‘‘आई, हे कसलं घर घेतलंस? मला नाही आवडलं. ते गावाला सुनिधीचं घर आहे ना, तसलं घर हवं.’’ मी विचार केला की, त्या गावातल्या घराइतकंच माझंही घर मोठं आहेच, मग ते मुलीला का नाही आवडलं? नीट विचार केल्यावर लक्षात आलं की, गावाकडच्या घराला अंगण आहे, माझ्या घराला अंगण नाही.
मला माझं बालपण आठवलं. माझे वडील फॉरेस्ट खात्यात असल्यामुळे दर तीन-चार वर्षांनी त्यांची बदली रायगड जिल्ह्य़ात व्हायची. आम्ही दुसऱ्या गावात राहायला जायचो. नवीन घर शोधायचं. घरात आम्ही तीन बहिणी, आई, वडील, आजी, मावशी म्हणून वडील जुनं असलं तरी चालेल, पण मोठ्ठं घर भाडय़ानी घ्यायचे. कोकणातील त्या काळची जुनी घरं नळीच्या कौलांची, ओटी, पडवी, मागची पडवी अगदी ऐसपैस असायची. त्या घरात आम्ही आमच्या मैत्रिणी ओटीवर खेळ मांडायचो. भातुकली, पत्ते, काचापाणी खेळायचो; लपाछपी, डब्बाऐसपैस खेळायचो. गावभर गाडी चालवायचो. काठीपाणी हा तर मजेशीर खेळ आम्हाला फार आवडायचा. सायकल शिकण्यासाठी भाडय़ानी सायकल घ्यायचो. आज प्रत्येकाकडे स्वत:ची सायकल असते म्हणून भाडय़ानी सायकल देणारी दुकानंच बंद झाली आहेत.
आज माझ्या बालपणाइतकं तिचं बालपण सुरक्षित नाही. रोज कानावर येणाऱ्या बातम्या, त्यामुळे मुलीला आपण एकटं घराबाहेर खेळायला तयार होत नाही. मग जर बाहेर खेळायला सोडायचं नाही, तर घरात बसून एकटीच खेळणार. पार्टनर नाही म्हणून मग मुले कॉम्प्युटर, मोबाइलच्या आहारी जातात. मुलांना खाली खेळायला थोडा वेळ पाठवलं तर बिचारी पार्किंगच्या जागेत वेळ लावून खेळतात, कारण सगळ्यांना आवाजाचा त्रास होतो. आज कारण काहीही असो, एकुलती एक असो, मुलांची सुरक्षितता असो वा अभ्यासाचा ताण असो, मुलांचं अंगण मात्र हरवलंय. भाडय़ाच्या घरात राहून आम्ही जी मजा केली ती मुलं स्वत:च्याही घरात घेऊ शकत नाहीत. आम्ही बालपणाचा जो आनंद लुटला, तो आजकालची मुलं लुटू शकत नाहीत. असो. कालाय तस्मै नम:!
या सगळ्यावर काही तरी उपाय शोधायचा ठरवलं आणि मुलीला बाल्कनी खेळायला दिली. त्यात तिने माती कालवली, रंगांनी भिंतीवर नावं लिहिली, बरणीत पाणी भरून त्यात तेलखडूचे रंग शार्प करून टाकले आणि मला म्हणाली, ‘‘आई, हा बघ माझा फिशटँक.’’ थर्माकोलचे किल्ले. मग मी तिला म्हटलं, ‘‘अगं, चिऊताईला छोटय़ा वाटीत दाणा आणि पाणी ठेव. बघ, ती दाणा खाईल, पाणी पिईल आणि भुर्रकन उडून जाईल.’’ आकाशातलं इंद्रधनुष्य, ताऱ्यांचं अंगण, ध्रुवतारा सगळं सगळं कसं बाल्कनीतूनही बघता येतं, अनुभवता येतं. अजून चार-पाच र्वष तिचं बालपण संपेपर्यंत ती बाल्कनी अस्वच्छ दिसली तरी चालेल, पण घरात गोकुळ नांदत असल्याचं ते द्योतक आहे. माझ्या मुलीचं हरवलेलं अंगण मी तिला परत मिळवून देण्याचा तो प्रयत्न असेल.
मेघा प्याटी
संग्रहित लेख, दिनांक 19th Sep 2015 रोजी प्रकाशित
अंगण
‘‘आई, हे कसलं घर घेतलंस? मला नाही आवडलं. ते गावाला सुनिधीचं घर आहे ना, तसलं घर हवं.’’
Written by दीपक मराठे

First published on: 19-09-2015 at 02:52 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: House yard