आरपीआयप्रमाणेच आता बामसेफमध्ये बरेच गट पडले आहेत. या सर्व गटांनी पुन्हा एकत्र यावे यासाठी बामसेफच्या मूळ विचारसरणीला मानणाऱ्या काही कार्यकर्त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी लोकशाही पद्धतीने संघटनेची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याला कितपत यश येईल, हा वेगळा प्रश्न आहे. परंतु अलीकडच्या काळात बामसेफने जी मूलनिवासी ही संकल्पना मांडण्यास सुरुवात केली आहे, तीच मुळात फुले-आंबेडकर विचारधारेच्या विरोधात जाणारी आहे..
भारतीय राजकारणात उतरायचे असेल आणि यशस्वी व्हायचे असेल तर त्या राजकीय पक्षाजवळ मनुष्यबळ आणि द्रव्यबळ असणे आवश्यक आहे. त्याशिवाय पक्षाची भूमिका मतदारांपर्यंत पोहोचविण्यासाठी बुद्धिजीवी कार्यकर्त्यांची एक फळीही असावी लागते. १९७० ते ८०च्या दशकात हाच विचार करून कांशिराम यांनी ‘बॅकवर्ड क्लास अ‍ॅण्ड मायनॉरिटी कम्युनिटी एम्प्लॉईज फेडरेशन’ अर्थात ‘बामसेफ’ या संघटनेची स्थापना केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मोठय़ा संघर्षांने मिळवून दिलेल्या घटनात्मक आरक्षणामुळे केंद्र व राज्य सरकारमध्ये नोकऱ्या मिळालेल्या आणि थोडय़ा प्रमाणात मध्यमवर्गीय जीवनाकडे वाटचाल करू लागलेल्या संघटित अशा नोकरदार वर्गाभोवती बामसेफने जाळे टाकले.
रिपब्लिकन पक्षातील गटबाजीला कंटाळलेल्या दलित, मागासवर्गीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी राजकीय सत्तेची स्वप्ने दाखविणाऱ्या कांशिराम यांच्या बामसेफला तन-मन-धनाने स्वीकारले. दुसरी गोष्ट अशी की, या नोकरदार वर्गाला सुरक्षितता हवी होती. तुम्ही फक्त वर्गणी द्यायची, बंद खोलीतील शिबिरात सहभागी व्हायचे, वर्षांतून एखाद दुसरे अधिवेशन घ्यायचे, बस्स. दुसरे म्हणजे रस्त्यावर उतरून संघर्ष वगैरे काही करायचा नाही, एवढेच करायचे म्हटल्यावर सामाजिक ऋण फेडल्यासारखे दाखविण्यासाठी कातडीबचाऊ नोकरदार वर्गाला बामसेफ हा उत्तम पर्याय वाटला. दलित-मागासवर्गीयांच्या न्याय्य हक्कांसाठी, त्यांच्यावरील अन्याय-अत्याचाराच्या विरोधात रस्त्यावर उतरून लढणाऱ्या आंबेडकरी कार्यकर्त्यांकडे हा ‘बामसेफ फेम’ बूझ्र्वा नोकरदार वर्ग कुचेष्टेने बघू लागला. रस्त्यावर लढणारा कार्यकर्ता नसता तर, सरकारी सेवेतील मागासवर्गीय अधिकारी वा कर्मचारी यांच्या नोकऱ्या  सुरक्षित राहिल्या असत्या का? अनेक कार्यकर्त्यांनी आपले आयुष्य पणाला लावले, परंतु आज हा नोकरदार वर्ग आपल्या नोकऱ्या कशा शाबूत राहतील, झटपट बढत्या कशा मिळतील याचाच फक्त विचार करत आहे. अशा  अप्पलपोटी नोकरदारांना आंबेडकरवादी म्हणता येईल का? असो. पण तरीही बघता-बघता देशभर बामसेफ फोफावली. त्याच भक्कम पायावर कांशिराम यांनी नंतर बहुजन समाज पक्षाची स्थापना केली. त्यानंतरची बसपची उत्तर प्रदेशातील सत्तेची वाटचाल सर्वश्रुतच आहे. अर्थात बामसेफचा व बसपचा काही संबंध नाही, असा अलीकडे दावा केला जातो. त्यात काही प्रमाणात तथ्य आहे. कारण बसपच्या सर्वेसर्वा मायावती यांना आता तशी बामसेफच्या मनुष्यबळाची व द्रव्यबळाची गरज उरलेली नाही. परंतु बसपचा सदस्य कोणत्या राजकीय पक्षाचा समर्थक वा सहानुभूतीधारक आहे, तर तो फक्त बसपचाच. बसपलाही आता ‘भारत मुक्ती मोर्चा’ नावाने नवा राजकीय पर्याय देण्याचा प्रयत्न सुरू झाल्याने मूळ बामसेफमध्ये फाटाफुटीला सुरुवात झाली. आरपीआयप्रमाणेच आता बामसेफमध्ये बरेच गट पडले आहेत. या सर्व गटांनी पुन्हा एकत्र यावे यासाठी बामसेफच्या मूळ विचारसरणीला मानणाऱ्या काही कार्यकर्त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मुंबईत २ व ३ मार्चला विविध गटांतील कार्यकर्त्यांची बैठक झाली. त्या बैठकीत सध्या प्रभावी असलेल्या बामसेफच्या एका गटाच्या नेत्यावर संघटनेत हुकूमशाही पद्धतीने वागत असल्याबद्दल टीका करण्यात आली. लोकशाही पद्धतीने संघटनेची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याला कितपत यश येईल, हा वेगळा प्रश्न आहे. परंतु अलीकडच्या काळात बामसेफने जी मूलनिवासी ही संकल्पना मांडण्यास सुरुवात केली आहे, तीच मुळात फुले-आंबेडकर विचारधारेच्या विरोधात जाणारी आहे. बामसेफचे सदस्य एकमेकांना भेटल्यानंतर किंवा सभा-बैठकांमध्ये ‘जय मूलनिवासी’ म्हणून एकमेकांचे स्वागत करतात. ‘जयभीम’च्या जागी ‘जय मूलनिवासी’ हा शब्द आला. आता ही मूलनिवासी काय भानगड आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मूलनिवासी या विचाराचा सध्या जोरात प्रचार सुरू आहे. त्यावर खास पुस्तिका लिहिल्या आहेत, ‘मूलनिवासी नायक’ नावाचे एकपानी वृत्तपत्रही चालविले जाते. मूलनिवासी ही मांडणीच मूळात द्वेषावर आधारित आहे, म्हणून ती महाभयंकर आहे. उदाहरणार्थ, बामसेफचे उद्दिष्ट काय तर, मूलनिवासी या तथाकथित सिद्धांताच्या आधारावर या देशातील ब्राह्मण वर्ग सोडून साडेसहा हजार जातींना जोडणे. या साडेसहा हजार जातींचे कडबोळे बांधून काय करायचे तर, म्हणे राष्ट्रीय आंदोलन! म्हणजे काय, तर काहीच नाही. तर मग या मूलनिवासीचे इतके स्तोम का माजविण्यात आले आहे? फुले-आंबेडकरी विचारांना बगल देऊन राजकीय स्वार्थ साधण्यासाठीच हा सारा खटाटोप चालला आहे, असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. म्हणजे उदाहरणार्थ, मूलनिवासी नायक वृत्तपत्राच्या ५ सप्टेंबर १२च्या अंकात बामसेफच्या एका प्रचारकाचे भाषण प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यात ते म्हणतात, परदेशी युरेशियन ब्राह्मणांची व्यवस्था उद्ध्वस्त करून मूलनिवासी व्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी बामसेफची निर्मिती करण्यात आली आहे. म्हणजे या देशातील ब्राह्मण हे परके आहेत व सारे अब्राह्मणी मूळ भारतीय आहेत, अशी त्यांची मांडणी आहे. त्यासाठी तथाकथिक कुणा तरी एका काल्पनिक मानववंशशास्त्रज्ञाचा आधार घेतात. त्याने म्हणे केलेल्या काही डीएनए चाचणीत ब्राह्मण परकीय असल्याचे आणि इतर साडेसहा हजार जातीच फक्त मूळ भारतीय असल्याचा शोध लावला आहे. म्हणजे ब्राह्मण सोडून सारे मूलनिवासी. जोतिबा फुले यांची या ठिकाणी आठवण होते. आपण चिरंजीव असल्याचा व आदिनारायणाचा अवतार असल्याचा दावा करणाऱ्या काल्पनिक परशुरामाला जोतिबांनी जशी त्याला सहा महिन्यांच्या आत हजर राहण्याची नोटीस बजावली होती, तशीच नोटीस या तथाकथित मानववंशशास्त्रज्ञाला बजावावी लागणार आहे.
वास्तविक पाहता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय समाजव्यवस्थेची, संस्कृतीची, धर्मग्रंथांची कठोर चिकित्सा केली आहे. मानववंशशास्त्राच्या आधाराने त्यांनी जातीय व्यवस्थेचे सैद्धांतिक विश्लेषण केले आहे. आर्य बाहेरून आले व त्यांनी मूळच्या अनार्याना जिंकून दास्य किंवा गुलाम बनविले. आर्य म्हणजे ब्राह्मण आणि बाकीचे अनार्य म्हणे शूद्र वा बहुजन अशा आजवरच्या तकलादू इतिहासाला आंबेडकरांनी शूद्र पूर्वी कोण होते आणि अस्पृश्य मूळचे कोण होते, या दोन शोधप्रबंधांत छेद देणारे नवे निष्कर्ष काढले आहेत. शूद्र हे पूर्वी आर्यच होते, शूद्रांचे हिंदू-आर्य समाजात मूळचे स्थान दुसऱ्या म्हणजे क्षत्रिय वर्णात होते. ब्राह्मण व क्षत्रिय यांच्यातील वर्चस्ववादातून शूद्रांना चौथ्या वर्णात टाकून त्यांना खालचा दर्जा देण्यात आला, असे बाबासाहेब सांगतात. आता आर्याना परकीय समजायचे तर मग पूर्वाश्रमीच्या शूद्रांना आणि आताच्या बहुजनांनाच उपरे ठरविण्यासारखे आहे. त्यानंतर अस्पृश्य मूळचे कोण, याचाही बाबासाहेबांनी शोध घेतला आहे. मूळचे आणि परके असले भेदाचे राजकारण करणाऱ्यांनी बाबासाहेब काय म्हणतात ते नीट एकदा समजून घ्यावे. ते म्हणतात, विभिन्न वंशांचा निर्णय करण्याचे वांशिक शरीररचनाशास्त्र हेच खरे शास्त्र असेल, तर हिंदू समाजातील विभिन्न जातींना या शास्त्राची कसोटी लावून पाहिल्यास अस्पृश्य हे आर्य आणि द्रविड वंशापेक्षा भिन्न वंशाचे लोक आहेत, हा सिद्धांत कोलमडून पडतो. या मोजमापावरून हे सिद्ध होत आहे की, ब्राह्मण व अस्पृश्य हे एकाच वंशाचे लोक आहेत. जर ब्राह्मण आर्य असतील तर अस्पृश्यही आर्यच आहेत. ब्राह्मण जर द्रविड असतील तर अस्पृश्यही द्रविडच आहेत. ब्राह्मण नाग वंशाचे असतील तर अस्पृश्यही नाग वंशाचे आहेत. त्या आधारावर अस्पृश्यतेला वंशभेदाचा आधार नाही, असा निष्कर्ष बाबासाहेबांनी काढला आहे. चातुर्वण्र्य व्यवस्थेत अस्पृश्य या अवर्णाची उपपत्ती कशी झाली, त्यालाही कोणता संघर्ष कारणीभूत आहे, हा एक स्वतंत्र चर्चेचा विषय आहे. परंतु बाबासाहेबांनी येथील सर्व समाजव्यवस्थेचे मूळ शोधून काढले आहे, शूद्र पूर्वी कोण होते हे सांगितले, अस्पृश्य मूळचे कोण होते, याचीही सैद्धांतिक उकल करून दाखविली. मग बामसेफ आता कोणत्या मूलनिवासींचा शोध घेत आहेत? बाबासाहेबांच्या संशोधनावर-सिद्धांतावर त्यांचा विश्वास आहे की नाही? दुसरे असे की, बाबासाहेबांनी आम्ही कोण याचे मूळ शोधून या समाजाच्या हातात जगाने स्वीकारलेला बुद्ध दिला. बुद्ध द्वेषाला मूठमाती द्यायला सांगतो. बुद्ध समता, न्याय, बंधुभाव, मैत्री, करुणेचा आग्रह धरतो. बुद्ध जगाच्या – मानवाच्या कल्याणाची भाषा करतो. मग एखाद्या देशात वंशभेदाच्या आधारावर मूळचे कोण व उपरे कोण अशी विभागणी करणे कितपत योग्य आहे? बाबासाहेबांना जातिव्यवस्था मोडायची होती. बामसेफला जाती मोडायच्या आहेत की जोडायच्या आहेत? फक्त जाती जोडायच्याच असतील तर ते आंबेडकरी विचाराच्या विरोधात आहेत, असे म्हणावे लागेल.

sachin pilot
धार्मिक मुद्द्यावर बोलणाऱ्या भाजपला ‘पढोगे तो बढोगे’ हे सांगण्याची वेळ; सचिन पायलट यांची टीका
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Ramdas Athawale, RPI pune, office bearers of RPI,
महायुतीची डोकेदुखी रिपाइं वाढणार ! खासदार रामदास आठवले यांच्याकडून रिपाइं पदाधिकाऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न
thane city BJP president JP Nadda, walk out of the Gurdwara
Video : …आणि गुरुद्वारातून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांना काढता पाय घ्यावा लागला
right to vote opportunity to create the future
मताधिकार ही भविष्य घडविण्याची संधी!
Comrade Subhash Kakuste no more
सत्यशोधक कम्युनिस्ट नेते सुभाष काकुस्ते यांचे निधन
guruji Nitesh Karale concern over giving opportunity to mp Kale wife Mayura Kale in Maharashtra
Video : कराळे गुरूजींची स्वपक्षीय खासदाराबद्दल ‘खदखद’,काय म्हणाले  ?
Loksatta chaturanga Parent Nature Confused Psychologist
सांधा बदलताना : संसार शांतीचा झरा…