विधानसभा निवडणुकीत वाढीव जागा देण्यास स्पष्ट शब्दांत नकार देणाऱ्या शिवसेनेविरोधात भारतीय जनता पक्षाचे नेते आक्रमक झाले आहेत. जागावाटपावरून शिवसेना करीत असलेल्या अरेरावीला प्रत्युत्तर देण्यासाठी स्वबळाची चाचपणी भाजप नेत्यांनी सुरू केली आहे. येत्या दोन दिवसांत युतीबाबत अंतिम निर्णय घ्यावा. अन्यथा स्वबळाची घोषणा करावी, असा सूर मंगळवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी झालेल्या भाजप नेत्यांच्या बैठकीत उमटला. तसेच शिवसेनेने स्वत:हून तयारी दाखवली तरच बोलणी पुढे सरकवावी, अशी भूमिका भाजपने घेतली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आज, बुधवारी मुंबईत येत असून रात्री उशिरा होणाऱ्या बैठकीत युतीबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.
गडकरी यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत भाजपच्या राज्यातील नेत्यांनी शिवसेनेच्या अडेल भूमिकेवर तीव्र संताप व्यक्त केला. शिवसेनेची अरेरावी आत्तापासून वाढली आहे. भविष्यात सरकार आल्यास शिवसेनेचा आक्रमकपणा अजूनच वाढेल. त्यामुळे शिवसेना नेत्यांशी आक्रमकपणेच चर्चा करावी, अशी चर्चा बैठकीत झाली. २८८ विधानसभा मतदारसंघात पाहणी केल्यानंतर भाजप स्वबळावर सरकार स्थापन करू शकेल, असा निष्कर्ष समोर आला आहे. परंतु आता स्वबळावर निवडणूक लढवण्यास उशीर झाला आहे, असे सूचक मत प्रदेश स्तरावरील एका भाजप नेत्याने नोंदवले.  युती दुभंगल्यास महायुतीतील अन्य घटकपक्ष कुणाला साथ देतील, यावरही बैठकीत चर्चा झाली.  युती तुटीच्या उंबरठय़ावर असताना शहा पुन्हा मुंबईत येत आहेत. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याची मात्र त्यांची तयारी नाही. शिवसेनेकडून प्रस्ताव आला, तरच भेटीचा विचार करू असा पवित्रा भाजपने घेतला असला तरी तसा कोणताही प्रस्ताव रात्री उशिरापर्यंत शिवसेनेच्या विचाराधीन नव्हता. शहा यांच्या उपस्थितीत बुधवारी रात्री उशिरा भाजपची बैठक होणार असून त्यात युतीबाबत निर्णय होईल. सुकाणू समितीच्या सदस्यांबरोबरच ज्या नेत्यांनी विभागवार मेळावे घेऊन पक्ष कार्यकर्त्यांचा कौल घेतला, त्यांना या बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आले आहे.  पोटनिवडणुकीतील निकालांचे प्रतिबिंब महाराष्ट्रात पडणार नाही. या निवडणुका स्थानिक प्रश्नांवर होत असतात. राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारविरोधात तीव्र असंतोष असून तो विधानसभा निवडणुकीत निश्चितच दिसून येईल, असे भाजप प्रवक्ते माधव भांडारी यांनी म्हटले आहे.

बैठकांचे सत्र सुरू
युतीतील तणावाच्या पाश्र्वभूमीवर भाजप व शिवसेनेत स्वबळाची तयारी आणि बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’ निवासस्थानी भेट घेतली. विधानसभा निवडणूक सोपी राहिलेली नाही, हे पोटनिवडणुकीच्या निकालांनी दाखवून दिले आहे. त्यामुळे स्बवळावर न लढल्यास नुकसान होण्याची शक्यता असून दोन्ही पक्षांनी जागावाटपाबाबत नरमाईची भूमिका घ्यावी. रिपब्लिकन पक्षाला भाजप-शिवसेनेने प्रत्येकी सहा जागा द्याव्यात, असे प्रतिपादन रिपब्लिकन नेते रामदास आठवले यांनी केले आहे. दरम्यान, शिवसेनेने मराठवाडय़ातील मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती मंगळवारी पूर्ण केल्या. याआधी पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आदी विभागातील उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या आहेत.