शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाने युती करूनच विधानसभा निवडणूक लढविण्याचे ठरविले असून, जागावाटपाच्या नव्या प्रस्तावावर महायुतीतील घटक पक्षांशी चर्चा करून मंगळवारी संध्याकाळी अधिकृत घोषणा केली जाईल, असे शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत मंगळवारी सांगितले.
युती टिकवण्यासाठी शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांकडून मंगळवारी पुन्हा एकदा प्रयत्न झाले. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत, मिलिंद नार्वेकर, सुभाष देसाई, अनिल देसाई या नेत्यांनी भाजपच्या प्रदेश कार्यालयात जाऊन भाजपच्या नेत्यांशी चर्चा केली. भाजपचे महाराष्ट्र प्रभारी ओम माथूर, प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, एकनाथ खडसे, विनोद तावडे, आशिष शेलार, पंकजा मुंडे या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीनंतर संजय राऊत आणि विनोद तावडे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन बैठकीतील चर्चेची माहिती दिली.
बैठकीत कोणत्या नव्या प्रस्तावावर चर्चा झाली, हे त्यांनी सांगितले नाही. केवळ नवा प्रस्ताव आला असून, तो अंतिम ठरविण्याआधी मित्रपक्षांशी आम्हाला बोलावे लागेल. त्यांच्याशी बोलल्यानंतर मंगळवारी संध्याकाळी याबाबत अंतिम घोषणा केली जाईल, असे विनोद तावडे यांनी सांगितले. युती कायम ठेवण्यावर शिवसेना भाजपचे शिक्कामोर्तब झाले असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. संजय राऊत यांनीही युती कायम राहील, असे या पत्रकार परिषदेत सांगितले.
स्वाभिमानी शेतकरी संघटना, रिपब्लिकन पक्ष (आठवले गट), राष्ट्रीय समाज पक्ष आणि शिवसंग्राम संघटना हे घटक पक्ष नव्या प्रस्तावावर काय भूमिका घेतात, यावर महायुती एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जाणार की त्यामध्ये फूट पडणार हे अवलंबून आहे.