शिवसेना-भाजपची युती तुटल्यास किंवा रिपब्लिकन पक्षाची चार-दोन जागा देऊन बोळवण करण्याचा प्रयत्न झाल्यास, आम्हाला वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा पक्षाचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी दिला. शरद पवार यांनी आपल्याला दूरध्वनी करून राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर येण्याचे आवाहन केले आहे, अशी खास माहिती देत युती तुटल्यास राष्ट्रवादी काँग्रेस हा आपला राजकीय पर्याय असेल, असे संकेतही त्यांनी दिले.
भाजप-सेना युती तुटण्यापर्यंत वाद विकोपाला गेला असताना अशा नाजूक परिस्थितीत महायुतीतील रिपाइंचे प्रमुख रामदास आठवले यांनी पहिल्यांदाच दोन्ही पक्षांवर आक्रमक टीका केली. मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघाने आयोजित केलेल्या वार्तालापात बोलताना, त्यांनी लहान पक्षांना गृहीत धरले जात असल्याबद्दल दोघांनाही खडे बोल सुनावले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेवर भगवा व  निळा झेंडा फडकवण्याची घोषणा केली होती. मात्र शिवसेना फक्त भगव्या झेंडय़ाचा विचार करणार असेल, तर निळ्या झेंडय़ाची मते त्यांना मिळणार नाहीत, असा इशारा त्यांनी दिला. तर भाजपने आपल्याला खासदारकी दिली म्हणजे काही उपकार केले नाहीत, लोकसभेवर निवडून गेलेल्या त्यांच्या उमेदवारांना रिपाइंची मते मिळाली आहेत, हे त्यांनीही विसरू नये, याची आठवण त्यांनी करून दिली. आम्हीही सर्वत्र उमेदवार उभे करू. प्रत्येक मतदासंघात आमची आठ-दहा हजार मते आहेत. ती सेना-किंवा भाजपला मिळाली नाहीत, तर मग त्यांचा पराभव होऊ शकतो, असा इशारा त्यांनी दिला.  युती तुटली तर आमच्या समोर अनेक पर्याय आहेत. पवार यांनी संपर्क साधला आहे. परंतु त्यांना आपण युतीबरोबर आहोत, असे सांगितले आहे. मात्र युती तुटली किंवा आमची चार-दोन जागा देऊन बोळवण केली, तर आम्हालाही वेगळा विचार करावा लागेल, असे आठवले म्हणाले. पवार यांच्या निमंत्रणाचा खास त्यांनी उल्लेख केल्यामुळे युती तुटल्यास आठवले यांच्यासमोर पहिला राजकीय पर्याय राष्ट्रवादीचा असेल, असे मानले जात आहे.