युती तुटेल, असे वातावरण गेली २५ वर्षे प्रत्येक निवडणुकीत होते, असे सांगतानाच, शिवसेनेपुढेही अन्य पर्याय आहेत, असा इशाराच आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिला. शिवसेनेने आयोजित केलेल्या अपारंपारिक उर्जानिर्मिती उपकरणांच्या प्रात्यक्षिक कार्यक्रमात पत्रकारांशी बोलताना ठाकरे यांनी युतीतील तणावाविषयी आणि त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याविषयी सविस्तरपणे भूमिका मांडली.  
 ठाकरे यांच्या वक्तव्यावरुन भाजप कार्यकर्ते संतप्त झाले व त्यांनी वाटाघाटी थांबविण्याची मागणी केली, यासंदर्भात भाजप प्रवक्ते माधव भांडारी यांच्या प्रतिक्रियेबाबत विचारता ‘जागावाटपाची बोलणी भाजपतर्फे ओम माथूर, प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस करीत असल्याचे सांगून युतीबाबत अंतिम निर्णय झाला नसल्याने अन्य ‘आदरणीय’ नेत्यांविषयी बोलणार नाही, असे ते म्हणाले.
ज्याच्या अधिक जागा त्याचा मुख्यमंत्री, या खडसे यांच्या वक्तव्याविषयी विचारता हे जर भाजपचे म्हणणे असेल, तर जागावाटपाचे सूत्रही त्यावेळी १७१ व ११७ असे ठरले आहे. अर्धवट सूत्र लागू करून चालणार नाही, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेतून घालविण्यासाठी एकत्रित प्रयत्न करावेत, अशी माझी भूमिका असून युती तुटावी, असे मी कधीच काही करणार नाही. युती टिकावी, हीच माझी इच्छा असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.