लोकशाही हे मूल्य म्हणून लोक फार मानतात, पण लोकशाहीतील सहभाग मात्र कमी असतो किंवा होतो -लोकशाहीच्या वाटचालीवर- लोकांचा असलेला विश्वासही उडू शकतो, अशी मांडणी करून लोकशाहीचे त्रांगडे (‘पॅराडॉक्स ऑफ डेमोक्रसी’) सोडविण्याचा प्रयत्न प्रा. रॉबर्ट डाल यांनी एकविसाव्या शतकात केला. समाजशास्त्राच्या भिंगातून राज्यशास्त्राचा अभ्यास हे प्रा. डाल यांचे वैशिष्टय़ असे. या रीतीने वास्तववादी मांडणी केल्याने प्रा. डाल यांचे अनेक निष्कर्ष सर्वमान्य ठरले. अलीकडेच त्यांचे निधन झाले. त्यांच्या कर्तृत्वाची ही अल्प ओळख.
In many of the oldest and most stable democratic countries, citizens possess little confidence in some key democratic institutions. Yet most citizens continue to believe in the desirability of democracy.
    –  Robert A. Dahl
राज्यशास्त्राच्या अभ्यासात १९४० ते १९८९ अशा मोठय़ा काळात, महत्त्वाची भर घालणारे प्रा. रॉबर्ट डाल वयपरत्वे ९८ व्या वर्षी, ५ फेब्रुवारीस निवर्तले. त्यांना आदरांजली वाहणे, हा या लेखाचा एक प्राथमिक हेतू; परंतु डाल यांनी राज्यशास्त्राच्या अभ्यासात जी भर घातली, तिची ओळख आपण करून घेणे अधिक आवश्यक आहे. वृत्तपत्रांकडे येणाऱ्या वाचक-पत्रांतून किंवा आजकाल ब्लॉग अथवा फेसबुकसारख्या समाजमाध्यमांतून राजकारणाविषयीची सामान्य माणसाची मते व्यक्त होऊ लागली आहेत. ही मुखरता सामान्य माणसाकडे कमी होती, इंटरनेट नव्हते आणि छपाईही महाग होती त्या काळात ‘सामान्य माणसाची मते’ हा राज्यशास्त्राचा एक केंद्रबिंदू मानण्याचे धैर्य प्रा. डाल यांनी दाखविले होते, हे त्यांच्या विचारांना जगाशी जोडणारे औचित्य होय.
‘सामान्य माणूस’ हे संबोधनच मला नामंजूर आहे. माणसे सामान्य अजिबात नसतात. त्यांच्याकडे अन्य काही नसले, तरी ‘कॉमनसेन्स’ असतोच असतो, असे विधान मार्गारेट लेव्ही यांच्याशी बातचीत करताना डाल यांनी  केले होते, ते डाल यांनी त्यांच्या प्रदीर्घ अभ्यासकाळात केलेल्या समग्र कार्याला शोभणारेच आहे. अलास्कातील एका गावात नोकरीपायी गेलेल्या डॉक्टर डाल यांचा रॉबर्ट हा मुलगा, शिक्षणखर्च भागवण्यासाठी सतरा प्रकारची कामे करून आणि सरकारीच काय पण सैन्यातही नोकरी करून मोठा झाला असल्याने सामान्य माणसाकडे पाहणे सोपे गेले. तसेही या मुलाखतीतच प्रा. डाल यांनी म्हटले होते. अर्थात, अभ्यासक म्हणून माणसे मोठी होतात, ती अशा भावनिक बांधीलकीने नव्हे. त्यासाठी वैचारिक शिस्त आणि अभ्यासपद्धतीवर विश्वास आवश्यक असतो. प्रसंगी नवी अभ्यासपद्धत शोधण्याचे धैर्य लागते. डाल यांचा पहिला अभ्यास- न्यू हेवन्स या गावातील स्थानिक स्वराज्य संस्थांसह तेथील लोकशाहीत कोण कोण कसकसे सहभागी आहे याबाबत होता. ‘हू गव्हर्नस्?’ या नावाने तो प्रकाशित झाला. त्या गावातील हितसंबंधांचाच हा अभ्यास होता आणि त्यासाठी अगदी सूक्ष्म तपशील डाल यांनी जमविला होता. समाजशास्त्राच्या अभ्यासपद्धतींची जोड राज्यशास्त्राच्या अभ्यासाला देण्याची शैली आता नवी राहिलेली नाही. भारतात तर, जातीपातींच्या वास्तवाने लोकशाही कशी घडली याचे अभ्यास अशा पद्धतीने आता सिद्ध झालेले आहेत. परंतु या पद्धतीने राज्यशास्त्राचा अभ्यास इतका काटेकोर करता येतो, हे डाल यांनी त्या वेळी दाखवून दिले. वर्तनाभ्यास पद्धती (बिहेवियरल रीसर्च) आणि निरीक्षण-गणनपद्धती (एम्पिरिकल रिसर्च) यांचा वापर डाल यांनी योग्यरीत्या केला. ही पद्धती पुढे त्यांनी ‘व्हॅल्यू’ किंवा राजकीय ‘मूल्य’मापन या संकल्पनेचा विस्तार करण्यासाठी वापरली. राज्यकर्ते आणि राजकारणाशी संबंधित नागरिक हे राजकीय मूल्यांचे मापन आपापल्या पद्धतीने करीत असतात, असे निष्कर्ष यातून नोंदविले गेले.
 मात्र यापुढले- सर्वच नागरिक राजकारणात रस घेत नाहीत ते का, आणि अनेक लोकांना राजकारणात रसच नसेल तरीही राज्यव्यवस्थेला ‘लोकशाही’ का म्हणायचे, हे प्रश्न डाल यांना पुढल्या काळात पडले. एव्हाना, वॉशिंग्टन विद्यापीठातील शिक्षण पूर्ण करून प्रा. डाल येल विद्यापीठात रुजू झाले होते. महायुद्ध सरले होते आणि महासत्ता म्हणून अमेरिकेचा उदय स्पष्ट असतानाच, आमची लोकशाही चांगली की तुमची, असा तंटा कम्युनिस्ट राजवटी आणि भांडवलशाही राजवटी यांत उभा राहिला होता. राज्यशास्त्राच्या अभ्यासातील गुरुतुल्य व्यक्तिमत्त्व प्रा. हेराल्ड लास्की यांनी १९१९ साली आधुनिक लोकशाहीच्या वर्तनाभ्यासाची सुरुवात केली होती आणि पुढल्या पिढीत त्यांचे कार्य प्रा. डाल यांच्यासारख्यांनी पुढे नेले, हे खरे. परंतु नागरिकांना राजकारणात रस नसूनही लोकशाही टिकते कशी, एखादा मोठा बहुमताचा गट लोकशाहीला गिळंकृत करून हुकूमशाही चालवू शकतो.. तसे का होताना दिसत नाही, हे प्रश्न प्रा. डाल यांना, निव्वळ वर्तनाभ्यासाच्या पलीकडे पाहावयास लावणारे ठरले. लोकांना रस नाही, हे निरीक्षण-गणनाने सिद्ध करता येते. परंतु प्रश्नाचा पुढला भाग- ‘याला लोकशाही का म्हणावे?’ – त्याच्या उत्तरासाठी प्रा. डाल यांना अॅरिस्टॉटलपर्यंत मागे पाहावे लागले. मग विचारपद्धतींतील ‘अभिजात’ आणि ‘आधुनिक’ हे भेद गळाले आणि उरले ते मर्म. ते हे की, लोकशाहीपेक्षा या राज्यव्यवस्थेस ‘पॉलिआर्की’ असे म्हणावे लागेल.
पॉलिआर्की म्हणजे बहुमत-शाही नव्हे (बहुविधशाही असे तिला तात्पुरत्या सोयीसाठी म्हणू). बहुमतशाहीत ज्यांच्याकडे बहुमत त्यांचीच सरशी असा जो सरळ हिशेब आहे, तो पॉलिआर्कीत असू शकत नाही. लोकशाही म्हणून वावरणाऱ्या राजकीय प्रदेशातील नाना प्रकारचे सामाजिक/ आर्थिक गट अनेकदा सामाजिक किंवा अन्य प्रकारच्या (पण राजकीय नव्हे) प्रतिनिधींमार्फत कार्यरत असू शकतात. अशा गटांचे निरनिराळे- विविधांगी हितसंबंध जपण्याच्या आश्वासनांनी मिळवलेले बहुमत ‘पॉलिआर्की’कडे नेणारे ठरते. पॉलिआर्की हे अर्थातच आदर्श राज्य नव्हे. आदर्श लोकशाहीचाच. पण व्यवहारात लोकशाहीचे काय होते, ते प्रा. डाल यांनी दाखवून दिले.
लोकशाहीचा आदर्श आणि लोकशाहीचा (पॉलिआर्कीपर्यंत फार तर जाऊ शकणारा) व्यवहार या दुविधेने उत्तरायुष्यात प्रा. डाल यांच्या अभ्यासाला दिशा दिली. डेमोक्रसी अॅण्ड इट्स क्रिटिक्स’ (१९८९) यासारखे- पुढे प्रा. डाल यांचा ‘मास्टरपीस’ म्हणवले गेलेले पुस्तक यातूनच सिद्ध झाले. ‘लोक’ म्हणजे कोण? ते राज्यासाठी काय करतात? लोक राज्य करतात, ते कसे? या प्रश्नांची व्यवहारातील उत्तरे शोधण्यासाठी वयाच्या पन्नाशीनंतर प्रा. डाल सिद्ध झाले होते. याच प्रश्नांची छापील उत्तरे राज्यघटनांपासून ते नागरिकशास्त्राच्या पुस्तकापर्यंत मिळत असतात, परंतु व्यवहारातील उत्तरांसाठी लोकांच्या वर्तनाकडे पाहावे लागते आणि ते असेच का वागताहेत, याचा तत्त्वशोधही घ्यावा लागतो. हे प्रा. डाल यांनी केले. लोकांचा सहभाग का वाढत नाही आणि सहभाग नसूनही राज्याने आपणासाठी काम करावे याकरिता लोकसमूह काही करतात का, याचा हा अभ्यास होता. आपण भारतीय मंडळी, राजकारणाबद्दलच्या गप्पा जेव्हा हाणतो, तेव्हा हे सारे लोकव्यवहार आपल्याला अवगत असतात. परंतु राज्यशास्त्रीय अभ्यासाच्या चौकटीतून हे व्यवहार पाहण्याची, काहीशी उफराटी दिशा प्रा. डाल यांनी शोधली.
लोकसहभागासाठी अनेक गोष्टी आवश्यक असतात. हक्क, लोकशिक्षण हे सारे ‘राजकीय समते’कडे नेणारे घटक आहेत. अशी ‘राजकीय समता’ पॉलिआर्कीची लोकशाहीकडे वाटचाल होण्यासाठी आवश्यक आहे, अशी मांडणी प्रा. डाल यांनी यानंतर केलेली दिसते. म्हणजे येथे, एका संकल्पनेकडून दुसऱ्या संकल्पनेकडे त्यांचा प्रवास होताना दिसतो. ‘राजकीय समता’ ही संकल्पना राजकारणातील सहभागाच्या मापनापुरतीच असल्याने, समतेच्या अन्य कल्पनांवर होतो तसा स्वप्नाळूपणाचा भलाबुरा आरोप त्या संकल्पनेवर झाला नाही. टीकाकारांनीही तिच्याकडे लोकशाहीच्या पूर्वअटींची बेरीज म्हणूनच पाहिले.
लोकशाही हे मूल्य म्हणून लोक फार मानतात, पण लोकशाहीतील सहभाग मात्र कमी असतो किंवा होतो -लोकशाहीच्या वाटचालीवर- म्हणजे ‘डेमोक्रॅटिक प्रोसीजर’वर लोकांचा असलेला विश्वासही उडू शकतो, अशी मांडणी करून लोकशाहीचे त्रांगडे (‘पॅराडॉक्स ऑफ डेमोक्रसी’) सोडविण्याचा प्रयत्न प्रा. डाल यांनी एकविसाव्या शतकात केला. याच मांडणीची बीजे ‘लोकांना स्वातंत्र्य द्या- सरकार त्यांच्या मागे लावू नका’ अशा विधानांतून प्रा. डाल यांनी (नेमके रेगन काळात!) रोवली होती.
भारतासारख्या व्यामिश्र लोकशाहीकडे त्यांचे लक्ष कमी होते. त्यांचे अनेक अभ्यास हे अमेरिकेपुरतेच आहेत आणि युरोपीय देशांचे अभ्यास त्यांच्या सहकाऱ्यांनी केले, त्यावरही त्यांनी आपले निष्कर्ष आधारले आहेत. त्यामुळे प्रा. डाल यांच्या एकंदर अभ्यासकार्याला मर्यादा आहेतच. तरीही लोकशाहीवरील निष्ठा जपणारा लोकशाहीच्या वास्तवाचा मर्मज्ञ म्हणून त्यांचे स्मरण होत राहील.

Pratap Patil Chikhlikar on Ashok Chavan
Pratap Patil Chikhlikar : प्रताप पाटील चिखलीकरांचा अशोक चव्हाणांना मोठा इशारा; म्हणाले, “जर कोणात खुमखुमी असेल तर…”
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
veteran actor amol palekar remark in jaipur literature festival 2025
जयपूर साहित्य महोत्सव :सध्या सरकारविरोधात जो बोलतो तो देशद्रोही; अमोल पालेकर यांचे परखड मत
Budget 2025 Is By The People, For The People, Says FM nirmala sitharaman
अर्थसंकल्प केवळ लोकांचा, लोकांसाठी – सीतारामन; मोदी यांच्या आग्रहामुळेच करकपात केल्याची माहिती
NGO , social work, transparency, accountability,
संस्थांची संस्थाने होताना..
Prithviraj Chavan On Budget 2025
Prithviraj Chavan : “अर्थसंकल्पाने आमची घोर निराशा केली”, पृथ्वीराज चव्हाण यांची अर्थसंकल्पावरून टीका
New Guardian Minister Ajit Pawar is visiting Beed tomorrow
उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या बीडमध्ये
One Nation One Election
One Nation One Election : ‘एक देश, एक निवडणूक’ अहवालाच्या मसूद्यासाठी किती पैसे खर्च झाले? सरकारने सांगितलेल्या आकड्यावर विश्वास बसणार नाही
Story img Loader