शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी रविवारी रंगशारदा येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात भाजपसमोर जागावाटपाचा शेवटचा प्रस्ताव ठेवताना युती टिकवण्यासाठीचाही हा शेवटचा प्रयत्न असल्याचे जाहीर केले. त्यामुळे भाजपच्या सर्व नेत्यांपुढे आता पेच निर्माण झाला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या महाराष्ट्र भेटीतही जागावाटप आणि युतीबाबत ठोस निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यामध्ये हस्तक्षेप करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. परंतु नरेंद्र मोदी हे उध्दव ठाकरेंशी याबाबत कोणतीही चर्चा करणार नसल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे. तसेच पुढील महिन्यात मोदी केंद्रात विविध कामांमुळे व्यस्त असल्याने निवडणुक प्रचारासाठीही महाराष्ट्रात येऊ शकणार नाहीत, असे म्हटले जात आहे.
प्रादेशिक पक्षांना संपवण्यासाठीच अमित शाह यांची भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी वर्णी लावली गेल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात आहे. परंतु आपल्या हिदुत्त्वाच्या आणि प्रादेशिक अस्मितेच्या मुद्यावर सुरूवातीपासूनच आक्रमक आहे. शिवसेनेला हे दोन्ही मुद्दे कायम ठेवून राजकारण करायचे आहे. परंतु भाजपला आपली हिंदुत्त्ववादाच्या प्रतिमेला छेद द्यायचा आहे. इतर राज्यातही असे प्रयत्न होताना दिसत आहेत आणि महाराष्ट्रात हे काम महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेनाच करू शकते, असेही म्हटले जात आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील भाजपचे नेते गेले दोन आठवडे एकही ठोस निर्णय घेऊ न शकल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे.