ज्येष्ठ समीक्षक माधव मनोहर यांचा २० मार्च हा जन्मदिवस. त्यानिमित्ताने त्यांच्या शिवाजी पार्क येथील वैशिष्टय़पूर्ण घराच्या आठवणींना उजाळा दिला आहे त्यांचे नातू व चित्रपट समीक्षक गणेश मतकरी यांनी..
पपांच्या, म्हणजे माधव मनोहरांच्या- माझ्या आजोबांच्या बहतेक आठवणींशी त्यांचं शिवाजी पार्कजवळ असलेलं घर माझ्याशी जवळून जोडलं गेलं आहे. या घराचं नाव घेतलं की डोळ्यासमोर येतात ती पुस्तकं. पुस्तकांना सन्मान आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे जागा दऊन त्यांच्याभोवती रचलेलं असं हे घर.
ते घर तसा चमत्कारिक आराखडा असलेलं हो??. तांत्रिकदृष्टय़ा ती होती चाळच, पण त्यांच्या घराचा आकार बऱ्यापकी मोठा होता. जवळपास दोन बेडरूमच्या फ्लॅटसारखा. मला वाटतं ती इमारत पूर्वी हॉस्पिटल म्हणून डिझाइन केलेली होती आणि नंतर त्यात जमतील तशी घरं बसवलेली होती, त्यामुळे बहुतेक सर्वच घरांचे आकार आणि खोल्यांची संख्या यांमधे खूपच फरक होता. हे घर ऐसपस होतं आणि इटिरिअर डिझाइन करताना त्याचा विचार खूपच नव्या पद्धतीने केला होता. मला वाटतं, पपाच्या मित्रपरिवारामधले आíकटेक्ट शशी मेहतांच्या फर्मने हे काम केलं होतं. त्या काळात विचार करून डिझाइन केलेली घरं मध्यमवर्गात क्वचित पाहायला मिळत, पण पपांचं घर अशा अपवादांपकी होतं.
या घराला दोन ठिकाणाहून प्रवेश होता. एक व्हरांडय़ासारख्या जागेतून, अन् दुसरा स्वयंपाकघरातनं. व्हरांडय़ात एक मोठं थोडी रद्दी, थोडी जुनी मासिकं ठेवायचं कपाट होतं. त्याला समोरून एक पडदा होता. या व्हरांडय़ात येताच क्षणी समोरच दिसायची ती समोर दिवानखाण्यात असणारी पुस्तकांची िभत. खालच्या आणि वरच्या भागात बंद (पण पुस्तकांचीच) कपाटं आणि मधल्या मोठय़ा भागात काचेची दारं असणारं हेपुस्तकांचं कपाट जमिनीपासून छतापर्यंत गेलेलं होतं. हे दिसलं की आपण घरी आल्यासारखं वाटायचं.
व्हरांडय़ाला लागून एक लांबट खोली होती. मी असं ऐकलंय की, हा भाग अगदी पूर्वी उघडा असायचा. माझ्या आठवणीत तो लाकडी पट्टय़ांच्या जाळीदार दारांनी बद केलेला आहे. मी अगदी लहान असताना, पपा ही खोली स्टडी रूमसारखी वापरायचे. त्यांची भलीमोठी खुर्ची इथे असायची आणि जेव्हा घरी असायचे तेव्हा बराच काळ ते त्यावर बसलेले असायचे. त्यांच्या लेखनिकांना मजकूर सागताना, किंवा रात्री टेबल लँपच्या पकाशात उशिरापर्यंत वाचत बसलेले, असे ते मला बऱ्यापकी आठवतात. या खोलीत आम्हाला, म्हणजे मी, माझी बहीण सपिया, कधी शेजारपाजारची मुलं, मामे-मावस भावंडं यांना पपांच्या कामाच्या वेळातही मुक्त प्रवेश असायचा; फक्त त्यांची शांतता भंग न करण्याच्या अलिखित अटीवर. ते सोडून व्हर्चुअली काहीही करायला, खेळायला वगरे परवानगी असायची. ते कामात असले की आजूबाजूच्या जगापासून इतके वेगळे असायचे, की त्यांना बाजूला काय चाललंय याने काहीच फरक पडत नसे.


पुढे माझ्या मामाचं लग्न झाल्यावर ही खोली त्याच्याकडे गेली आणि आम्हाला काही बंधनं आली. मग पपांचा स्टडी एरियाही आतल्या बेडरूमलाच जोडला गेला. तिथे आम्हाला तसाही आधीपासूनच मुक्त प्रवेश होता. सामान्यत: छोटय़ा घरांमध्येही बेडरूम ही खाजगी जागा म्हणून सर्वमान्य असते, आणि ती वेळप्रसंगी बंद करण्याची सोय असते. शिवाजी पार्कच्या घरात अगदी बाहेरचे पाहुणे सोडले, तर इतरांसाठी दिवाणखाणा आणि बेडरूम ही मिळून एक बैठकीची खोली असल्यासारखी होती. एकतर तिथे म्हणावा तसा एकांत नव्हताच. दोन-तीन गोष्टी या त्या दोन खोल्यांचा एकोपा अधोरेखित करणाऱ्या होत्या.
बेडरूमला दार नव्हतं, पडदा होता- जो बहुधा उघडा असायचा. त्याशिवाय दिवाणखान्यामधली पुस्तकांची िभत ही तशीच सरळ रेषेत बेडरूममध्ये शिरून तिथल्याही एका िभतीचा ताबा घेत असे. त्यामुळे वावरणाऱ्याला सरळच या दोन्ही खोल्या एकाच जातीच्या असल्याचं जाणवायचं. प्रत्यक्षात दिवाणखाना दुपारीही काहीसा अंधारलेला असायचा, कारण या खोलीला थेट खिडकी नव्हती. व्हरांडय़ाच्या खिडकीतून येणारा प्रकाशच इथपर्यंत यायचा. शिवाय पुस्तकांचं कपाटही फार प्रकाश परावर्तित
करीत नसे. त्यामुळे खोली दिवसाही थोडी रहस्यमय वाटायची.
या दोन खोल्यांमधली सामायिक िभत- या िभतीतले कपाटही वर छपरापर्यंत जातच नसे. त्याच्या दीड दोन फूट खालीच ती संपायची. दिवाणखान्यात बसलं की या िभतीवरूनही बेडरूमचं छत दिसायचं, इकडला आवाज तिकडे ऐकू यायचा. त्या काळात आíकटेक्चर/ इंटिरिअर डिझाइनमध्ये खाजगीपण जपण्यापेक्षा मोकळ्या जागेला प्राधान्य असायचं. त्याचाच हा नमुना होता.
आम्हाला या घरात काही करायला, कुठेही फिरायला आडकाठी नव्हती. याचा अर्थ आम्हाला कोणाचा धाक नव्हता, असा मात्र अजिबातच नाही. तो पपा आणि ताई (माझी आजी मालती मनोहर) दोघांचाही होता. पण वेगवेगळ्या बाबतीत. ताईचा धाक हा अधिक प्रॅक्टिकल, रोजच्या गोष्टींबाबत होता. म्हणजे अभ्यास वेळच्या वेळी होतोय ना, हस्ताक्षर नीट आहे ना, (ती शिशुविहारमध्ये उपमुख्याध्यापिका असल्याने ते अपेक्षितच होतं. या दोन्ही बाबतीत ती माझ्याबद्दल थोडी नाखुश असणार याबद्दल माझ्या मनात शंका नाही.) वगरे.. मला इंग्लिश आणि संस्कृत शिकवण्याचे तिचे प्रयत्नही मी फार यशस्वी होऊ दिले नव्हते. इंग्लिश मी पुढे वाचवाचून आणि सिनेमे पाहून सुधारलं, संस्कृतची बोंब राहिली, ती कायमचीच.
पपांचा धाक हा थोडा वेगळ्या प्रकारचा होता. त्यांनी कधी कोणावर आवाज चढवल्याचं मी पाहिलं नाही. मी, सुप्रिया, सुप्रियाच्याच वयाची शिवाजी पार्कला येणं-जाणं असणारी श्रुती मुजुमदार, सगळ्यांबरोबर ते सारखेच वागायचे. पोरांना काय कळतं, म्हणून त्यांनी कोणाकडे दुर्लक्ष केल्याचं मला आठवत नाही. क्वचित वैतागले (मी एकदा अकरावी- बारावीत असताना आदल्या दिवशी टीव्हीवर झालेलं िहदी नाटक कसं अवध्यवरून उचललंय असा वाद घातल्याचं आठवतं, तेव्हा ते नक्की वैतागले असावेत) तरी ते त्यांचा आवाज चढू देत नसत. तरीही त्यांच्या ‘असण्या’चा दबदबा असे.
सर्वानी चांगलं वाचलं, पाहिलं पाहिजे, यावर पपांचा कटाक्ष होता. यासाठी खास मुलांची पुस्तकंही ते बऱ्याचदा आणत. माझ्यासाठी अगदी लहान असताना आणलेल्या जादूबिदू असलेल्या गोष्टींच्या पुस्तकांपासून पुढे अनेक वर्षांनंतर आणलेल्या मॅड मॅगेझिन्सपर्यंत विविध प्रकारची पुस्तकं आणल्याचं आठवतं. आमच्यातल्या काही जणांना त्यांचा पुरेसा विश्वास संपादन केल्यावर, त्यांच्या कलेक्शनमधली पुस्तकं न्यायला परवानगी मिळालेली होती. मी मराठी पुस्तकं तर नेहमीच न्यायचो, अर्थात त्यांना सांगून.
पण इंग्लिशची काही तेव्हा ग्रिप आलेली नव्हती. मग बऱ्याच वेळा त्यांनाच काय नेऊ हे विचारायचो. ते सुचवायचे. कधी पुस्तकं काढून द्यायचे. कधी कपाटातला विशिष्ट भाग सांगून त्या भागात शोध, अशी सूचना करायचे. दिवाणखाना आणि बेडरूम व्यापून राहिलेल्या त्या कपाटांमधून तासन्तास पुस्तकं चाळणं, शोधणं हा एक आनंद होता, जो मला अनेक र्वष उपभोगता आला.
पपा फार उत्तम शिकवतात हे ऐकून होतो, पण मला त्यांनी प्रत्यक्ष शिकवलं नाही. बहुतेक सुप्रियाला त्यांनी एका विषयात मार्गदर्शन केल्याचं आठवतं, पण खात्री नाही. आíकटेक्चरला गेल्यानंतर तर माझ्या त्या घरातल्या फेऱ्या तशाही कमी झाल्या. तरीही कधी गेलं आणि हातात चांगलं पुस्तक असलं तर त्यांना बरं वाटतं हे जाणवायचं. मी लिहायला सुरुवात केली ती खूपच उशिरा, वयाच्या २६/२७ व्या वर्षी. तेव्हा ते नव्हते, त्यामुळे समीक्षकीय लिखाणाबद्दल काही थेट मार्गदर्शन त्यांच्याकडून मिळालं नाही ही माझी
जुनीच खंत आहे. तरीही त्यांचा काही अप्रत्यक्ष प्रभाव असणारच, असं मात्र मी धरून चालतो. पपा गेल्यावरही काही दिवस दोन खोल्या व्यापून राहिलेली पुस्तकांची कपाटं, ते असल्याची जाणीव करून द्यायची. पुस्तकं धुंडाळताना त्यांचं अस्तित्व जाणवायचं. पूर्वीही ते घरात असताना बऱ्याचदा आपल्या कामात, शांतपणे वाचत असत. या दिवसातही असंच वाटायचं, की ते पलीकडच्या खोलीत आहेत. थोडय़ा वेळाने येतील आणि कोणती पुस्तकं नेतोयस ते विचारतील किंवा वाचनाबद्दल काही सूचना करतील.
पपा गेल्यावर कालांतराने या घराचा पुस्तकांशी असलेला संबंध संपला. ती घराला ‘डॉमिनेट’ करणारी पुस्तकांची कपाटं जाऊन स्वच्छ रंगवलेल्या भिंती आल्या. व्यक्तिमत्त्व नसलेल्या, पण चकचकीत. धुळीपासून मुक्त.. खोली थोडी अधिक उजळ करणाऱ्या.. कार्पेट एरियामधली १५-२० स्क्वेअर फूट जागा वाचली. मुंबईतली महागडी जागा वाचली हेही तसं चागलंच म्हणायला हवं, नाही?
माझा त्या घराशी संबंधही त्याच सुमारास कधीतरी संपला. अर्थात त्याने फार फरक पडला नाही. ती कपाटं गेली तेव्हाच माझ्या आजीआजोबांचं घर दुरावल्यात जमा होतं. नाटकात जशी लक्षवेधी भूमिका करणारा नट आपला वेष उतरवल्यावर चारचौघातलाच एक होऊन जातो, तसंच काहीसं त्या घराचं झालं. निदान माझ्या लेखी. ते अगदी सामान्य होऊन गेलं. केवळ कपाटंच गेली नाहीत, तर इतरही बदल झाले. किंबहुना इतर बदल आधीपासून व्हायला लागले होते. ती कपाटं हा अखेरचा, सर्वात मोठा धक्का होता. ती
गेली आणि ते घर, ते घर राहिलं नाही. आज ताईपपांचं घर म्हटलं की मला अखेरचं पाहिलेलं, ते सामान्य घर आठवत नाही, मला आठवतं ते जुनं घर. आम्हाला आमचं वाटणारं. पुस्तकांनी भरलेलं. थोडं अंधारलेलं, थोडं गूढ वाटणारं, पण आमचं.