पालखी आज पुण्याकडे

संतश्रेष्ठ संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे शनिवारी पिंपरी चिंचवडमध्ये दुपारी साडेचारच्या सुमारास आगमन झाले. पिंपरी चिंचवडकरांनी या पालखीचे मोठय़ा भक्तिभावाने स्वागत केले. पालखीचा मुक्काम आकुर्डी येथील विठ्ठल मंदिरात असून, रविवारी (१८ जून) सकाळी पालखी पुण्याकडे मार्गस्थ होणार आहे.

संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे शुक्रवारी देहूगावातून पंढरपूरकडे प्रस्थान झाले. पहिला मुक्काम इनामदार वाडय़ात झाल्यानंतर शनिवारी दुपारी दुसऱ्या मुक्कामासाठी पालखी पिंपरी चिंचवडकडे मार्गस्थ झाली. साडेचारच्या सुमारास पालखीचे शहराच्या प्रवेशद्वारात आगमन झाले. पिंपरी चिंचवडमधील नागरिकांनी मोठय़ा भक्तिभावाने पालखीचे स्वागत केले. शहरातील नागरिकांनी पालखीचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे निगडीच्या भक्ती शक्ती चौकात स्वागत कक्ष उभारण्यात आला होता. पालखी सोहळय़ामध्ये सामील झालेल्या प्रत्येक दिंडीप्रमुखांचे स्वागत या ठिकाणी करण्यात आले.

महापालिकेच्या वतीने या वर्षी भेट म्हणून दिंडीप्रमुखांना ताडपत्री देण्यात आली. महापौर नितीन काळजे, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समिती अध्यक्ष सीमा सावळे, सभागृह नेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते योगेश बहल, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर तसेच नगरसेवक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या वतीनेही स्वागत कक्ष उभारण्यात आला होता.

प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीशकुमार खडके यांच्यासह प्राधिकरणाचे अधिकारी या वेळी उपस्थित होते. महापालिकेचे स्वागत स्वीकारल्यानंतर पालखी आकुर्डीच्या दिशेने मार्गस्थ झाली. आकुर्डी गावातील विठ्ठल मंदिरात ग्रामस्थांनी पालखीचे स्वागत केले. आकुर्डी येथून पालखी रविवारी सकाळी पुण्याकडे मार्गस्थ होणार आहे.

Story img Loader