सदाशिव अमरापूरकर यांच्या आयुष्याचा फार मोठा भाग ग्रामीण जीवनानं व्यापला होता. जन्मगाव (नगर जिल्ह्य़ातील) शेवगाव तालुक्यातील अमरापूर (ज्यावरून त्यांचं नाव अमरापूरकर पडलं), धोरजळ आणि देवाची आळंदी या तीन ठिकाणी त्यांचं बालपण गेलं. त्यांचे वडील शेती करायचे. शेत नांगरणं, मोट चालवणं, बैलांना चारा घालणं, गाईचं दूध काढणं, जत्रेत बैल पळवणं या सगळ्या गोष्टी अमरापूरकरांनी लहानपणी केल्या. त्यांच्याकडे १०० शेळ्या होत्या. रोज त्यांना चरायला घेऊन जाण्याचं काम अमरापूरकर करत. शेत नांगरणं, शेतात खत टाकणं, ही कामंही ते करत.
पडद्यावरील खलनायक, सामाजिक क्षेत्रातील ‘नायक’
त्यांची एक आत्या आळंदीला राहायची. आषाढी कार्तिकीला पंढरपूरला वारीबरोबर पायी चालत जायची. अमरापूरकर तिच्यासोबत तीन-चार वेळा आळंदी ते पंढरपूर असे पायी चालत गेले. आळंदीला संतसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक सोनोपंत दांडेकर राहत. ते वारकरी संस्थेचे अध्यक्ष होते. ते कथा, प्रवचन करत, शिकवत. टाळ कसे वाजवायचे, कीर्तनाला उभं कसं राहायचं, कशी सुरुवात करायची, या गोष्टी अमरापूरकर त्यांच्याकडून शिकले.  
हा तर अनामिक, परमेश्वरी कार्याचा सत्कार!
अमरापूरकर यांना वाचनाची गोडी लागली ती त्यांच्या आजोळला, आष्टीला. त्यांना गोष्टी ऐकायला आवडायचं. मीना नावाची बहीण त्यांना पुस्तकातल्या गोष्टी वाचून दाखवायची. तिच्या मांडीवर डोकं ठेवून गोष्ट ऐकण्याचा त्यांना छंदच लागला होता. तिथं त्यांनी पहिलं पुस्तक ऐकलं ते ‘शामची आई’. साने गुरुजींच्या पुस्तकांनी त्यांना वाचनाची गोडी लावली, ती शेवटपर्यंत कायम होती. त्यांच्याकडे पाच ते सहा हजार पुस्तकं होती. ते रोज किमान तीन तास वाचन करत. मराठी-इंग्रजीतील नवनव्या पुस्तकांबाबतचं त्यांचं वाचन अतिशय अद्ययावत म्हणावं असं होतं. उदा. महाराष्ट्रात सेझचा प्रश्न गाजत होता, तेव्हा त्यावर एक कादंबरी आली होती. अमरापूरकरांनी ती लगेच मिळवून वाचली.
अमरापूरकरांचे जाणे
नगरलाच अहमदनगर एज्युकेशन सोसायटी नावाची न्या. रानडे यांनी बांधलेली शाळा आहे. अमरापूरकर तिचे विद्यार्थी. शालेय वयात ते अत्यंत हूड विद्यार्थी होते, पण क्रिकेट चांगले खेळायचे. पुढे महाविद्यालयात गेल्यावर क्रिकेट सुटलं आणि नाटक सुरू झालं. त्या दोन-चार वर्षांत मुंबईची प्रचंड नाटकं नगरला आली. त्या काळी मुलांना आठ आणे तिकीट होतं. अमरापूरकर प्रत्येक नाटक पाहायचे. त्या काळात त्यांनी प्रचंड नाटकं पाहिली.
चतुरस्र अभिनेता हरपला
महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते नगर महाविद्यालयात गेले. भालचंद्र नेमाडे, मधुकर तोरडमल हे प्राध्यापक त्यांना शिकवायचे. त्या दरम्यान त्यांच्या मित्रानं एकांकिका करायला सुरुवात केली होती. त्यात अमरापूरकरांना नोकराचं काम मिळालं; पण आयत्या वेळेला हिरोचं काम करणारा मुलगा निघून गेला आणि ती भूमिका त्यांच्याकडे आली. त्या एकांकिकेला आणि अमरापूरकरांना उत्तेजनार्थ दहा रुपयांचं बक्षीस मिळालं. ती – ‘पेटलेली अमावस्या’ – त्यांची पहिली एकांकिका.
त्यानंतर त्यांनी व्यावसायिक रंगभूमीवर ‘छिन्न’, ‘हँडसअप’, ‘काही स्वप्नं विकायचीयत’, ‘हवा अंधारा कवडसा’, ‘ज्याचा त्याचा विठोबा’ अशा विविध नाटकांत काम केलं.
अमरापूरकर यांचे वडील महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून काँग्रेसकडून निवडून गेलेले. शिवाय वडील एक अनाथ संस्था चालवत, शेतकी शाळा चालवत. मुलानं शिकून नोकरी करावी, अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. तरीही सुरुवातीला मुलगा नाटक करतोय म्हटल्यावर त्यांनी उत्तेजन दिलं; पण लग्न होऊन दोन मुलं झाली तरी अमरापूरकर नाटकच करत आहेत हे पाहिल्यावर मात्र त्यांनी विरोध करायला सुरुवात केली. वडील अमरापूरकरांना ‘नाच्या’ म्हणत. तरीही वडिलांचा विरोध पत्करत त्यांनी नाटकं करणं चालूच ठेवलं. या काळात त्यांच्या पत्नी, सुनंदा यांनी त्यांना खूपच खंबीरपणे साथ दिली. पदवीधर झाल्यावर अमरापूरकरांनी परभणीला ऑल इंडिया रेडिओवर उद्घोषक म्हणून नोकरीही करायला सुरुवात केली, पण ते वातावरण त्यांना मानवलं नाही. शिवाय आणीबाणीचा काळ. त्या वातावरणातील मुस्कटदाबीला कंटाळून त्या नोकरीचा त्यांनी सहा महिन्यांत राजीनामा दिला. नंतर ते नोकरीसाठी जातो आहे, असे सांगून पुण्याला नाटक करायला आले. तेव्हा घरची आघाडी सांभाळून सुनंदाताईंनी त्यांना प्रोत्साहन देण्याचं, त्यांची उमेद वाढवण्याचं मोठं काम केलं.
अमरापूरकर यांच्या निधनाने नगरकर व्यथित!
  ‘अर्धसत्य’मुळे अमरापूरकरांच्या जीवनात मोठा बदल झाला. मराठीतील शैलीदार कथालेखक श्री. दा. पानवलकर यांच्या ‘सूर्य’ या कथेवर गोविंद निहलानी यांनी विजय तेंडुलकर यांच्याकडून कथा-पटकथा लिहून घेऊन ‘अर्धसत्य’ हा चित्रपट १९८४ साली केला. त्यात रामा शेट्टीची छोटीशी भूमिका अमरापूरकर यांनी केली; पण त्यांच्या या छोटय़ा भूमिकेनं प्रचंड लोकप्रियता मिळवली. त्या संदर्भातील दोन किस्से रंजक आहेत.
या चित्रपटाचं शूटिंग संपल्यावर अमरापूरकर गावी नगरला गेले. त्यांच्या मोठय़ा भावाला बाहेरगावी जायचं असल्याने वडिलांनी त्यांना तोपर्यंत किराणा मालाचं दुकान सांभाळायला सांगितलं. दरम्यान ‘अर्धसत्य’च्या प्रीमिअरची तारीख जवळ आली. अमरापूरकरांनी त्याबाबत वडिलांना सांगितल्यावर ते म्हणाले, ‘‘तो मुंबईत आहे ना, तू दुकान सांभाळ.’’ त्यानंतर आठ-दहा दिवसांनी अमरापूरकर नगरहून एसटीने निघून पहाटे दादर बस स्टॅण्डला उतरले. तोवर ‘अर्धसत्य’मधील रामा शेट्टी मुंबईत सर्वाना माहीत झाला होता. त्यामुळे त्यांना पाहताच टॅक्सीवाल्यांनी त्यांच्याभोवती गलका केला. एकानं बळजबरीनं त्यांना टॅक्सीत बसवून त्यांच्याकडून पैसेही न घेता त्यांना घरी सोडलं.
‘अर्धसत्य’च्या कथेचे मूळ लेखक श्री. दा. पानवलकर यांनी या चित्रपटाविषयी ‘शूटिंग’ (१९८५) या नावाने एक पुस्तक लिहिले आहे. त्यात त्यांनी ओम पुरी आणि अमरापूरकर यांच्या समोरासमोरच्या दृश्याविषयी लिहिले आहे – ‘‘इथं सदाशिव अमरापूरकरांचा रामा शेट्टी फार समजदारीनं संवादांतील सम खटकन पकडतो. हे सगळं दृश्य सदाशिव अमरापूरकर यांनी विनासायास अभिनयानं झक्कास तोलून धरलं. फिल्मी दुनियेत हे त्यांचं पदार्पण, पण ‘वामना’च्या पहिल्या पावलासारखं नेमकं आणि भक्कम.’’
त्या एवढय़ा भूमिकेवरून अमरापूरकरांना १८० चित्रपटांच्या ऑफर आल्या. त्यांची तुलना अमरीश पुरीशी केली गेली.
त्यानंतर आजतागायत त्यांनी ४५० हून अधिक हिंदी चित्रपटांत आणि ७०-८० मराठी चित्रपटांत भूमिका केल्या. याशिवाय भोजपुरी, गुजराती, बंगाली, उडिया चित्रपटांमध्ये काम केलं. अमरापूरकरांनी अमान जलाल यांच्या मालिकेत लोकमान्य टिळकांची छोटीशी भूमिका करून रुपेरी कारकीर्द सुरू केली, तर ‘राज से स्वराज तक’ या मालिकेत टिळकांची मोठी भूमिका केली. श्याम बेनेगल यांच्या ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’तील म. फुले आणि ‘सडक’, ‘हुकूमत’, ‘ऐलान-ए-जंग’ या चित्रपटांतील खलनायकाच्या भूमिका त्यांना स्वत:लाही आवडलेल्या होत्या, तर मराठीतील सुमित्रा भावे यांच्या ‘वास्तुपुरुष’मधील भूमिका त्यांना सर्वात आव्हानात्मक वाटली होती.
अमरापूरकरांनी ‘कन्यादान’सारख्या काही नाटकांचं दिग्दर्शनही केलं. त्याचबरोबर ‘किमयागार’ हे नाटकही लिहिलं. वयाच्या सहाव्या वर्षी, श्रवण-दृष्टी-वाचा हरवून बसलेल्या हेलन केलर या अमेरिकी मुलीला तिची शिक्षिका अ‍ॅनी सुलेवान यांच्या अथक प्रयत्नांनी भाषा सापडते आणि तिच्या आयुष्यात मोठं परिवर्तन घडून येतं. त्या दोघींच्या आयुष्यावर पुढे याच नावानं एक नाटक अमेरिकन रंगभूमीवर आलं. त्याचं ‘किमयागार’ असं अगदी अचूक मराठीकरण वि. वा. शिरवाडकर आणि सदाशिव अमरापूरकर या लेखकद्वयांनी केलं. या दोघांचं नाव लेखक म्हणून या नाटकाला असलं तरी हे नाटक पूर्णपणे अमरापूरकरांनी लिहिलं आहे. शिरवाडकरांनी काही सुधारणा व थोडेफार बदल केले आहेत.
रिचर्ड बोलेस्लाव्हस्की यांच्या ‘अ‍ॅक्टिंग – द फर्स्ट सिक्स लेसन्स’ या पुस्तकावर आधारित सदाशिव अमरापूरकर आणि आनंद विनायक जातेगांवकर यांनी ‘अभिनयाचे प्राथमिक सहा पाठ’ हे पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकावर काहीशी टीका झाली असली तरी अशा प्रकारचं हे मराठीतील पहिलंच पुस्तक आहे. आनंद पटवर्धन यांच्या ‘वॉर अ‍ॅण्ड पीस’ या लघुपटावरील त्यांचा लेख बराच गाजला होता.
सामाजिक जाणिवेतून सार्वजनिक जीवनात कार्यरत असलेल्या संस्था-संघटनांशीही अमरापूरकर संबंधित होते. सामाजिक कृतज्ञता निधीसाठी झालेल्या ‘लग्नाच्या बेडी’ या नाटक संचात ते होते. मेधा पाटकरांच्या नर्मदा आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता. वध्र्याच्या गांधी आश्रमात ते नेहमी जात. अभय बंग, बाबा आढाव, नरेंद्र दाभोलकर यांच्याशीही त्यांचे चांगले संबंध होते.
अमरापूरकरांना अनेक गोष्टींविषयी उत्सुकता असे. वाचन तर ते सततच करत; पण ते पेन्सिल स्केचिंगही चांगल्या प्रकारे करत. शूटिंगदरम्यानच्या काळात वेळ मिळेल तेव्हा ते वाचन किंवा पेन्सिल स्केचिंग करत असत. एकदा त्यांना जपानी लेखक मासानोबु फुकुयोका यांचं ‘एका काडातून क्रांती’ हे नैसर्गिक शेतीविषयीचं पुस्तक मिळालं. ते वाचून अमरापूरकर भारावून गेले. त्यांनी पुण्यात सिंहगडाच्या पायथ्याजवळ अर्धा एकर शेत विकत घेतलं. तिथं नैसर्गिक पद्धतीची शेती करायचा प्रयत्न केला. त्या शेताच्या आजूबाजूला त्यांनी किती तरी झाडं लावली. सुरुवातीची तीन र्वष त्यांचं पीक जळून गेलं. एकदा त्यांनी भुईमूग पेरला. त्या वर्षी किती तरी पोती भुईमूग झाला.
अमरापूरकरांनी खलनायकी भूमिका चित्रपटांतून केल्या असल्या तरी त्यांच्यातला माणूस अतिशय संवेदनशील, हळुवार होता. फिल्मी दुनियेत राहून ते तिथे कधी रमले नाहीत. ते रमायचे वाचनात, नाही तर शेतात.

सेलिब्रेटी कलाकार ते सामाजिक कार्यकर्ता!
बॉलिवूडमधील कलाकार अशी ओळख असलेल्या अमरापूरकर यांची ओळख ‘सोलिब्रेटी कलाकार ते सामाजिक कार्यकर्ता’ अशी होती. त्यांनी कलाकार असूनही आपल्यातील सामाजिक भान कायम जपले होते. अन्यायाच्या विरोधात आवाज उठवायला ते मागेपुढे पाहात नसत. गेल्यावर्षी धुळवडीच्या दिवशी पाण्याची नाहक उधळपट्टी करणाऱ्यांच्या विरोधात त्यांनी आवाज उठविला होता. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्या सामाजिक चळवळ, ‘सामाजिक कृतज्ञता निधी’उपक्रमातही ते सहभागी झाले होते.

Liquor and fish stocks seized in Bhayander news
मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरवात; भाईंदरमध्ये मद्य आणि मासळाची साठा जप्त
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Nishigandha Wad
हिंदी मालिकेच्या सेटवर निशिगंधा वाड यांचा अपघात; तातडीने रुग्णालयात केलं दाखल
Loksatta padsad lokrang readers reaction on article
पडसाद : त्यांच्याविषयी कुतूहल
like aani subscribe movie on OTT
अमृता खानविलकर-अमेय वाघचा ‘लाईक आणि सबस्क्राईब’ चित्रपट OTT वर प्रदर्शित
Rakul Preet Singh opens up about her diet
हळदीच्या पाण्याचे सेवन अन् दुपारच्या जेवणात…; रकुल प्रीत सिंगने सांगितला तिचा डाएट प्लॅन; म्हणाली, “रात्रीचे जेवण…”
article about journey of author subodh kulkarni as a content writer
चौकट मोडताना : ‘कंटेन्ट रायटर’पर्यंतचा मुलाचा प्रवास
Anupam Kher still lives in rented house
४० वर्षांपासून बॉलीवूडमध्ये काम करणारा अभिनेता राहतो भाड्याच्या घरात; म्हणाला, “कोणासाठी घ्यायचं?”

अहमदनगर ते मुंबई
अमरापूरकर यांचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण अहमदनगर येथे झाले. कुटंब आणि मित्र परिवारामध्ये ते ‘तात्या’ या टोपणनावाने ओळखले जात. महाविद्यालयात असतानाच त्यांना अभिनयाची गोडी लागली. पुढे पुणे विद्यापीठातून एमए ची पदवी प्राप्त केल्यानंतर ते रंगभूमीकडे वळले. राज्य नाटय़ स्पर्धेत ‘काही स्वप्न विकायचीयेत’ या नाटकाचे दिग्दर्शन त्यांनी केले होते. या नाटकात शिक्षकाची भूमिकाही त्यांनी केली होती. धि गोवा हिंदूू असोसिएशन आणि इंडियन नॅशनल थिएटरच्या मराठी विभागाचे कामही त्यांनी काही काळ पाहिले होते.