ज्येष्ठ साहित्यिक, उत्तम कीर्तनकार आणि ‘वक्ता दशसहस्रेषु’ अशी ख्याती असलेल्या राम शेवाळकर यांची महाराष्ट्रातील फर्डे आणि प्रभावी वक्ते म्हणून ओळख होती. ‘महाभारतातील स्त्री-शक्ती’ या विषयावर त्यांनी दिलेल्या एका व्याख्यानाचा हा संपादित भाग.
आजच्या व्याख्यानामध्ये मी आपणासमोर महाभारतातील स्त्री-शक्ती मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. विषय असा ठेवण्याचं कारण महाभारत हा एक प्रचंड असा महाकाव्याचा ग्रंथ आहे. महाभारताची अठरा र्पव आणि हरिवंश नावाचं खिलपर्व घेऊन एकूण एक लाख श्लोक आहेत. महाभारत ही एका वंशाची कहाणी आहे आणि जवळजवळ त्या वंशाच्या चार पिढय़ा महाभारतामध्ये चित्रित झाल्या आहेत.
महाभारतामध्ये पुरुषपात्रं अनेक, तर स्त्रीपात्रं संख्येने कमी आहेत. स्त्रियांची नावं घ्यायची झाली तर कुठली नावं येतात तुमच्या डोळ्यांसमोर? गांधारी, कुंती, द्रौपदीचं नाव येतं. महाभारतामध्ये स्त्रीपात्रं पुरुषपात्रांपेक्षा संख्येने जरी अल्प असली तरी प्रभावाने अधिक मोठी आहेत.
गांधारीने जाणून बुजून जन्मांध नवरा पत्करलेला आहे आणि एकदा जन्मांध नवरा आपल्या वाटय़ाला आल्यानंतर या बाईने निर्धारपूर्वक आपल्याला मिळालेली दृष्टी जन्माची बंदिस्त करून टाकली आहे. जे जग नवऱ्याला पाहता येत नाही, ते जग पाहण्याचा आपल्याला अधिकार नाही, या भावनेने ती स्वत: आंधळी बनली आहे. जन्मभर ते आंधळेपण तिनं मिरवलं, त्याबद्दल कुठेही तक्रार केली नाही आणि दुर्योधनासह शंभर पुत्रांची माता असली तरी या बाईनं आपल्या बुद्धीचा, भावनेचा तोल कधी जाऊ दिला नाही. त्यामुळे ही बाई सतत सत्पक्षाच्या अनुकूल राहिली. युद्धाच्या वेळी दुर्योधन पाया पडायला येऊन आशीर्वाद मागायचा तेव्हा ‘ज्या ठिकाणी सत्य आणि न्याय आहे त्या ठिकाणी जय राहील’, असेच म्हणायची. भर राज्यसभेत द्रौपदीची विटंबना व्हायची पाळी आली त्या वेळी झालेल्या हाहाकाराने हतबल होऊन बसलेल्या जन्मांध सत्तेला आपल्या तेजस्वी वाग्बाणांनी वठणीवर आणण्याकरिता गांधारीने प्रयत्न केले. ‘तुम्हाला दृष्टी नाही. पण कान आहेत. तेव्हा तुमच्यासमोर काय चाललं आहे ते तुम्हाला दिसत नसेल, पण ऐकायला आलं असेल. काय चालू आहे हे? त्या वेळच्या हस्तिनापूरच्या सत्तेला अत्यंत निर्भयपणे परखड बोल सुनविण्याइतकी तेजस्विता गांधारी होती.
उरलेल्या दोन स्त्रियांतील एक सासू आणि दुसरी सून आहे. कुंती आणि द्रौपदी यांच्यात एक विलक्षण साम्य आहे. प्रत्येकीचा विवाहाच्या निमित्ताने एकापेक्षा अधिक पुरुषांशी संबंध आलेला आहे. या दोघीजणी या मातृ आणि पितृसुखाला आचवलेल्या आहेत. कुंतीलासुद्धा जन्मदाता होता, पण बाप नव्हता. जन्मदात्री होती, पण आई नव्हती. कुंतीसुद्धा दुसऱ्याच्या घरामध्ये वाढलेली आहे. द्रौपदीचं प्राक्तन तेच आहे. द्रोणाचार्याकडून अपमानित होऊन परतल्यानंतर ज्याने माझा अपमान केला त्या द्रोणाचार्याचा वध करील असा पुत्र व्हावा आणि ज्याने माझा पराभव केला त्या अर्जुनाला अर्पण करता येईल अशी कन्या व्हावी या उद्देशाने द्रुपदाने यज्ञ केला. त्या यज्ञज्वालेतून दृष्टद्युम्न आणि द्रौपदी निघाले.
द्रौपदी आणि कुंती दोघीजणी राजकन्या, राजपत्नी आणि राजमाताही होत्या. पण दोघींच्याही नशिबाचा वनवास सुटला नाही. काही दिवस पंडूनं राज्याचा उपभोग घेतला, नंतर वैराग्य उत्पन्न झाल्यामुळे सर्व भार धृतराष्ट्रावर सोपवून अरण्यात निघून गेला. कुंतीही माद्रीबरोबर त्याच्या मागोमाग गेली. पंडूच्या आकस्मिक निधनानंतर माद्री सती गेली आणि पाच मुलं पोटाशी घेऊन कुंतीची वणवण सुरू झाली. द्युतासारख्या हलकट खेळामध्ये जो द्रौपदीला पणाला लावतो, ज्या तोंडाने तिचा पण उच्चारतो त्याच तोंडाने ‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्रदेवता:’ असं म्हणतो. त्या आपल्या पत्नीला द्रौपदीला पणाला लावण्याचा विचार ज्या क्षणी युधिष्ठिराच्या मनात आला तो माझ्या देशाच्या इतिहासातला अत्यंत काळाकुट्ट असा दुर्दैवाचा क्षण आहे.
अर्जुन हातात शस्त्र घेऊन अश्वत्थाम्याला मारण्यासाठी पुढे झाला तेव्हा तो कितीही अधम आणि दुष्ट असला तरी तो गुरुपुत्र आहे. गुरुपुत्र अवध्य असतो म्हणून त्याला मारू नका असं सांगून द्रौपदी म्हणाली, हा कितीही हलकट असला तरी तो त्याच्या आईचा एकुलता एक पुत्र आहे. याला आपण ठार मारलं तर त्याची आई निपुत्रिक होईल आणि निपुत्रिकपणाचं दु:ख किती दाहक असतं याचा पाचपटीनं ताजा, भळभळता अनुभव मी नुकताच घेतलेला आहे. जो माझ्या वाटय़ाला आला तो त्याच्या आईच्या वाटय़ाला जाऊ नये अशी माझी इच्छा आहे. म्हणून त्याला सोडून द्या’. ज्याने काही काळापूर्वीच जिच्या पाच पोरांचा जीव घेतला त्यालासुद्धा वाचवण्याइतकं द्रौपदीचं वात्सल्य विशाल होतं. त्या हलकट शत्रूवरसुद्धा मायेचं पांघरुण घालण्याइतकं तिचं मातृत्व व्यापक झालं. म्हणून मी म्हणालो, सासू आणि सून या दोघींचंही मनाचं औदार्य फार थोर होतं. या दोघींतील विलक्षण गुण, विलक्षण शक्ती यामुळे महाभारतात पुरुषपात्र अधिक तरीसुद्धा पुरुषपात्रांच्या प्रभावांना निष्प्रभ करून टाकतील एवढय़ा त्या परिणामकारक आणि श्रेष्ठ ठरतात. महाभारतातील मला अभिप्रेत असलेली जी स्त्री-शक्ती आहे ती ही आहे. ही शक्ती प्रकट करण्याकरता यापैकी एकाही स्त्रीने हातामध्ये शस्त्र घेतलेलं नाही. रणांगणावर पाऊल टाकलेलं नाही. या स्त्रियांची जी शक्ती होती त्या तेजाचं दर्शन घडविणाऱ्या महर्षी व्यासांच्या प्रतिभेला आणि स्त्री-शक्तीच्या प्रभावाला आपल्या सर्वाच्या वतीनं अभिवादन करतो. (विदर्भ साहित्य संघ प्रकाशित आणि वि. स. जोग संपादित ‘वक्ता दशसहस्त्रेषु – प्रा. राम शेवाळकर यांची भाषणे’ या पुस्तकावरून साभार)
संकलन – शेखर जोशी
नाथे समूह प्रस्तुत आणि पृथ्वी एडिफाइस व भारतीय आयुर्विमा मंडळ यांच्या सहकार्याने आणि जनकल्याण सहकारी बँक लिमिटेड व तन्वी हर्बल्स यांच्या मदतीने राज्यातील आठ केंद्रांवर झालेल्या ‘लोकसत्ता’ वक्तृत्व स्पर्धेची अंतिम फेरी शनिवारी आहे.