‘‘मंजिरी, अगं निखिल किरकिरतोय का गं, जरा खळ्यात घेऊन बस त्याला म्हणजे शांत होईल.’’
‘‘आता माजघरात आम्ही जेवायची पानं मांडतोय तेव्हा सगळ्या मुलांनी खळ्यात जाऊन बसा.’’
‘‘पोळ्या करताना गॅसजवळ उभं राहून चिवचिवलंय अगदी, मी आता दहा मिनिटं खळ्यात जाऊन स्वस्थ बसतेय.’’
‘‘खळ्यात महादेश्वराच्या जीर्णोद्धारासाठी पंचायतीचे सभासद आलेत त्यांच्यासाठी अमृत कोकम पाठवा.’’
असं आमचं खळं (कोकणात अंगणाला खळं हा शब्द प्रचलित आहे.) घराचाच एक भाग असलेलं, घरापेक्षाही अधिक वापरात असलेलं, सगळ्यांचंच लाडकं.. आमचं खळं!
कोकणातली घरं देशावरच्या घरांसारखी बंदिस्त नसतात. परकीय आक्रमणाचा धोका नसल्याने तशी आवश्यकता नसेल वाटत. कोकणी माणसांची घरं ही त्यांच्यासारखीच मोकळी-ढाकळी. दिंडी दरवाजा, चौसोपी वाडे वैगेरे कोकणात फारसे आढळत नाहीत. घराला फाटकही नसतं बहुतेक ठिकाणी. गुरं वगैरे आत शिरू नयेत म्हणून एक घालता काढता येणारी काठी (आखाडा) अडकवून ठेवलेली असते साधारण दोन फुटांवर फाटक म्हणून.
आमचं कोकणातलं घर डोंगर उतारावर आहे. ही जमीन माझ्या आजे सासऱ्यांना १८८२ साली इनाम म्हणून मिळाली आहे (आमच्या कुलवृत्तांतात तसा उल्लेख आहे.) उतारावरची जमीन असल्याने घर बांधण्यासाठी लेवलिंग करणं गरजेच होतं. माझ्या आजे सासऱ्यांनी स्वत:च्या हाताने डोंगर फोडून घर बांधण्यापुरती सपाटी केली. आम्ही आत्ता राहतोय ते घरही त्यांनीच बांधलेलं आहे आणि अजूनही मूळ ढाचा तोच आहे. पूर्वी भिंती मातीच्या होत्या आता सिमेंटच्या.. असे किरकोळ बदलच फक्त केले गेले आहेत. वाढत्या कुटुंबासाठी म्हणून त्यानी खूप मोठं खळं राखलं आहे.
पावसाळ्याचे चार महिने खळ्याचा म्हणावा तसा उपयोग होत नाही, कारण कोकणात पाऊस खूप असतो. पूर्वी जेव्हा मातीची जमीन होती, तेव्हा तर पावसाळ्यात जराही जाता येत नसे खळ्यात. पाऊस संपला की दरवर्षी चोपण्याने चोपून, शेणाने सारवून खळं करावं लागे. पण घरातल्या बायकांना पाऊस थांबला की जरा मोकळ्यावर येऊन बसता यावं म्हणून आता फरशी बसवून घेतली आहे खळ्याला. त्यामुळे पाऊस थांबला की पाच मिनिटांत खळं कोरडं होतं. श्रावणात नुकतीच पावसाची सर येऊन गेल्यावर संध्याकाळच्या पिवळ्या उन्हात खळ्यात बसणं म्हणजे स्वर्गसुखचं!
पावसाळा संपला की खळ्याची डागडुजी केली जाते. दोन फरशांच्या भेगांमध्ये सीमेंट भरलं जातं. कारण कापलेलं भात खळ्यातच आणून रचायचं असतं. नवरात्रात मुलींचा भोंडला याच खळ्यात रंगतो आणि नंतरची दिवाळीही. दिवाळीत रांगोळ्या आणि आकाशकंदील तर असतोच, पण फोटोत वर जो काट्टा दिसत आहे त्यावर सगळीकडे ठरावीक अंतरावर पणत्या ठेवतो आम्ही. आजूबाजूच्या असलेल्या अंधारामुळे, एका ओळीत लावल्यामुळे, दीपावली हे नाव सार्थ करणाऱ्यांना आणि शांतपणे तेवणाऱ्या त्या पणत्या मनालाही तेवढीच शांतता देतात. दिवाळी झाली की अध्र्या खळ्याला मांडव घातला जातो. वाऱ्याने पडलेल्या पोफळ्यांचे होतात खांब (सुपारीची झाडं) आणि नारळाच्या झावळ्यांचं छत. एकदा का मांडव घालून झाला की मग खळं बैठकीच्या खोलीची भूमिका बजावतं. येणारा जाणारा पै पाव्हणा मग खळ्यातच टेकतो.
मुख्य खळ्याचाच भाग असलेलं पण दोन पायऱ्या उंचावर असलेलं हे आहे तुळशीचं खळं. तुळशी वृंदावन आहे इथे म्हणून याला तुळशीचं खळं असं नाव आहे. दरवर्षी याच तुळशीचं लग्न श्रीकृष्णाबरोबर अगदी थाटामाटात हौसेने, वाजंत्र्यांच्या गजरात याच खळ्यात संपन्न होतं.
भात झोडणी करणं, सुपाऱ्या, कोकम, आंबोशी वाळत घालणं, आंब्या फणसाची साटं वाळत घालणं, यासाठी खळं सदैव तयार असतं वाल, नागकेशर, मिरच्या, कुळीथ आणि इतर अनेक उन्हाळी वाळवणं दरवर्षी नेमानं अंगावर मिरवतं खळं. पण एकदा का वाळवणं पडली की मुलांना सायकल, क्रिकेट. बॅडमिंटन असे खेळ संध्याकाळपर्यंत खळ्यात खेळता येत नाहीत म्हणून ती नाराज असतात आमच्या वाळवणांवर.
मे महिन्यात कितीही पाहुणे आले तरी खळ्यामुळे जागा कधीही कमी पडत नाही झोपायला. खूप जास्त पाहुणे असतील तर मजाच असते. कारण काही गाद्या मग मांडवाबाहेरही घालाव्या लागतात. नीरव शांततेत उघडय़ा आकाशाखाली, चांदण्या मोजत, चंद्रप्रकाश अंगावर घेत, आपल्याशीच आपला संवाद साधत साधत झोप केव्हा लागते ते कळतही नाही. पण अलीकडे काही र्वष आम्ही या सुखाला पारखे झालो आहोत. त्याचं असं झालं की, काही वर्षांपूर्वी अंगणात झोपलेल्या आमच्या जॉनीला अगदी जराही ओरडण्याची संधीही न देता एका बिबटय़ाने उचलून नेलं तेव्हापासून खळ्यात झोपायचं डेरिंग नाही होतं कुणाचं.
घरातल्या सगळ्या मुलांच्या मुंजी आणि गोंधळ वगैरे सारखी शुभकार्ये गेल्या पाच-सहा पिढय़ांपासून याच खळ्यात संपन्न होत आहेत. कार्य असेल तेव्हा पूर्ण खळ्याला मांडव घातला जातो. छताला सगळीकडे आंब्याचे टाळे लावून सुशोभित केलं जातं. चारी बाजूंनी रांगोळ्या घातल्या जातात, आजूबाजूच्या झाडांवर शोभेचे विजेचे लुकलुकणारे दिवे सोडले जातात. शहरातल्या एखाद्या परिपूर्ण हॉलपेक्षाही आमचा हा मुंजीचा हॉल अनेक पटींनी अधिक सुंदर दिसतो. हे अंगणही मग त्या कार्याच्या दिवसात खूप आनंदी असतं आणि बटूला मनापासून आशीर्वाद देतं.
माझ्या एक चुलत सासुबाई नेहमी अभिमानाने सांगत की, आमच्या घरातल्या बायकांना कधीही खळं झाडावं लागलं नाही. आमच्याकडे कायम खळं झाडायला गडी असतो. पण मी घरी गेले की संध्याकाळी खळं झाडण्याचं काम घेते अंगावर. एवढं मोठं खळं झाडताना कमरेचा काटा होतो ढिला, पण अंगण स्वत: झाडणं आणि नंतर त्या स्वच्छ झाडलेल्या खळ्याकडे कौतुकाने पाहणं हा माझ्या आनंदाचा भाग आहे.
गुढी पाडव्याच्या दिवशी अंगणात उंच उभारलेली, आजूबाजूच्या हिरवाईत उठून दिसणारी गुढी पाहताना ही जणू काय या वैभवशाली अंगणाचीच गुढी आहे या विचाराने उर अभिमानाने आणि मायेने भरून येतो..
velankarhema@gmail.com