कॉंग्रेससोबत जागावाटपाची चर्चा करण्यासाठी मंगळवारी सकाळी आणखी एक बैठक घेण्यात येईल, अशी माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी सोमवारी दिली. या बैठकीत राष्ट्रवादीकडे आधीपासून असलेल्या १२४ जागांवर चर्चा करण्यात येणार नसून, पक्षाने वाढवून मागितलेल्या जागांसंदर्भात चर्चा करण्यात येईल, असेही पटेल यांनी स्पष्ट केले.
आघाडीसंदर्भात निर्णय घेण्यासाठी राष्ट्रवादीने कॉंग्रेसला रविवारपर्यंत मुदत दिली होती. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि कॉंग्रेस नेते अहमद पटेल यांचा रविवारी रात्री मला फोन आला होता. त्यानंतर सोमवारी सकाळीही चव्हाण यांचा मला फोन आला, असे पटेल यांनी सांगितले. चव्हाण आणि कॉंग्रेसमधील इतर नेत्यांशी झालेल्या चर्चेनुसार मंगळवारी सकाळी दहा वाजता मुंबईमध्ये जागावाटपावर तोडगा काढण्यासाठी दोन्ही पक्षांच्या नेत्यांची बैठक घेण्यात येईल. या बैठकीला राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ यांच्यासह मीसुद्धा उपस्थित राहणार असल्याचे पटेल म्हणाले.
राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे याआधीपासून असलेल्या १२४ जागांबाबत या बैठकीत कोणतीही चर्चा होणार नाही. ज्या जागा राष्ट्रवादीकडे आहेत. त्या आमच्याच पक्षाकडे राहतील. मात्र, आम्ही जागा वाढवून देण्याची जी मागणी केली आहे, त्यासंदर्भात या बैठकीत चर्चा होईल, असेही पटेल यांनी स्पष्ट केले.