शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी १९९५ मध्ये गोहत्याबंदी कायद्याचे विधेयक महाराष्ट्रात मंजूर झाल्यानंतर लिहिलेल्या लेखाचा हा संपादित अंश; आजच्या चर्चेलाही योग्य आणि नेमकी दिशा देणारा..

गोवंशाचे संरक्षण म्हणजे केवळ कसाई-कत्तलीवर बंदी नाही. कसाईबंदीचा उपयोग कोणा जमातीला खिजविण्यासाठी होत असेल, पण त्यामुळे गाईंना मारण्याचे थांबणार नाही. कायद्याने बंदी घालून आजपर्यंत कोणतीच सुधारणा झाल्याचा दाखला नाही. अठरा वर्षांखालील मुलींची लग्ने सर्रास होतात. नवविधवा सती जात असल्याच्या बातम्या अजूनही येतात. दारूबंदी पोलिस खात्यालाच संपवून गेली. नवीन कायद्याने गोवंशाचे संरक्षण होणार, अशी कायदा करणाऱ्यांचीही कल्पना नसावी.

गोसंरक्षकांची विचारपद्धती किंवा निदान प्रचारप्रणाली काहीशी विचित्र आहे. गाईचा विषय निघाला, की ते काव्यमय भाषेत बोलू लागतात. गाय माता आहे, ‘गाय मरी तो बचा कौन?’ असे मोठय़ा निष्ठेने ते मांडतात. भारतीय गाईत काही अद्भुत गुण आहेत आणि तिच्या श्वासोच्छ्वासातून प्राणवायू बाहेर पडतो. तिच्या शेणात आणि मूत्रात काही विलक्षण पोषक, कीटकनाशक, आरोग्यदायक गुण आहेत, असे ते विज्ञानातील अर्धे कच्चे संदर्भ देऊन सांगू पाहतात. खत म्हणूनसुद्धा गाईच्या शेणमूत्राची मातब्बरी इतर कोणत्याही जनावरांच्या उत्सर्जनापेक्षा जास्त आहे, असे आग्रहाने सांगतात. गोरक्षण व गोसंवर्धन एवढय़ा एकच कलमी कार्यक्रमाने देश समृद्ध होण्याची ते खात्री सांगतात.

सर्वच जनावरे उपयुक्त पशू असतात; गाय हा विशेष उपयुक्त पशू. हे खरे असले तरी जगातील सर्व देशांत गाईंविषयी भावनिक जवळीक नाही. सहृदयतेच्या कारणाने किंवा अगदी अर्थशास्त्राच्या आधाराने कोणत्याही प्राण्याचा वध करू नये असे मांडता येईल. पण ते व्यवहारी हिशेबापोटी असावे. अगदी गांधीवादीसुद्धा अहिंसेचा आग्रह धरताना सर्व पशूंच्या कत्तलींवर बंदी घालावी, अशी मागणी करण्याचे धारिष्ट करीत नाहीत. त्यांची करुणा गाईपुरतीच मर्यादित राहते!

विज्ञानाचा किंवा अर्थशास्त्राचा आधार गोवंश रक्षणासाठी आवश्यक आहे असे मला वाटत नाही. गाईविषयीचा पूज्यभाव समाजात आहे, एवढे पुरे आहे. कोणतीच पूज्य भावना तर्कशास्त्राच्या विचक्षणेस उतरू शकत नाही. गाईच्याच बाबतीत अशी विचक्षणा का? सर्वसामान्य समाजाला गाय मारली जाऊ नये असे वाटत असेल, तर तसा कायदा करण्याचा त्यांना अधिकार आहे. गाईच्या श्वासात प्राणवायू आहे आणि प्रत्येक गाय ‘कामधेनू’च असते असला अवास्तव कांगावा करण्याची काहीच आवश्यकता नाही.

गाईविषयी प्रेम, आदर आणि करुणा भारतीय साहित्यात पूर्वापार आढळते. याउलट, बैल यज्ञयागात बळी देण्याची प्रथा वेदकालीन आहे. गोरक्षणाची परंपरा आहे, तशी बैल आणि वळू यांच्या रक्षणाची परंपरा भारतीय इतिहासात नाही. पण आधुनिक हिंदुत्ववाद्यांना त्यासाठी आपणास आवश्यक ते जनसमर्थन आहे असे वाटत असल्यास त्यांना कोण आणि कसे थांबविणार?

मध्य प्रदेशातील छत्तरपूर येथील गांधी स्मारक आश्रमात मुक्कामास असताना एका सवरेदयी नेत्याने गोरक्षणावर चांगले तास दोन तासांचे प्रवचन ऐकवले होते. ते गेल्यानंतर शेतकरी संघटनेच्या बैठकीस सुरवात झाली. मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांसमोर मी शेतीमालाच्या उत्पादन खर्चावर आधारित रास्त भावाचे विस्तृत निरूपण केले. सर्व प्रश्न सोडविण्याची गुरुकिल्ली रास्त भाव आहे, हे सांगितले. त्यानंतर एका शेतकरी कार्यकर्त्यांने उठून म्हटले, ‘‘शरदजी, तुमचा मुद्दा आम्हाला पटला. तुमच्या आंदोलनात आम्ही जरूर सामील होऊ. पण येथे मध्य प्रदेशात आमच्यापुढे त्याहीपेक्षा एक मोठी समस्या आहे. गावोगावी भाकड गाईंचे कळप संख्येने वाढत चालले आहेत. त्यांना पोसण्याची जबाबदारी साऱ्या गावाची.कुंपण नसले, तर कळपच्या कळप शेतात घुसून पिकाची धूळधाण करतात. शरदजी, हमे गायसे बचाओ, वाजिब दामका मामला हम निबट लेंगे।’’ शेतकऱ्यांच्या मनातील भावना आणि शेतकऱ्यांचे नाव पुढे करून बोलणाऱ्यांचे युक्तिवाद यातील तफावतीने मला मोठा धक्का बसला.

महाराष्ट्रात काही जिल्हे सोडल्यास असे मोकाट जनावरांचे कळप नाहीत. पण तरीदेखील दावणीला असलेल्या जनावरांची संख्या सारखी घटत असते हे रहस्य समजून घेण्यासाठी सोळा-सतरा वर्षांपूर्वी आम्ही बैलाचा उत्पादनखर्च काढण्याचा उपद्व्याप केला होता. जन्मल्यापासून अडीच-तीन वर्षे गोऱ्ह्याला चांगले पोसावे तेव्हा तो कामास येतो आणि वय झाल्यानंतर जुवाखालून निघाल्यानंतर चार-पाच वर्षे तरी बैलाला तसेच पोसावे लागते. मधल्या सात-आठ वर्षांच्या काळात तर त्यांच्या पोषणाचा खर्च खूपच वाढतो. पेंड, वैरण, हिरवा चारा काहीच तोडता येत नाही; नाहीतर, शेतीची कामे होतच नाहीत. सतरा वर्षांपूर्वी बैलाच्या आयुष्यात दर दिवशी त्याच्या खाण्याचा खर्च २८ रुपये येतो, असा निष्कर्ष निघाला. शेतातले गवत असले तरी ते काही फुकट नाही, तेही विकतच घेतले आहे असे गृहीत धरून हा हिशेब काढला होता. आयुष्यभर, वर्षभर दरदिवशी २८ रुपये खर्चून पोसलेल्या बैलाचा उपयोग त्याच्या उमेदीच्या वर्षांत दरवर्षी जास्तीत जास्त ४० दिवस असतो. त्या काळी भाडय़ाने बैलजोडी ३० रुपयाने मिळे. असे बैल ठेवणारा शेतकरी शेतीतून सहीसलामत जगण्यावाचण्याची शक्यता शून्य. त्याच्या शेणमूत्रामुळे होणारा फायदा लक्षात घेऊनही बैल ही न परवडणारी गोष्ट आहे, असा निष्कर्ष निघाला.

भारतात पवित्र मानली जाणारी एक वशिंडाची नंदी गाय. हिच्यात काही विशेष गुण आहे, यात काही शंका नाही. ती बिचारी अगदी दुष्काळाच्या काळातही जमिनीवर आलेले पेरभर वाळकेसाळके गवत खाऊन स्वत: गुजराण करते आणि जमेल तसे म्हणजे अर्धा लिटर, लिटर दूध कसोशीने देते. भारतातील शेतकरी ‘सव्‍‌र्हाव्हल टेक्नॉलॉजी’ वापरतो. ही भारतीय शेतकऱ्याची श्रेष्ठता; तसेच त्याची गाय दुष्काळात, इतर बिकट परिस्थितीत ती टिकून राहते हा तिचा मोठा गुण! नंदी गाईची बहीण संकरित गाय. तिच्या खाण्यापिण्यात आठवडाभर हयगय झाली, तर ती कायमची खराब होते. नंदी गाईच्या असल्या मिजाशी नाहीत, हे तिचे कौतुक.

पण ‘नंदी गाई’च्या या विशेष गुणाचा एक मोठा विपरीत परिणाम दिसून येतो. गाईची ही झेबू जात जगाच्या पाठीवर प्रामुख्याने भारतीय उपखंड आणि एका काळी त्याला संलग्न असणारा आफ्रिकेचा पूर्व किनारा येथेच सापडते. म्हणजे, या गाईचा राहण्याचा प्रदेश बांगला देश, भारत, पाकिस्तान, इथिओपिआ, टांझानिया आणि केनिया. आश्चर्याची गोष्ट अशी की नेमके हेच देश जगात सर्वात दरिद्री राहिले आहेत. सपाट पाठीच्या गाईंचे देश वैभवाच्या शिखरावर आहेत. म्हशी बाळगणारे थायलंड, कंबोडिया, मलेशियासारखे देश खाऊन-पिऊन सुखी आहेत. वशिंडाची गाय साऱ्या देशाची लक्ष्मी फस्त करून टाकते याचा हा सज्जड पुरावा आहे.

याचा अर्थ गोवंशाच्या कत्तलीस बंदी करू नये असा नाही. अशा बंदीमुळे देशात चैतन्य पसरणार असेल, तर तसे अवश्य केले पाहिजे. फक्त वाचलेल्या गाईंचे सड एकाकडे आणि खायचे तोंड दुसऱ्याकडे अशी विभागणी करून चालणार नाही. गाय आमची आई आहे, ती भली तोटय़ाची असो, तिला शेवटपर्यंत सुखाने पोसण्याचा आमचा निर्धार आहे. त्यासाठी काहीही किंमत द्यावी लागली तरी चालेल, असा जेथील आम जनतेचा निर्धार आहे, तेथे कत्तलीस बंदी जरूर झाली पाहिजे. पण बंदीमागोमाग इतरही काही पावले उचलली पाहिजेत. गाईची उत्पादकता सात-आठ वर्षे आणि आयुष्यमान बारा-तेरा वर्षे अशी परिस्थिती या कायद्याने तयार होईल. भाकड काळात गाईला पोसायचे कोणी? शहरी धर्ममरतडांनी गोपूजनाच्या गोष्टी सांगायच्या आणि तिला पोसायचे ओझे मात्र शेतकऱ्यांवर अशी व्यवस्था टिकू शकणार नाही. कत्तलखान्यातील कत्तली थांबतील, पण शेतकऱ्याच्या घरची हेळसांड थोडीच थांबणार आहे? कत्तलीवर बंदी घातली तर मेलेल्या जनावरांचा उपयोग करण्यात आला असे नाटक वठवता येईल. मग, गायबैल खरोखरच नैसर्गिकरीत्या मेले, की खाण्यापिण्याची हेळसांड झाल्यामुळे मेले, की औषध घालून मारले गेले याची प्रत्येक वेळी चौकशी करावी लागेल. प्रत्येक गायबैलाचे शवविच्छेदन करावे लागेल. शेतकऱ्यांना कचाटय़ात पकडून त्यांच्याकडून दक्षिणा उकळू पाहणाऱ्या नोकरशहांची आणखीच चंगळ होईल.

गोवंश हत्याबंदी पशुपालनाच्या सर्व सिद्धांतविरुद्ध आहे. गाईचा गोठा किफायतशीर व्हायचा असेल तर कळपातील गाईंची दररोजच्या दुधाची सरासरी आठ लिटर तरी असली पाहिजे. म्हणजे, वितानंतर वीस-बावीस लिटरपेक्षा कमी दूध देणारी गाय आर्थिकदृष्टय़ा निव्वळ बोजा आहे. चांगल्या चांगल्या गाईंचे संवर्धन आणि कमस्सल गाईंना गोठय़ातून काढणे ही दूध उत्पादनातील आणि यशस्वी पशुसंवर्धानातील गुरुकिल्ली आहे. त्यांचा मान राखला नाही तर काय होईल? गाईंची पूजा करणाऱ्या भारतातील गाई सर्वात कमअस्सल आणि जेथे गाय खाल्ली जाते, तेथे गाईच्या सवरेत्कृष्ट जातींचे संवर्धन असे विचित्र दृश्य चालूच राहील.

पण हे सर्व बाजूला ठेवून, भावनेपोटी, गाईंची कत्तल होता कामा नये असा आग्रह धरण्यात चूक काही नाही. तसे करायचे ठरले तर येथील दुधाची किंमत जगातील इतर देशांच्या तुलनेने निदान दुप्पट राहील. ती देण्याची तयारी, गाईविषयी पूज्य भावना बाळगणाऱ्यांनी ठेवली पाहिजे. ‘तुम्ही गाई सांभाळा आम्ही वसुबारसेला हळद-कुंकू वाहू’ असली दांभिकता काय कामाची?

नवी विटी आली आहे, नवे राज्य चालू आहे. समाजवादाच्या घोषणा संपल्या, हिंदुत्वाच्या सुरू झाल्या आहेत. हाही आजार ओसरला म्हणजे माणसे माणसासारखा विचार करू लागतील, अशी आशा बाळगायला काय हरकत आहे!

मूळ लेख ‘शेतकरी संघटक’ मध्ये ‘गोवंश हत्या बंदी? नव्हे, ‘गो’पाल हत्या’ या शीर्षकाने छापला गेला होता.