दसऱ्यादिवशी घरात लगबग असायची ती अवजारांच्या पुजेची. दसऱ्याच्या दिवशी या अवजारांना अडगळीच्या जागेतून देवघरात स्थान मिळायचं. त्यांची पूजा करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली जायची.
द सरा म्हणजे मांगल्याचा दिवस. या दिवशी विशेषकरून
यंत्रे-हत्यारांची पूजा केली जाते. अशीच पूजा शेतकरी कुटुंबे आपल्या घरात शेतीच्या अवजारांची करतात. वर्षभर शेती-मळ्यांसाठी राबणाऱ्या अवजारांना दसऱ्याच्या दिवशी घासूनपुसून स्वच्छ केले जाते. संध्याकाळी दिवेलागणीच्या वेळी रांगोळी काढून पाटावर अवजारे ठेवली जातात. त्यात वर्षभर मळ्यांचे पाट खणणारे कुदळ, पिकाव, पाटासाठी किंवा खडय़ासाठी खणलेली माती बाजूला सारण्यासाठी वापरण्यात येणारे फावडे, खोल खड्डा खणण्यासाठी उपयोग येणार पार किंवा पारई, मोठी सुकलेली झाडे तोडण्यासाठी व चुलीसाठी लाकडे फोडण्यासाठी लागणारी कुऱ्हाड, झाडांचे डुखण किंवा फांद्या छाटण्यासाठी वापरण्यात येणारा कोयता, आऊत, मोठी कैची, शेतीची पिके आणि गवत कापण्यासाठी उपयोगी खरळ किंवा विळा, तसेच नारळ सोलण्याचे यंत्र, घरातील चाकू/सुरी, काती, विळी, कैची अशा विविध अवजारांची या दिवशी पूजा केली जाते.
आमच्या उरण येथील नागाव (मांडळ आळी) या माझ्या माहेरच्या गावात लहानपणापासून ही अवजारे मी हाताळली आहेत. काही अवजारांच्या आठवणी अजूनही स्मृतीत आहेत. लहानपणी शेतात मजूर आणि घरच्यांसोबत शेती कापण्यासाठी लुडबुड करायला मला आवडायचे. दुसऱ्यापेक्षा आपण जास्त जलद गतीने शेतातील रोपे कापतोय हे दाखवण्यासाठी ३-४ वेळा हातावर खरळ येऊन दुखापत झालेली आहे आणि त्यापेक्षा त्यानंतरची नकोशी वाटणारी गोष्ट म्हणजे माझे वडील हे मला त्याच दिवशी धनुर्वाताचे इंजेक्शन द्यायला न्यायचे, पण अशा वेळी माझ्या हेळसांडपणाला दोष न देता हा खरळच बरोबर नाही, त्याची मूठच सैल होती, त्याचे दाते खूपच धारदार आहेत, त्याला बरोबर धारच नव्हती अशी कारणे सांगून बिचाऱ्या खरळाला मी दोषी ठरवायचे.
पारई तशी जडच असते. पण करांदे, तारले (ताडफळाचे रोपात रूपांतर झाल्यावर जे त्याला खाली मूळ येते ते जवळ जवळ दीड फूट खाली असते) काढण्याची हौस जास्त. करांदे निघायचे, पण तारला कधीच माझ्याने निघाला नव्हता. मोठी झाल्यावरही सुरणापर्यंत झेप गेली, पण तारला काढणे खूपच कष्टाचे वाटायचे. त्यातही एखादा पारईचा घाव करांद्यावर किंवा सुरणावर लागला की स्वत:च्या नेमबाजीचा राग न येता निर्जीव पारईचाच यायचा. कारण त्यामुळे पारई लागलेला तो भाग काळवंडून बिनउपयोगी व्हायचा. याच पारईचा उपयोग सुकलेल्या शेतीची ढेपळे काढण्यासाठी व्हायचा. पारईच्या साहाय्याने ढेपळे काढून भाज्या व अबोली, झेंडू, शेवंतीसारख्या फुलांचे वाफे हिरवे व रंगीत वाफे डोलायचे.
मोठी म्हणजे १६-१७ वर्षांची झाले तेव्हा स्वकष्टाने झेंडूचा वाफा फुलवायची हवा डोक्यात गेली. एक दिवस घराजवळचीच मोकळी जागा निवडून तिथे कुदळ आणि फावडय़ाच्या साहाय्याने आळ्या केल्या. पाटाचा मार्ग त्या आळ्यांपर्यंत जुळवला. झेंडूची रोपे लावली आणि काही दिवसांतच गेंदेदार झेंडूची बाग तिथे तयार झाली. ही बाग फुलल्यावर मी मनोमन सुखावले. माझ्यावरच मी खूश झाले. घरातल्या सगळ्याच अवजारांना मी ती कशी चालतात हे कुतूहल म्हणून हाताळायचे. बऱ्याचदा कुऱ्हाड, फावडे, पारई; पण नेम चुकल्याने पायावर लागलेली आहे.
पण घरी आई-आजी दर दसऱ्याला या अवजारांना स्वच्छ धुऊनपुसून देवांच्या खोलीत रांगोळी काढून पाटावर ठेवायच्या. सगळ्या अवजारांना हळद कुंकू, फुले, अक्षता वाहायच्या. समोर दिवा लावायच्या. दसऱ्याला लुटले जाणारे सोने म्हणजे आपटय़ाची फांदीही यांच्याबरोबर विराजमान असायची. दसऱ्याच्या दिवशी या अवजारांना अडगळीच्या जागेतून देवघरात स्थान मिळायचं. लहान असताना मी घरातल्या मोठय़ांना विचारायचे यांची आपण का पूजा करतो? तेव्हा उत्तर मिळायचे- ‘वर्षभर ते आपल्यासाठी राबतात. हा एक दिवस त्यांच्या मानाचा असतो. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा.’
लग्न झाले आणि उरण येथील कुंभारवाडय़ात आले. घराच्या आसपास शेती वा वाडी नसल्याने घरात अवजारे तुरळकच होती. पण सासऱ्यांनी राहत्या घरापासून काही अंतरावर वाडी घेतली होती. त्यात एक शेतही होते. तिथे सगळी अवजारे वस्तीला असायची. तिथे नवीन घराचे काम चालू होते. माझ्या नोकरीमुळे माझे तिथे जास्त जाणे होत नसे.
लग्नानंतरचा दसरा आला. माझ्या सासरच्या घरात सगळेच सण दिमाखात साजरे होतात. दसराही थाटामाटात साजरा झाला. सोने लुटण्याचा कार्यक्रमही उत्साहात  पार पडला. पण दरवर्षी दसऱ्याला सजलेली हत्यारे माझ्या नजरेसमोर न आल्याने मन खिन्न झाले होते. त्या अवजारांची मला माहेरच्या माणसांप्रमाणे आठवण आली.
दुसऱ्याच वर्षी नवीन घराचे काम होऊन आम्ही वाडीतल्या नवीन घरात राहायला गेलो. तिथे माझी भेट एका पडवीतील अवजारांशी झाली आणि आमची पुन्हा गट्टी जमली. नवीन जागेतील नवीन अवजारे मला पाने-फुले फुलवण्यात मदत करू लागली. नवीन घरातला दसऱ्याचा दिवस आला आणि त्या संध्याकाळी माझ्या मनात अवजारांची पूजा करायची कल्पना आली. मग नवऱ्याच्या मदतीने सगळी अवजारे स्वच्छ धुवूनपुसून देवखोलीत पाटाखाली रांगोळी काढून पाटावर विराजमान केली. माझे दीर-जाऊ, सासू-सासरे सगळेच कौतुकाने चालला प्रकार पाहत होते. सासऱ्यांनी त्या दिवशी ‘खरी शेतकरीण आहेस’ म्हणून कौतुक केले ते माझ्यासाठी अविस्मरणीय आहे.

Story img Loader