टीव्हीवर एका प्लायवुड कंपनीची जाहिरात येते. त्या विशिष्ट प्लायवुडपासून तयार झालेले टेबल सोफा यांना ‘रंगमंच’ असे संबोधले आहे. कारण या वस्तू नुसत्या घरातील निर्जीव वस्तू न राहता त्या घरातील जीवनाचे एक अविभाज्य अंग बनते आणि त्या निर्जीवातही सजीवपण देते. ही गोष्ट अगदी खरी आहे. नुकत्याच एका सेमिनारला उपस्थित राहण्याचा योग आला. विषय होता ‘स्वस्थ जीवनशैली-कला आणि संगीत’ यात संगीत निर्जीव वस्तूमध्ये चैतन्य आणतो हे सप्रमाण बघता आले. एका लाकडी टेबलवर मीठ पसरण्यात आले आणि या टेबलला संगीताच्या वेगवेगळ्या स्वरनिर्मिती करणाऱ्या अनुनाद वारंवारितेला जोडले. जसजशी वारंवारिता वाढत गेली तसतसे त्यावर पसरलेल्या मिठाने वेगवेगळे आकार घेण्यास सुरुवात केली. याचाच अर्थ निर्जीव मिठामध्ये संगीत चेतना भरते. अशीच एक घरातील निर्जीव गोष्ट म्हणजे घर साकारणारी भिंत! आम्ही नवीन घराच्या शोधात होतो. एक घर बघायला आत शिरलो. संपूर्ण घर छान फिक्या क्रीम रंगाने रंगवले होते त्यामुळे प्रसन्न वाटत होते. मात्र एका खोलीतील एकच भिंत फक्त राखाडी रंगाची होती. मी सहज विचारले अरेच्चा ही भिंत कशी काय राहिली रंगवायची! मालकाने माझ्याकडे राग, तुच्छता अशा संमिश्र भावनेने बघितले आणि म्हटले ही भिंत आम्ही विशेष टाइल्सने सजवली आहे, यावर आम्ही खूप खर्च केलाय त्यामुळे तुम्ही यावर कोणतीही ठोकाठोकी करायची नाही, खिळा ठोकायचा नाही, काहीही चिकटवायचे नाही. ती राखाडी रंगाची मंद भिंत इतकी महागाची असेल असे वाटलेच नाही आणि घर सजावटीच्या  क्षेत्रात आपण निर्बुद्ध आहोत हे लगेच मान्य केले. अशाही प्रकारची घर सजावट असते?
मला आठवते ती आमच्या आजोळच्या घरातील विविध खोल्यांमधील वैशिष्टय़पूर्ण भिंती! घरात शिरल्याबरोबर समोरच्या बैठकीतील दर्शनी भिंत. या भिंतीला दोन-तीन सजवलेले कोनाडे असायचे. एका कोनाडय़ात कंदील आणि त्यासोबत काडेपेटीने कायम ठिय्या दिलेला असे. दुसऱ्या कोनाडय़ात पंचांग, हळदीकुंकवाचा करंडा, या कोनाडय़ाच्या वर स्वस्तिक, शुभ-लाभ अशा सुचिन्हाने सुशोभित केले असे. एका कोनाडय़ात विडा-सुपारी असलेले चकचकीत पितळेचे तबक असे. भिंतीच्या एका मोठय़ा खोबणीला दार असे त्यात आजोबांची कोर्टाच्या कामाची पत्रे, फायली, पेन असे महत्त्वाचे सामान असे याला कुणीही हात लावलेला चालत नसे. भिंत पांढऱ्या चुन्याने स्वच्छ रंगवलेली असे.
एका भिंतीवर गांधी, टागोर, टिळक, हेडगेवार, आगरकर असं वैचारिक नेतृत्व फोटोबद्ध असे. तर त्याबाजूलाच खुर्चीवर बसलेले पीळदार मिश्यांचे आजोबा अणि घाबरतच त्यांच्या खांद्यावर हात ठेवून उभी असलेली लाजणारी आजी. बैठकीच्या खोलीत खाली सतरंजी त्यावर गादी पांढरी स्वच्छ चादर अंथरलेले असे आणि वर टेकायला पांढरे स्वच्छ खोळ घातलेले लोड, तक्के असा वैदर्भीय जामानिमा असे. मात्र त्या लोडाला टेकून टेकून आजोबांच्या डोक्याच्या तेलाने त्या भिंतीला कायम तेलकट डाग उमटलेला असे.
आतील माजघराच्या या भिंतीला चार-पाच खुंटय़ा असायच्या. प्रत्येक खुंटीला आजोबा, काका, दादा यांचे शर्ट, बंडी, लेंगा, पँट कायम लटकलेले असे त्याचबरोबर आजोबांची पगडी असे सारेच काही अडकवलेले. देवघरातील भिंतीवर गाभाऱ्याच्या एका बाजूला वटसावित्रीच्या, जराजिवंतिकेच्या पूजेला लागणारा कागद चिकटवलेला असे, त्याचबरोबर अष्टगंध आणि कुंकवाच्या साहाय्याने काढलेले नऊ नाग, नऊ पिल्ले, त्यांना वाहिलेले कापसाचे वस्त्र अशा सगळ्याच गोष्टींनी सजलेली असायची. सोबतच गणपती, गौरी या विशेष सणांसाठी अडकवलेल्या झिरमिळ्या, लोलक, घुंगरू त्याबरोबरच धूप, राळ, हिना, केवडा अशा सुगंधांनी युक्त अशी रंग, गंध, नाद अशा इंद्रियांना तृप्त करणारी भिंत असे. एका कोनाडय़ात निरी घातलेले सोवळे, खुंटीवर धाबळ अशी वैविध्य जपणारी होती. स्वयंपाकघरातील भिंत ही पूर्णपणे घरमालकिणीच्या अखत्यारीत असे, एका बाजूला ताटाळे, चहा, साखरेचे डबे व कप-बश्या मावतील असे छोटेसे रॅक, सूप, टोपले अडकवण्याचे खिळे अशा सगळ्याच वस्तूंनी भरगच्च असे. मागील पडवीच्या भिंतीला घंगाळ, बादली, विहिरीचा दोर, केरसुणी, फडा अशा कित्येक वस्तू अडकवलेल्या असायच्या. काही भिंतीच्या गमतीदार आठवणी असायच्या. घरातले कोणी लहान मूल काना, नाकातला मळ भिंतीला पुसताना दिसला की आमची आजी गमतीने पुढचा श्लोक म्हणायची की खुदकन हसू यायचे.
रघु रघु राणा, चारी बोटे ताणा,
रघुराणा रुसला, भिंतीवर जाऊ न बसला.
अभ्यासाच्या भिंतीला पेनातली शाई शिंपडल्याचे डाग, शिसपेन्सिलीच्या खुणा, त्याच भिंतीला ओठंगून उभे केल्याची शिक्षा, रागाने ओढलेला चरा, चांगले गुण मिळाले म्हणून मारलेले राइट, त्याच भिंतीजवळ पाहायला आले असता लाजेने खाली मान घालून उभी असणारी आत्या आणि.. आजोबा गेल्यावर हिरवा चुडा फुटला म्हणून त्याच भिंतीने फोडलेला टाहो.. काळ बदलला आणि भिंतीचे रूपही पालटले. गांधी, नेहरू, टिळक जाऊन त्याजागी रवी वर्मा, रघुवीर मुळगावकर, दीनानाथ दलाल आले. बिटकोच्या कॅलेंडरमधील राधाकृष्ण, रामसीता, लक्ष्मी यांनी तर कित्येक वर्षे अधिराज्य गाजवले. काचेची कपाटे आली. त्यात साहित्य बागडू लागले. दिवाणखान्यात विराजमान असलेली ही कपाटे उच्च अभिरुचीचे दर्शन घडवू लागली दिवाणखान्यातील एका भिंतीवर मर्फी आणि तत्सम कंपन्यांच्या रेडिओने जागा पटकावली आणि श्रुतीसंवेदनेला संगीताने समृद्ध केले. खुंटय़ा, खिळे ही मंडळी भिंतीवरच्या कपाटात लपली. एखाद्या भिंतीवर उंची मोजल्याच्या पेन्सिलच्या खुणा, त्याच्या बाजूलाच वाण्याची यादी, उधारी दिल्या घेतल्याचा हिशेब, धोब्याकडच्या कपडय़ांचा हिशेब, ऑफिसचे घरचे पत्ते, दूरध्वनी क्रमांक, घरातील दहावीच्या विद्यार्थ्यांचा टाइमटेबल असे आणखी बरेच काही बाही.. भिंत तीच होती पण संदर्भ बदलले होते.
पुन्हा काळाची चाके वेगवान झाली आणि रेडिओची जागा वॉलमाउंटेड टीव्हीने घेतली. संगीताचे अत्याधुनिक स्पीकर आले, होमथिएटर आले. भिंत आता प्रोजेक्टरचा पडदा झाली. त्यावर जीवनातल्या गोड आठवणींना हवा तेव्हा उजाळा मिळू लागला. मुळगावकर, दलाल यांचे मूर्त जाऊन त्याची जागा अमूर्ताने घेतली. प्रत्येक भिंत वेगळ्या रंगाची अशी फॅशन आली. एखादी संपूर्ण भिंत म्युरल्सने साकारली. भिंतीतच पहाडे झाडे, धबधबे असे ‘लाइव्ह’ साकारले.
भिंतीचा हा असा सांस्कृतिक प्रवास काळासोबत चालूच राहणार आहे. अगदी कुडाच्या, गवताच्या भिंतीपासून दगड, विटा, सिमेंटपासून साकारणाऱ्या या भिंतींचे वरचे आवरण बदलले, संदर्भ बदलले तरीही एक महत्त्वाचे काम अखंड सुरूच राहणार आहे ते म्हणजे वास्तव्याला आलेल्या प्रत्येकाला भरभक्कम आधार व सुरक्षितता देण्याचे! हा आधार शारीरिक सोबतच मानसिकसुद्धा असू शकतो. प्रत्येक भिंत ही नुसती भिंत नसून संस्कृतिरक्षक, संवर्धन करणारी स्वत:मध्ये परिपूर्ण अशी घराचा वारसा जपणारी, काही देणारी, काही घेणारी आणि बरेच काही सांगणारी अशी चैतन्य देणारी घरातील लक्ष्मीच!