नव्हतं. एक तर मला संगीताचा वारसा नव्हता आणि दुसरं म्हणजे आमच्या घरात संगीत कुणी ऐकतही नव्हतं. आई-वडील दोघं शिक्षक. आíथक स्थिती बेताची. हेडमास्तरांची मुलगी म्हणून मला शाळेतल्या प्रत्येक कार्यक्रमात भाग घ्यायला लागायचा. वार्षकि सम्मेलनात तर गाणं, नृत्य असायचंच. एकदा असाच कोणी गाणं समजणारा पालक समारंभाला आला होता, आबांना म्हणाला, ‘‘तुमच्या मुलीला नसíगक देणगी आहे. तिला गाणं शिकवा.’’ त्या वेळी आबांनी मनावर घेतलं नाही. नंतर आईचं दुखणं सुरू झालं. तिचं मन दुसरीकडे लागावं म्हणून हाम्रेनियम शिकवण्यासाठी घरी एक मास्तर यायला लागले. चार-पाच दिवसांतच आई कंटाळली. आलेल्या मास्तरांना नाही कसं म्हणायचं म्हणून आईच्या जागी मी गाणं शिकायला लागले. त्या ‘सा’च्या वळणावर एका गायिकेचा जन्म झाला..
घरात शिक्षणाचं वातावरण असल्यामुळं शिक्षणावरच भर होता. दुसऱ्या बाजूला माझं शास्त्रीय संगीताचं शिक्षण चालू होतं. आकाशवाणीवर होणाऱ्या लहान मुलांच्या कार्यक्रमात झालेलं कौतुक, अधूनमधून होणाऱ्या संगीत स्पर्धामधलं यश, गणपती उत्सवातली पहिली मफल – श्रोत्यांची ‘वाहवा’, प्रोत्साहन, माझ्यातल्या कलाकाराशी होत असलेली माझी भेट – मी एक चांगली कलाकार आहे, याची सुखद जाणीव देत होती. हे कौतुकाचे क्षण मला संगीताकडे खेचत होते. तरीही पुढच्या आयुष्यात फक्त गाणंच करायचं असं निश्चित केलं नव्हतं.
माझ्या मनात डॉक्टर व्हायचं कसं आलं कोणास ठाऊक? खरं तर साधं इंजेक्शन म्हटलं तरी मी घराशेजारच्या गल्लीत पळायची. आजही हॉस्पिटलमध्ये कोणाला भेटायला जायचं म्हटलं की छातीत धड-धड व्हायला लागतं. तरीही मी डॉक्टर व्हायचं ठरवलं होतं. इंटर-सायन्सला असताना बेडकं, झुरळं कापायची वेळ आली, तेव्हा डॉक्टरकीचा विषय मनातून काढून टाकला आणि सरळ बी.एस्सी.ची पदवी घेतली. यानंतर काय करावं असं ठरवत असतानाच मला ‘गुलगुल’ म्हणणाऱ्या माझ्या वकीलमामानं वकिलीची परीक्षा द्यायला सांगितलं. एलएल.बी. झाल्यानंतर मी बार कौन्सिलची परीक्षाही दिली. थोडे दिवस कोर्टातही गेले. पण तिथली काम करण्याची पद्धत, वातावरण, खऱ्याचं खोटं – खोटय़ाचं खरं करण्याचे जे प्रयत्न केले जायचे, ते पाहून वकिली करण्याचा नाद सोडला. बेडकं कापण्यापेक्षा, गुन्हेगारांशी संबंध ठेवण्यापेक्षा गाणं किती तरी चांगलं होतं, माझ्या स्वभावाशी जुळणारं!
एकदा माझं गाणं ऐकून वडिलांचे मित्र वैद्यबुवा देशपांडे यांनी आग्रह धरला की किराणा घराण्याचे मान्यवर गायक सुरेशबाबू माने यांच्याकडे मी गाणं शिकावं. कोणत्याही क्षेत्रात योग्य गुरू, योग्य मार्गदर्शन मिळणं फार आवश्यक असतं. हा गुरू निवडायचा कसा? त्या क्षेत्रातलं तुम्हाला काही ज्ञान असेल तर थोडी तरी शक्यता असते. संगीत क्षेत्रात शिष्याच्या आवाजाची जात, त्याचे सांगीतिक गुण, सांगीतिक स्वभाव, या सर्व गोष्टी लक्षात घेऊन शिकवणारा गुरू मिळण्यासाठी भाग्यच असावं लागतं. सुरेशबाबूंनी मला शिकवायचं कबूल करणं हे माझ्या सांगीतिक प्रवासातलं मोठं वळण ठरलं. नाद समुद्राच्या तळाशी घेऊन जाणारं!
आमच्या घरात रेडिओ आला आणि बडे गुलाम अली खाँ, रोशनारा बेगम, बेगम अख्तर अशा कलाकारांशी माझं जवळचं नातं जुळलं. ठुमरी, दादरा, ग़ज़्‍ाल यांसारख्या सुगम शास्त्रीय संगीत प्रकारांशी माझी जवळीक वाढली. कोणाकडेही न शिकता नुसतं ऐकून हे संगीत प्रकार मी चांगल्या तऱ्हेनं गाऊ लागले. खरं सांगू, हे प्रकार शिकून गाता येईलच असं नाही. आवाजाची जात, बुद्धिमत्ता, कल्पनाशक्ती, वृत्ती, मानसिकता हे सर्व त्या प्रकारांना पोषक असायला लागतं. पुण्यातल्या ब्राह्मण कुटुंबातली, एका शिक्षकाची मी मुलगी. या संगीत प्रकारांकडे कशी वळले ते मलाही सांगता येत नाही. माझ्या सांगीतिक प्रवासातल्या या छोटय़ा-छोटय़ा पाऊलवाटा मला खूप श्रीमंत करून गेल्या. खरं म्हणजे संगीतातले सर्व प्रकार, अगदी चित्रपट, फ्यूजन संगीतसुद्धा मला खूप आवडतं. प्रत्येक संगीत प्रकारात काही तरी घेण्यासारखं असतं. तुम्हाला ते शोधता आलं पाहिजे, उचलता आलं पाहिजे आणि आपली ओळख त्याला देता आली पाहिजे. मला वाटतं, या गोष्टी माझ्यात उपजतच होत्या. त्यामुळे माझ्या गाण्यातला सांगीतिक आशय मी समृद्ध करीत गेले. सुरेशबाबूंना कोणी भेटायला आलं की ते मला बडे गुलाम अली खाँची ‘काँ करू सजनी..’ ही ठुमरी गायला सांगत. किराणा घराण्यात सुरेशबाबूंसारखी ठुमरी कोणी गायली नाही. पण का कोणास ठाऊक. बाबूरावांनी मला मात्र कधी ठुमरी शिकवली नाही. आज ठुमरी गाणारे कलाकार खूप कमी आहेत. माझी ठुमरी नखरेल, रंगिली, रसिली असली तरी भारदस्त आहे. किराणा ठुमरीला तिनं एक नवीन परिमाण दिलंय.
ख़्याल म्हणा, ठुमरी म्हणा, ग़ज़्‍ाल, नाटय़गीत, भावगीत – प्रत्येक संगीत प्रकाराचं आपलं वैशिष्टय़ आहे. आवाजाची जात, स्वरोच्चार, शब्दोच्चार, स्वरवाक्यांची गुंफण, भावप्रदर्शन, गांभीर्य, नखरेलपणा अशा अनेक गोष्टींचा यात विचार असतो. बाबूरावांनी वर्षभर मला केवळ ‘यमन’ राग शिकवला, पण त्या यमनमधून या सर्व गोष्टींचं मला ज्ञान दिलं. माझ्या स्वतंत्र सांगीतिक व्यक्तिमत्त्वाचा तो पाया आहे. बाबूरावांच्या आकस्मिक निधनानंतर एकलव्याचं व्रत घेऊन चालताना ही सर्व शिदोरी माझ्याबरोबर होती. केंद्र शासनानं पहिल्यांदाच संगीतासाठी एक शिष्यवृत्ती सुरू केली होती. ती मला मिळाली आणि माझं संगीताचं शिक्षण किराणा घराण्यातच पुढे चालू राहणं अपेक्षित असल्यामुळे बाबूरावांची धाकटी बहीण प्रसिद्ध गायिका हिराबाई बडोदेकर यांच्याकडे माझं शिक्षण सुरू झालं. त्या वेळी हिराबाई सतत दौऱ्यावर असायच्या. त्या दोन वर्षांत त्यांच्या पाठीमागे तंबोऱ्यावर साथ करीत मफल कशी रंगवावी ही कला मी शिकले. तुमच्याकडे पुष्कळ ज्ञान असतं, पण तुम्ही मंचावर बसल्यानंतर ते कसं मांडता हेही महत्त्वाचं असतं. हिराबाईंनी माझ्या मफलीला वळण दिलं, आशीर्वाद दिला, त्यामुळे मी आज एक यशस्वी गायिका झाले आहे. अकस्मात एखादी गोष्ट समोर येणं हे माझ्या जीवनाचं वैशिष्टय़ आहे. त्यामुळे मला किती तरी गोष्टी शिकायला मिळाल्या, करायला मिळाल्या. संगीत नाटकांत काम करण्याचं असंच झालं. दिल्लीच्या नाटय़महोत्सवात ‘संगीत शारदा’ पाठवायचं ठरलं होतं. आयोजकांना लहान वयाची गाणारी मुलगी पाहिजे होती. माझं नावं पुढे आलं. मला अजिबात काम करायचं नव्हतं. पण, माझं कुणी ऐकेच ना. नाटकसृष्टीतले सगळे दिग्गज बरोबर होते – गणपतराव बोडस, चिंतूबुवा दिवेकर, भालचंद्र पेंढारकर इत्यादी. त्यानंतर चार र्वष कोणाकोणाच्या आग्रहास्तव संगीत-नाटकातून कामं करावी लागली – ‘विद्याहरण’, ‘मृच्छकटिक’, ‘संशयकल्लोळ’, मो. ग. रांगणेकरांचं ‘लिलाव’, विद्याधर गोखले यांचं ‘मंदारमाला’. अशी लोकप्रिय संगीत-नाटक आणि भालचंद्र पेंढारकर, छोटा गंधर्व, मास्टर दामले, राम मराठे, सांबप्रसाद सावकार, प्रभाकर पणशीकर इत्यादी असे नावाजलेले नट. त्याच सुमाराला पुणे, नागपूर आकाशवाणी केंद्रावरील श्रुतिकांमधून पु. ल. देशपांडे यांच्यासारख्या मान्यवरांबरोबरही कामं केली. आजही मी आवडीनं नाटक बघते, पण तिथं काम करण्याच्या दृष्टीतून माझं मन रमलं नाही.

एकदा वर्तमानपत्रात आकाशवाणीच्या नोकरीची जाहिरात पाहिली. सहज अर्ज केला, माझी निवड झाली. आकाशवाणीच्या नोकरीनं माझ्या आयुष्याला एका नवीन वळणावर आणून सोडलं. गाण्यातच करिअर करायचं हेही निश्चित झालं. नोकरी म्हणजे आíथक सुरक्षितता! आकाशवाणीतल्या नोकरीनं सांगीतिकदृष्टय़ा मला खूप श्रीमंत केलं. अनेक मोठमोठय़ा कलाकारांशी जवळून संबंध आला. त्यांचं गाणं, त्यांचे विचार तपासून पाहता आले. प्रत्येक गोष्टीकडे चिकित्सक दृष्टीनं पाहण्याची मला सवय आहे. त्यात विज्ञान आणि कायद्याची पदवीधर झाल्यावर तर परंपरेकडेही मी डोळसपणे पाहायला लागले. नागपूर आकाशवाणीत काम करत असताना अनेक कलाकारांचं रेकॉìडग करण्याची संधी मिळाली. तिथल्या लायब्ररीत असणाऱ्या टेप्स् ऐकायला मिळाल्या. अमिर खाँसाहेबांचा मारवा, दरबारी, ललत ऐकला आणि मी भारावून गेले. खाँसाहेबांची आवाज लावण्याची पद्धत, रागरूपाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, आलाप-तानेमधल्या स्वराकृती आणि मुख्य म्हणजे त्यांच्या गाण्यातला सरगमचा भाग – अप्रतिम पेशकारी! आलाप, तानेसारखीच सरगम एक अतिशय ताकदीची वैविध्यपूर्ण संगीतसामग्री आहे याची जाणीव झाली. या सरगमनं माझ्या गाण्यात कधी प्रवेश केला ते मला कळलंच नाही. अमूर्त संगीताला मूर्त करणारी, श्रोत्याला जवळ आणणारी ‘सरगम’ माझ्या अभ्यासाचा विषय झाली. माझ्या गाण्यात बदल झालाय अशी कुजबुज सुरू झाली. भीमसेनजींच्या मोठय़ा मुलाच्या मुंजीत त्यांनी माझं गाणं ठेवलं होतं. झाडून सगळे दर्दी गाणं ऐकायला आले होते. खूप वाहवा झाली. माझ्या गाण्यात झालेला बदल सगळ्यांनाच जाणवला होता हे खरं. कार्यक्रमानंतर प्रसिद्ध गायक वसंतराव देशपांडे यांची दोनदा-तीनदा भेट झाली. प्रत्येक वेळी त्यांनी आवर्जून माझं कौतुक केलं, ‘पोरी, तू छान गायलीस.’. काही समीक्षकांनी, कलाकारांनी मात्र माझ्या ‘सरगमला’ चांगलाच
विरोध केला. ‘हे काय नवीन ‘फॅड’? संगीत प्रस्तुतीमध्ये व्याकरण कशाला दाखवायचं? सरगम म्हणजे रागाचं स्केलेटन दाखवणं आहे,’ इत्यादी. हे विरोधक विचार न करता, केवळ आपलं महत्त्व राखण्याकरिता पुढच्या पिढीला चुकीचं मार्गदर्शन करताहेत, असं मला नेहमी वाटतं.
या विरोधामुळे माझा मात्र फायदा झाला. मी अधिक खोलात जाऊन ‘सरगम’चा अभ्यास केला. एवढंच नाही, तर शोधप्रबंध लिहिला आणि डॉक्टरेटची पदवीही मिळवली. सर्व भारतात या विषयावर माझं एकमेव शोधकार्य असावं.
सरगमच्या वळणावर मी माझ्या गाण्याला अधिक उंचीवर नेऊ शकले.
आकाशवाणीतल्या नोकरीचा आणखी एक फायदा झाला. माझ्यातल्या रचनाकाराशी माझी ओळख झाली. कामाचा भाग म्हणून कधी सांगीतिका, कधी श्रुतिका, कधी मासिक गीत अशा कार्यक्रमांना संगीत द्यावं लागतं. सुरेशबाबूंचं अकस्मात निधन झाल्यानंतर ‘गुरू’ म्हणून मी दुसऱ्या कोणाकडेही गेले नाही. त्यांची जागा दुसऱ्या कोणाला मी देऊ शकले नाही. ऐकून, अभ्यास करून मी बरेच राग गायला लागले होते. मला बंदिशींची गरज भासायला लागली. बंदिश ही कलाकाराच्या गानशैलीला, स्वभावाला जुळेल अशी हवी असं मला वाटतं. बंदिशीचे शब्द, तिची लय, तिच्या स्वरवाक्यांची वळणं, हे सर्व खूप महत्त्वाचं असतं. मारूबिहाग रागातली ‘जागू मैं सारी रैना..’ ही माझी पहिली बंदिश खूप लोकप्रिय झाली. आजही घराघरांत ही रेकॉर्ड वाजते आहे. अनेक संगीतप्रेमी या रेकॉर्डमुळे शास्त्रीय संगीताकडे वळले आहेत. माझा आत्मविश्वास वाढला. रचनेच्या वाटेवर गरज म्हणून उचललेलं पाऊल नंतर चालतच राहिलं.
ख्याल, तराणा, ठुमरी, दादरा, भक्तिगीत, गझल अशा संगीत प्रकारात जवळजवळ ५५० रचना केल्या आहेत. स्त्री रचनाकारांची संख्या तशी खूपच कमी आहे आणि ज्यांचं संगीत रचनांचं पुस्तक प्रसिद्ध झालंय अशा स्त्री रचनाकारांमध्ये माझं नाव कदाचित पहिलं असेल.
माझ्या रचनांच्या पुस्तकांचं बंदिशींच्या अर्थासहित इंग्रजी भाषांतरही लवकरच प्रसिद्ध होतंय. कालानुरूप संगीत बदलतंय. राग संकल्पना विकसित होते आहे. बंदिशींनीही बदलायला हवं असं मला वाटतं. माझ्या पुस्तकात बंदिशींवर लेखही आहेत. आकाशवाणीत असताना कर्नाटक संगीताची मला गोडी लागली. त्याचाच परिणाम म्हणजे माझ्या गाण्यालाही कर्नाटक संगीताच्या गमकांचा, सरगम पेशकारीचा स्पर्श झालाय. एवढंच नाही, तर माझ्या बंदिशींमध्येही कर्नाटक संगीताची झलक दिसते. अनेक विद्यार्थी, कलाकार माझ्या रचना गाताहेत. नृत्यासाठी, फ्यूजनसाठीही माझ्या रचनांचा उपयोग केला जातो आहे. हे सगळं पाहिलं की, मन सुखावतं. वाटतं- किती छान वळण आहे!
इतर देशांच्या तुलनेत भारतातले कलाकार आपल्या कलेबद्दल, संगीतनिर्मितीबद्दल फारसं बोलत नाहीत, लिहीत नाहीत. आपले विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी बोलणं, लिहिणं खूप आवश्यक आहे. संगीताची सूर-लयीची भाषा किती श्रोत्यांना कळते? श्रोत्यानं रसिक असण्याबरोबर जाणकारही असायला हवा तरच कलानिर्मितीचा स्तरही उंचावेल. तो अधिक जाणकारीनं आनंद घेऊ शकेल. अमूर्त संगीताला शब्दरूप देणं किती कठीण आहे, हे लिहिणाऱ्यालाच माहीत. एका वळणावर मी लेखणी हातात धरली. पुण्यात आमच्या घराजवळच ‘रुद्रवाणी’ मासिकाचं ऑफिस होतं. त्यांची एक मालिका सुरू होती. संपादक जीवन किर्लोस्करांनी आबांना विचारलं, ‘‘तुमची मुलगी लिहील का?’’ आबांच्या शब्दकोशात ‘नाही’ हा शब्दच नव्हता. ‘‘प्रयत्न करायच्या आधी ‘नाही’ म्हणायचं नाही,’’ असं ते सांगत आणि तसं वागतही. मी लेख लिहायला सुरुवात केली. आठवडय़ात कसा तरी लेख तयार केला. मनातून मात्र मी घाबरले होते. लोक काय म्हणतील? लेख प्रसिद्ध झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी प्रसिद्ध लेखिका, कवयित्री शिरीष पैंचा फोन आला- ‘‘प्रभा, छान लिहिलंयस ग.’’ त्यानंतर या ना त्यानिमित्तानं मी लिहीत राहिले. विशेषत: माझे सांगीतिक विचार, अनुभव रसिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मला हे गरजेचं वाटलं. आज संगीताचं जे प्रस्तुतीकरण होतंय, त्यासाठी शास्त्रामध्येही बदल झाला पाहिजे. कलाविष्कार आणि शास्त्र यांच्यात एकवाक्यता हवी, नाही तर संगीत शिक्षणच फोल होण्याची शक्यता आहे. परदेशात आपलं संगीत पोहोचवण्यासाठी याची फार आवश्यकता आहे.
मराठीतली दोन पुस्तकं ‘स्वरमयी’, ‘सुस्वराली’. ‘स्वरमयी’ला ‘महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार’ मिळालाय. इंग्रजीतली दोन पुस्तकं आणि ‘अंतस्वर’मध्ये मुक्त छंदाचं रूप घेऊन आलेले संगीत अनुभव. अशा तऱ्हेचं हे पहिलंच पुस्तक असावं.
आमच्या घरी शिक्षणाचं वातावरण असल्यामुळे लहानपणापासूनच मला शिक्षणाची आवड लागली. शिक्षणानं विचारांना चालना मिळते, विचारात स्पष्टता येते, हे मी अनुभवलंय. म्हणूनच एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठामध्ये संगीताच्या पदव्युत्तर अध्ययन आणि संशोधन विभागामध्ये, प्राध्यापक आणि विभाग प्रमुख म्हणून काम करण्याची जबाबदारी मी स्वीकारली. संगीताचा साकल्यानं विचार करण्यासाठी इतर विद्याशाखा आणि संगीत यांच्यातले अंत:संबंध तपासण्यासाठी ज्या तऱ्हेच्या सुविधा लागतात त्या तिथे होत्या. त्याशिवाय चर्चासत्र, कार्यशाळा, प्रात्यक्षिकासहित व्याख्यान, प्रशिक्षण शिबिर, शोधनिबंध लिहिणं अशा माध्यमातून संगीत कलाविष्कार आणि संगीत व्यवहार यांच्या बदलत्या स्वरूपाचा अभ्यासही करता येणार होता. या सर्व गोष्टींमुळे माझी संगीताची जाणकारी तर वाढलीच, पण माझ्या गाण्यातही त्याचं प्रतििबब दिसूं लागलं.
एस.एन.डी.टी.मध्ये जो अभ्यासक्रम शिकवला जात होता आणि त्यासाठी ज्या अध्यापन पद्धती वापरल्या जात होत्या, त्यात बदल करणं आवश्यक होतं. आजच्या विद्यार्थ्यांला केवळ स्वत:च्या संगीतशैलीचं ज्ञान, आकलन किंवा आस्वादन करता येणं एवढं पुरेसं नाही. त्याच्याबरोबरीनं इतर संस्कृतींमधून उदयाला आलेल्या संगीत पद्धती, तसंच त्या एकमेकांच्या जवळ आल्यामुळे संगीतात झालेले बदल, याबद्दलही माहिती असणं अत्यावश्यक आहे. याचा फायदा केवळ स्वत:चा वारसा नीट जपणं, त्याचं रक्षण करणं, त्याची वेगळी ओळख ठेवणं, एवढय़ासाठीच नव्हे, तर इतर देशांच्या संगीत प्रणालींच्या परिचयातून स्वत:चं संगीत बहुआयामी करण्यासाठीही होईल. या दृष्टिकोनातून मी तयार केलेला अभ्यासक्रम सर्वसमावेशक असा होता. त्यामध्ये भारतीय संगीतात येणारे लोकसंगीतापासून शास्त्रीय संगीतापर्यंतचे सर्व प्रकार, शिवाय पाश्चात्त्य संगीत, विश्व संगीतही होतं. तसंच संगीताशी संबंध असलेल्या इतर ज्ञानशाखांची तोंडओळख यांचाही समावेश होता. मला वाटतं विश्व संगीत/ एथ्नोम्युजिकोलॉजी या विषयाचा अभ्यास सुरू करणारं एस.एन.डी.टी. हे पहिलं विद्यापीठ असावं. हा अभ्यासक्रम बदलण्याच्या पाठीमागे आणखी एक हेतू होता – संगीत शिक्षण हे अर्थार्जनाचं साधन झालं पाहिजे, तरच अधिकाधिक लोक गांभीर्यानं संगीताचा विचार करतील.
कालानुसार आपण सर्व जण बदलत आहोत, तसा कलाविष्कारही बदलतो आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. कलेबरोबर तिच्या शास्त्रानंही बदलणं आवश्यक आहे. संगीत शास्त्रासंबंधित जे जुने ग्रंथ आहेत – भरत नाटय़शास्त्र म्हणा, संगीत रत्नाकार म्हणा- ते त्यांच्या काळी होत असलेल्या कलाविष्कारांसंबंधी, एकूण सांगीतिक घटनांविषयी, हालचालींविषयी आपल्याला माहिती देतात. ते आधारग्रंथ निश्चितच आहेत; पण संगीतामधल्या राग, ताल यांसारख्या संकल्पना काळाबरोबर अधिक परिपक्व, विकसित होत चालल्या आहेत. त्यांच्यात होत चाललेला बदल समजून घेऊन, आजच्या कलाविष्काराला सामावून घेणारं शास्त्र तयार होणं ही काळाची गरज आहे. मात्र हे करत असताना भारतीय संगीताच्या मूळ स्रोतापासून आपण दूर जाणार नाही, यांची कलाकारांनी, शास्त्रकारांनी आणि जाणकारांनी सर्वानी काळजी घेतली पाहिजे.
आजचा संगीत कलाविष्कार आणि संगीतशास्त्र यांना जवळ आणण्याचा मी सतत प्रयत्न करीत आले आहे. माझ्या लेखनातून, संगीत रचनांमधून, परिसंवादातून, प्रत्यक्ष सादरीकरणातून काही गोष्टींविषयी मी माझी भूमिका मांडत राहिले आहे, त्यांचं समर्थन करत आले आहे. संगीत प्रस्तुतीकरणात सरगम सामग्रीचा जाणिवेनं समावेश, विलंबित ख्यालात बंदिशीच्या केवळ स्थायीचा वापर, राग नियमांचे बदललेले संदर्भ, राग, रस, राग समय यांना विज्ञानाची कसोटी – यांसारख्या काही गोष्टी आज स्वत: सिद्ध झाल्या आहेत, याचा मला आनंद आहे. मात्र त्यासाठी कलाकार, शास्त्रकार आणि समीक्षक यांच्याकडून मला भरपूर त्रास सहन करावा लागला आहे, लागतोय. शास्त्राच्या चौकटीत राहून नावीन्य निर्माण करणं फार कठीण असतं. ही सारी वळणं खूप धाडसाची होती.
संगीत ही एक प्रयोगसिद्ध कला आहे. गरज आणि नावीन्य यांचा हात धरूनच कला पुढे जात असते. नित्य नवीन रूप धारण करणं हा तिचा स्वभाव आहे. व्यक्तिस्वातंत्र्याचं लोण आता संगीतातही शिरलंय. आमचे कलाकार आणि शास्त्रकार यांनी एकत्र येऊन, घराण्याचा वृथा अभिमान सोडून संगीत कलेच्या विकासाचा अधिक गांभीर्यानं, जबाबदारीनं विचार करणं आणि शास्त्रामध्ये एकवाक्यता आणण्यासाठी स्वच्छ मनानं चर्चा करणं अत्यंत आवश्यक आहे. कलाविष्कार आणि शास्त्र यांच्यात एकवाक्यता आणणं ही आजच्या काळाची गरज आहे.
आमच्या शिक्षणात श्रोत्यांचा विचारच झालेला नाही. शास्त्रीय संगीताचा आजचा आश्रयदाता सामान्य माणूस आहे, ज्याची अभिरुची चित्रपटासारख्या जनप्रिय संगीतानं घडते आहे. या श्रोत्याला शास्त्रीय संगीताची गोडी लावण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत. आपल्या शिक्षणात श्रोत्यांचाही समावेश केला पाहिजे. संगीतासंबंधित माझ्या काही योजना आहेत. त्या पूर्ण करण्यासाठी मी पुण्याला ‘स्वरमयी गुरुकुल’ सुरू केलंय. गुरुकुलामध्ये दर महिन्याला बठक होते. त्यात श्रोत्यांनी जाणीवपूर्वक सहभागी व्हावं, अशी इच्छा असते. जाणिवेनं संगीत ऐकण्याच्या प्रक्रियेतून, कलाकार आणि श्रोता यांच्या संवादातून, श्रोत्याची जाण वाढणार आहे. संगीत कलेच्या विकासाच्या मार्गावरचं हे पहिलं पाऊल आहे.
गायिका म्हणून जगण्यात मी पूर्ण समाधानी आहे. ही गायिकाच कधी रचनाकार होते, कधी लेखिका बनते, कधी शिक्षणतज्ज्ञ म्हणून काम करते, कधी गुरूची जबाबदारी उचलते आणि कधी कवयित्री म्हणून काव्याकडे वळते. हे सगळे माझ्या गाण्याचेच आविष्कार आहेत. हे सर्व करत असताना या आविष्कारांनी मला आणि माझ्या गाण्याला श्रीमंत केलंय. आज माझ्या कुटुंबातली, जवळची, रक्ताची माणसं उरली नाहीत. कुटुंबातले जीवघेणे प्रसंग- त्या वेदनांच्या खुणा माझ्या सुरांवर आहेत. त्यामुळे त्यांनी माझ्या सुरांनाही अधिक बोलकं केलंय. सुरांनी जोडलेली नाती मात्र सतत वाढत राहिली आहेत. १३ सप्टेंबरला ८४ व्या वर्षांत मी पाऊल टाकलं आहे. या टप्प्यावर मी एकटी नाही, माझं संगीत माझ्याबरोबर आहे, आपण सर्व जण बरोबर आहात, मला आणखी काय पाहिजे? व्यवसायाच्या दृष्टिकोनातून, लौकिक स्तरावर मिळालेले पुरस्कार निश्चित महत्त्वाचे आहेत; पण ते केवळ क्षणिक सुख देतात हे मी अनुभवलंय. कलाकाराचा खरा पुरस्कार आहे त्याचं साधनेमधलं यश आणि त्याचे श्रोते.
मी मागे वळून पाहते तेव्हा लक्षात येतं- या वळणवाटांनीच मला जगण्याचा तोल सांभाळायला शिकवलं. मी नियतीची आभारी आहे.

माझ्या कुटुंबातली, जवळची, रक्ताची माणसं उरली नाहीत. कुटुंबातले जीवघेणे प्रसंग- त्या वेदनांच्या खुणा माझ्या सुरांवर आहेत. त्यामुळे त्यांनी माझ्या सुरांनाही अधिक बोलकं केलंय. सुरांनी जोडलेली नाती मात्र सतत वाढत राहिली आहेत.
डॉ. प्रभा अत्रे -atreprabha@hotmail.com