धर्मसंसदेचा पुरस्कार करण्याचा प्रयत्न काही प्रवृत्तींकडून होत आहे. तथापि देशाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानातून आकाराला आलेल्या संसदेची गरज आहे. फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांची आस्था असणारा पुरोगामी महाराष्ट्र धर्मसंसदेचा विचार उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.
विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराचा प्रारंभ पक्षाध्यक्ष पवार यांच्या हस्ते झाला, या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे होते. लोकसभा निवडणुकीनंतर बदलत चाललेल्या सामाजिक स्थित्यंतराचा उल्लेख करुन पवार यांनी, साईबाबांच्या भक्तीविषयी निर्माण झालेल्या वादाकडे लक्ष वेधले. ते म्हणाले, साईबाबा मुस्लीम होते की ब्राह्मण, असा वाद धर्मसंसदेच्या माध्यमातून काही प्रवृत्ती निर्माण करीत आहेत. या माध्यमातून साईबाबांचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न दिसतो. हा अधिकार धर्मसंसदेला कोणी दिला? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात पुन्हा आघाडीचेच शासन येईल असा विश्वास व्यक्त करुन पवार यांनी, पक्षाच्या जाहीरनाम्यातून शेवटच्या माणसाला सन्मानाची वागणूक देणारे निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगितले. ते म्हणाले, ‘शेतकरी, शेतमजूर यांना पेन्शन देण्यात येईल, कोरडवाहू शेती ओलिताखाली आणण्यासाठी भरीव अनुदान देण्यात येईल. अल्पसंख्याकांच्या उन्नतीसाठी असलेल्या महामंडळाची तरतूद ५०० कोटीवरुन दोन हजार कोटीपर्यंत वाढविण्यात येईल, २८ हजार ग्रामपंचायतींना आधुनिकीकरणाचा चेहरा देण्यात येईल. हे निर्णय कृतीत आणून देशात महाराष्ट्र आघाडीवर ठेवून राज्याचा कारभार कसा असतो हे दाखवून देण्यात येईल.’
तीन राज्यातील पोटनिवडणुकीत भाजपास आलेल्या अपयशाकडे लक्ष वेधून प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी, पोटनिवडणुकीच्या निकालाची पुनरावृत्ती राज्याच्या विधानसभेत घडेल असा विश्वास व्यक्त केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, सत्ता पुन्हा दिली तर कोल्हापूरच्या टोलचा प्रश्न शंभर दिवसात संपुष्टात आणू असे सांगितले. या वेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ, गृहमंत्री आर. आर. पाटील, ग्रामविकाम मंत्री जयंत पाटील, जलसंपदा मंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडीक, जिल्हाध्यक्ष आमदार के. पी. पाटील, माजी खासदार निवेदिता माने, आमदार विलास शिंदे, सातारा जिल्हाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची भाषणे झाली.

अजित पवार यांची ‘सिंघम’ स्टाइल ’
आपल्या वक्तव्यांनी अनेकदा वादग्रस्त ठरलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी सभेत,‘विरोधकांबाबत आक्रमक बना,’ असे सांगताना थेट ‘सिंघम’ स्टाइल ‘चा अवलंब केला. ‘आता माझी सटकली’ हा चित्रपटातील गाजलेला डायलॉग म्हणून त्यांनी कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न केला. या वक्तव्याद्वारे त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनाही सक्रिय होण्याचा सल्ला दिला.