९ मे १८१४ हा मराठी व्याकरणाचे पाणिनी म्हणून प्रख्यात असणाऱ्या दादोबा पांडुरंग तर्खडकर यांचा जन्मदिवस. समाजसुधारणा, व्याकरणनिर्मिती, लेखन संशोधन, शिक्षण व्यवस्थेत मोलाचे योगदान असणाऱ्या आणि मानवधर्म समाज, परमहंससभा, प्रार्थना समाज अशा अत्यंत महत्त्वाच्या संस्थांमध्ये सक्रिय सहभाग असणाऱ्या दादोबांच्या द्विजन्मशताब्दीनिमित्ताने हा लेख.
दादोबा पांडुरंग तर्खडकर यांच्या जन्माला यंदा २०० वर्षे होत आहेत. इंग्रजांचे राज्य भारतात आल्यानंतर जे पाच विद्यार्थी शिकू लागले त्यापकी दादोबा पांडुरंग होते. दादोबांचा काळ, त्यांचे लेखन, त्यांचे कार्य, याविषयी अत्यंत अव्वल दर्जाचे संशोधन प्रा. अ. का. प्रियोळकरांनी केले आहे, परंतु त्यांच्या त्या कार्याची जितकी दखल संशोधक-लेखक-विचारवंतांनी घ्यायला हवी होती, तितकी ती घेतली नाही.
प्रा. गं. बा. सरदार (म.सा.प. एप्रिल-जून १९४८), भीमराव कुलकर्णी (स्वराज्य ४ एप्रिल १९८१) किंवा प्रा. कल्याण काळे, प्रा. वसुंधरा तारकर यांचे मराठी संशोधन पत्रिकेतील लेखन आणि खुद्द पुस्तकाला असणारा पुरस्कार आशीर्वाद असे काही अपवाद वगळता, ज्या तळमळीने प्रा. प्रियोळकरांनी दादोबांविषयीचे अमाप कष्ट घेऊन केलेले संशोधन, खटाटोप करून अस्सल कागदपत्रे जमवून महाराष्ट्रातील सुजाण वाचकांना सादर केलेले चरित्र, त्याची योग्य ती दखल महाराष्ट्राने घेतली नाही. १९४७ साली त्यांनी ‘रावबहादूर दादोबा पांडुरंग पूर्वार्ध : आत्मचरित्र – उत्तरार्ध : चरित्र’ हा ग्रंथ केशव भिकाजी ढवळे प्रकाशन संस्थेच्या सहकार्याने प्रकाशित केला. १९५० साली ढवळे प्रकाशन संस्थेने दादोबांच्या आत्मचरित्राचा भाग स्वतंत्रपणे प्रकाशित केला. १९७३ साली अनुभव प्रकाशन संस्थेने पुन्हा हे आत्मचरित्र प्रकाशित केले. आज प्रा. प्रियोळकरांचे संपादित आत्मचरित्र आणि चरित्र असे एकत्रित असणारे पुस्तक अप्राप्त आहे. जिथे कुठे त्याची प्रत सापडते ती वाईट अवस्थेत आहे. प्रा. प्रियोळकरांच्या पुस्तकाची दुसरी आवृत्ती इतक्या वर्षांत का निघू नये? दादोबांचे कार्य, तो काळ, त्या काळातील व्यक्ती इत्यादींचे विवेचन-विश्लेषण आणि विशेषत: दादोबांच्या लेखनकार्याविषयी घेतलेला शोध, दादोबांच्या लेखनाचे केलेले मूल्यांकन, त्याला जोडलेली तळटिपांमधली माहिती अत्यंत उत्तम तर आहेच, पण संशोधन कसे असावे, कसे करावे, केलेल्या संशोधनाची मांडणी कशी करावी, याचा उत्कृष्ट नमुना म्हणजे प्रियोळकरांचे हे संशोधन आहे. त्याचीही दखल फारशी कुणी पुढील काळात का घेऊ नये, याचे आश्चर्य वाटते. मात्र, डॉ. प्रा. अरुणा दुभाषी यांनी ‘श्रीगंधर्व-वेद प्रकाशन’ संस्थेच्या ‘महाराष्ट्र चरित्र ग्रंथमाला’ या चरित्रग्रंथांच्या मालिकेत दादोबा पांडुरंगांचे छोटेखानी चरित्र लिहून ठिकठिकाणी प्रा. प्रियोळकर यांच्या पुस्तकाचे, संशोधनाचे दाखले दिले आहेत. प्रा. दुभाषी यांचे पुस्तक वाचून वाचक प्रा. प्रियोळकरांच्या मूळ पुस्तकाकडे वळण्याची शक्यता आहे, तरीही प्रा. प्रियोळकरांच्या अपेक्षा, ज्या त्यांनी सदर पुस्तकात व्यक्त केल्या होत्या, त्या मात्र पूर्ण झालेल्या दिसत नाहीत किंवा पुढच्या पिढीतील संशोधक त्या इच्छा पूर्ण करण्याकडे वळलेला दिसत नाही, असे का झाले ते मात्र समजत नाही.
प्रा. प्रियोळकरांच्या अपेक्षांकडे वळण्यापूर्वी, त्यांच्या सदर पुस्तकाची अपूर्वता लक्षात घ्यायला हवी. दादोबांनी लिहून ठेवलेले आत्मचरित्र घेऊन, त्याला तळटिपांची जोड देऊन ते आत्मचरित्र जिथे अर्धवट आहे तिथून पुढे त्यांचे चरित्र लिहून केवळ हे पुस्तक प्रियोळकरांनी तयार केले आहे अशी जर कोणाची समजूत असेल तर ती पूर्णार्थाने चुकीची आहे. प्रकाशकांचे निवेदन, पुरस्कार (बा. गं. खेर), आशीर्वाद (एम. आर. जयकर इंग्रजी आणि पां. वा. काणे, मराठी), प्रो. रामचंद्र कृष्ण लागू यांचा ‘आत्मचरित्र, चरित्र आणि आठवणी’ हा निबंध सोडला, तर प्रियोळकरांच्या या पुस्तकाचे काही भाग पडतात. एक- संपादकीय निवेदन, दोन- आत्मचरित्र आणि तीन- चरित्र. शेवटी दíशकाही जोडली आहे. पुस्तकाला ‘वृद्धी आणि शुद्धी’ असा एक नवाच भाग जोडला आहे. त्यात नवी टिपणं (वृद्धी) आणि शुद्धिपत्रक जोडले आहे. पुस्तकाला असणाऱ्या तळटिपा हा या पुस्तकाचा स्वतंत्र भाग मानायला हवा, इतका तो अभ्यासपूर्ण झाला आहे. किंबहुना असे म्हणता येईल की, पुस्तकाला असणाऱ्या तळटिपा हाच या पुस्तकाचा आत्मा आहे. एकेकाचे वैशिष्टय़ लक्षात घेतल्याशिवाय त्याचे महत्त्व लक्षात येणार नाही.
‘संपादकीय निवेदन’ म्हणजे केवळ कशी माहिती जमवली, दादोबांच्या आत्मचरित्राचे हस्तलिखित कसे मिळाले, कोणाला मी भेटलो इत्यादी इत्यादींचा जुजबी तपशील त्यात नाही, तर त्या संपादकीय निवेदनातही प्रियोळकर नावाच्या अव्वल दर्जाच्या संशोधकाची दृष्टी नि कार्यप्रणाली व्यक्त होते. दादोबांच्या आत्मचरित्राच्या लेखनाचा काळ कोणता, म्हणजे ते त्यांनी केव्हा लिहायला घेतले आणि ते केव्हा थांबले याचा त्यांनी तक्ताच दिला आहे. दादोबांची ‘लेखनपद्धती’ (ड१३ँॠ१ंस्र्ँ८) विस्तारभयामुळे पुस्तकात त्यांना समाविष्ट करता आली नव्हती. त्याच्या अगदी महत्त्वाच्या बाबी, विशेषत: लेखनशैलीच्या लकबी त्यांनी दिल्या आहेत. ‘दादोबांच्या पूर्वीची आत्मचरित्रे’ हा निवेदनातील भाग तर संशोधकांना अत्यंत उपयुक्त ठरणारा आहे. ग्रंथातील ग्रांथिक परिभाषा व संक्षेप यासंबंधीचा त्यांनी केलेला खुलासा म्हणजे संशोधन पद्धतीचा जाणीवपूर्वक वापर करण्याचा प्रा. प्रियोळकरांच्या प्रयत्नाचा साक्षात दाखला आहे.
संपादकीय निवेदनानंतर सुरू होते ते म्हणजे, दादोबा पांडुरंगांचे आत्मचरित्र. या भागाचे वैशिष्टय़ म्हणजे, पानोपानी असणाऱ्या प्रा. प्रियोळकरांच्या तळटिपा. या भागात स्वत: लेखकाच्याही काही ठिकाणी तळटिपा आहेत. लेखकाच्या आणि संपादकांच्या तळटिपा आणि लेखकाच्या टिपांनाही काही वेळा दिलेल्या टिपा असा एक सुंदर संगमही त्यात आहे. या तळटिपांचे काही गटही करता येणे शक्य आहे. व्याकरण सांगणाऱ्या टिपा, अर्थ सांगणाऱ्या, लेखननिर्देश, भौगोलिक तपशील, व्यक्तींची माहिती देणाऱ्या टिपा, लेखांचे, पुस्तकांचे संदर्भ, व्यक्तींविषयक तपशील दिल्यानंतर त्या व्यक्तीची अधिक माहिती मिळावी यासाठी दिलेली पुस्तके, लेख इत्यादींचे संदर्भ देणाऱ्या टिपा, सरकारी अहवालातील अचूक तपशील, पत्रव्यवहार, दादोबांच्या विशिष्ट पíशयन शब्दांचे भाषांतर, अर्थ, बोधवचने, दादोबांनी नमूद केलेल्या पुस्तकांचे अचूक तपशील, पुन्हा त्याच तपशिलाची टीप पुन्हा देण्याची वेळ आली तर मागच्या तळटिपेचा दिलेला संदर्भ, इत्यादी अनेक प्रकारच्या टिपा माहितीने भरलेल्या आहेत. ज्यांच्याबद्दल प्रियोळकरांना काही तपशील देता आला नाही, तिथे त्यांनी प्रामाणिकपणे तसे मांडले आहे. या तळटिपांच्या आधारे त्या काळाचा, व्यक्तींचा, शब्दांचा, चालीरीती, शासकीय निर्णय, स्थळं इत्यादींचा एक छोटेखानी कोशच तयार झाला आहे. दादोबांची शैली आणि तळटिपांमधला अचंबा वाटावा असा विलक्षण कष्टाने ठिकठिकाणांहून मिळवलेला अचूक आणि अधिक तपशील हे या पुस्तकाचे वैशिष्टय़ म्हणता येईल.
प्रा. प्रियोळकरांचे व्यक्तिमत्त्व या तळटिपांमध्ये प्रतििबबित झाले आहे. संशोधकाच्या संशोधनाची वाटचाल, त्याने वाचलेले ग्रंथ, सरकार दरबारच्या कागदपत्रांचा घेतलेला धांडोळा, एखाद्या व्यक्ती, घटना, स्थळाची खोलात जाऊन माहिती कशी घ्यायची – द्यायची याची घालून दिलेली मार्गदर्शक तत्त्वेच या तळटिपांतून नवीन संशोधकांना सापडू शकतात.
दादोबांचे आत्मचरित्र दिल्यानंतर सुरू होते ते प्रा. प्रियोळकरांनी लिहिलेले दादोबांचे उर्वरित चरित्र. चरित्रलेखनाचा तो एक उत्तम नमुना म्हणावा लागेल. साधार विधानं म्हणजे काय याची पद्धती या चरित्रातून त्यांनी दाखवून दिली आहे. या भागाला तळटिपांऐवजी संदर्भाच्या टिपा अधिक आहेत. अर्थातच त्याचे कारण उघड आहे. तळटिपांमध्ये यावा असा तपशील चरित्र लेखनाच्या मजकुरातच समाविष्ट करून चरित्राचे लेखन चरित्रकाराने केले आहे. या चरित्राचे संपादन जर आता कुणा संशोधकाने केले तर त्याला तळटिपांचे तपशील जोडता येणे शक्य आहे.
परिशिष्टात येणारा ‘शिशुबोध’ हा दादोबांचा निबंध याला मात्र तळटिपा नाहीत. मात्र ‘वृद्धि आणि शुद्धि’ या त्यांच्या जोडणीत ‘वृद्धि’त नवीन हाती आलेल्या तपशिलाच्या टिपा आहेत. ही पुरवणी माहिती मागील पृष्ठसंख्येवरील त्या त्या भागात अधिक तपशिलाची माहिती पुरवते. लेखन पुढे होऊन गेल्यानंतरही त्यातील माहितीच्या शोधाने झपाटलेला संशोधक कसा असतो ते या ‘वृद्धि’वरून कळून येऊ शकते.
‘तळटिपा’ हे या ग्रंथाचे एक महत्त्वाचे अंग आहे. आज अशा पद्धतीने संपादनाचे कार्य फारच अपवादाने होते. नवीन कार्य तर दूरच राहिले, पण जुन्या कार्याची बूजही राखली जात नाही याचा विशेष खेद वाटतो. या तळटिपांकडे प्रियोळकर कशा प्रकारे पाहतात? त्यांना काय वाटते?
प्रा. प्रियोळकरांनी तळटिपांमध्ये जी माहिती दिली आहे, ती वाचून आपण थक्क होतो, पण त्याबद्दल ते असे म्हणतात की, ‘‘दादोबांचे हे जे संपूर्ण चरित्र वाचकांपुढे आज ठेवण्यात येत आहे त्यात माझ्या मनासारखी माहिती मला देता आलेली नाही, याबद्दल मी अत्यंत असंतुष्ट व दिलगीर आहे.’’
तसेच ते पुढे म्हणतात की, ‘‘तळटिपांच्या आधाराने एखाद्याला जास्त माहिती मिळविता येईल. त्या काळच्या निरनिराळ्या व्यक्तींचीही यात माहिती आहे व त्यांच्यासंबंधी जास्त माहिती मिळविण्याची सोय तळटिपांत आहे.’’
याचा एक अर्थ उघड आहे, तळटीपांचे जे कार्य असते ते चोख बजावले जावे यासाठी प्रियोळकर योग्य ती काळजी घेतात, पण प्रामाणिक संशोधकाचे मन मात्र त्यांना सांगत राहते की यात अधिक तपशील येण्याची गरज आहे. ती खंतही ते बोलून दाखवतात. या पुस्तकाच्या अनुषंगाने त्यांनी अन्य बाबतीतली खंतही ठिकठिकाणी बोलून दाखवली आहे. तशी ती त्यांनी का मांडली असावी? एक कारण असे वाटते की, ती खंत लक्षात घेऊन पुढची पिढी काही तरी पुढचा टप्पा गाठील, पण तसे झाले नाही. काय होत्या प्रियोळकरांच्या अपेक्षा?
ग्रंथ प्रकाशनाला विलंब लागत असल्याची खंत बोलून दाखवताना त्यांनी असेही म्हटले आहे की, ‘‘आणखी नवी माहितीही पुष्कळ मिळाली हे कबूल केले पाहिजे. अजूनही त्याला पूर्णता आलेली आहे असे नाही.’’ याचा अर्थ अजून काही उरले आहे याची खात्रीच प्रियोळकरांनी देऊन ठेवली आहे. ‘यांत दोषही असण्याचा संभव आहे. ते शोधून पुढच्या आवृत्तीच्या वेळी जरूर दुरुस्त करण्यात येतील’, असेही त्यांनी म्हटले असले तरी प्रियोळकरांचे दोष शोधून काढायलाही तितकीच समर्थ व्यक्ती आज हवी. दुसरी आवृत्ती निघाली असती तर ते कार्य त्यांनी पार पाडले असते, पण ते झाले नाही. असा नवा संशोधक मराठीला सापडला तर भाग्याचेच म्हणायला हवे.
प्रियोळकरांनी, ‘दादोबांनी न सांगितलेल्या त्यांच्या काळांतील महत्त्वाच्या गोष्टी व त्यांची शुद्धलेखन पद्धती (ड१३ँॠ१ंस्र्ँ८) अशी दोन संकल्पित प्रकरणे विस्तारभयामुळे सदर पुस्तकात दिलेली नाहीत. ही प्रकरणे किती महत्त्वाची होती व आजही आहेत, ते नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही. प्रियोळकरांना अपेक्षित असणारी ही दोन प्रकरणे आज २००व्या वर्षांच्या निमित्ताने कुणी संशोधकाने लिहून सदर पुस्तकात दिलेली नाहीत. ही प्रकरणे किती महत्त्वाची होती व आजही आहेत, ते नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही. प्रियोळकरांना अपेक्षित असणारी ही दोन प्रकरणे आज २००व्या वर्षांच्या निमित्ताने कुणी संशोधकाने लिहून सदर पुस्तकाला नव्याने जोड द्यायला हरकत नाही.’
आणखी एक खुलासा प्रा. प्रियोळकरांनी केला आहे. तो असा की, ‘‘या ग्रंथात ठिकठिकाणी जे इंग्रजी ग्रंथातील किंवा जुन्या कागदपत्रांतील उतारे उद्धृत केले आहेत, त्यांचे स्थळाभावामुळे मराठी भाषांतर देणे मला शक्य झालेले नाही.’’ हा इंग्रजी मजकूरही आम्ही अजून भाषांतरित केलेला नाही. शिवाय हे उतारेही संपूर्णपणे पुस्तकात दिलेले नाहीत. त्यातील काही भागच दिलेला आहे. भाषांतराबरोबरच ते मूळ उतारे मिळवण्याची नितांत आवश्यकता आहे. कालांतराने ते संदर्भही लयात जातील.
दादोबांच्या डायऱ्या किंवा कागदपत्रे प्रियोळकरांना सापडली नाहीत. काळाच्या ओघात ते नष्ट झाले, पण दादोबांनी लिहिलेल्या ‘माबाईच्या ओव्यां’ची वहीसुद्धा आज कुठे असेल याचा शोध घ्यायला हवा. ‘माबाईच्या ओव्या’ यावर प्रियोळकरांनी एक अख्खे प्रकरणच लिहिले आहे.
‘माबाईच्या ओव्या’ हे दादोबांचे पद्यलेखन पुस्तकरूपाने प्रकाशित झाले होते की नाही याविषयी शंका आहे. त्याची इंग्रजीतील एक जाहिरात प्रा. प्रियोळकरांना सरकारी दप्तरखान्यात उपलब्ध झाली. ती जाहिरात त्यांनी पुस्तकात दिली आहे. (पृ. ३५१-३५२) परंतु शोध घेऊनही त्यांना ते पुस्तक छापील स्वरूपात सापडले नाही. या ओव्यांची वही, जी दादोबांच्या हस्ताक्षरात होती, ती वही म. म. दत्तो वामन पोतदारांना एका मुंबईच्या रद्दीवाल्याकडे सापडली. ती त्यांनी विकत घेतली. त्याची नकलून काढलेली प्रत प्रियोळकरांना मिळाली. मूळ प्रत प्रा. दत्तो वामन पोतदारांकडून कुठे तरी गहाळ झाली असावी, असा प्रियोळकरांचा तर्क आहे. प्रा. प्रियोळकरांनी या ‘माबाईच्या ओव्या’मधील काही ओव्या सदर पुस्तकात दिल्या आहेत. (पृ. ३५३-३६७) आणि असे म्हटले आहे की, ‘‘माबाईच्या उपलब्ध सर्व ओव्या या ठिकाणी देणे विस्तारभयास्तव शक्य नाही. शक्य झाले तर स्वतंत्र पुस्तकरूपाने त्या लवकरच प्रसिद्ध करण्यात येतील.’’ (पृ. ३५२)
हे पुस्तक प्रकाशित झालेले दिसत नाही, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे असे की, ती नकलून काढलेली वही तरी आज कुठे आहे? असेल तरी का? काय झाले असेल त्या वहीचे?
पुस्तकरूपात त्या देण्याच्या कामात नक्कीच काही तरी अडथळा आला असणार, पण मग प्रश्न असा पडतो की, १९४८ साली ‘मराठी संशोधन मंडळ’ स्थापन झाले. ऑक्टोबर १९५३ साली ‘मराठी संशोधन पत्रिका’ सुरू झाली, त्यामधून या ओव्या प्रियोळकरांनी का प्रकाशित केल्या नाहीत? प्रा. प्रियोळकर कलेक्शनमध्ये ही वही असेल का? शोध घ्यायला हवा, इतके त्याचे मोल विलक्षण आहे.
स्वीडनमध्ये राहणारा शास्त्रज्ञ व गूढवादी तत्त्ववेत्ता स्वीडनबोर्ग यांच्या धर्मविषयक ग्रंथांकडे दादोबा पुढच्या काळात वळले होते. त्यांनी स्वीडनबोर्गचे सर्व ग्रंथ वाचून काढले आणि त्याच्या विचारांना उत्तर देणारा एक ग्रंथ लिहिला. हा पत्ररूपी निबंध A Hindu Gentlemanls Reflections respecting the works of Emanuel Swedenborg १८७८ साली लंडन येथून प्रकाशित झाला होता. याचे मराठी भाषांतर दादोबांच्या मुलीने, अहिल्याबाई तर्खडकर यांनी मराठीत केले आहे. मूळ इंग्रजी पुस्तकावर न्या. महादेव गोिवद रानडे यांनी Poona Sarwajanik Sabha Quarterly १८७८ मध्ये परीक्षणही केले होते. मूळ इंग्रजी पुस्तकाची दुसरी आवृत्तीही प्रकाशित झाली होती. त्या मूळ प्रती आज कोणत्या ग्रंथालयात आहेत? इंग्रजी पुस्तकावर परदेशात अनेक नियतकालिकांत परीक्षणे येऊन गेली आहेत, ती जमा करायला हवीत.
प्रियोळकरांचे पुस्तक वाचताना काय काय करायला हवे याची एक यादीच समोर घुमत राहते. ती अशी :
१. A prize Essay on the native Female Education १८३९ हा मूळ निबंध मिळवणे. सदर निबंध पत्रिकेत, याच अंकात भाषांतरासह प्रकाशित केला आहे.
२. A Journal of a trip from Jawrah to Tonk in Malwa हे प्रवासवृत्त शोधायला हवे.
३. An Absurdity of the Holi Festival as it is now practised by the Hindus, १८२९ हे पुस्तक व त्याचा इंग्रजी अनुवाद मिळेल का, ते पाहायला हवे.
४. अप्रकाशित कोश कुठे असतील?
५. सर्वच्या सर्व व्याकरणाच्या आणि लघुव्याकरणाच्या आवृत्त्या कशा एका ठिकाणी जमा करता येतील?
६. मराठी नकाशांचे पुस्तक पुन्हा छापता येईल का? गुजराती नकाशांचे पुस्तक प्रियोळकरांना पाहायला मिळाले नाही, ते आपण पाहू शकणार आहोत का?
ही यादी आणखी खूप मोठी आहे, पण या द्विजन्मशताब्दीनिमित्ताने दादोबांच्या स्त्री-शिक्षणावरील निबंधाची प्रत मिळवण्याच्या मागे लागल्यानंतर काही बाबी पुढे आल्या. एक म्हणजे मूळ लेख प्राप्त झाला. स्त्री-शिक्षणावर दादोबांचे जे विचार आहेत ते प्रियोळकरांच्या पुस्तकात आलेले नाहीत. दुसरे असे की, त्यांच्या या लेखाचा शोध घेत असताना Review of Essays on Native Female Education या लेखाचा शोध लागला. त्यातील तिसरा पारितोषिकप्राप्त लेख हरि केशवजी आणि दादोबा पांडुरंग यांनी मिळून लिहिला असावा असे यावरून वाटते. हा मूळ लेख मिळवण्याचाच शोध सुरू आहे. हरि केशवजी व दादोबांनी मिळून लेख लिहिण्याचा दाखला प्रियोळकरांच्या पुस्तकात नाही. याचा एक अर्थ असा असेल का, की दादोबांचे स्त्री-शिक्षणविषयक कार्य अजून तरी समोर आलेले नाही? दादोबांचे कार्य अजूनही संशोधकांना चकवा देतेच आहे, असे म्हणावे काय?
दादोबा पांडुरंग आणि प्रा. अ. का. प्रियोळकर
९ मे १८१४ हा मराठी व्याकरणाचे पाणिनी म्हणून प्रख्यात असणाऱ्या दादोबा पांडुरंग तर्खडकर यांचा जन्मदिवस. समाजसुधारणा, व्याकरणनिर्मिती, लेखन संशोधन, शिक्षण व्यवस्थेत मोलाचे योगदान असणाऱ्या आणि मानवधर्म समाज, परमहंससभा, प्रार्थना समाज अशा अत्यंत महत्त्वाच्या संस्थांमध्ये सक्रिय सहभाग असणाऱ्या दादोबांच्या द्विजन्मशताब्दीनिमित्ताने हा लेख.
आणखी वाचा
First published on: 04-05-2014 at 01:49 IST
मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dadoba pandurang and prof ak priolkar