गेली कित्येक वर्षे अधूनमधून पण एखाद्या गर्हणीय प्रकारानंतर काही काळ सतत (खून, बलात्कार, नरबळी, चमत्काराच्या हव्यासापोटी घडणारे प्रकार) ‘पुरोगामी महाराष्ट्रा’ला कलंक या वा अशा उद्गारांची लवंगी फटाका लडी सर्वपक्षीय नेते, भाष्यकार, (अशा, दरगावी शेकडय़ांनी वावरणाऱ्या भाष्यकारांना ‘विचारवंत’ असे संबोधले जातेच.) चळवळीतले कार्यकर्ते लावतात. दृक्श्राव्य युगात तर याला ऊत येतो, कारण त्यातल्या बहुतेक अँकर्सना समोरच्याला अमर्याद उलटतपासणीसाठी आपल्या हाती दिला आहे, असा ‘भ्रम’ असतो.
प्रश्न असा आहे, की महाराष्ट्र ‘पुरोगामी’ आहे हे मिथक आहे हे आपण मान्य का करत नाही?
कालबाहय़ पेशवाई मोडीत निघाल्यावर प्रथम लोकहितवादी, (१८५७च्या आधी) पुढे महात्मा फुले, न्या. रानडे, आगरकर, शाहूमहाराज, डॉ. आंबेडकर, महर्षी कर्वे.. असंख्य नावे या प्रबोधनाच्या प्रवाहात आहेत. यात काही फक्त विचार पेरणारे, तर काही कार्यमग्न, काही विचार-कृती अशा दोन्ही आघाडय़ांवर वावर असणारे अशा उपधाराही दिसतात. हे प्रबोधनपर्व सुरू होण्याच्या खूप आधीच्या काळात संत मंडळाने आपापल्या रचनांमधून समाजाला गर्तेतून बाहेर काढण्यासाठी विचार पेरले होतेच. भारताच्या इतरही भागांत हे सर्व घडले पण संख्या, सातत्य याबाबत महाराष्ट्र आघाडीवर राहिला. इतके सर्व होऊनही या व्यक्ती पुरोगामी विचारांच्या होत्या, त्या कार्यात होत्या, वंदनीय आहेत, यापुढे महाराष्ट्र गेला नाही. आजही नाही. ही प्रबोधनपरंपरा साधारणत: १७५ वर्षांची आहे. यातल्या व्यक्तींचे विचार पुरोगामी, अंधारयुगातून बाहेर पडण्याचा मार्ग निर्देशित करणारे होते. हा वादविषय नाही. प्रश्न एक मोठा समाज म्हणून आपण पुरोगामी आहोत का?
याचा अर्थ आजही महाराष्ट्र १८१८च्या काळातच वावरत आहे असा नाही. बदल घडला, पण तो औद्योगिकीकरणाच्या रेटय़ामुळे. पुणे-मुंबई रेल्वे सुरू झाल्यावर या आगगाडीच्या डब्यांत शिवाशिव टाळण्यासाठी ब्राह्मणांना निराळा डबा हवा ही मागणी झाली. ही मान्य न झाल्यामुळे ‘नाइलाज’ म्हणून ते स्वीकारले गेले. रुळले. आज प्रवास, हॉटेल्स, अशा ठिकाणी ही मागणी कुणीही करत नाही हे एक उदाहरण. या आधुनिक उद्योगरेटय़ामुळे घडलेल्या बदलांची यादी मोठी आहे. मात्र हे बदल नाइलाज म्हणून स्वीकारलेल्या समाजाने ‘शास्त्रकाटय़ाची कसोटी’ मनोमन आजही आपलीशी केलेली नाही.
याचा अर्थ आपण औद्योगिकीकरण स्वीकारले, पण ज्या भौतिकशास्त्रांच्या प्रगतीमुळे हे उद्योगयुग शक्य झाले, त्यामागचे तत्त्वज्ञान आपलेसे केले नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे स्वत:ला कडवे निष्ठावंत अनुयायी मानणाऱ्या किती घरांमध्ये श्राद्धपक्ष, दहावे ते तेरावे, मंत्राग्नी यांना निरोप दिला गेला? महात्मा फुले यांचे विचारकार्य शंभर वर्षांहून जास्त काळ उलटलेले. मात्र १९६०पर्यंत जोतिबा बहुतांशी विस्मृतीत का राहिले? आयुष्यभर गोरगरिबांना अंधश्रद्धेतून बाहेर काढणे हा एकच नारा समोर ‘आणिक पायतळी अंगार’ अवस्थेत देह झिजवलेल्या गाडगेबाबांचे देऊळ अमरावतीत उभे आहे, तिथे नवस बोलले जातात. एरवी अंगात कुठला तरी स्थानिक देव/देवी येणाऱ्या स्त्रीच्या आयुष्यात ‘बुद्धवादी’ झाल्यावर डॉ. बाबासाहेबच येऊ लागतात, मानवत, खैरलांजी हे प्रकार फार जुने नाहीत.
सर्वप्रथम मार्ग चोखाळला जातो. दुर्लक्ष करणे ही विवेकाच्या प्रवासातली मांडणी आहे. त्यात या दुर्लक्षित ठेवलेल्या महनीयांमधली दोन नावे म्हणजे बडोद्याचे (मूळ नाव वडोदरा) सयाजीराव गायकवाड आणि विठ्ठल रामजी शिंदे. व्यक्तीच दुर्लक्षित करणे यासोबत दुसरा म्हणजे विचारांना मान डोलावणे, वाहवा करणे आणि विसरून जाणे. आणखी एक लोकप्रिय मार्ग म्हणजे त्या व्यक्तीचा देव करणे. एकदा दैवतस्थान दिले म्हणजे पुढे काही करायला लागत नाही. जयंती व पुण्यतिथीला जय हो, जय हो, हारफुले, नक्राश्रू यांवर भागते.
एखादा विचार व्यक्तीची एखादी कृती यामागील कार्यकारणभाव, संगती असे सर्व दुर्लक्षित ठेवून सर्व रोख व्यक्तिकेंद्रित करणे, व्यक्तीला पूजा वा दुर्लक्ष वा द्वेषाचे लक्ष्य बनवणे हा आपला स्थायीभाव आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधींपासून कुणीही ‘महात्मा’ हे बिरूद मान्य केल्यावरही असेल तरी त्याची एखादी कृती, मुद्दा मान्य-अमान्य असू शकते, परिस्थितीचे वाचन चुकलेले असू शकते, प्रसंगी फार मोठी चुकीची कृतीही असू शकते. याची चर्चा व/वा विश्लेषण याला कुणी हात घातलाच तर ‘खबरदार, कोण आहे रे तिकडे’ असे दरडावत आपापले हितसंबंध यांच्या वाढ व जपणुकीसाठी झटणाऱ्या महाराष्ट्राला ‘पुरोगामी’ म्हणायचे कसे? ‘या व्यक्तिपूजेच्या मानसिकतेतून बाहेर या, सावध’ असा इशारा नरहर कुरुंदकरांसारख्या प्रज्ञावंताने वारंवार दिला. प्रश्न, विचार, कृती यावर लक्ष केंद्रित करावे. व्यक्तीवर नव्हे, हेही आपण ऐकून विस्मरणात टाकले. एवढेच नव्हे तर जास्त हिरिरीने व्यक्तिपूजक झालो. तरीही ‘पुरोगामी?’ केंद्र-राज्य यांच्या कृती, त्यातल्या धुरीणांचे वागणे, उद्गार ‘राज्यघटना’ या एकाच निकषावर आपण तपासतो का? उद्योगयुगातल्या सर्व सुखसोयी हव्यात, मात्र मन अजूनही मध्ययुगात वावरणार, अशा समाजाला ‘पुरोगामी’ कसे म्हणावे? अजून कार्ल मार्क्सचे देऊळ कुणी उभारल्याचे ऐकिवात नाही. दिवंगत स्नेही नरेंद्र दाभोलकर यांचे विचार सोडा, त्यांचे नावही उद्या विस्मृतीत ‘ढकलले’ जाणार नाहीच याची खात्री या ‘पुरोगामी’ महाराष्ट्रात कोण देऊ शकेल?
संग्रहित लेख, दिनांक 25th Aug 2013 रोजी प्रकाशित
महाराष्ट्राला ‘पुरोगामी’ म्हणायचे कसे?
गेली कित्येक वर्षे अधूनमधून पण एखाद्या गर्हणीय प्रकारानंतर काही काळ सतत (खून, बलात्कार, नरबळी, चमत्काराच्या हव्यासापोटी घडणारे प्रकार) ‘पुरोगामी महाराष्ट्रा’ला
First published on: 25-08-2013 at 06:16 IST
मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to call maharastra progressive